संगमनेरच्या दुधगंगा पतसंस्थेत अफरातफर? पतसंस्थेला टाळे, संचालकाचा राजिनामा, राजकीय नेत्यांना पळताभुई..!!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेर शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेत मॅनेजरने कोट्यावधीचा अपहार केल्यानंतर आता पुन्हा शहरातील दुधगंगा पतसंस्थेतील मॅनेजरने अफरातफर केल्याचा संशय खुद्द संस्थेच्या चेअरमनने केला आहे. ही तक्रार 13 जुलै 2022 रोजी जिल्हा निबंधक कार्यलय अहमदनगर व सहाय्यक उपनिबंधक कार्यलय संगमनेर येथे केली आहे. या अर्जात म्हणले आहे की, सन 2017 ते 2022 या कालावधीत संस्थेचे ऑडीट झाले. या ऑडीट मध्ये संस्थेचे मॅनेजर भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ व त्यांच्या नियंत्रणाखाली काही कर्मचारी यांनी संस्थेमध्ये अफरातफर केल्याचे दिसुन आले आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात व जिल्हानिबंधक कार्यलय व सहाय्यक निबंध कार्यलय येथे तक्रार केलेली आहे. आता या तक्रारी नंतर ठेवीदारांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. कारण, कालपर्यंत चालु असलेल्या पतसंस्थेला काल अचानक टाळे लागल्याने ठेवीदारांनी पतसंस्थेच्या परिसरात एकच गर्दी केली. 

   दरम्यान पतसंस्था का बंद आहे याची कोणत्याही कारणांची पाटी बाहेरील बाजुस दिसत नव्हती. कालपर्यंत उपनिबंधक कार्यलयाला काहीच माहीत नव्हते. आज अचानक नगरहून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचे पत्र संगमनेरातील उपनिबंधक कार्यलयात आले एका दिवसात कारवाईची दखल घेऊन काल पर्यंत काहीच माहीत नसलेल्या कार्यलयात आज अचानक पत्र आल्याचे समजते. त्यावरून पतसंस्थेला व शाखांना काही कालावधी करता बंद करण्यात आल्या. यावरून या संस्थेत किती मातब्बर राजकीय लोक आहेत हे दिसते. राजकीय वलयात असलेल्या या पतसंस्थेला आता मात्र, ग्रहण लागल्याचे दिसते. आता हा घोटाळा आहे का? असेल तर किती मोठा आहे? यामध्ये किती जण सामील आहे? मॅनेजरला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का ?असे नाना प्रश्न संगमनेरातील सुज्ञ लोकांनी उपस्थित केले आहे. 

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेरातील दुधगंगा ही पतसंस्था अतिशय नावाजलेल्या पतसंस्थेमधील एक आहे. या पतसंस्थेतील चेअरमनने 13 जुलै 2022 रोजी संस्थेतील मॅनेजरने व त्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी अफरातफर केल्याची तक्रार पोलीस ठाण्यासह जिल्हा उपनिबंधक कार्यलयात व सहाय्यक उपनिबंधक कार्यलयात केली आहे. पण, ही बातमी ठेवीदारांमध्ये पसरल्यामुळे असुरक्षतेची व भीतीची भावना ठेवीदारांमध्ये तयार झाली असुन ठेवीदार संस्थेमध्ये येवुन त्यांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर काढुन नेत आहे. त्यामुळे, पतसंस्था ठेवीदारांना आजच्या मितीस ठेवीच्या रक्कमा देण्यास असमर्थ आहे. संस्थेने मोठ्या स्वरूपात कर्ज वाटप केले आहे. परंतु संस्थेकडे कर्जाच्या वसुल आज रोजी वसुल होत नसल्याने संस्थेकडे रोख स्वरूपात निधी उपलब्ध नाही. मात्र, संस्था कर्ज वसुल करून ठेवीदारांच्या  सर्व ठेविदेण्यास समर्थ आहे. पण, पतसंस्थेत कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने संस्था व शाखा काही कालावधी करता बंद ठेवण्यात आल्या आहेत असा अर्ज सहाय्यक उपनिबंधक कार्यलयात आला आहे. दरम्यान, या संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा 2020 साली माझ्या वैयक्तिक कारणामुळे दिले असल्याचा खुलासा संस्थेचे संचालक नवनाथ अरगडे यांनी माध्यमांना दिला आहे. त्यामुळे, मी गेल्याकाही वर्षांपासुन संचालक म्हणुन कार्यरत नसल्याने माझा या संस्थेशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे.  


         दरम्यान, ग्रामीण भागातील काही राजकीय लोक मोठ्या गोंडस नावाने पतसंस्था खोलतात. मोठे होण्यासाठी तेथील मोठ्या रक्कमा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. एक वेळ अशी येते की, कुंपनच शेत खाऊ लागतात. तेव्हा घशात घातलेल्या रकमांचा ताळमेळ लागत नाही. नंतर डोईजड झालेली आकडे पाहुन मी नाही केले अशी री ओढत संचालक मंडळ नकाराचा पाढा वाचतात. मात्र, शेतकरी, मजुर, कामगार व्यापारी हे आपल्या घामाचे पैसे मोठ्या आशेने तेथे ठेवतात. आणि नंतर घोटाळे, अपहार, फसवणुका झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळु सरकते. त्यामुळे, पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगली पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरालगतची धनगंगा या पतसंस्थेत देखील कोट्यावधीचा घोटाळा झाला. तेथील मॅनेजरने देखील आख्खी पतसंस्था स्वतःच्या घशात घातली. या पतसंस्थेतील चेअरमनसह व्यवस्थापकाला दहा वर्षे तर चौदा संचालकांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. पण, आजही त्यात ज्या शेतकऱ्यांचे पैसे आहे ते अक्षरशः रडत आहेत.