तोंडाच्या भांडवलाने वास्तव कधी दडपत नाही.! कारखान्याला 67 कोटी, साहेब.! कडेलोट आणि बदनाम केलेला कारखाना पुन्हा सुरू झाला बरं का.!

 


  - सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :- 

     गेली दोन वर्षे होत आले, कारखाना बंद होणार, तो कडेलोटाच्या उंबर्‍यावर आहे, उद्याचा गळीत हंगाम होणार नाही, कारखाना कर्जात बुडाला आहे, तो व्हेंटीलेटवर आहे, मोक्कार भ्रष्टाचार झाला आहे, चौकशी चालु आहे, सगळे जेलमध्ये जाणार आहे. बाप रे.! काय ते फोन, काय त्या चौकशा काय ते आरोप अन काय तो अपप्रचार.! पण, भाग्यलक्ष्मीचं कसे एकमद ओकेमध्ये आहे. कोणामुळे? तर, केवळ ज्या गायकरांच्या नावाने खडे फोडले. ज्या समृद्धी मंडळाची निंदा नालस्ती केली, त्यांच्यामुळे.! वेळ आली तर आम्ही आमच्या नावे कर्ज काढू म्हणणारे का तत्काळ पुढे आले नाही? कारखान्याच्या हितासाठी का हायकोर्टात गेले नाही. पण, तोंडाच्या भांडवलापेक्षा वास्तव कधी दडपत नाही. हेच खरे आहे.! जेव्हा संपुर्ण तालुका, मी-मी म्हणणारे, परिवर्तनाचे तोतया वाटसरु आणि चेअरमन साहेब सुद्धा गाढ झोपेत होते. तेव्हा भर पावसात रात्रीचा दिवस करुन पहाटे 3 वाजता गायकर साहेब औरंगाबाद हायकोर्टाच्या पायरीवर बसलेले होते. हे कौतुक नाही मित्रांनो.! कर्तुत्व आहे. नाही लागला निकाल म्हणून रडले नाही, रखडले नाही. चालते झाले आणि पुढील गळीत हंगामासाठी 67 कोटी रुपयांची तरतुद केली. त्यांनी इतरांप्रमाणे उटाहून शेळ्या वळल्या असत्या तर आज शंभर टक्के कारखाना बंद पडला असता. त्यामुळे, आता बहुजन नेता म्हणजे काय? हा प्रश्न विचारताना स्वत:चे सामाजिक योगदान काय? याचे आत्मचिंतन करा..!!

प्रसिद्धीसाठी उत्तम पर्याय..!

खरंतर निवडणुका म्हटलं की त्यात आरोप प्रत्यारोप होतच असतात. मात्र, अकोल्याच्या राजकारणात भाषेचा प्रचंड स्तर ढासाळला आहे. अर्थात का नाही ढासाळावा? ज्यांना आपण तालुक्याचे जेष्ठ म्हणतो, ज्यांना आपण उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणतो त्यांचे वागणे, बोलणे, त्यांच्या भाषा, त्यांचे चेलेचपाटे यांच्याकडे पाहिल्यानंतर तालुका खरोखर भ्रमिष्ट होत चाललाय का? असा प्रश्न निर्माण होतो. पण, एक मात्र नक्की.! ज्यांना नव्याने राजकारणात यायचे आहे, ज्यांना राजकीय स्थैर्य मिळवायचे आहे. ज्यांना प्रसिद्धी हवी आहे किंवा झोतात तथा चर्चेत रहायचे आहे त्यांनी थेट सिताराम पाटील गायकर यांच्यावर टिका टिप्पण्णी करायची. नको त्या थरावर जाऊन भाषा वापरायच्या आणि इतक्या थडक्लास लेवलला जायचे की.! अक्षरश: व्यक्तीद्वेषापोटी प्रतिकात्मक वस्त्रहरणाच्या मिरवणुका काढण्याइतपत कृत्य करायचे. म्हणजे, आजकाल प्रसिद्धी झोतात येण्याचा हा भारी फंडा पुढे आला आहे. गेल्या दोन वर्षापासून गायकर नाव हे इतके अजेंड्यावर आले आहे. की, व्यासपिठ आणि गायकर हे एकाच नान्याच्या दोन बाजु झाल्या आहेत.!! मात्र, तरी देखील येथील संस्था टिकल्या पाहिजे. शेतकर्‍यांकडे खेळते भांडवल राहिले पाहिजे, तालुक्याची बाजारपेठ खेळती राहिले पाहिजे म्हणून सातत्याने हा व्यक्ती पळतो आहे. येथील जनतेला त्यांची किंमत नाही असे बिल्कुल म्हणता येणार नाही. पण, त्यांच्याच काही जवळच्यांना किंमत नाही असे म्हटल्यास काही वावघे ठरणार नाही.!!

पतसंस्थेनंतर कारखान्याची चौकशी..! 

या अकोले तालुक्यात अद्याप कोणाला इडीची नोटीस काय.! इनकम टॅक्सची चौकशी देखील झाली नाही. गेल्या 50 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळे त्यांची विचारसारणी डावी होती. पुरोगामीत्वाला साजेशे वर्तन होते. पण, जसे तालुक्यात भाजपाचे बळ वाढले. तसे वान नव्हे.! पण अनेकांना गुण लागला. कोणी इडीची धमकी देतय, कोणी पत्रकारांच्या तक्रारी करतय, तर कोणी पतसंस्थांच्या चौकशी लावतय. काय हा घाणेरडा प्रकार? 2014 ते 2019 हा भाजपामय फाईल ओपनिंगचा काळ होता. त्यात अकोल्यासह कोणाकोणाचे बळी गेले हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. परंतु, दुर्दैव असे की, तोच फंडा अकोल्यात वापरला जाऊ लागला आहे. आपच्याकडे येतो की नाही? कि खोलु फाईल अन लावू चौकशी? असे म्हणून तर अगदी जाणिवपुर्वक तिन्ही राजकारणी व्यक्तींच्या पतसंस्थांच्या चौकशा लावल्या आहेत. का? तर केवळ दुधसंघाचा ठराव होऊ दिला नाही म्हणून.!! आता काही व्यक्तींना अगस्ति कारखान्याची चौकशी लावली आहे, त्यात निवडणुकीपुर्वी चेअरमन दोषी होते. मात्र, नंतर त्यांना शुद्धपत्र देण्यात आले आणि व्हा-चेअरमन भ्रष्टाचारी असा नवखा शोध काही अभ्यासू व ज्येष्ठांनी लावला आहे. आता येणार्‍या काळात भाजपाकडून कारखान्याची चौकशी, मग नोटीसा, मग ब्लॅकमेलिंग असले प्रकार सुरू झाले. तर, नवल वाटण्याचे काही कारण नाही. 

तस्विर बदलनी चाहाये.!

कोणी कितीही बदनामी केली, कोणी कसाही अपप्रचार केला, अफवा पसरविल्या. तरी काही झाल्यास आम्ही कारखाना बंद पडू देणार नाही. असे अभिवचन डॉ. किरण लहामटे, सिताराम पा. गायकर, अशोकराव भांगरे, मधुभाऊ नवले, अमितराव भांगरे, विजय वाकचौरे, डॉ. अजित नवले, सुशांत आरोटे, शांताराम वाळुंज, मारुती मेंगाळ यांच्यासह अनेकांनी दिले होते. आज खर्‍या अर्थाने ते सत्यात उतलले आहे. कारण, बोलणार्‍यांनी काय केले? नवे चेहरे हा टेंभा गावभर पिटविला. मग त्या चेहर्‍यांनी काय योगदान दिले? याचे आत्मचिंतन केले पाहिजे. व्यक्तीप्रेम हा नंतरचा विषय आहे. परंतु, खरोखर कारखाना कोण चालवू शकतो? हे तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे. उगच उर बडविण्यापेक्षा भाग्यलक्ष्मीचा विचार केला पाहिजे असे प्रांजळ मत अनेकांनी व्यक्त केले आहे. आज समृद्धी मंडळाने जिल्हा बँकेकडून 67 कोटी रुपये मंजुर केले आहे. यानंतर प्लेजसारखे अन्य कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, येथे एक वाक्य शंभर टक्के लागु होते. सिर्फ हंगामा खडा करणा हमारा मक्सद नही.! हमारी कोशीश हैं.! की, यह सुरत बदलनी चहिऐं.! खरोखर अगस्ति समृद्ध व्हवा, ज्यांना शक्य नाही त्यांनी तोडाच्या वाफा दवडण्यापेक्षा आणि हंगामा खडा करण्यापेक्षा जो केला आहे तो सुरळीत करण्यासाठी शांत बसून मदत केली पाहिजे असेच सुज्ञ व्यक्तींचे मत आहे.