अरेच्चा.! संगमनेरात कापड व्यापाऱ्याला तब्बल अर्धा कोटीचा गंडा.! जागा एकाची अन विकली भलत्याला, कर्ज काढलं पण बोजा शुन्य.! गुन्हा दाखल...
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील नेहरू चौक येथे सिटी सर्वे नं. 2741 या सर्वे नंबर वरील 14 चौ. मीटर या जागेवर कर्ज काढुन त्याची उताऱ्यावर कुठली कर्ज बोज्याची नोंद जाणीवपूर्वक करून न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका प्रतिष्ठित कापड उद्योजकास 51 लाख 51 हजार रुपयास फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना दि.20 फेब्रुवारी 2020 रोजीच्या दरम्यान घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जतीन जोगींद्र बत्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्याम सोमनाथ माळवे (रा. जोर्वे. ता. संगमनेर)यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी मात्र पसार झाला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी जतीन बत्रा यांचे कोहिनुर कपड्याचे दुकान आहे. डिसेंबर 2019 मध्ये त्यांची ओळख जोर्वे गावातील दिगंबर भाऊसाहेब काकड यांच्याशी झाली. या ओळखीतुन फिर्यादीच्या कापड दुकाना शेजारी आमच्या जोर्वे गावातील आरोपी श्याम माळवे यांचे दुकान विक्री करीता आहे असे फिर्यादीला सांगितले. फिर्यादीने व्यवसाय वाढविण्यासाठी हे दुकान आपण घेऊ अशी चर्चा केली. त्यानंतर, आरोपी श्याम माळवे व दिगंबर काकड हे दुकानाचा व्यवहार करण्यासाठी फिर्यादी व कुटुंबातील सदस्यांसोबत बसले. यामध्ये दुकानाचा जागेसह व्यवहार 51 लाख 51 हजार रुपयांना ठरला. त्याच दिवशी फिर्यादीने मिळकत नं. 2 हजार 741 पैकी 14 चौ. मीटरचे विसार म्हणुन 1 लाख 51 हजार रुपये चेक द्वारे विसार देऊन कागदपत्रावर नोटरी केली. त्यानंतर फिर्यादीने ओळखीच्या वकीलांकडून 14 फेब्रुवारी 2020 रोजी सर्च रिपोर्ट देखील घेतला. त्यावर कुठलेही प्रकारचे कर्ज आढळुन आले नाही.
दरम्यान, या दुकानाच्या जागेवर कुठले कर्ज नसल्याने फिर्यादीने शासकीय मूल्यांकाप्रमाणे 8 लाख 60 हजार रुपये चेक द्वारे देऊन दुय्यय निबंधका समोर खरेदीखत करून घेतले. त्यानंतर, अचानक ऑक्टोबर 2021 रोजी कॅपरी ग्लोबल कॅपीटल लि. श्रीरामपूर या कंपनीचे अधिकारी दुकानावर आले.तुम्ही या दुकानाच्या जागेचा व्यवहार कसा केला असा प्रश्न करू लागले. या जागेवर कर्ज आहे याचे दुकानाच्या जागेचे कागदापत्र देखील आमच्याकडे आहे. येवढे बोलुन त्यांनी दुकानाला नोटीस लावुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादीने आरोपी श्याम माळवे याना फोन केला असता या कंपनीचे कर्ज मिटवतो असे सांगितले. त्यानंतर कॅपरी कंपनीने पुन्हा दुसरी नोटीस जानेवारी 2022 मध्ये फिर्यादीच्या नावावर झालेल्या दुकानावर लावली. सदर कॅपरी कंपनीचा व्यवहार आरोपी श्याम माळवे यांनी पूर्ण केला नाही. फिर्यादीने वेळोवेळी फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. 2741या मिळकत नंबरवर 14 चौ. मीटर दुकानासह जागेवर कर्ज असताना देखील फिर्यादीला अंधारात ठेऊन 8 लाख 60 हजार रुपयांचे चेक घेऊन 51 लाख 51 हजार रुपयांचा व्यवहार केला. येवढी मोठी फसवणुक झाल्यानंतर फिर्यादी जतीन बत्रा यांनी थेट पोलीस ठाणे गाठवुन सर्व हकीगत कथन केली असता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात श्याम सोमनाथ माळवे याच्यावरीरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक सुज्ञ व कर्तव्य जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की, कोणतीही जागा खरेदी करण्याआधी सदर जागेबाबत पूर्ण माहिती घ्यावी. एखाद्या वकील महोदयांमार्फत सदर जमीन मिळकतीचा टायटल सर्च रिपोर्ट म्हणजेच शोध अहवाल घ्यावा व मगच जमीन खरेदी करावी. यासाठी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट मध्ये 'कॅव्हेट एम्पटर' नावाचे तत्व देखील आहे. ही बाब मा.सर्वोच्च न्यायालयाने व विविध उच्च न्यायालयांनी वेळोवेळी वेगवेगळ्या न्यायनिर्णयांमधून अधोरेखीत केलेली आहे. परंतु मिळकत खरेदी करणाऱ्याने असा सर्च रिपोर्ट घेऊन देखील त्याची फसवणूक होत असेल तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याखेरीज खरेदीदाराकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. म्हणुन प्रथमदर्शनी भा.दं.वि. कलम ४२० अन्वये फसवणूक झालेली दिसून येते. सबब पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केलेली बाब योग्य व कायदेशीर आहे. त्यामुळे, असे कोणतेही व्यवहार करताना सुजान नागरिकांनी या काळात सावध राहणे गरजेचे आहे.
_ अॅड.सुशांत कवडे