पिचडांना भाजपचा वान नव्हे, पण गुण लागला.! इडीच्या धमक्या आणि पतसंस्थांच्या चौकशा.! मी पणापाई यांनी 2002 ला कारखान्याचं वाटोळं केलं.!

 

                                    संग्रही फोटो

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

        जेव्हा आम्ही अगस्ति कारखान्याचा राजिनामा दिला. तेव्हा पिचड साहेबांना विशेष सभा घेऊन विनंती केली होती. आम्ही सक्षम असलो तरी आम्हाला सहकार्य करण्याची भावना तुमची नाही. त्यामुळे, आमच्या विरोधात असहकाराचे राजकारण करण्यापेक्षा तुम्ही कारखाना चालवा. परंतु, तो बंद पडू देऊ नका. तेव्हा पिचड साहेबांनी आमचे ऐकले नाही. उलट ते जेव्हा-जेव्हा मिटींग असे तेव्हा गैरहजेरीचा अर्ज पाठवून देत असे. त्यामुळे आमच्या काळात त्यांनी एकदा देखील त्यांनी डोकावून पाहिले नाही. उलट मी नाही तर कारखाना कसा चालतो हे दाखविण्यात त्यांनी धन्यता मानली. ते मंत्री असताना देखील ऐनवेळी कारखाना बंद पडला. त्याचे राजकीय महत्व वाढवून घेण्यात ते यशस्वी झाले. खरे.! मात्र, त्यात तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले. 2 लाख 25 हजार मेट्रीक टन उस शेतकर्‍यांच्या काळजावर धडकी देऊन शेतात डौलत उभा होता. मात्र, पिचड साहेबांना तालुक्याची किव आली नाही. साहेबांनी त्यांचा ऊस दिलीपराव वळसे पाटील यांच्या भिमाशंकर कारखान्याला दिला. आता ते मंत्रीमंडळातील सहकारी होते. त्यामुळे, वाजत गाजत उस गेला. पण, छोटे शेतकरी आणि जे अन्य कोठे सभासद नव्हते. त्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना संगमनेर आणि लोणी यांच्या पाया पडण्याची वेळ आली तर गेटकेनच्या भावात हा ऊस गेला. इतकेच काय.! जर साहेबांनी सर्व रोष सोडून कारखाना सुरू केला असता तर तेव्हा अडिच कोटीच्या आसपास रक्कम ही मशिन, पत्रे आणि अन्य डागडूजीसाठी खर्च करण्याची वेळ आली. कर्मचार्‍यांचे प्रचंड हाल झाले, काहींच्या चुल्ही पेटल्या नाही. काही कर्मचार्‍यांच्या घरातील महिला लोकांच्या बांधावर रोजगार शोधत होत्या. तर, दोन वर्षे भांडवल नसल्यामुळे अकोल्याची बाजारपेठ पुर्णपणे ठप्प झाली होती. याला जबाबदार कोण आहे? तर, अर्थातच पिचड साहेब आहेत. मी नाही तर संस्था नाही हे द्वेष त्यांनी बाळगला. तो कोणाच्या जिवावर? तर बेशक राष्ट्रवादी तथा शरद पवार यांच्या बळावर. त्यामुळे, पवार कुटुंब आता तालुक्याच्या पाठीशी उभे आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर.! ह्या म्हणीची प्रचिती आज आम्हाला येऊ लागली आहे. 

तो दिवस मला अजुनही चांगला आठवतो आहे. दि. 22 ऑगस्ट 2003 साली आम्ही अगस्ति सहकारी साखर कारखान्याची विशेष सभा बोलावून मी (प्रकाश मालुंजकर) व गुलाबराव शेवाळे (व्हा-चेअरमन) यांनी कारखान्याचा राजिनामा दिला. अर्थात आम्ही सक्षम होतो, पण पिचड साहेबांच्या राजकीय गणिम काव्यापुढे हतबल झालो होतो. पण. तरी देखील कारखान्यावर प्रशासकाची नेमणुक करु नये. साहेबांनी कारखाना चालवावा अशी विनंती होती. मात्र, बहुजनांच्या हाती हतबलता सोडून काही नव्हते. कारण, साहेब राज्यात मंत्री होते. त्यांनी कोतुळचे बी.जे.देशमुख यांचे बंधु राजेंद्रजी देशमुख यांना कारखान्यावर प्रशासक म्हणून बसविले. त्यांच्यासोबत प्रादेशीक सहसंचालक नगर येथून आर.जे.डी व आणखी एक सहकार खात्याचे अधिकारी अशा तिघांचे मंडळ नियुक्त केले. दुर्दैवाने सांगावेसे वाटते. की, जे बी.जे देशमुख आज कारखाना कडेलोटावर आहे. तो बंद पडणार आहे, त्याच्यावर कर्ज आहे असे सांगून परिवर्तनाची भाषा करीत आहेत. त्यांचे बंधू राजेंद्र देशमुख यांनी तेव्हा कारखाना चालु ठेवण्यासाठी प्रयत्न केले असते. तर, कारखाना बंदची नामुष्की ओढवली नसती. आता कारखाना पिचड साहेबांना चालु करायचा होता की नाही? त्यांनी देशमुख यांना काय सांगितले होते देव जाणे.! पण, बी.जे. देशमुख यांचे सख्खे बंधु यांनी कारखाना चालु करण्यासाठी कोणताही पत्रव्यावहार केला नाही. कोणत्याही बँकेकडे कर्ज मागणी केली नाही. आपल्या तालुक्याचा भुमिपुत्र असून देखील त्यांनी तालुक्याची भाग्यलक्ष्मी टिकविण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ डिझेल भरून कारखान्याच्या गाड्या फिरवायच्या आणि तिघांचे पगार वेळच्या-वेळी आपापल्या खात्यावर वर्ग करून घ्यायचे. हे काम चोखपणे पार पडले. परंतु, दोन वर्षे कारखाना बंद राहिला, मशिनरी गंजून गेली. पत्रे फुटून गेले, कारखान्यावर गवत माजले, वस्तुंच्या नासधूस झाल्या. मात्र, कारखान्यावर कोणताही प्रगती झाली नाही. आता त्याला पिचड साहेब जबाबदार की तिघांचे मंडळ हे जनतेने ठरविले पाहिजे. परंतु, ही गोष्ट अशी झाली की, लोक सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण.!!

पुढे 2005-6 साली कारखान्यात सहमती एक्सप्रेस नावाचा प्रकार सुरू झाला. तेव्हा पिचड साहेबांनी सर्वपक्षीय पॅनल बनविला. तेव्हा देखील 11-11 संचालक मंडळ घेण्यात आले होते. मात्र, आता कोणी चाळचुळ करतील अशी परिस्थिती साहेबांनी पुर्वीच करुन ठेवली होती. त्यावेळी, पुन्हा पिचड साहेब चेअरमन आणि प्रकाश नवले हे व्हा. चेअरमन झाले. तेव्हा कारखाना पाऊसामुळे बर्‍यापैकी गंजुन गेला होता. पत्रे फुटले होते. काही मशिन बिघडल्या होत्या, काही ठिकाणी तडे गेले होते. दोन वर्षे विजबिल थकले होते. त्यावेळी जयंत पाटील हे उर्जामंत्री होते. तेव्हा मिनानाथ पांडे आणि जनरल मॅनेजर यांनी त्याचा पाठपुरावा केला. हाप्ते पाडून बिलाची तजबिज दिलीपराव वळसे पाटील यांनी केली. तर त्यावेळी जवळ-जवळ 850 कर्मचारी कामावर नव्हते, पगार नसल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले होते. उसतोड कामगारांची लाईन पुर्णपणे विस्कळीत झाली होती. शेतकर्‍यांचा कारखान्याहून विश्वास उडाला होता, लेबर कामावर येत नव्हते. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. की, काही लोक उस असून देखील आपल्या कारखान्याला देत नव्हते. इतकेच काय.! अकोले तालुक्यातील सर्व बाजारपेठा सुन्न झाल्या होत्या. हे कशाचे द्योतक होते? तर पिचड साहेबांनी जो अट्टाहास केला होता. त्यामुळे, ही परिस्थिती ओढावली होती. यातून सावरता-सावरता तीन ते चार गळीत हंगाम निघुन गेले होते. तुम्हाला आकडेवारी देऊन सांगतो. की, आम्ही कारखाना चालवत होतो तेव्हा 2 लाख 46 हजार मेट्रीक टन ऊसाचे गळीत केले होते. तर, 2005-6 साली कारखाना सुरू झाल्यानंतर फक्त दिड लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. या सर्व गोष्टीला केवळ साहेबांचा मीपणा कारणीभूत होता. तेव्हा, आजकाल आ.डॉ. किरण लहामटे म्हणाले कारखाना बंद पडला तर पिचड साहेेबांना काही फरक पडणार नाही. ते निघुन जातील भिवंडीला, त्यांचा ऊस जाईल नाशिकला. मग येथील शेतकर्‍यांनी करायचे काय?

त्यावेळी कारखाना बंद पडल्यामुळे, तालुक्यावर मोठी नामुष्की ओढवली होती. बँका पैसे देत नव्हत्या, कारखान्याला तर किमान चार पाच कोटी रुपयांची गरज होती. तेव्हा पिचड साहेबांनी एमएससी बँकेतून केवळ 2 कोटी 51 लाख रुपये कसेबसे आणले. मग बाकी पैसे कोठून व कसे आणायचे? म्हणून 1 कोटी बडोदा बँकेतून 50 लाख सिताराम पाटील गायकर यांच्या पतसंस्थेतून 2 लाख विठ्ठल चासकर यांच्या पतसंस्थेतून 10 लाख भाऊपाटील नवले यांच्या जनलक्ष्मी पतसंस्थेतून तर रुंभोडी येथील लक्ष्मी बँकेतून काही कर्ज घेतले. येथे नमुद केले पाहिजे. की, जर तेव्हा गायकर साहेबांसह अन्य पतसंस्थांनी कर्ज दिले नसते. तर, त्याच वेळी कारखाना बंद पडला असता. तेव्हा, कारखाना चालु होण्यासाठी कोणी घरातून पैसा घातला नाही. दुर्दैवाने तुम्हाला सांगताना खेद वाटतोय की. ज्या पतसंस्थांनी कारखाना टिकविला, शेतकरी उभा केला. त्याच पतसंस्था मोडीत काढण्याचे काम पिचड पिता-पुत्र करत आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, तेव्हा हे कर्ज काढण्यासाठी प्रत्येकाने आपले उतारे देऊन वैयक्तीक नावे कर्ज काढले होते. मात्र, पिचड साहेब आणि वैभव पिचड यांनी त्यांचे उतारे देऊन स्वत:च्या नावे कर्ज काढले नाही. उगच आता निवडणुका होत्या म्हणून मोठ्या साहेबांनी सर्वांच्या बरोबरीने कर्जाला हातभार लावला. मात्र, वैभव पिचड यांचे अगदी शुन्य योगदान आहे. आजवर अंतर्गत बाबी फार आहेत. मात्र, त्यावर आम्ही बोलण्याचे धारिष्य करीत नाही. कारण, साहेब सत्तेत होते, त्यांच्या जिवावर लहाण्याचे राजकारण धकून जात होते. गायकर साहेबांकडे पाहुन अनेकजण गप्प बसत होते. परंतु, त्यांनी मर्यादा ठेवल्या नाही. तर, आपण तरी केव्हर धरायच्या? असे प्रश्न प्रत्येकजण उपस्थित करू लागला आहे.

आज मोठ्या खेदाने सांगावे वाटते. की, तालुक्याला ना आमदारकी ना खासदारकी त्यामुळे, बहुजनांच्या मुलांने नेहमी शिकण्यासाठी पुण्याला तर दुखण्यासाठी लोणीला जावे लागले आहे. ज्या काही सहकारी संस्था उभ्या आहेत. त्यावर संचालक आणि फारफार तर व्हा-चेअरमन यापलिकडे संधी नाही. शेतकर्‍यांसाठी संगमनेरच्या अमृतवाहिनी सारखी कोणती आर्थिक जिवणदायीनी नाही. जे आहे ते केवळ गायकर, चासकर, नवले, मालुंजकर यांच्यासारख्या अन्य काही बहुजन नेत्यांनी उभ्या केल्या पतसंस्था, एक दुधसंघ आणि दुसरा कारखाना यापलिकडे संधी नाही ना सोर्स. त्यामुळे, राज्यात कोणी जवळ उभे करीत नाही. राहिला प्रश्न मोठ्या पिचड साहेबांचा. तर, त्यांनी देखील बहुजनांना हवे तसे वाकवून त्यांची राजकीय पोळी भाजण्याचे काम केले आहे. गुंतली गाय आणि फटके खाय त्यामुळे, ते म्हणतील तसे गेली 40 वर्षे हा बहुजन समाज नांदत आला आहे. त्यांनी कारखाना बंद पाडून दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. की, मी नाही तर तालुक्यात काहीच नाही. आज त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. तुमच्या शिवाय आमचे काहीच आडत नाही. डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे आणि राज्यातून पवार साहेब तालुक्यासाठी आता भक्कम आहे. त्यामुळे, पिचड भाजपत गेल्यानंतर त्यांच्यासारखेच इडी आणि चौकशीच्या धमक्या देऊ लागले आहेत. त्यांना वान नाही पण गुण लागला. त्यामुळे, असे गलिच्छ राजकारण तालुक्यातील पुरोगामी जनता सहन करणार नाही. यावर माझा ठाम विश्वास आहे. -आपला प्रकाश मालुंजकर (पिचड साहेबांनीच कारखाना बंद पाडला, त्याचा साक्षिदार)

 भाग 2, क्रमश: