सन 2002 साली ज्या अगस्ति कारखान्याचे शरद पवारांनी कौतुक केले तो पिचडांनीच सत्तेच्या जोरावर बंद पाडला.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति साखर कारखान्यावर सन 1992 ते 96 सालापर्यंत शासन नियुक्त मंडळ होते. तर 1997 नंतर पहिल्यांदा कारखान्याच्या निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा, त्यावेळी तालुक्यात कम्युनिस्ट चांगले होते, तर चळवळी देखील पिचड साहेबांच्या विरोधात होत्या. त्यामुळे, 1997 च्या निवडणुकीत पहिल्यांदा विरोधकांनी जागृती मंडळाची स्थापना केली. पहिल्या निवडणुकीत जागृती मंडळाचे दोन संचालक निवडून आले. तर, 2002 च्या निवडणुकीत मात्र उत्पादक शेतकर्यांनी जागृती मंडळाच्या 11 जणांना कौल दिला. तेव्हा, मतमोजणीच्या वेळी मार्केट कमिटीवर गोळीबार झाला, त्यात एकाने जीव गमविला तर दोघे अधु झाले. तेव्हा पिचड साहेबांनी स्वत:ला सहानुभूती मिळविण्यासाठी माघार घेत जागृती मंडळाला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. तेव्हा, मी (प्रकाश मालुंजकर) चेअरमन तर गुलाबराव शेवाळे हे व्हा.चेअरमन झाले. यावेळी पहिला गळीत हंगाम काढण्यासाठी पिचड साहेबांनी आम्हाला कर्ज मिळू दिले नाही. ते ठाण्याचे पालकमंत्री असल्याने आमच्या गाड्या चेकनाक्यावर आडविल्या गेल्या. परंतु, 12 ते 15 गाड्या आमच्या पुढे निघुन आल्या होत्या. आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येथे नो क्राऊड झोनमध्ये आंदोलन केले. तेथे देखील साहेबांनी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आमच्या विरूद्ध उभा केला होता. मात्र, आम्ही त्या सहा मजली बिल्डींगमध्ये घुसलो आणि कर्ज द्या अन्यथा काचा फोडून उड्या मारतो अशी कठोर भुमिका घेतली. त्यानंतर राज्याचे दिवंगत बहुजन नेतृत्व विलासराव देशमुख यांनी तेथे फोन केला आणि 6 कोटी कर्ज मिळाले. पहिला हंगाम आम्ही इतका कमी खर्चात काढला. की, पवार साहेबांनी त्याची दखल घेऊन आम्हाला बोलावून 11 जणांचे कौतुक केले. तेव्हा इतके सुक्ष्म नियोजन होते. की, बँकेचे हाप्त जाऊन पुढील हंगाम सुस्थितीत निघेल अशी परिस्थिती होती. मात्र, हेच पिचड साहेबांना पहावले नाही. त्यांनी आमच्या विरोधात कारखाना कर्मचारी उभे केले. कधी संप तर कधी पगार, कधी कामबंद तर कधी असहकार, इतकेच काय.! कर्मचार्यांनी थेट माझ्या घरावर आंदोलन केले. तेव्हा मी पहिला धडा घेतला. की, पिचड साहेबांनी 24 महिने कामगारांचा पगार थकविले होते. त्यातील 6 पगार तोडजोड करून आम्ही वर्षभरात भरले. स्वत:चा खर्च, स्वत:च्या गाड्या, घरुन भाकरी बांधून आम्ही दिसाआड मुंबईला स्व-खर्चाने जाई. का? तर हा कारखाना टिकावा, राजकीय मक्तेदारी मोडीत निघावी. पण ज्यांच्यासाठी आम्ही लढत होतो. तेच विरोधात गेले तर लढायचं कोणासाठी? त्या दिवशी मी राजिनामा देण्याचे ठरविले. पिचड साहेबांना आम्ही सत्ता स्थापन करा व कारखाना चालु ठेवा असे सांगत असताना देखील त्यांनी दोन वर्षे कारखान्यावर प्रशासन आणुन बसविला. त्यातून, तालुक्याचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे, अगस्ति आम्ही नव्हे.! तर पिचड साहेबांनी कारखाना उभा राहु दिला नाही आणि स्वत:ही उभा केला नाही. हेच सत्य आहे.
गेल्या कित्तेक दिवसांपासून पिचड साहेब आणि अन्य काही लोक कारखान्याच्या 2002 ची उदाहारणे देतात. यांनी कारखाना बंद पाडला. पण, आज मी स्वत: त्यावेळी चेअरमन होतो, त्यामुळे त्यावेळी मी का राजिनामा दिला? ती कशी परिस्थिती होती, पिचड साहेबांनी किती आडकाठ्या आणल्या? त्यांचे राजकारण टिकविण्यासाठी काय-काय केले? याची इतिहास अनेकांना माहित नसेल. म्हणून तो रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून मांडतो आहे. ते साल 2001-2 चे होते. तेव्हा दशरथ सावंत, झुंबरराव आरोटे, अशोकराव भांगरे, शिवाजी धुमाळ, मधुभाऊ नवले, अॅड. शांताराम वाळुंज, कॉ. कारभारी उगले, विजय वाकचौरे, विठ्ठलराव चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुकाणु समितीची करण्यात आली होती. तेव्हा, पिचड साहेब राज्यात मंत्री होते. त्यामुळे, त्यांची पक्षात चलती होती. आता कारखान्यात पुर्वी उत्पादक व बिगर उत्पादक यांना गटातील सहा जणांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यामुळे, त्यांचे सहा सभासद फिक्स निवडून येत असे. मात्र, उत्पादकांमधून त्यांना विरोध झाला होता. म्हणून 2001 च्या निवडणुकीत जागृती मंडळाचे 11 जण निवडून आले. त्यात प्रकाश मालुंजकर, प्रकाश नवले, अशोक देशमुख, गुलाबराव शेवाळे, सुधाकर आरोटे, भाऊसाहेब नवले, रावसाहेब शेटे, कैलास शेळके. विठ्ठल आरोटे भाऊसाहेब वाकचौरे यांना उत्पादकांनी निवडून दिले. मात्र, या निवडणुकीनंतर मतदान होताना मोठा राडा झाला होता.
त्याचे झाले असे की, दि. 9 जून 2002 रोजी निवडणुक शांततेत पार पडली होती. तर 10 जून रोजी कृषीऊत्पन्न बाजार समिती येथे मतमोजणी सुरू झाली होती. जसजसे जागृती मंडळाचे उमेदवार निवडून येत होते. तशतशी पिचड साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश होता. मात्र, काहीतरी राडा करायचा आणि फेरबदल करायचे असा काहींचा मानस होता. त्यावेळी निवडणुक अधिकारी डॉ. प्रमोद बोरसे होते. तेव्हा भलेली दगडफेक झाली असेल. पण, गोळीबार व्हावा आणि पोलीस बळाचा वापर करुन सामान्य मानसे व शेतकर्यांवर लाठ्याकाठ्या उगारल्या जाव्यात अशी काही परिस्थिती नव्हती. मात्र, बोरसे यांच्या आदेशाने काही क्षणात गोळीबार सुरू झाला आणि एकच पळापळ सुरू झाली. हा गदारोळ इतका माजला की, पोलिसांच्या गोळीने सतिष म्हातारबा तिकांडे ( वय 32, रा. टाकळी) यांचा जीव घेतला. तर, विक्रम बाळासाहेब नवले आणि चंद्रकांत कानवडे यांना अधुपण आले. अगदी आजही कानवडे यांची प्रकृती अगदी अंथुरणाशी खिळून आहे. त्यावेळी तब्बल 40 जण जखमी झाले होते. तर, 4 लाख 75 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची सरकार दरबारी नोंद आहे. त्यानंतर, पिचड साहेब हे राज्यात मंत्री असल्यामुळे त्यांच्या नावाची ठ्या-ठ्या झाली. मंत्र्याच्या तालुक्यात, ते ही कारखान्याच्या निवडणुकीत आणि साहेबांचा पराभव होत असताना गोळीबार झाला. याबाबत तालुक्यातील जनतेत फार वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. त्यामुळे, त्यांनी एक पाऊल मागे घेत मोठी युक्ती सुचविली.
खर्या अर्थाने उस उत्पादकांनी आम्हाला कौल दिला होता. तेव्हा 11-11 संचालक असले तरी, पाहू हे लोक सत्तेशिवाय कारखाना कसा चालवितात. म्हणून त्यांनी सुकाणू समितीला सत्ता स्थापन करण्यास संधी दिली. तेव्हा मी (प्रकाश मालुंजकर) चेअरमन तर गुलाबराव शेवाळे हे व्हा.चेअरमन झाले. तेव्हा 24 महिन्यांचे कर्मचार्यांचे पगार थकलेले होते. हंगाम सुरू करण्यासाठी किमान 15 कोटी रूपयांची गरज होती. त्याकाळी कारखान्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतून कर्जपुरवठा होत होता. तेथे अगस्ति कारखान्याचा प्रस्ताव देखील दाखल केला होता. मात्र, त्यांनी तो नामंजूर केला. राज्यात सगळ्या कारखान्यांना अल्पमुदत कर्ज दिले. मग आम्ही काय पाप केले? असे विचारुन देखील उत्तर मिळाले नाही. हे कारस्थान पिचड साहेबांचेच आहे. याबाबत सगळ्यांना शाश्वती होती. त्यामुळे, सावंत साहेब, भांगरे साहेब, धुमाळ साहेब यांच्यासह आम्ही सगळ्यांनी पैसे काढून मुंबईला एमएससी बँकेवर मोर्चा न्यायचे ठरविले. जेव्हा आमच्या 40 ते 50 गाड्या अकोल्यातून निघाल्या तेव्हा एम.एच 17 गाड्या चेकनाक्यावर आडविण्याचे आदेश पिचड साहेबांनी दिले होते. तोवर आमच्या महत्वाच्या नेत्यांच्या 10-12 गाड्या पुढे निघुन गेल्या होत्या. अखेर नगरची गडी पाहिली की, आडविली. शेवटपर्यंत पोलिसांनी गाड्या सोडल्या नाही. त्यावेळी तेथे भाजप आमदार सरदार तारासिंग होता. त्यांनी फार मदत केली. आंदोलकांना जेवण, चहापाण केला. मात्र, तोवर आम्ही एमएससी बँकेच्या आवारात प्रवेश नसताना तेथे आंदोलन सुरू केले. तेथे देखील पोलिसांनी आमच्यावर धिटाई केली. तरी आम्ही त्या सहा मजली बिल्डींगमध्ये घुसलो आणि त्यांना ठणकावून सांगितले. कर्ज द्या अन्यथा खिडकीच्या काचा फोडून खाली उड्या मारू. त्यावेळी मीडियामुळे हे आंदोलन व्हायरल झाले. ते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाहिले. तेव्हा त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख हेच तेथे अधिकारी होते. मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि कर्ज मंजुरीचे आदेश काढले. त्यानंतर ना. बाळासाहेब थोरात यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांशी भेट घालुन दिली आणि तो प्रश्न कायमचा मिटला. यात त्याकाळचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आर.सी.पाटील यांनी पिचडांच्या विरोधात जाऊन कर्जसाठी कायम मदत केली. त्यानंतर जेव्हा कारखान्यातून साखरेचे पहिले पोते निघाले. त्याचे पुजन करण्याचा मान या मंडळाने पाटील यांना दिला होता.
दरम्यान, हा सर्व खटाटोप केल्यानंतर शिवाजी धुमाळ यांनी देखील बाळासाहेब विखे केंद्रात अर्थराज्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून पाऊनेतीन कोटी रुपयांचे कर्ज मंजुर करण्यासाठी बडोदा बँकेला फोन करण्यास सांगून ती मदत मिळविली होती. हा सर्व उहापोह झाल्यानंतर या मंडळाने अगदी काटकसर करुन 2 लाख 46 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. तर, पिचड साहेबांनी यापुर्वी सर्व अलबेले असताना 1 लाख 35 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. जागृती मंडळाने महाराष्ट्रात सर्वात कमी प्रोडॉक्शन कॉस्टवर अडिच लाखांचा हंगाम काढला होता. ही बाब शरद पवार यांना समजली तेव्हा त्यांनी 11 जणांना पुण्याला बोलावून कौतुक केले होते. हे कसे शक्य झाले? याबाबत विचारणा केली होती. तर, कारखाना हा विरोधकांच्या ताब्यात असला तरी मी तुम्हाला मदत करेल, शेतकरी जगला पाहिजे, उभा राहिला पाहिजे असेच काम करा. असे म्हणून शब्बासकीची थाप दिली होती. आता विरोधकांचे काम आणि कौतुक हे पिचड साहेबांना पहावले नाही. पवार साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले हे लक्षात आले, आपण नसलो तरी एक बहुजन तरुण पोरगा कारखाना सुस्थितीत चालवितो, सर्वात कमी कॉस्टवर गुणवत्ता सिद्ध करतो. हे असेच प्रगतीचे काम दिसले तर पुन्हा आपण चेअरमन होणे नाही. म्हणून त्यांनी कामगारांनी जागृती मंडळाच्या विरोधात उतरविले. खरंतर, पुर्वी 24 महिन्यांचा पगार थकला होता, तरी यांनी सहा महिन्यांची पगार केला होता. परंतु, पगाराच्या नावाखाली काही दिवसात आंदोलने उभी राहिली. संचालक मंडळ आणि कर्मचारी हा वाद इतका विकोप्याला गेला. की, माझ्या (प्रकाश मालुंजकर यांच्या) घरावर आंदोलने होऊ लागली. हे फार जिव्हारी लागले. कारण, घरकाम सोडून कारखाना पहायचा, स्वखर्चाने मुंबईला जायचे, इतका वेळ द्यायचा, स्वत:च्या गाडीत स्वत: डिझेल भरून कामे करायची. मुंबईला जाताना तर अशोक भांगरे साहेबांच्या घरुन सगळ्यांच्या डबे तयार राहयचे. हे सगळं कोणासाठी चाललं होतं? केवळ, कारखाना राजकीय मक्तेदारीतून मुक्त करायचा होता. मात्र, ज्यांच्यासाठी लढतो आहे. तेच आपल्या विरोधात बंड करीत असतील तर कशासाठी हा उपद्याप? म्हणून 22 ऑगस्ट 2003 साली आम्ही सगळ्यांनी राजिनामे दिले. त्यावेळी विशेष सर्वसाधारण सभा घेऊन हा सर्व घटनाक्रम मांडला होता. तेव्हा पिचड साहेबांना सत्ता स्थापन करा अशी विनंती केली. पण त्यांनी सत्तेच्या बळावर 2 वर्षे तेथे प्रशासन बसविला. त्यामुळे, कारखाना त्यांनी देखील चालविला नाही आणि आम्हाला देखील चालु दिला नाही. तो बंद पडला नाही. तर, तो पिचड साहेबांनी बंद पाडला...!
क्रमश: भाग 2