बांध कोरला म्हणून भावाने भावाचा कुर्हाडीने जीव घेतला, आता जन्मभर जेलमध्ये रहावे लागणार.! अजन्म कारावास...!!
![]() |
संग्रही फोटो.. |
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे बांध कोरला म्हणून भावाने भावाच्या डोक्यात कुर्हाड मारली होती. त्यानंतर काही वेळ भावाचा देह धडधड उडत होता. मात्र, तरी देखील दुसर्या भावाला दया आली नाही. अखेर श्वास स्थिरावला आणि शुल्लक कारणाहून भावाचा जीव गेला. ही घटना दि. 10 मे 2020 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. यात सतिष छबु यादव (वय 36, रा. कौठेकमळेश्वर) या तरूणाचा जीव गेला होता. तर छबु माधव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरख संपत यादव (रा. कौठेकमळेश्वर) याच्याविरूद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी साहेब यांनी या गुन्ह्याचा सक्षमपणे तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते. कोरोनाचा काळा सुरू असताना देखील त्याचा अवघ्या दोन वर्षात निकाल लागुन आरोपी गोरख संपत यादव यास आजन्म कारावास आणि 25 हजार रूपये दंड तर दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कौठेकमळेश्वर येथे छबु यादव आणि संपत यादव यांची शेजारी-शेजारी जमीन आहे. यांच्यात शेतातील बांध कोरण्याहून वारंवार वाद होत होते. घटना घडण्याच्या गेल्या काही दिवसांपुर्वीच यांच्यात टोकाचे वाद झाले होते. तो वाद पोलीस ठाण्यात गेला आणि त्यांच्यावर तुर्तास कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र, वाद मिटून देखील गोरख हा नेहमी कुर्हाड हाती घेऊन तुमचा बेत पाहतो, कामच करतो, काटाच काढतो अशा प्रकारच्या धमक्या देत होता. त्यामुळे, छबु यादव यांनी ही बाब गावचे सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह समझदार मानसांच्या कानावर घातली होती. मात्र, त्यावेळी कोरोनाचा भयानक काळ सुरू असल्याने गावात कोणी पेशन्ट निघु नये, कोणाच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून ही मंडळी व्यस्त होती.
दरम्यान, दि. 10 मे 2020 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास छबु यादव यांचा मुलगा सतिष हा त्याच्या दोन मित्रांसोबत दुचाकीवर चुलत्याकडे गेला होता. तेव्हा आरोपी गोरख यादव याने त्याला आडविले आणि मागे झालेल्या बांधाच्या भांडणाहून त्याने शिविगाळ, दमदाटी सुरू केली. तेव्हा सतिष म्हणाला की, आता आपले वाद मिटले आहे. त्यामुळे, वारंवार भांडण करू नको. मात्र, गोरख याच्या डोक्यात प्रचंड राग होता. त्याने त्यांच्या हातातील कुर्हाड थेट सतिशच्या डोक्यात मारली. त्यामुळे, काही क्षणात तो जमिनिवर कोसळला आणि रक्ताचे थारोळे तयार झाले. आपल्या वाड्यातील भावाच्या डोळ्यादेखील सतिष तडफडत होता. मात्र त्याने त्याला उचलले नाही ना त्याला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. तो त्यास मारून निघुन गेला. त्यानंतर ही बाब त्याच्या वडिलांना कळविली असता सतिषला संगमनेर येथे हलविण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती. तेथून लोणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, सतिष इतक्या मोठ्या घावापुढे दम धरू शकला नाही. अखेर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नंतर, त्यांचा धार्मिक पद्धतीने अंत्यविधी झाला.
दरम्यान, छबु यादव यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात गोरख यादव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी यांनी केला होता. जवळ-जवळ या घटनेत 31 साक्षिदार तपासले, तर 13 सबळ पुरावे देखील जोडण्यात आले होते. न्यायालयाने काही वैद्यकीय अधिकारी, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षिदार तसेच तपासी अधिकारी पप्पू कादरी यांचे जबाब, सक्षम पुरावे आणि सरकार पक्षाचे वकील अॅड. गवते यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी गोरख संपत यादव यास आजन्म कारावास आणि 25 हजार रूपये दंड तर दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेनंतर पप्पु कादरी आणि मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले आहे.