पिंपळगाव धरणाचे तुम्हाला माहित नसलेले विदारक वास्तव.! नेत्यांनो.! शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवू नका.!



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

      आ. डॉ. किरण लहामटे यांच्या पत्रानंतर पठार भागावरील 11 गावांना 65 कोटींची योजना मंजुर झाली. त्यानंतर पिंपळगाव धरणाचे पाणी पेटले. मात्र, या पाण्याबाबत किती लोकांना वास्तव माहिती आहे? हे जर विचारले तर अनेकांचे खांदे वर उडतील. परंतु, हे जे आंदोलन सुरू आहे त्याला जर कोणी अयोग्य म्हणत असेल तर त्यांचे तोंड झोडले पाहिजे. तर आंदोलनाच्या नावाखाली काही लोक राजकारण करत आहे असे कोणी म्हटले तर त्याची खरोखर पाठ थोपटली पाहिजे. कारण, जे डोळ्यांनी दिसतेय ते स्विकारायला जनता भोळी नाही. आता हे आंदोलन यासाठी बरोबर आहे. की, पुर्वी ओसाड पडलेले 1 हजार 778 हेक्टर क्षेत्र हे या धरणामुळे हिरवाइने नटले आहे. त्यावर पुन्हा दुष्काळ पडत असेल तर गायकर पाटलांसारखे नेते बंड पुकारतील हे सहाजिक आहे. का? तर ते देखील समजून घेणे आवश्यक आहे. आता अनेकजणांना माहित आहे की, हे धरण 600 एमसीएफटीचे आहे, मात्र, अनेकजण अनभिज्ञ असेल की, त्यात 203 एमसीएफटी मृतसाठा असून, 50.480 एमसीएफटी बाष्पीभवन होते. त्यात बोरी (33.54 एमसीएफटी), कोतुळ (20 एमसीएफटी) व झेडपी केटीवेअर (9 एमसीएफटी) धरुन हे 600 एमसीएफटी धरण आहे. जर वरील आकडेवारी वजा केली तर केवळ 284 एमसीएफटी पाणी वापराखाली आहे. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी 140 एमसीएफटी आणि 144 एमसीएफटी पाणी शेतीच्या वापरासाठी आहे. जर यातून 24 एमसीएफटी पाणी पठार भागासाठी गेले तर एक हजार हेक्टर शेती धोक्यात येऊ शकते, त्यात पुन्हा ब्राम्हणवाड्यासह अन्य तीन गावांना योजना मंजुर होणार आहे. त्यासाठी 12 एमसीएफटी पाणी जाऊ शकते. मग असे झाले तर 132 एमसीएफटी पाण्यात मुळेतील शेतकर्‍यांनी काय बुडून मरायचे काय? असा प्रश्न मुळा विभागाचे नेते सिताराम पाटील गायकर यांनी अधिकार्‍यांना ठणकावून विचारला आहे. (हे कोण्या तोंडचे आकडे नसून ते शासकीय आहे.)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन महिन्यांपासून मुळा विभागात लोक सुखाने पाणी देखील पित नाहीत. कारण, त्यांच्या हक्काचे पाणी पठार भागावर दुसर्‍यांची तहाण भागविण्यासाठी नेले जात आहे. अर्थात पाणी नेण्यास विरोध मुळीच नाही. परंतु, 14 किमी पाईपलाईन करुन नेण्यापेक्षा 6 किमी अंतरावर सेफ्टी टँक किंवा छोटेसे धरण होइल अशी सुविधा आहे. त्यामुळे, 284 एमसीएफटी पाण्यात भागिदारी करुन दोघांचे हाल करुन घेण्यात काय अर्थ आहे? असा सरळ-सरळ प्रश्न आहे. पिंपळगाव धरणात 600 एमसीएफटी पाणी साठा होता. त्यात सरकारी नियमानुसार 203 एमसीएफटी हा मृतसाठा असून तो काढता येत नाही. त्यामुळे, पाणी उरले 397 एमसीएफटी, त्यात जेव्हा प्रशासनाने साठा सांगितला तेव्हा त्यात 50.480 एमसीएफटी बाष्पीभवन होते हे धरलेच नाही. त्यामुळे 397 मधून पाणी उरले 346.52 एमसीएफटी. आता मुळा विभागातील अनेकांना माहित नसेल. की, पिंपळगाव खांड धरण होण्यापुर्वी वरती बोरी बंधारा 33.54 एमसीएफटी होता, कोतुळ बंधारा 20 एमसीएफटी होता, झेडपी केटीवेअर 9 एमसीएफटी होता. म्हणजे हि आकडेवारी तब्बल 62.54 एमसीएफटी पाणी खांड धरणाच्या वर साचत होते. त्यामुळे, आजही ते पाणी खाली गृहीत धरणे चुकीचे आहे. त्याचे भुअंतर्गत फायदा भरपूर आहे. अडिनडीचा विषय देखील मान्य आहे. मात्र, ते पुर्वीच कृत्रीम जलसाठे होते. त्यामुळे, ते पिंपळगाव धरणातून वजा केल्यास 283.98 एमसीएफटी पाणी खर्‍या अर्थाने पिंपळगाव खांड धरणाचे आहे. म्हणजे राऊंड फिगर 284 एमसीएफटी पाणी होय. (हीच आकडेवरी प्रशासनाने 334 एमसीएफटी दाखविली आहे. कारण, त्यात 50 एमसीएफटी बाष्पीभवन त्यांनी धरलेच नाही)

आता शासकीय आकडेवरीनुसार जलाशयातून 15 गावे तर पाठबंधार्‍यातून 18 गावे असे 33 गावांना या धरणाचा लाभ मिळतो. त्यामुळे, 1 हजार 778 हेक्टर जमिन ही आलिताखाली येते. सरासरी पाहिले तर केवळ 284 एमसीएफटी पाणी धरणात असताना शेतकर्‍यांची थोडीफार ओढाताण होते. मात्र, तरी देखील गडी बागाइतदार म्हणून टिचीत फिरतो. आता यापुढे जाऊन पाहिले तर, 2001 ज्या जनगणनेनुसार लाभ क्षेत्रातील 22 गावांची लोकसंख्या ही 41 हजार 475 इतकी होती. तर 22 वर्षानंतर म्हणजे 2022 मध्ये सरासरी ती 56 हजार 477 होते. पुर्वी म्हणजे 2001 मध्ये शासकीय नियमानुसार प्रती व्यक्तीमागे 40 लिटर पाणी लागत होते. तर आता हायब्रेड अन्नामुळे लोकांची तहान-भूक वाढली असून ती प्रतिव्यक्ती 55 लिटर झाली आहे. त्यामुळे, जर 2022 मध्ये सरासरी 60 हजार लोकांना या धरणातून पाणी द्यायचे असेल तर किमान 80 ते 90 एमसीएफटी पाणी गरजेचे आहे. मात्र, विहीर, शेततळे, बोअरवेल, मुळा नदी यातून हे प्रश्न सुटले आहे. तरी देखील नियमानुसार पिंपळगाव खांड धरणातून 140 एमसीएफटी पाणी हे पिण्यासाठी उचलले जाते त्यामुळे, फक्त 144 एमसीएफटी पाणी हे शेतीसाठी शिल्लक राहते. त्यात खरीप हंगामासाठी 29.629 एमसीएफटी तर रब्बी हंगामासाठी 261.679 एमसीएफटी पाणी आवश्यक असते. ते देखील धरणात राहत नाही. हेच धरणाचे वास्तव आहे. तर शासकीय नियमानुसार 291.24 एमसीएफटी पाणी हे धरणाच्या अखत्यारीत असणार्‍या शेतीला आवश्यक आहे. त्यामुळे, आता सरकार आणि प्रशासन यांनीच सदसद विवेक बुद्धीने विचार करुन सांगावे. की, पाणी आहे किती, उचलयाचे किती आणि वापरायचे किती व कसे.?

राजकीय टोलेबाजी..! 

गेल्या दोन महिन्यांपासून पिंपळगाव धरणाच्या 600 एमसीएफटी पाण्याहून मुळेचे खोरे पेटले आहे. पठार भागातील 11 गावांना 24 एमसीएफटी पिण्यासाठी पाणी द्या.! पण, धरणातून नको. असा सुर दोन्ही गटांचा आहे. मात्र, झालय काय? पाणी प्रश्न राहिलाय बाजुला आणि येथे राजकारण सुरू झाले आहे. कारण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अगस्ति कारखाना, बाजार समिती आणि दुधसंघ या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, काहींना आपण चेअरमन किंवा संचालक झाल्याचे दिवास्वप्न पडू लागले आहेत. खरंतर 2017-18 साली वैभव पिचड आमदार होते. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यादेखत पाणी खाली गेले. तेव्हा, कोणी पुण्याला होते तर कोणी मुंबईला. आज जे काही टमाटमा बोलत आहे त्यांनी देखील हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवले होते. आता मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पोळ्या भाजण्याचे काम सुरू आहे. त्यांना आम्ही सांगू इच्छीतो की, गेली 40 वर्षे सिताराम पाटील गायकर यांनी मुळेचे नेतृत्व केले आहे. त्यांनी या धरणाला जन्म दिला आहे. त्यामुळे, ते येथील शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही. उगच कोणी खोट्यानाट्या माहित्या देऊन शेतकर्‍यांची माथी भडकवू नये. खरंतर जे कोतुळमध्ये राहतात त्यांच्या ताब्यात ना ग्रामपंचायत आली ना सोसायटी; म्हणजे गाव त्यांंचे नेतृत्व स्विकारत नाही अन ते तालुक्यात भोंगळ कारभार करायला येऊ पाहत आहे. अशा प्रकारच्या टिका वेगवेगळ्या नेत्यांनी विरोधकांवर केल्या. आज दि. 12 जून 2022 रोजी सिताराम पा. गायकर यांच्या अध्यक्षतेखाली पिपळगाव खांड येथे मुळा विभागातील शेतकऱ्यांनी ओदोलन केले. तेव्हा अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.