कारखाना बिनविरोधला पिचड साहेबांचे एक पाऊल मागे, पहिल्याच दिवशी 45 अर्ज गेले.! सावधान.! दागाबाजी होऊ शकते.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बॉयलर पेटला आहे. गेल्या 40 वर्षेत जिह्यातील सहकारी संस्थांवर अधिराज्य गाजविणार्या पिचड साहेबांना माघार घेण्याची वेळ आली हे आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहिले. तर, आता कारखान्यात देखील मी एक पाऊल मागे टाकण्यास तयार आहे अशी प्रांजळ भुमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीला सोइस्कार वातावरण असले. तरी, दोघांना कसे भिडून द्यायचे, अंतर्गत कोणाला कसे फोडायचे यात पिचड साहेबांचा फार मोठा हातखंडा आहे. म्हणजे, अशोक भांगरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सगळेच पिचड विरोधक होत असे कोणी म्हणत असेल तर त्यांचा राजकीय अभ्यास कमी आहे असे निच्छित समजले पाहिजे. कारण, साहेबांनी एक पाऊल मागे टाकून उद्या काही उपद्रवी लोकांमुळे कारखाना बंद पडला तर त्याचे खापर आपल्या आंगावर नको.! हा संदेश जनतेला दिला आहे. आता काँग्रेस, शिवसेना, माकप आणि राष्ट्रवादीत पडलेले गट यांच्यात मनधरणी करताना सिताराम पाटील गायकर यांच्या नाकीनव येणार आहे. दुर्दैवाने कारखान्यात नगरपंचायत प्रमाणे भोंगळ कारभार होऊन नाराजी नाट्य आणि आरोप-प्रत्यारोपाचे लोळ बाहेर पडू नये म्हणजे झालं. हे सर्व सलोख्याने करत असताना पायलीच्या पन्नास नेत्यांपेक्षा मुख्य नेत्यांनी एकत्र बासावे, विशेष म्हणजे कानफुक्या लोकांना बाजुला ठेवून जे काही मंडळ निर्माण होईल त्यात फायनल चर्चा करावी, इतक्या-तितक्या जागांवर कोणी आडून न बसता पात्र उमेदवारांना संधी देऊन कोण्या एकाच्या नेतृत्वाखाली एकजुटीने कामाला लागले तर परिवर्तन-फिरीवर्तन आणि तिसर्या-चौथ्या आघाड्यांना सभासद-मतदार धुळ चारल्याशिवाय राहणार नाही..!!
खरंतर माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांचे मन:पुर्वक आभार मानले पाहिजे. कारण, त्यांनी राजकारणाच्या पलिकडे पहिला संस्था टिकविण्यासाठी एक पाऊल मागे टाकले. अर्थात त्यांच्या राजकीय प्रगल्भतेला सौ बार सॅल्युट केला पाहिजे. मात्र, आज जसे मुळेच्या पाण्याहून संघर्ष चालु आहे. त्यात पठार भाग विरोधात जायला नको म्हणून ते स्वत: हस्तक्षेप करीत नसले तरी त्यांनीच काही लोकांना बळ दिले आहे अशा प्रकारचा आरोप होत आहे. त्याप्रमाणे कारखान्यात एक पाऊल मागे घेतल्याचे भासवून तिसर्या आघाडीला बळ दिले तर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची राजनिती व्हायला नको. अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. कारण, अगस्ति एज्युकेशन संस्थेच्या आंदोलनात त्यांनी विश्वासघात केला, पिचडांकडून दगफटका झाला अशा प्रकारचा आरोप आंदोलकांनी केला त्यास अजून दोन महिने देखील उलटले नाही. तरी देखील साहेबांच्या निर्णयाने त्यांना फार मोठी सहानुभूती मिळाली आहे. मात्र, विरोधकांनी पिचड नावाचे दुध हे शंभर टक्के फुकून पिले पाहिजे असे मत जाणकरांनी व्यक्त केले आहे.
खरंतर, कारखाना चालवायचा म्हणजे ते ग्रामपंचायत चालविण्याइतपत सोपे नाही. त्यामुळे, जे करायचे आहे त्यात पिचड साहेब आणि गायकर साहेब यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. कारण, राजकारण गेले चुल्हीत संस्था टिकली पाहिजे असे तालुक्यातील शेतकर्यांचे मत आहे. त्यामुळे, मला कारखान्यात संचालक व्हायचे आहे असे उतावळे नवरे फार भेटतील. मात्र, ऐनवेळी कारखान्यासाठी लाख ते कोटीभर रुपये स्वत:च्या नावे कर्ज काढण्याची दानत देखील त्या संचालकामध्ये असली पाहिजे. त्यामुळे, पक्ष कोणताही असो, त्यांनी नगरपंचायतीसारखे मला इतक्या जागा द्या, तितक्या जागा द्या असा राजहट्ट न धरता कारखान्यात बुजगावनं म्हणून नको तर सहाय्यभूत ठरेल अशा लायबल व्यक्तीसाठी शंभर टक्के हट्ट धरला पाहिजे असे शेतकर्यांचे मत आहे. मात्र, कारखान्याच्या निवडणुकीची गोळाबेरीज करुन पुढील हंगाम सुरू करताना पिचड साहेबांपासून ते गायकर साहेबांपर्यंत फार मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात कोणी मुळेच्या पाण्याप्रमाणे खोट घातली नाही म्हणजे बरे.! अन्यथा याला त्याला नालायक म्हणता-म्हणता पुर्वी जशी बदनामी झाली तशी पुन्हा होणार नाही. याची काळजी जबाबदार व्यक्तींनी घेतली पाहिजे.
आज दि. 14 जून 2022 पासून कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याची मुदत 20 जून पर्यंत असणार आहे. 21 जून रोजी अर्ज छाननी होणार असून 22 जून रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. 7 जुलै रोजी चिन्हा वाटप असून 17 तारखेला मतदान आणि 18 तारखेला निकाल आहे. आज सर्वात पहिला अर्ज विकास कचरुपाटील शेटे यांचा आला असून आज 3 वाजेपर्यंत ईच्छूक उमेदवारांनी 44 अर्ज नेले होते. आता माघारीच्या अंतीम क्षणापर्यंत कारखाना बिनविरोध होण्यासाठी पिचड साहेब प्रयत्न करणार आहे. मात्र, अजित दादा पवार आणि डॉ. किरण लहामटे हे नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, कारखाना टिकवायचा असेल तर सरकार आणि जिल्हा बँक तसेच पवार कुटुंबाचा वरदहस्त फार महत्वाचा असणार आहे. त्यामुळे, नुकत्यास सुरू झालेल्या कारखाना निवडणुकीला पुढे काय रंग चडतोय हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.