हे तर खाटीक, डॉक्टरांवर न्यायाधीश रागावले.! संगमनेर कोरोना काळाचा उद्रेख, क्षमा करा, आम्ही जास्त बिल घेतले, तरी प्रशासन पाठीशी घालतय.!
सार्वभौम (संगमनेर) :-
कोरोनाच्या काळात ज्यांचा उदो-उदो झाला. त्याच काही डॉक्टरांचे आता दुसरे निर्दयी रूप संगमनेरात उघडे पडू लागले आहेत. कारण, एका न्यायाधीशाच्या आई-वडिलांची कोरोना काळात वाढीव बिल लावून अवाजवी पैसा उकळण्याचा घाट संजीवनी हॉस्पिटलमध्ये झाल्याची बाब आता सरकारी कागदामुळे उघडकीस येत आहे. न्यायाधीशांनी संपूर्ण रक्कम भरून थेट कलेक्टरला तक्रार अर्ज केला आणि संबंधित हॉस्पिटलवर प्रश्न उपस्थित केले? या तक्रार अर्जात म्हणले आहे की, डॉ. जगदीश वाबळे यांनी माझ्या आई वडिलांना हॉस्पिटल मधुन डिस्चार्ज करते वेळी वडिलांच्या बिलामध्ये ऑक्सिजन बेडचे चार्जेस लावले. परंतु, प्रत्यक्षात वडिलांना एक मिनिटांसाठी देखील ऑक्सिजन लावण्यात आला नव्हता. डॉ. जगदीश वाबळे यांचे तेथील न्यु अनुकृपा मेडिकलवाल्यासोबत लागेबांधे असल्यामुळे मेडीकलचे अव्वाच्या सव्वा बिल लावल्याचे आरोप केले आहेत. तर, डॉ. वाबळे यांनी आई-वडिलांना एकाच रूम मध्ये ठेवलेले असताना देखील बिल कर्त्यावेळी दोन स्वतंत्र रूमचे चार्जेस लावले. आशा प्रकारे डॉ. वाबळे यांनी सुमारे 1 लाख 22 हजार 202 रुपयांचे बिल काढुन लुट केली असे त्यात म्हटले आहे. त्यापैकी 13 हजार रुपये लॅबची फी देखील धरलेली आहे. त्यामुळे, डॉ. वाबळे हे मेडीकलवाले व लॅबवाल्यांसोबत संधान साधुन डॉ. वाबळे हा रुग्णांची खोटी बिले तयार करून अतोनात लुट करत असल्याचे तक्रार अर्जात न्यायाधीशांनी नमुद केले आहे. जरी काही डॉक्टरांकडे डॉक्टरकिची पदवी असेल तरी देखील माझा व्यक्तिगत अनुभव असा सांगतो की, सदर काही व्यक्ती डॉक्टर नसुन खाटीक असल्याचे या तक्रार अर्जात खुद्द न्यायाधीशांनी म्हणले आहे. खरंतर, न्यायाधीशांच्या आई-वडिलांना अतिरिक्त बिल लावुन लुटले जाते तेव्हा सामान्य माणसांना कोरोनाकाळात किती लुटले असावे असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ लोकांना पडला आहे. त्यामुळे, एकीकडे मनमानी कारभार करून आपण म्हणु तेच बिल पाहिजे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या डॉक्टरांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 15 सप्टेंबर 2021 रोजी न्यायाधीशांच्या आई वडिलांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्यांना 16 सप्टेंबर 2021 रोजी संजीवनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर 2021 रोजी दोघांना ही हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज करण्यात आले. डॉ. वाबळे यांनी डिस्चार्ज करतेवेळी न्यायाधीशांच्या वडिलांच्या बिलामध्ये ऑक्सिजन बेडचे चार्जेस प्रतिदिन 4 हजार 500 रुपये इतके लावले. म्हणजे 36 हजार रुपये लावण्यात आले. परंतु प्रत्यक्षात न्यायाधीशांच्या वडीलांना हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना एक मिनिटांसाठी देखील ऑक्सिजन लावण्यात आला नव्हता. त्यातच आठ दिवसांचे मेडिकलचे बिल सुमारे 47 हजार 546 रुपये इतके आकारले गेले. तर आईसाठी प्रतिदिन 2 हजार 400 रुपये असे एकुण आठ दिवसांचे 19 हजार 200 रुपये हॉस्पिटलचे बिल आकारले व मेडिकलचे बिल 6 हजार 456 इतके आकारले. जर न्यायाधीशांच्या आई-वडिलांना डॉ. वाबळे यांनी एकाच रूम मध्ये ठेवलेले असताना देखील बिल तयार करते वेळी दोन स्वतंत्र रूम चार्जेस कसे लावले? अशा प्रकारे डॉ. जगदीश वाबळे यांनी 1 लाख 22 हजार 202 रुपयांची लुट केली असे तक्रारीत म्हणले आहे. त्यांनी 30 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात नऊ प्रश्न उपस्थित करून माझ्यासारख्या रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देऊ शकता का? असा प्रश्न न्यायाधीशांनी तक्रार अर्जात केला आहे.
दरम्यान, न्यायाधीशांच्या तक्रार अर्जानंतर चौकशीसाठी समिती गठीत केली. डॉ. जगदीश वाबळे यांना वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय संगमनेर यांच्यामार्फत खुलासा करण्यास सांगितला या खुलाशामध्ये अतिरिक्त बिल आल्याचे डॉ. वाबळे यांनी कबुली दिली आहे. तर संबंधित चौकशी समितीने दि. 10 जानेवारी 2021 रोजी चौकशी केली असता हॉस्पिटलचे 16 हजार तसेच एक्सरेचे 1 हजार 800 व औषधांचे 6 हजार 385 तर पॅथॉलॉजी लॅबचे 13 हजार असे एकुण 37 हजार 985 इतके अतिरिक्त बिल घेतल्याचे गठीत समितीच्या निदर्शनास आले. त्यांनी हा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकाकडे 14 जानेवारी 2022 रोजी पाठवला आहे. यामध्ये तक्रारदाराच्या तक्रारी वरून संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 1 जुन 2021 रोजीच्या निर्देशावरून कारवाई करण्यात यावी असे या पत्रात नमुद केले आहे.
दरम्यान, यापुर्वी देखील दोन रुग्णांची या संजीवनी हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त बिल घेतल्याची घटना घडली आहे. त्या रुग्णांनी तक्रार केली असता त्यांचे अतिरिक्त आकारण्यात आलेले बिल पुन्हा द्यावा लागले. त्याचे उचित कारवाईसाठी गटविकास अधिकारी यांनी इंसीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांना 10 जुन 2021 रोजी पत्र दिले आहे. तरी देखील अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे, स्थानिक प्रशासन या मनमानी करणाऱ्या डॉक्टरला पाठीशी घालते का असा प्रश्न संगमनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पहिला कोरोना लोकांच्या मुळावर उठला होता. मात्र, काही डॉक्टर कोरोनाकाळात लोकांच्या मुळावर उठले की काय? अशी टीका संगमनेरात होताना दिसत आहे. खरंतर, रुग्ण डिस्चार्ज होण्याचे अगोदर ऑडिट होणे हे बंधन कारक होते. पण, आजतागायत एका ही ऑडिटरला अधिक बिल घेतल्याचे निष्पन्न झाले नाही. पण, तक्रार केल्यानंतर अतिरिक्त बिल घेतल्याचे लक्षात येते. त्यामुळे, संगमनेरात कोरोनाकाळात प्रशासनाचा किती मनमानी कारभार केला हे न बोलेल बरं.! कारण, 1 लाखापेक्षा जास्त बिल असल्यास प्री- ऑडीट करणे गरजेचे असताना ते कुठे होताना दिसले नाही.
खरंतर, लोक म्हणतात रुग्णालयात यातना आणि वेदना दोन्ही कमी होतात. पण, इथे उपचारासाठी लाखो रुपयांचे बिल पाहुनच छातीवर दडपण येते. त्यातच संगमनेरात मोफत उपचाराच्या सुविधा अगदी नगण्य आहे. त्यामुळे, कोरोनाकाळात सामान्य लोकांनी सोने तारण करून, जमिनीवर कर्ज उचलण्याची वेळ आली तर दागिने मोडुन उपचारासाठी पैसे मोजले. पण, काही खाजगी हॉस्पिटलांमध्ये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळून रुग्णांची इथे लुट केली. तक्रार केली की सोयीस्करपणे त्यावर पडदा टाकायचा आणि डॉक्टरांना गुन्ह्यात पाठीशी घालायचे हे इथे सुरळीत पणे चालते. त्यामुळे, येथील सामान्य माणसांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर वारंवार नाराजी दाखवली आहे. मात्र, प्रत्येक डॉक्टरला एकाच माळीत गोवता येणार नाही. काही डॉक्टर असे आहे. जे सामान्य माणसांच्या बिलांमध्ये सवलती किंवा मोठ्यामनाने माफ करतात. ही माणुसकी जपली तर माणसाला आधार मिळतो. तर दुसरीकडे तुमच्या माणसाचे वाटोळे झाले तरी चालेल आम्हाला काही देणे घेणे नाही. पैसे टाक आणि चालते व्हा असे म्हणणारे देखील संगमनेरात कमी नाही.