सुनेच्या नावाखाली सासर्याकडून उकळली 5 लाखांची खंडणी, पत्रकाराची भन्नट ऐड्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.!
सार्वभौम (अकोले) :-
कोरोनाच्या काळात मुलगा मरण पावला, त्यानंतर सुन आणि सासरा यांच्यात प्रॉपर्टीहून वाद सुरू झाले. ही नामी संधी पाहून या बहादराने सुनेच्या नावाखाली सासर्याला तब्बल पाच लाख 35 हजार रुपयांना गंडा घातला. तुमची सुनेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, त्यात तुम्हाला 20 वर्षे जेल होणार आहे. हे प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील अशी नाना प्रकारची भिती दाखवून वयोवृद्धाला या तरुणाने फसविले. हा प्रकार पाहुण्यांना समजला असता त्यांनी चौकशी केली आणि घडला प्रकार समोर आला. आता याप्रकरणी सचिन बाळु रेवगडे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यास न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली आहे. हा एक धक्कादायक प्रकार असून लोक किती चलाख, फसवे, लबाड असतात हे एकीकडे दिसते तर दुसरीकडे काही सामान्य लोक शिकून सवरुन देखील किती अज्ञानी, भेदरलेले, कायदा आणि प्रशासनाबाबत अनभिज्ञ आहेत. याची प्रचिती या गुन्ह्यातून येते आहे.
याबाबत नामदेव कारभारी वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सोमनाथ हा गेल्या कोरोनाच्या लाटेत मयत झाला आहे. त्यानंतर त्यांची सुन आणि वाकचौरे यांच्यात जागा जमिनीहून वाद सुरू आहेत. हा प्रकार आरोपी सचिन बाळु रेवगडे यास माहित झाला. स्थानिक माहितीनुसार तो पत्रकार म्हणून मिरवत असल्यामुळे त्याचे अन्य काही उपद्रव अनेकदा समोर आले होते. त्याने सासरा आणि सुन यांच्या वादाचा फायदा घेतला आणि थेट नामदेव वाकचौरे यांचे घर गाठले. डिसेंबर 2021 मध्ये त्याने वाकचौरे यांना सांगितले की, तुमच्या सुनेने तुमच्याविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे, तुम्हाला 20 वर्षे शिक्षा लागू शकते. ते लोक सारखी चौकशी करीत आहे. हे शब्द ऐकल्यानंतर वाकचौरे घाबरुन गेले, ते आरोपी रेवगडे यास म्हणाले. की, मी माझी सगळी जमीन सुनेच्या नावावर करुन देतो आणि वृद्धाश्रमात निघुन जातो. परंतु हे प्रकरण येथेच मिटले पाहिजे. त्यावेळी रेवगडे म्हणाला की, त्यासाठी पैसे मोजावे लागतील. तेव्हा या व्यक्तीने दि. 26 डिसेंबर 2021 रोजी 15 हजार रुपये काढून दिले. मात्र, यावरच त्याचे भागले नाही. तर, दि. 27 डिसेंबर 2021 रोजी 1 लाख 50 हजार रुपये वाकचौरे काका यांनी रेवगडेला दिले.
दरम्यान, हा प्रकार येथे मिटेल असे वाकचौरे यांना वाटत होते. मात्र, रेवगडे याची भूक आता वाढली होती. त्यामुळे, जानेवारी 2022 मध्ये पुन्हा तो वाकचौरे यांच्या घरी गेला. तेव्हा म्हणाला की, तुमच्या सुनेने रेकॉर्डींग केलेला डाटा जर डिलीट करायचा असेल तर आयडिया कंपनीच्या ऑपरेटरला 1 लाख 20 हजार रुपये, ज्याने रेकॉर्डींग केली त्याला 1 लाख 80 हजार रुपये, पोलिसांना 70 हजार रुपये द्यावे लागतील. तरच हे प्रकरण शांत होईल. तेव्हा वाकचौरे यांनी दि. 7 जानेवारी 2022 रोजी त्यांचा पुतन्या डॉ. रेवण वाकचौरे यांच्याकडून घरघुती कारण सांगून 3 लाख रुपये व पैसे कमी पडल्यामुळे त्यांनी आंबरेपाटील पतसंस्थेतून 85 हजार रुपये असा 3 लाख 70 हजार रूपये आरोपी सचिन रेवगडे याला दिले. आता सुनेचा हा उपद्रव थांबेल अशी बाबांना अपेक्षा होती. मात्र, तिच्या नावाखाली हाच भुजंग या वयोवृद्ध व्यक्तीला फसवत होता. खरंतर, एकदा, दोनदा ठिक होते असे म्हणूया. मात्र, वारंवार त्याने बाबांच्या भावनांशी त्यांच्या वयाशी, त्यांच्या भितीपोटी जगण्याशी खेळ खेळला. हे सर्व होऊन देखील रेवगडे येथेच थांबला नाही. तर, त्याने पुढे देखील अनेक करामती केल्या.
घेतलेला पैसा संपला की, याला या वृद्धाची आठवण होत होती. पुढे मे 2022 मध्ये रेवगडे कंगाल झाला. त्याने पुन्हा वाकचौरे यांचे घर गाठले. त्याने नामदेव यांना त्यांच्या सुनेने राज्य महिला आयोगाकडे केेली तक्रार दाखविली. तेव्हा सांगितले की, पहिली तक्रार आपण केली होती. त्या सर्व अधिकार्यांची चौकशी लागली आहे. त्यामुळे जे नव्याने अधिकारी आले आहेत. त्यांना आता पैसे द्यावे लागणार आहे. त्याने दाखविलेल्या कागदांवर राज्य महिला आयोगाचा शिक्का देखील होता, त्यामुळे, संबंधित कागद कायदेशिर आहे. हे तरी लक्षात येत होते, त्यामुळे, येणार्या काळात 20 वर्षे शिक्षा लागयची नसेल तर ही चौकशी मिटली पाहिजे असे रेवगडे याने सांगितले होते. मात्र, इतका पैसा आणायचा कोठून? उपलब्ध करायचा कसा? असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे त्यांनी आरोपी रेवगडे याच्याकडे थोडा वेळ मागितला होता. या दरम्यानच्या काळात रेवगडे हे नामदेव यांना फोन करणे, व्हाटसअॅपवर तक्रारी टाकणे, धमक्या देणे अशी कामे चोख पार पाडत होता. त्यामुळे, नामदेव हे प्रचंड भेदरुन जात होते.
दरम्यान, जेव्हा नामदेव यांनी पुन्हा डॉ. रेवण वाकचौरे यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा रेवण यांना शंका आली. आजवर कधी इतकी पैशाची गरज पडली नाही, मागीलवेळी नेलेले 3 लाख पुन्हा दिले नाही. तोच पुन्हा पैसा हवा आहे. त्यामुळे, त्यानी नामदेव वाकचौरे यांच्याकडे सखोल चौकशी केली. तेव्हा घडला प्रकार समोर आला. त्यानंतर नामदेव यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. अकोले पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनाक्रम ऐकल्यानंतर कोणताही विलंब न करता गुन्हा दाखल करुन घेतला आणि आरोपी सचिन रेवगडे यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून कम्पुटर सेट, पेनड्राइव्ह, बनावट रबरी शिक्के, राज्य महिला आयोगाचे बनविलेले कागदपत्र, दोन मोबाईल, एक चारचाकी वाहन असा 5 लाख 50 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, या बहादराने दिव्य मराठीच्या नावे एक बनावट बातमी तयार केली आहे, झी.24 तास, न्युज 18 इंडिया, साम टिव्ही, यांच्या नावे बनावट ब्लॅग देखील तयार केलेले आहेत. असे अनेक कारनामे त्याचे उघड झाले आहेत. पोलीस निरीक्षक घुुगे आणि पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे, विठ्ठल शरमाळे, अजित घुले, सुयोग भारती, आत्माराम पवार, संदिप भोसले, प्रदिप बडे, फुरकान शेख यांच्यासह अन्य पथकाने या गुन्हात मोलाची मदत केली.