पिंपळगावच्या धरणातून थेंबभर पाणी कोठे जाऊ देणार नाही.! आंदोलन नको,कोणाची नौटंकी नको.! राजकारण नको.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले विधानसभा मतदार संघातील पठार भागावर 10 गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी जल जिवण मिशन योजनेतून 65 कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. ही बाब 20 हजार जनतेसाठी सुखद असली तरी दुसरीकडे 1 लाख लोकांसाठी मात्र वेदना देणारी ठरु पाहत आहे. अर्थात याचे कारण देखील तसेच आहे. की, ज्या पिंपळगाव धरणाच्या 600 शे दलघफू पाण्यावर लाखो लोक सुखाचा घास खात आहे. कालपर्यंत ओसाड पडलेल्या जमिनीने आज हिरवा शालु परिधान केला आहे. काल तहानलेल्या प्राण्यांचा घसा आज ओला झाला आहे. अशा सुखाच्या परिस्थितीत जर कोणी धरणात वाटेकरी उभा करीत असेल तर सहाजिकच येथील शेतकर्यांच्या पायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, पठारावरील तहानलेल्या 10 गावांना पाणी जरुर दिलेच पाहिजे. मात्र, त्यासाठी धरणाच्या खालच्या बाजुला तीन ते चार ठिकाणी स्टोअर टँक उभे करता येतील. किंवा पठारावर असणार्या तीन बंधार्यांमध्ये पाणी सोडून 24 तास घरोघरी पाणी देता येतील असे पर्याय आहेत. असा काहीतरी मार्ग सामोपचाराने निघेल अशी परिस्थिती आहे. याबाबत धरणाचे पालक अजित दादा पवार, जयंत पाटील आणि ना. बाळासाहेब थोरात यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यामुळे, काही झाले तरी धरणातून थेंबभर पाणी निघणार नाही. याची शाश्वती सिताराम पाटील गायकर यांनी दिली आहे. त्यामुळे, कोणी आंदोलन करणे, त्यावर जाऊन उड्या मारणे, नको ती नौटंकी करुन धरणावर राजकीय भिंती उभ्या करण्याचे काम करु नये, असे परखड मत गायकरांनी मांडले.
सन 2014 पुर्वी पठार भाग काय आणि कोतुळसह 22 गावे काय.! अगदी सारखीच होती. मात्र, अजित दादा पवार यांनी विशेष बाब म्हणून पिंपळगाव खांड धरणाला मंजुरी देत 50 कोटी रुपये वर्ग केले आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसात राज्यातील सत्ता बदलली. म्हणजे, तो काळ तालुक्यातील लाखो शेतकर्यांसाठी किती सुवर्णकाळ होता. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यावेळी हरिश्चंद्र गडापासून निघणारे पावसाचे पाणी थेट राहुरीच्या 26 टिएमसी मुळा धरणात जाऊन धडकत होते. म्हणजे, डोळ्यादेखत पाणी वाहुन जाई. मात्र, घशाला आणि शेतीला पाणी मिळत नव्हते. अशा पडत्या काळात माजी मंत्री मधुकर पिचड, सिताराम पाटील गायकर, सिताराम देशमुख, मिनानाथ पांडे यांसारख्या काही व्यक्तींनी मुळा परिसराला नवसंजिवणी दिली. त्यामुळे, तेव्हा दिड हजार हेक्टर तर आता तीन हजार हेक्टर शेती त्या परिसरात ओलिताखाली आली आहे.
पिंपळगाव खांड धरणाचा फायदा.!
मोग्रास, पांगरी, पिंपळगाव, लिंगदेव, सिरवड, चौधरी लहित, चास, कौठे, बोरबन, घारगाव, कौठे, पिंपळदरी, गुडशेतलन, वाघापुर, बोरी, भोळेवाडी, नाचनठाव, कोतुळ यांसह 25 गावांना पाणी पुरवठा होतो आहे. काही ठिकाणी नळ योजना झाली असून काही ठिकाणी प्रलंबित आहे. याच परिसरातून 2 लाख टन उस गाळप होऊ लागला आहे. हजारो ट्रक कांदा मुळा पट्यात येतो तर दोन लाख लिटरच्या जवळपास दुधाचे उत्पादन घेतले जाते. या धरणामुळे, अगदी वाशेरे, सुगावर्यंत पाण्याची भुजलपातळी वाढली आहे. तरुण मुलांना शेतीत स्वरस्य आले आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील सहकार वाढविण्यात धरणाचे मोलाचे योगदान आहे. 3 हजार हेक्टर शेती याच पाण्यावर अवलंबुन आहे. ओसाड शेती वाल्यांना बागायतदार शब्दाची देण ही याच धरणामुळे लाभली आहे. असे अनेक फायदे अवघ्या 600 शे दलघफू पाण्यामुळे, झाले असून हे धरण म्हणजे 25 गावांचा आत्मा आहे.
हे स्वर्थी व धुर्त राजकारण थांबवा.!
जवळे बाळेश्वरसह 10 गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी डॉ. लहामटे यांनी पत्र दिले. त्याला 65 कोटींचा निधी मंजुर झाला. त्यामुळे, 25 गावांतील चार डोक्यांना पुढे करुन हा आमदार तुमचे पाणी कसा खाली देतो आहे. हे सांगण्यात अनेकांनी राजकीय स्टण्टबाजी सुरू केली आहे. पाणी आडवा पाणी जिरवा या ऐवजी याची आडवा त्याची जिरवा अशी निती काही विरोधक करत आहे. खरंतर या योजनेचे अजून कशातच काही नाही. मात्र, त्यापुर्वीच कोणी जेलमध्ये जायच्या भाषा करत आहे तर कोणी धरणात उड्या मारू पाहत आहे. कोणी आंदोलन छेडू पाहत आहे तर कोणी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम जोरदार करत आहे. त्या 10 गावांना पाणी द्या. पण, पिंपळगाव खांडच्या धरणातून नको. ही भूमिका डॉ. लहामटे, गायकर साहेब यांच्या लक्षात आली आहे. ती त्यांना देखील शंभर टक्के मान्य आहे. म्हणून तर त्यांनी थेट अजित दादांची भेट घेतली. दादांनी त्यावर ग्रिन सिग्नल देखील दिला. मात्र, काही लोकांनी असा बाऊ उभा केली की, जणुकाय उद्याच धरणात फुटबॉल टाकला जाणार आहे. लगेच पाणी उपसणार आहे. सगळी गावं ओसाड होणार आहे. म्हणजे यांना इतकी घाई झाली आहे की, कधी आम्ही आंदोलन करतोय आणि कधी आम्ही तासतास भाषणं ठोकून आरोपांचे फवारे मारतोय.! हे कोठेतरी थांबले पाहिजे. मुळा पट्ट्यातील जनते आणि शेतकर्यांनी देखील संयमाने घेतले पाहिजे, कोण आपल्याला भडकवून देत आहे, कोणी कोणाच्या पाणी ओतत आहे, कोणाला त्यात राजकारण करायचे आहे, कोणाला कोणाचा वैयक्तीक द्वेष आहे, कोणाला जनतेला भडकवायचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आमदार कामाचा आहे, विकासकामे होत आहे, गडी तापड आहे पण निरोपयोगी नाही. हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे, आ. डॉ. लहामटे, सिताराम पा. गायकर, भांगरे साहेब, पांडे साहेब, सिताराम देशमुख यांच्यासारख्या व्यक्तींवर विश्वास ठेवा. पिंपळगाव खांड धरणातील थेंबभर पाणी सुद्धा ते काढू न देता पर्यायी व्यवस्थेतून जल जिवण योजनेची आंमलबजावणी करतील...!!
काय करता येईल...!
आता काही झाले तरी पिंपळगाव खांड धरणातून पाणी काढायचेच नाही हे ठरले आहे. मग त्या 10 गावांना पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न पडतो. तर, त्यासाठी अनेक पर्याय आहेत. पहिला म्हणजे चास पिंपळदरी या ठिकाणी पाण्याचा साठवण तलाव करणे शक्य आहे. किंवा घारगाव बोरबन येथे देखील हा तलाव करणे सहज शक्य आहे. तसे केले तर किमान काही किलोमिटरचे आंतर वाचते आणि 65 कोटी मधील पैसा देखील वाचतो. या तलावांतून पाणी उचलायचे आणि पठारावर चोंबरदरा, आभाळवाडी अशा काही ठिकाणी जे बंधारे आहेत. त्यात पाणी नेवून टाकायचे, असे केले तर या 10 गावांनाच काय.! अन्य पठारावर 24 तास पाण्याचा प्रश्न कायम मिटून जाईल. खरतर पठारावर कित्तेक ठिकाणी डोंगर दर्या आहेत. जेथे एक ते दिड टिएमसी पाणी बसू शकेल अशी ठिकाणी आहेत. खरंतर या पानलोट क्षेत्रात 1085 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे, छोटी मोठी धरणे ऑगस्टच्या पुर्वीच भरुन जातात. खाली 26 टिएमसीचे मुळा धरण भरुन 30 ते 40 टिएमसी पाणी खाली जायकवाडीकडे सोडले जाते. त्या जोरावर 102 टिएमसी धरण भरते. मग हे पाणी अकोले आणि संगमनेर तालुक्यात आडविले तर काय हरकत आहे? त्यासाठी ना. बाळासाहेब थोरात आणि डॉ. लहामटे यांनी मनावर घेणे गरजेचे आहे. यात दोन्ही तालुक्यांचे हाल होत आहे. त्यात पठाराचे अधिकच. खरंतर पठाराची गत म्हणजे, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी मेला, अशी झाली आहे. कारण, विधानसभेला अकोले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी संगमनेर, अशी गोची पठार भागाची आहे. त्यामुळे, त्यांच्याकडे दोन्ही आमदारांनी लक्ष घातले तर त्यात योग्य मार्ग निघु शकेल.