पळुन-पळुन थकलेल्या तरुणाचा एका ठोक्यात जीव घेतला, तिघांना अटक, एक पसार, पाभुळवंडी येथील त्या खुनाचे गुढ उलगडले.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील पाभुळवंडी येथे दि. 5 मे 2022 रोजी योगेश भास्कर भालेराव या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून या गुन्ह्यातील दोन आरोपी पसार होते. नेमकी ही हत्या कशामुळे झाली, यात किती जणांचा सहभाग आहे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता. मात्र, राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी मोठ्या कसोशीने चार आरोपी निष्पन्न करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात तिघांना अटक करण्यात आली असून अद्याप एक मुख्य आरोपी पसार आहे. मधुकर दत्तु जाधव, कुणाल मधुकर जाधव, आश्वीन रमेश जाधव अशा तिघांना बेड्या ठोकल्या असून मुख्य आरोपी रमेश जाधव हा अद्याप पसार आहे. यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाल हा फोनवर मोठ्याने बोलत होता. त्याला मयत योगेश याने हटकविले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि योगेशने कुणालला मारहाण केली होती. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोेपी व मयत योगेश यांच्यात चकमक झाली आणि चौघांनी मिळुन त्याचा काटा काढला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 4 मे 2022 रोजी योगेश भास्कर भालेराव हा पाभुळवाडी गावात गेला होता. त्यावेळी एका टेकाडीवर त्याचा एक अवैध व्यवसाय असल्यामुळे तो त्याच्या कामात मग्न होता. तेव्हा कुणाल हा तेथे गेला आणि मोबाईलवर जोरजोरात बोलण्याच्या कारणाहून यांच्यात वाद झाले. तेव्हा मयत योगेश कुणाल यास म्हणाला की, येथे मोठ्याने बोलु नको. तु कुठला आहेस? तुला येथे कधी पाहिले नाही. तेव्हा, कुणाल म्हणाला की, इथेच राहणारा आहे. मात्र, कसारा येथे स्थायिक आहे. तेव्हा येथे दोघांमध्ये शब्दीक चकमकी झाल्या आणि शिवीगाळ दमदाटीत रुपांतर झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, योगेशने कुणाला यास चांगलीच मारहाण केली. त्या दिवशी हा वाद मिटला होता. योगेश घरी गेला तेव्हा त्याने घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला देखील होता. मात्र, कुणालच्या घरच्यांनी योगेशला जाब विचारण्यासाठी पुन्हा योगेशचे घर गाठले...!
दरम्यान, योगेश हा काही माल आणण्यासाठी शेंडी येथे त्याची स्कुटी घेऊन गेला होता. तो परत येत असताना आरोपींनी त्यास पाहिले आणि काठ्या घेऊन ते योगेशच्या मागे लागले. देवगाव परिसरात असताना योगेशने दोघांना पाहिले असता त्याने गाडी सोडून थेट पळ काढला. खरंतर योगेश धिप्पाड होता. मात्र, तो पळाल्यामुळे पुर्णत: दमला होता. जेव्हा त्याला आरोपींनी पकडले तेव्हा त्याने एकास मारहाण केली. मात्र पळुन-पळुन दमल्याने त्याला दोघांना फारसा प्रतिकार करता आला नाही. त्यामुळे, आरोपी यांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली तर एक जोराचा फटका नाजुक ठिकाणी लागला आणि योगेशला त्यांनी अखेरचा श्वास घ्यायला लावला. हा सर्व प्रकार तेथील निवृत्त पोलीस पाटील यांनी पाहिला होता. आरोपी हे योगेशला मारहाण करीत होते. तेव्हा त्यांनी आरोपींना विरोध देखील केला होता. तुम्ही माझ्या शेतात कोणाला मारहाण करु नका असे सुनावले होते. त्यामुळे, पाटील हे मुख्य आय विटनेस पोलिसांना सहाय्यभूत ठरले.
दरम्यान, घटना घडल्यानंतर पहिल्यांदा रमेश दत्तु जाधव आणि मधुकर दत्तु जाधव यांना आरोपी करण्यात आले होते. ही दोघे सख्खे भाऊ असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यात कुणाला मधुकर जाधव आणि आश्वीन रमेश जाधव अशा दोघांचा देखील हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना मुंबईतून अटक केली असून या गुन्ह्यातील रमेश जाधव हा अद्याप पसार आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा पुढील चौकशीसाठी कोर्टाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खरंतर हा गुन्हा घडल्यानंतर सामाजिक वातावरण फार गढुळ झाले होते. मात्र, सपोनी साबळे यांनी त्यास योग्य रितीने हताळले. कोणालाही पाठीशी न घालता संयमाने गुन्ह्याला न्याय दिला आहे. येणार्या काळात या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी देखील लवकरच अटक केला जाईल असा आशावाद त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.