लोक म्हणतात, कैलास वाकचौरे पुन्हा येतील, पुन्हा येतील...!! त्यामागिल सत्य काय? चर्चेला उधान..!



  - सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :-

              माजी मंत्री मधुकर पिचड साहेब हे अकोले तालुक्यात पर्मनन्ट आमदार होते. कारण, त्यांच्याकडे संघटन कला आणि सहज कोणाच्याही पाठीवर हात ठेवून बळ देण्याची शैली होती. राज्यात आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी तालुक्यात बहुजनांना कधी वार्‍यावर सोडले नाही. म्हणून गेली कित्तेक वर्षे सिताराम पा. गायकर यांच्या सहयोगाने त्यांनी तालुका एकसंघ विचारांनी बांधून ठेवला. त्यांनी 40 वर्षे काय केले हा मुद्दा नंतर आहे. मात्र, त्यांनी तालुक्यातील पुरोगामी संस्काराला कधी गालबोट लागू दिले नाही. हे देखील तितकेच खरे आहे. म्हणून त्यांना आज देखील माननारा वर्ग फार मोठा आहे. का कोणास ठाऊक ते भाजपमध्ये कसे गेले.! त्यांच्यामुळे येथील बहुजन नेते गायकर साहेब, मधुभाऊ नवले आणि कैलास वाकचौरे यांच्यासह पुरोगामी विचारांच्या भल्याभल्या नेत्यांना कमळाच्या सुगंधाची अनुभूती आली. आता, एकीकडे व्यक्तीनिष्ठा आणि दुसारीकडे पक्षनिष्ठा या बुचकळ्यात अनेकजणांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली. मात्र, गायकर आणि नवले यांनी वेळ पाहून कमळाच्या रथातून अलगद उड्या मारल्या. राहिले फक्त कैलास वाकचौरे, अर्थात त्यांनी नगरपंचायतीत स्वत:ला सिद्ध केले. मात्र, भाजप आणि त्यात होणारी घुसमट त्यांची काही कमी नाही, हे विशेषत: नगरपंचायतीच्या अधिकार पदांच्या वाटपात दिसून आले. त्यामुळे, उद्याच्या निवडणुका लक्षात घेत ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील अशा प्रकारची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र,  तसे कोणतेही खात्रीशिर वृत्त नाही. तर, वाकचौरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो झाला नाही.


मुळ विषय असा आहे की, गेल्या कित्तेक दिवसांपासून कैलास वाकचौरे हे राष्ट्रवादीत येणार अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र, पहिली कायदेशीर बाब अशी सांगते की, ते मुळात राष्ट्रवादीचे संविधानात्मक राजकीय जबाबदार पदाधिकारी आहेत. कारण, जिल्हा परिषदेत ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे, ते पक्षात येणार अशी चर्चा मुळात नियमानुसार चुकीची आहे. आता राहिला प्रश्न राजकीय नैतिकतेचा, तर तेथे मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. कारण, ते तालुक्यात व्यक्तीनिष्ठ म्हणून भुमिका पार पाडतात तर जिल्ह्यात पक्षनिष्ठ म्हणून. त्याचे कारण देखील तसेच आहे. त्यांना 1995 पासून माजी मंत्री पिचड साहेबांनी आपल्या विश्वासू मंडळात स्थान दिले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, कारखाना आणि निर्णय मंडळात त्यांना मोलाचे स्थान आहे. त्यामुळे, आख्खी राजकीय कार्यकीर्द त्यांनी पिचड साहेबांच्या सावलीत घालविली आहे. त्यामुळे, त्यांना तालुक्यात एकटे पाडणे हे त्यांच्या नैतिक राजकारणाला पटत नाही. म्हणून, जिल्ह्यात ते पक्षाशी निष्ठावंत आणि तालुक्यात साहेबांशी अशा प्रकारची त्यांची भुमिका असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे.

खरंतर, कैलास वाकचौरे यांचे राजकारण म्हणजे समुद्राच्या संथ पाण्यासारखे आहे. गणिमी काव्यांना ते कमी नाहीत, विचारांची खोली अगाध आहे, तुसड्या भावनेचे राजकारण नाही, लगेच कोणावर रिअ‍ॅक्ट होणार नाहीत, आपल्यामुळे फार एखाद्याचे आयुष्य राजकारणातून बरबाद होईल अशी त्यांची धोरणे नाहीत, विशेष म्हणजे माईक समोर आला म्हणजे लागेच कोणाची आय-माय काढून मोकळं व्हायचं ही वृत्ती तर नाहीच नाही. त्यामुळे, त्यांचे देखील संघटन चांगले आहे, त्यांना माननारा वर्ग मोठा आहे. सहज कोणलाही मदत करण्याची वृत्ती आणि शांत, संयमी चेेहरा म्हणून आजवर जनतेने त्यांना स्विकारले आहे. त्यामुळे, त्यांचे राष्ट्रवादीत असणे तथा तालुक्यात पक्षाकडून क्रियाशिल होणे हे पक्षासाठी कधीही चांगले असणार आहे. कारण, तालुक्यातील बंडखोर पदाधिकार्‍यांच्या "खोगिर भरतीपेक्षा" वाकचौरे यांच्यासारखे नेतेच पक्षाला येणार्‍या काळात साधक ठरू शकतात. कारण, गटनेत्यांनी स्वत:ची ताकद आणि नियोजन म्हणजे काय.! हे दाखवून दिले आहे. म्हणून, त्यांचे महत्व आजकाल रिझल्ट ओरिऐंन्टेड वर्कमुळे वाढले आहे.

खरंतर, अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर पडद्याआड असणार्‍या काही निवडक लोकांमध्ये कैलास वाकचौरे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. मात्र, जेव्हा नगराध्यक्ष ते समित्या वाटप यंत्रणा कार्यान्वीत झाली. त्यानंतर भाजपमध्ये धुसफुस सुरू झाल्याचे बोलले जाऊ लागले. त्यात वाकचौरे हे देखील नाराज झाल्याच्या चर्च्यांना उधान आले. तेव्हापासून ते घरवापसी करणार अशी चर्चा तालुकाभर रंगली. अर्थात याला काही कांगोरे देखील आहेत. ते यात मांडणे संयुक्तीक नाही. मात्र, त्यांना पक्षात कार्यरत करण्यासाठी प्रयत्न झाले. तशा बैठका देखील झाल्याचे बोलले गेले. मात्र, त्यावर वाकचौरे यांनी मौन पाळले. आता खरं काय आणि खोटं काय? याबाबत तालुक्यात प्रचंड संभ्रम आहे. जेव्हा आमदारांसह अन्य जबाबदार नेत्यांचा कौल घेतला तेव्हा त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक सिग्नल मिळाला नाही. ना याबाबत वाकचौरे यांनी मौन सोडले. त्यामुळे, तालुक्यात कालपर्यंत जी गोपनिय चर्चा सुरू होती. ती आता उघड-उघड झाली आणि अगदी या चर्चेचा चव जाऊन चोथा उरला. तरी देखील खरं काय? हे सत्य बाहेर आले नाही.

आता थोडं मागे वळून पाहिले तर लक्षात येते की, गायकर साहेब यांनी देखील पिचड साहेबांशी निष्ठा ठेवली. मात्र, कारखाना टिकला पाहिजे, दादांचा विश्वास कायम राहिला पाहिजे, पक्षाचे संघटन झाले पाहिजे म्हणून त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाला देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकांची वाट पहावी लागली. त्यामुळे, वाकचौरे हे देखील जिल्हा परिषद आणि कारखान्याच्या निवडणुकांच्या मुहूर्तावर कार्यरत झाले तर नवल वाटायला नको.! कारण, काही झालं तरी नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाय घट्ट आहे. दिमतीला काँग्रेस आणि राज्याच्या गणितानुसार शिवसेना देखील. त्यामुळे, राजकारणात स्थिराता प्राप्त होण्यासाठी राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. त्यात आरक्षणावर बरेच काही अवलंबून आहे. विशेेष म्हणजे वाकचौरे यांचे नातेगोते मोठे असून ते त्यांच्या गटातून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. मात्र, जिल्ह्यात सत्तेत बसायचे असेल तर त्यांना योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे. आता सध्यातरी त्यांच्या वापसिवर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी सध्यातरी कोणच्याही प्रकारचे भाष केले नसून त्यांची भूमिका वेट अ‍ॅण्ड वॉच अशीच असणार असल्याचे दिसते आहे. यात एक बाकी नक्की, ते येतील जातील हा भाग वेगळा. मात्र, त्यांची विचारधारा ही धर्म आणि जातीयवादी नसून पुरोगामी स्वरूपाची आहे. सध्यातरी इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची फसगत असली तरी काल भाजपची शाखा कळसमध्ये उघडणारे वाकचौरे आज त्यांची सोसायटी एकहाती आल्यानंतर त्यांच्या बॅनरवर पिचड-पिता पुत्रांचा फोटो देखील दिसत नाही. याहून चर्चा होते आणि म्हणून लोक म्हणतात. ते पुन्हा येतील, ते पुन्हा येतील, ते पुन्हा येतील...!!