गरिबाच्या दारी आमदार येईल का असे म्हणताच आमदारांचा ताफा तिच्या घरी दाखल झाला.! अन....



सार्वभौम (अकोले) :-

                आमदार-खासदार म्हटलं की, भल्याभल्यांना हेवा वाटतो. कारण, पैसा-आडका, बंगला गाडी आणि तो रुबाब आणि मिजास.! त्यामुळे, पांढर्‍याशुभ्र कडक इस्त्रीला सामान्य जनमानसांमध्ये फार क्रेझ आहे. अर्थात अशी आमदारकी या लोकशाहीला अपेक्षित नाही. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आम जनतेला तो व्यक्ती आपला वाटला पाहिजे. किमान मुलभूत गरजा भागवेल अशी त्याची कामे असली पाहिजे आणि सहज कोणाच्याही काळजावर अधिराज्य गाजवेल इतका तो समाजभिमुख असला पाहिजे. अगदी तसाच आमदार म्हणजे डॉ. किरण लहामटे साहेब आहेत. काम बोलाल तर अडिच वर्षेत पाचशे कोटींच्या जवळपास निधी, स्वभाव पहाल तर कोणालाही हात जोडेल, मन पहाल तर दिसेल त्याच्याशी तोंडभरुन बोलेल, वागणं पहाल तर अगदी शेणानं सारविलेल्या घरात मांडी घालुन बसेल, आहार पहाल तर लसनाची चटणी आणि बेसन भाकर, त्यामुळे, काटेरी चमच्यांनाच नव्हे.! आमदारकीची मिजास गाजविणार्‍या चमच्यांना देखील त्यांनी डस्टबीन जमा केले आहे. असे मत एका सामान्य महिलेने दिले आहे. कारण, आमदार माझ्या घरी येऊच शकत नाही. असे म्हणणार्‍या महिलेच्या घरी जेव्हा साहेब अवतरतात तेव्हा.! सहज अशा प्रकारचे शब्द महिलेच्या तोंडून बाहेर पडतात...! इडा पिडा जावो अन पुन्हा हेच आमदार होवो.! 

काल, अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे यात्रा होती. येथील सोंगांचा पारंपारिक नाच पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. यावर्षी 11 लाख रुपयांना या सोंगांचा लिलाव झाला होता. सायंकाळी 6 ते पहाटे 7 वाजेपर्यंत सोंगांची मिरवणुक होते. त्यामुळे, तेथे तालुक्यातील सर्वच प्रतिष्ठीत लोक आपली हजेरी लावतात. त्यात तालुक्याचे आमदार देखील रात्री 12 वाजता धावती भेट देऊन जातात. आता आमदार म्हटलं की, सामान्य मानसांना वाटतं. हे काम पुढार्‍यांचे आहे, आमदार महोदय त्यांच्याच घरी चहापण करतील, जेवण नाष्टा सगळं काही ताजंताजं आणि लुसलुशीत. अर्थात पुढारी देखील त्यांचं पुढंपुढं करायला काही कमी नसतात. हे सर्व चित्र आपण याची देही याची डोळा गेली कित्तेक वर्षे अनुभवलं आहे, पाहिलं आहे. नेता आला म्हणजे त्याने गाव पुढार्‍याच्या घरी जायचं, त्याचं गुणगाण करायचं आणि भलभक्कम रिचवून चालतं व्हायचं. या पलिकडे वेगळा पायंडा नाही.

खरंतर, डॉ. किरण लहामटे म्हणतात की, जनतेचा आमदार आहे. मी, लोकांमध्ये आहे. मी सामान्यांचा कैवारी आहे. त्याची प्रचिती काल लिंगदेवमध्ये आली. त्या दिवशी यात्रेच्या भोंग्यातून आवाज आला. तालुक्याचे कर्तबगार आमदार याचे येथे स्वागत आहे. त्या क्षणी एक महिला बोलली आले बाई हे नेते. आता सोंग नाचायचे थांबतील. तेव्हा सहज त्या व्यक्तीला म्हटलं गेलं, आमदार महोदय तुझ्या घरी देखील येतील. तेव्हा, महिला अचानक डचकली आणि म्हणाली.! साहेब, अन माझ्या घरी.! कायपण नको सांगू..., येथे पुढारी काही कमी नाही. त्यांच्याकडे ते जातील. आपली मेनाची झोपडी आणि शेणाची भुई ते कशाला आपल्याकडे येतील? तिला सांगितलं, हे आमदार तसे नाही. साद घातली तेथे ते उभे राहतात. त्यांच्या गाडीच्या काचा खाली राहतात, त्यांना लोकांना प्रेरणा द्यायला, लढ म्हणायला आवडतं, शेणाच्या घरात मांडी घालुन भाजी भाकर खायला अवडते, जनतेच्या सुख दु:खात जायला आवडते. त्यामुळे, तू विचार नको करु फक्त हो म्हण.!


त्या बिचार्‍या माय माऊलीला आपल्या गरिबीची खंत, एक खोलीचा संसार आणि चार डोकं मावतील असा हॉल. त्यात पती म्हणजे कोणाच्या दु:खावर सलणार नाही इतका शांत मुद्रेचा धनी. दोन लहान मुलं चुल्हीवरचं आयुष्य. त्यामुळे, कशाला जगा-दुनियेेच्या पुढे मांडायचे हे हाल. त्यामुळे, प्रचंड इच्छाशक्ती असून देखील जड अंत:करणाने नाकार देणारी ती माय माऊली. शांतपणे एका कोपर्‍यात बसून सोंगांची कला पाहत होती. गेल्या काही दिवसांपुर्वी आई-वडिल दोघे कोरोनाने गेल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्या सगळ्या नऊ बहिनी आणि भाऊ, पण दोघे एकाच वेळी गेल्याने सगळा परिवार पोरका झाला होता. म्हणून तर आमदार महोदयांना त्यांच्या सांत्वनासाठी न्यावं असे वाटले.

रात्री 12 वाजून गेले असावेत. सोंगांनी सनई ताफ्यावर ठेका धरला होता. आमदार साहेब अकोल्याकडे निघाले आणि तो मेसेज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी कधी-कोठे-केव्हा असा शब्दभर प्रश्न केला नाही. ते भर गर्दीतून वाट काढीत त्या घराकडे निघाले. त्या रात्री फक्त महिलेला वर हात करुन खुनावले. आमदार महोदय तुझी घरी येत आहे. तिची सगळी गरबड झाली. धावत पळत घरी जाऊन तिने पांचारती केली. घरातला टोपी टॉवेल काढून कोठून कसा नारळ आणला. साहेबांसोबत नगरसेवक नवनाथ शेटे, इमेज हॉलीडे ट्रॅव्हल्सचे हरिभाऊ फापाळे, गणेश आवारी, अनिल कोळपकर, अंकुश वैद्य, मुकुंद लहामटे असे अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती होते. साहेबांना पाहुन सिमा आढाव, दत्तात्रय आढाव यांचे मन भारावून गेले होते. एका सामान्य कुटुंबाला दिलेली भेट ही त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती. एक आमदार दलित वस्तीतील रस्ता तुडवित एका व्यक्तीच्या घरी जाऊन पाहुणचार घेतो. हे तालुक्यासाठी 2019 नंतर दिसू लागले आहे. त्यामुळे, या महिलेच्या भावना खरोखर काही औरच होत्या. यात आमदारांच्या मनाचा मोठेपणा, साधेपणा आणि जमिनिवर पाय असणारा नेते म्हणून खरोखर त्यांची प्रतिमा जनमानसांमध्ये उजळुन गेली. तर संविधानाला जे अपेक्षित लोकप्रतिनिधी असतात त्यात डॉ. लहामटे हे नाव तालुक्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजू लागले आहे.