शिवसेना वाघांच्या मांजरासारख्या कळवंडी.! फालतु शब्द आणि थडक्लास राजकारण.! राजकीय बाजीरावकी कोणाची.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात काल शिवसेनेच्या दोन गटांमध्ये अर्वाच्च शब्द आणि सोबर शिविगाळीसह अक्षरश: हमरी-तुमरी करुन काही पत्रकार परिषदा झाल्या. मी चांगला कसा आणि तो नालायक कसा.! हे मांडताना मधुकर तळपाडे आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत शब्दांचे तारतम्य बाळगले. मात्र, बाजीराव दराडे यांचा सयम सुटला. अर्थात असेलही तळतळ, मात्र त्यांची बाजीरावकी त्यातून दिसून आली. त्यामुळे, ते स्वभावत: कसे वागत असतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही. एकंदर, शिवसेनेच्या नेत्यांनीच शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात बंड पुकारणे हे काही आजच्या परिस्थितीला साजेसे नाही. कारण, राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ते सरकार टिकविण्यासाठी आणि या महाराष्ट्रात शिवसैनिक कोणत्याही कठिण प्रसंगाला तोंड देऊन स्वत:ला सिद्ध करु शकते हे दाखविण्यासाठी विरोधकांच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत आहेत. असे असताना त्यांना राज्याच्या कानाकोपर्यातील प्रत्येक शिवसैनिकांनी बळ देणे गरजेचे आहे. मात्र, दुर्दैव असे की, येथे दोन वाघ एकेकांमध्ये मांजरासारख्या कळवंडी करताना दिसत आहे. आता ही अशीच ताकद विभागली गेली, व एकात एक नाही अन बापात लेक नाही. असे पुढेही होत राहिले. तर, अकोले नगरपंचायतीत काय झाले. हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे, पुढच्याला ठेच मागचा शाहना.! अशी भुमिका घेऊन यांनी एकतर ऐकमेकांपासून थेट फारकत घेतली पाहिजे. अन्यथा सर्व मतभेद विसरुन एकत्र तरी आले पाहिजे. नाहीतर राज्यात भारी अन तालुक्यात भिकारी अशी गत कोणाची होऊ नये म्हणजे झालं. हे सर्व सोडा हो.! पण, एक गोष्ट तालुक्यात भारी सुरु आहे. ती अशी की, राज्यात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे आणि तालुक्यात तीच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ही एकमेकांना नावे ठेवण्यात व उणिधुनी करण्यात व्यस्त आहे. तर, सर्वात अधोरेखीत करण्याजोगी बाब म्हणजे अकोल्यात यांचे भाडंण लावून भाजप केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसते आहे. आता या भाजपला फितूर कोण आहे याचा शोध घेवून पुढील यंत्रणा आखणे हेच तालुक्यातील बुजुर्ग अनुभवी नेत्यांनी लक्षात घेऊन या विस्कटणार्या घडीला एक केले पाहिजे. अन्यथा येणार्या काळात पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.
खरंतर एक काळ होता. तालुक्याच्या राजकारणाला एक संस्कृती होती. नेत्यांच्या पक्षनिष्ठेला एक शाश्वती होती, तरुणांच्या मनात ज्येष्ठांविषयी आदर आपुलकी होती, आरोप-प्रत्यारोपांना देखील एक सिमा होती, कितीही पराकोटीचा विरोध असला तरी त्या शब्दांना मर्यादा होती आणि तालुक्याच्या राजकारणाला एक संस्कार होता. आता काय झालंय? मोठ्यांनी त्यांचे मोठेपण जपले नाही, जेष्ठांना त्यांच्या वयाचे भान नाही आणि माईक समोर आला की, तोंड कोणाच्या ताब्यात नाही. त्यामुळे, या पुरोगामी तालुक्याचा पार फदाना होऊन बसला आहे. आजही तालुक्यात मधुकर पिचड, डॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, शांताराम वाळुंज, विजय वाकचौरे, वैभव पिचड, सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले, विनय सावंत, महेश नवले यांच्यासह अगदी बोटावर मोजता येतील अशा नेत्यांच्या शब्दांनी त्यांचा स्थर ढासाळु दिला नाही. त्यामुळे, ही मानसे आहेत म्हणून तरी तालुक्यातील पुरोगामीत्व टिकल्यासारखे वाटते. अन्यथा काय ती भाषणे, काय तो उद्धार काय ते टुकार-टाकार शब्दप्रयोग आणि काय ती वैयक्तीक आयुष्यावरील टिका टिपण्णी.! काय बोध घ्यावा भल्याभल्या नेत्यांकडून? केवळ राजकीय स्थैर्यासाठी कोण कोणाच्या आयुष्यात डोकावून पाहतय तर कोण कोणाचे वस्त्रहरण करतय. इतकी निच पातळी तालुक्याच्या राजकारणाने कधी सोडलेली पाहिली नाही. याला जबाबदार खर्या अर्थाने नाही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जड-जड भाषेत मोठमोठ्या नेत्यांवर टिका करायची. नको त्या शब्दाचा वापर करुन बातम्यांच्या हेडिंगचे शिलेदार व्हायचे आणि लोकप्रियता मिळवायची. त्यामुळे, त्याच पावलांवर पाऊल ठेऊन नवी पिढी तोच अजेंडा घेऊन पुढे नाचत आहे. त्यामुळे, प्रत्येक पक्षाच्या तालुकाध्यक्षांसह जबाबदार नेत्यांनी आणि पदाधिकार्यांनी आपल्या राजकीय संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे. असे जाणकारांचे मत आहे.
खरंतर, परवा मच्छिंद्र धुमाळ आणि मधुकर तळपाडे यांनी पत्रकार परिषदेत जी काही मांडणी केली होती. ती नैतीक नितीमुल्या जोपासून होती. किमान उद्धट शब्दांच्या मर्यादा त्यांनी पाळल्या होत्या. मात्र, बाजीराव दराडे यांनी जो काही आवेश मांडला. त्याबाबत जनतेतून प्रतिक्रिया फार वेगळ्या उमटल्याचे पहायला मिळाले. दराडे यांची भाषा ही अत्यंत उद्धट होती. हे सोशल मीडियावर अनेकांनी मांडले. मात्र, तळपाडे साहेबांसारख्या मानसाने त्यांच्या शब्दांचा संयम ढळु देणे हे काही जनतेला पटले नाही. त्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत जे काही पुरावे मांडले ते त्यांच्या प्रोफेशन नुसार योग्य होते. त्याला सुज्ञ मतदारांनी पसंती दिली. मात्र, मच्छिंद्र धुमाळ यांच्या पंक्तीला बसून शेवटी उद्धट शब्दांनी आपले तोंड खराब केले. तर, भर पत्रकार परिषदेत पिस्तुल दाखविणे अर्थात आरोपाचे खंडण करताना देखील त्या शस्त्राचा शो करणे. हे देखील चुकीचेच आहे. एका निवृत्त पोलीस अधिकार्याने केलेले हे वर्तन त्यांना अडचणीचे कसे ठरू शकते. हे त्यांना देखील ठाऊक आहे. मात्र, काही झालं तरी तळपाडे यांच्यासारखा प्रांजळ मानाचा माणुस आजकाल तालुक्यात वेळ देत असून त्यांना जनता आता स्विकारु लागली आहे. अशा देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
एकंदर, समशेरपूर गट आता चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. ओपन आणि राखीव असे दोन्ही आरक्षण पडले तरी तळपाडे यांनी या गटातून कंबर कसली आहे. बाजीराव दराडे यांनी गटात कामे केली. मात्र, बहुतांशी ठिकाणी ते वादग्रस्त ठरले आहे. अर्थात काम करतो तोच चर्चेत येतो, आरोपाचा धनी होतो. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीवर अधिकार्यांपासून ते कर्मचारी आणि गावापासून ते तालुक्यापर्यंत चर्चा आहे. त्यांच्या दबावशाहीचे अनेक अधिकारी बळी आहेत असा आरोप होतो. त्यामुळे, त्यांच्यावर नेहमी टिका होते. त्याचा परिणाम असा झालाय की, त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीवर देखील गंडांतर येऊ पाहत आहे. आज शिवसेनेने त्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे, त्यांनी काँग्रेसला उद्घाटनातून जवळ केले आहे. तर, राष्ट्रवादीशी देखील त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. रिपाईला ते तिसरी आघाडी म्हणून साद घालत आहे. मात्र, कोठे बस्तान बसेनासे झाले आहे. तर, या सगळ्यात मारुती मेंगाळ यांची देखील फार मोठी गोची झाली आहे. एकदा उपसभापती झाले खरे, मात्र फार मोठे वैर त्यांना सहन करावे लागले आहे. एकीकडे मार्क्सवादी आता त्यांना स्विकारत नाही तर दुसरीकडे तिकीटासाठी शिवसेने औदा दारात देखील उभी करणार नाही. त्यामुळे, त्यांना काय करावे हे कळत नाही. सतिष भांगरे फार हुशार ठरले, त्यांनी काँग्रेस आवटून घेतली. डॉ. किरण लहामटे हे मेंगाळ यांना प्रतिस्पर्धी म्हणून स्विकारणार नाहीत. कारण, जे शितयुद्ध भागंरे आणि लहामटे यांच्यात चालु आहे. ते काही कमी नाही. त्यामुळे, अपक्ष वगळता पर्याय राहिलाय तरी कोठे? उलट मेंगाळ यांची लोकप्रियता अनेकांची डोकेदुखी ठरली आहे. मात्र, डॉ. लहामटे यांना आम्ही आमदार करण्यासाठी माघार घेतली, कोणी म्हणतं त्यांना आम्ही मोठं केलं त्यामुळे, त्यांना आता आम्हला सामावून घेतले पाहिजे. असे म्हणून लोक आमदारांवर चिखलफेक करीत आहेत. हे उपकार रुपी शब्द तालुक्यातील अनेकांकडून येत आहे. यावर देखील बोलले पाहिजे..!
खरंतर 2019 च्या विधानसभेत डॉ. किरण लहामटे हे आमदार झाले खरे.! मात्र, त्यांच्या विजयाला इतके बाप झाले, की जो भेेटेल तो म्हणतो, त्यांना निवडून आणायला आम्ही जीवाचं रान केलं, कोणी म्हणतो आम्ही रात्र-रात्र जागविल्या, कोणी म्हणतं आम्ही हजारो लाखो खर्च केेले, म्हणजे ते आमदार इतके कन्फ्युझ झाले आहेत की, नमायचं तरी कोणा-कोणापुढे.! अर्थात जो खरा पक्षप्रेमी व तळागाळातील व्यक्ती आहे ज्यांनी हेतू व स्वार्थ ठेवून काम केले नाही. ते कार्यकर्ते आमदारांना शब्दभर बोलत नाहीत. मात्र, सावंत साहेबांपासून ते अगदी आज दराडे साहेबांपर्यंत इकडे मेंगाळ साहेबांपासून ते भांगरे साहेबांपर्यंत प्रत्येकजण ओठावर आणतो आहे. मी केलं, मी म्हणून ते आमदार झाले- मी म्हणून ते पुढे आले. मुळेत हे उपकार जो तो व्यतीत करतो आहे. त्यामुळे, आमदार लहामटे हे प्रचंड कन्फ्युज झाले होते. त्यांनी दोन वर्षे या सर्वांचा तालामाला पाहुन घेतला, कोणाला दुखवू पाहिले नाही. याला सोबत घ्यावं तर तो रुसतो आणि त्याला सोबत घ्यावं तर हा रुसतो. त्यामुळे, आमदारांनी कायम एकला चलो रे.! ही भुमिका घेतली. आता हे सर्व करुनही प्रत्येकजण त्यांच्यावर उपकार असल्यासारखे बोलत आहे. मात्र, आमदारांनी या तालुक्याला विकास कामे काय असतात, निधी काय असतो, सामान्यांचा आमदार काय असतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे, आमदारांनी कोणाच्या खुशामतीचा ठेका घेतला नाही. तर त्यांनी विकासाचा ठेका घेतला आहे. त्यामुळे, मी म्हणून आमदार असा अविर्भाव कोणी गाजवू नये. असे देखील मत अनेकांनी व्यक्त केले आहे.