दोन लाख देऊन नवरी केली अन बाई गेला ना पळून.! एक नव्हे, तीचे अनेक नवरे.! नवरीवर संगमनेरात गुन्हा दाखल.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                      संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे एका तरुणाने दोन लाख रुपये देऊन नवरी करुन आणली. बाई पहिल्या मुळाला गेली अन तिकडून मध्यस्तीचा फोन आला. तुझ्या बायकोवर नाशिकमध्ये मिसिंगची तक्रार आहे. तेव्हा समजले की, हिने यापुर्वी आणखी एक तरुणाकडून एक लाख घेऊन त्याची देखील फसवणुक केली आहे. तेव्हा, संगमनेरच्या तरुणास समजले की, तेलही गेलं अन तुपही गेलं, हाती धुपाटनं आलं. त्यामुळे, त्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपली कायदेशीर बायको, तिची तोतया आई आणि अन्य नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अवघ्या पंधरा दिवसांपुर्वी घडली आहे. या प्रकारामुळे, तरुणांची किती बिकट अवस्था झाली असून महिला दिनाच्या निमित्त काही महिला आपल्या स्त्रीत्वाचा किती गैरफायदा घेतात हे देखील समोर आले आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे एक शेतकरी तरुणाचे लग्न ठरणार होते. त्यामुळे, त्यांना एक मध्यस्ती व्यक्तीने असा उपद्रवी सल्ला दिला की, नवर्‍याला नवरी मिळेल. मात्र, त्याला दोन लाख रुपये मोजावे लागतील. एकीकडे कोरानाचा काळ, त्यात शेतकर्‍यांना कमी लेखणे, त्यात नोकर्‍या नाहीत अन मुलींचा घटता जन्मदर त्यामुळे, पैसे देऊन का होईना नवरदेव भाजून घेणे हीच भुमीका अनेकांची असते. त्यामुळे, नवरदेवाच्या घरच्यांनी देखील दोन लाख रुपये देणे कबुल केले. त्यानंतर दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी मुलाच्या घरी मध्यस्ती आले. त्यांनी सांगितले की, मुलगी ही कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर येथे आहे. आता नवरीच पाहिजे म्हटल्यावर नेक काम के लिऐं देरी किस बात की? या सहा जणांनी गाडी काढली आणि थेट सावळीविहिर गाठले.

मुलगा आणि मुलगी यांनी एकमेकांना पाहिले. दोघांची पसंती झाली. एकमेकांनी तोंडभरुन गप्पा मारल्या आणि फसवणुकीचे पोहे खाऊन पाहुणे माघारी फिरले. मात्र, जाताना मुलीची तोतया आई म्हणाली की, आम्हाला मुलगा पसंत आहे. फक्त आता त्याचे घर पहायचे आहे. कारण, तेथे मुलगी नांदणार आहे. म्हणजे यांनी जे काही लग्नाचे सोपस्कर होते ते अगदी ठरवून पार पाडले. त्यामुळे, या लग्नाबाबत कोणाला साशंकता देखील आली नाही. त्यानंतर नवरी मुलगी, आई, तिचे अन्य नातेवाईक यांनी खांडगाव येथे येऊन मुलाचे घर पाहिले आणि ही लोक दोन लाख रुपये देऊ शकतात हे शाश्वत झाल्यानंतर यांनी लग्नास होकार दिला. ती घाई इतकी होती की, यांनी लगेच त्या रात्री लग्न करण्याचा निर्णय घेतला. झट मंगणी आणि पट ब्यह.! ताबडतोब हाळद लावून नवरी नटली तर नवरदेवाने देखील गुढग्याला बाशिंग बांधले. मोठ्या धावपळीत रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास हिंदु रिती-रिवाजाप्रमाणे तत्काळ हे लग्न लागवण्यात आले. लग्न पार पडले आणि लगेच मुलीच्या आईने मुलाच्या पालकांकडे हात पसरले. महाराज लग्न लावले आपला वायदा पुर्ण करा. तेव्हा ठरल्याप्रमाणे दोन लाख रुपये न देता एक लाख रुपये दिले गेले. बाईने कोर्‍या-कोर्‍या नोटा मोजुन घेतल्या आणि वर्‍हाडाने त्यांचे बिर्‍हाड गुंडाळुन चालते झाले.

त्यारात्री सगळा सावळा गोंधळ सुरू होता. दुसर्‍या दिवशी हाळद उतरविली आणि दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी नवरीच्या आईने नवरदेवाला फोन करुन कोपरगाव येथे बोलावून घेतले. सासुने बोलविल्यानंतर यांनी गाडी काढली आणि मध्यस्तींसह कोपरगाव गाठले. आता एक लाख मिळाले होते तर एक लाख येणे बाकी होते. त्यामुळे, सासुबाई म्हणाल्या की, जावईबुवा.! लग्न झाले म्हटल्यावर नोटरी केली पाहिजे. म्हणजे कायदेशीर तुमची लग्नाची बेडी पुर्ण होईल. त्यामुळे, यांनी कोपरगाव येथे लग्नाची नोंद करुन घेतली. ही सर्व प्रकार पुर्ण झाल्यानंतर सासुने पुन्हा हात पुढे केले आणि नवरदेवाने रोख पुन्हा एक लाख रुपये मोजुन दिले. दोन लाख पोहच केल्यानंतर नवरदेव खांडगाव येथे निघुन आला. मात्र, त्यानंतर दि. 2 मार्च 2022 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नवरदेवाला एका मध्यस्तीने फोन केला आणि सांगितले की, तुझी पत्नी ही नाशिक पोलीस ठाण्यात मिसिंग म्हणून दाखल आहे. त्यावेळी मात्र, याला घाम फुटला. त्याने लगेच पत्नीस विचारले असता तिच्याकडून काही समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे, त्याने हा सर्व प्रकार आपल्या पाहुणांना सांगितला आणि तिला जाब विचारला.

तेव्हा नवी नवरी हळुवार अवाजात म्हणाली की, होय.! ही बाई माझी आई नाही. माझे आई वडिल हे नाशिक येथे राहतात. तर मी सावळीविहिर येथे याच महिलांंकडे राहते. मी पटना-मालेगाव या ठिकाणी एक-एक लाख रुपये घेऊन असेच लग्न केले आहे. आता मला माझ्या आई वडिलांकडे जायचे आहे. मी जीला माझी आई सांगितले ती माझी आई नसून ती भलतीच बाई आहे. तर, जो भाऊ म्हणून लग्नात उभा केला होता. तो देखील माझा भाऊ नसून तो तात्पुरता भाऊ तयार करण्यात आला होता. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर नवरदेवाच्या लक्षात आले की, आता आपली फार मोठी फसवणुक झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.