आमदार पेटले.! अध्यक्षांसह आख्खी बॉडी बरखास्त करणार, काम करायचे नसेल तर चालते व्हा.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे हे आमदार झाल्यानंतर त्यांनी अगदी तळागाळातील तरुण नेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठमोठी पदे देऊन काम करण्याची संधी दिली होती. मात्र, झाले काय, कधी न मिळं अन गटकन गिळं.! अशी गत अनेक उताविळ नेत्यांची झाली. पद हे गोमाशी सारखे चिकटून बसायला नव्हे तर काम करुन संघटन वाढवायला असते हेच अनेकांना समजले नाही. काल तालुकाभर राष्ट्रवादीचा बोलबाला असताना आज तालुक्यात राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे.? याचे पदाधिकाऱ्यांनीच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अर्थात काही पदाधिकारी इतकी कोडगी भुमिका घेत आहेत की, जबाबदाऱ्या झटकून पांढऱ्या कपड्यात राहणे ते पसंत करतात. मात्र, नगरपंचायतीच्या निकालाने राष्ट्रवादीला चांगलीच चपराख दिली आहे. त्यामुळे, हे वास्तव कोणी लपवु शकत नाही. त्यावेळी पदाधिकारी तोंड लपवत फिरत असताना आमदार त्यांना आवाज देत होते. मला उमेदवार दाखवा, त्यांच्यामागे किती समाज आहे ते दाखवा. मात्र, आमदारांना देखील पदाधिकाऱ्यांनी शुल्लक समजले. का? तर म्हणे आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि पवार साहेबांचे चाहते आहोत. या अविर्भावात राष्ट्रवादीला फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यात कोणाचे काय गेले? राज्यात आमदारांना खाली पहायची वेळ आली आणि दादांनी देखील त्यांचे कान टोचले. त्यामुळे, ये रे माझ्या मागल्या, ही परिस्थिती पुढे व्हायला नको. म्हणून आ. डॉ. किरण लहामटे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. अकोले नगरपंचायतीत तुम्ही मला झोपेत ठेवले. आता मी गाफील राहणार नाही. आत्ताची सर्व बॉडी बरखास्त केली जाणार असून जो कोणी काम करेल, त्याला संधी दिली जाईल. ज्यांना काम करायचे आहे, त्यांनी करा अन्यथा चालते व्हा.! पक्षाला पुढे नेण्यापेक्षा मागे आणण्याचे काम काही पदाधिकारी करीत आहे. त्यामुळे, योग्यत्या कार्यकर्त्याला काम करण्यास संधी दिली जाणार आहे. म्हणून तालुकाध्यक्ष पदासह मोठ्या पदांवर नेमकी कोणाची वर्णी लागते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
डॉ. किरण लहामटे म्हणाले की, आपल्या आपल्यात मला एकोपा दिसला नाही. कार्यकर्ता आपला आणि स्टेटस विरोधी नेत्याचे. तुम्हीच सांगा, कसा उमेदवार निवडून येईल. आपलेच आपली जीरवत होते मग विजय होईल तरी कसा? आता आपण पराभव स्विकारला आहे. तीच गुल आणि तिच काडी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती यात व्हायला नको. त्यामुळे, आज काही नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे पक्षाला खाली पहायची वेळ आली आहे. हे जर थांबवायचे असेल तर एक नैतिक जबाबदारी म्हणून काहींनी स्वत:हून आपले राजीनामे दिले पाहिजे. अन जर बाजुला व्हायचे नसेल तर येणाऱ्या एक महिन्याच्या काळात ही सर्व प्रक्रिया बरखास्त होऊन नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, तेथे कोणाला बोलायची संधी नसेल. तेथे फक्त काम पाहिले जाईल. तो कोणत्या गटाचा आणि कोणाचा चाहता आहे हे महत्वाचे असणार नाही. ते म्हणाले यापुर्वी जे कोणी माझे पहिल्यापासून काम करीत होते. त्यांना मी कोणत्याही मोठ्या पदावर घेतले नाही. कारण, जे पुर्वीचे राष्ट्रवादीत होते, त्यांना मोठी पदे देऊन काम करण्याची संधी मला द्यायची होती. जे माझे होते ते नाराज झाले तरी ते माझेच राहिले. त्यामुळे, मी समाधानी आहे. मात्र, ज्यांना मी संधी दिली. त्यांनी काय केले? त्यांना साधी त्या पदाची किंमत देखील कळली नाही. पदाची गरिमा लमजली नाही त्यामुळे त्या पदाला ते न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे, यांच्या असण्याने पराभव आणि नसण्याने पराभव मग हे वरपर्यंत तक्रारी सोडून काहीच करणार नाही. त्यामुळे, ज्यांच्यात खरोखर काम करण्याची क्षमता आहे. आपण त्यांच्या नेमणुका करणार आहोत. हे मान्य आहे का? असे विचारताच जवळजवळ ऐंशी टक्के पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना संमती दर्शविली आहे.
ते पुढे म्हणाले की, येथून पुढे मी कारणे ऐकूण घेणार नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहचा, त्यांच्या समस्या जाणुन घ्या, त्या सोडवा, मला निम्म्या रात्री कधीही संपर्क करा. मी तो प्रश्न सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. त्यामुळे, आता येणाऱ्या काळात महिन्यातल्या प्रत्येक पहिल्या शनिवारी तुम्हाला तुमच्या परिसरात जनता दरबार घ्यायचा आहे. जनतेची प्रश्न सोडवायची आहे. गाव पातळीवर शाखा काढायची, लोकांच्या मागण्या जमा करायच्या, जी कामे होत आहे. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचवायची आहे. या सर्व गोष्टींचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे रिपोर्टींग करायची आहे. खुद्द किरण लहामटे असतील तर त्यांनी देखील त्यांच्या गावात शाखा ओपन केली पाहिजे. जे कोणी भावी उमेदवार असतील त्यांनी प्रत्येकी १० ते २० शाखा तरी स्थापन करणे आपेक्षित आहे. अशा पद्धतीने संगठण उभे करायचे आहे. या पलिकडे जर कोणी म्हणत असेल मी एकटा येईल आणि एकटा जाईल. तर, तुम्ही सन्मानास पात्र नाही. आता दुसऱ्याच्या नावाने शिमगा खेळायचे बंद करा. माझा सख्खा भाऊ जरी काम करीत नसेल तर त्यांना देखील अभय देणार नाही. अशी माझ्या कामाची पद्धत आहे. आता गावोगावी सेवादल प्रमुख नेमण्यात येणार आहे. त्यानुसार तालुकाभर संगठण करण्यात येणार आहे.
दरम्यान, नगरपंचायतीच्या पराभवाचा धसका डॉ. लहामटे यांनी चांगलाच घेतलेला दिसतो आहे. मात्र, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ये रे माझ्या मागल्या.! हाच पायंडा अंगिकारला आहे. कारण, डॉ. लहामटे म्हणाले की, नगरपंचायतीत इतका मोठा पराभव होऊन देखील साधे एक स्विकृत नगरसेवक पदाचा उमेदवार तुम्हाला वेळेवर देता आला नाही.! किती दुर्दैवाची बाब आहे. असे म्हणून त्यांनी अनेकांना टोमने मारत हात जोडले. मी एकटा कोठे कोठे पळणार आहे. म्हणून तर आता तळमळीचे कार्यक्षम पदाधिकारी द्यायचे आहेत. एकंदर, या बैठकीत आमदारांनी जे पराभूत उमेदवार झाले त्यांची खरडपट्टी काढली तर दुसऱ्या बाजूने धिर देत आता पुन्हा नव्याने संगठन उभे करा. जनतेच्या सेवेला लागा असे म्हणत बळ दिले. तर, जे लोक म्हणत होते. आमदार आम्ही निवडून आणला, आम्ही म्हणून आमदार आहे. त्यांना साधा एक प्रभागातील नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यामुळे, आमदार निवडून आणला अशी वल्गना करणाऱ्यांना डॉक्टरांनी एका अर्थाने चपराख दिली आहे. या बैठकीत आमदारांनी बड्या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. जमत असेल तर कामे करा, अन्यथा आमच्या आणि पक्षाच्या खुटा घालण्याचे काम करु नका. आपलेच लोक आपल्याच मानसांच्या कुरघोड्या करतात. त्यामुळे, नेमकी विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही. आमदारांनी आज पहिल्यांदा तडक बैठक देऊन अनेकांना शब्दरुपी नारळ देऊन पदच्युत केले आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित पदाधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
रिपाई आणि भाजपवर आमदार म्हणाले.!
पिचड पिता-पुत्रावर लोकांचा विश्वास नाही. विजय वाकचौरे यांची आम्ही पत्रकार परिषद पाहिली. पिचडांनी स्विकृतचा शब्द देऊन देखील ऐनवेळी त्यांना डावलले. म्हणून मी स्वत: कायम म्हणत असतो. मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणुस आहे. जो शब्द देतो तो मी पाळतो. आजवर दिलेले प्रत्येक शब्द मी पाळले आहेत. दुर्दैवाने अकोले शहरात लोकांना काय भूल पडली माहित नाही. पण, ज्यांनी पवार साहेबांचा विश्वासघात केला. त्यांच्यासमोर विजय वाकचौरे काय आहे.! आता तरी विजुभाऊंनी नेहमीप्रमाणे त्यांच्यासोबत हात मिळवू नये. ज्या पद्धतीने रोष व्यक्त केला. त्यावर ठाम राहिले पाहिजे. पवार साहेबानी त्या व्यक्तीला काय कमी केले होते.? आज तालुक्यात तीनशे कोटीच्या जवळपास कामे केवळ अडिच वर्षात दिली आहेत. हीच कामे यापुर्वी देखील झाली असती. मात्र, यांना याचा त्याचा वापर करायचा आणि त्याला सोडून द्यायचे. अशी धोकेबाजीची रित ठाऊक आहे. त्यामुळे, विजुभाऊंनी जो निर्णय घेतला तो अतिषय योग्यच आहे.