वैभव आणि मधुकर पिचड दोघेही विश्वासघातकी.! माझ्या लेकराची शप्पत आता पुन्हा त्यांच्या दारात जाणार नाही.!

 


सार्वभौम (अकोले) :-

                      अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका नुुकत्याच पार पडल्या, त्यानंतर आज स्विकृत नगरसेवक पदाची निवडणुक होती. यात रिपाईला एक स्विकृत नगरसेवक देण्याचा शब्द वैभव पिचड, मधुकर पिचड तसेच कैलास वाकचौरे यांनी दिला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी नेमहीप्रमाणे रिपाईची फसवणुक केली आहे. त्यामुळे, रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांनी पिचड पिता पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही तुम्हाला नगरपंचायत दिली, आता कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि 2024 ला तुम्ही आमदार कसे होता हेच आम्ही पाहतो. आयुष्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकण्याची चुक आम्ही केली. आता मात्र, काही झाले तरी ही चुक पुन्हा होणार नाही. जिल्ह्यात आम्ही भाजपसोबत जाऊ, मात्र तालुक्यात पिचडांच्या विरोधात उतरुण त्यांचा प्रत्येक वेळी पराभव केल्याशिवाय राहणार नाही. तर, रिपाईचे ज्येष्ठ नेते शांताराम संगारे यांनी भाजपच्या एका मुख्य पदाधिकार्‍यास फोन करून आपली खंत व्यक्त करीत दु:खी अंत:करणाने शब्द काढले की, तुम्ही विश्वासघात केला लक्षात ठेवा.! माझ्या लेकराची शप्पत घेऊन सांगतो, आता पुन्हा पिचडांच्या दारात पाय ठेवणार नाही.!


विजय वाकचौरे म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत पिचड पितापुत्र हे एकाकी पडले होते. तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यात तालुक्यातील आंबेडकरी चळवळ त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्या पराभवाच्या सदम्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम रिपाईने केले. मात्र, त्याचे फळ पिचडांनी आम्हाला अशा पद्धतीने दिले. खरंतर आजवर पिचडांनी आंबेडकर चळवळीशी कायम गद्दारी केली आहे. 40 वर्षे आम्ही त्यांना साथ देत होतो. मात्र, त्यांनी नेहमी गायकर साहेबांनी बदनाम करण्याचे काम केले आहे. आम्ही त्यांच्याकडे सत्तेत वाटा मागितला की, त्यांनी एनवेळी गायकर साहेब, मधुभाऊ नवले, कैलास वाकचौरे यांची नावे पुढे करायची. तोवर निवडणुकीत सर्व काही उमेदवार ठरलेले असायचे. आम्ही त्यांना जाब विचारला की, ते म्हणायचे गायकरांनी तुम्हाला घेतले नाही. त्यामुळे, बहुजनांचा नेता म्हणून गायकर आमच्या नजरेत बदनाम कसे होतील. हेच षडयंत्र पिचडांनी आखले होते. आता मात्र, या पिचड पिता पुत्राचा खरा चेहरा आमच्या समोर आला आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशी टिका देखील वाकचौरे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, आमच्या आयुष्यात आम्ही लपवाछपवीचे राजकारण केले नाही. जेव्हा आम्ही अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकांबाबत विचार करीत होतो. तेव्हा कैलास वाकचौरे आणि वैभव पिचड यांनी आम्हाला स्वत:हून साद दिली होती. आम्ही तीन ते चार जागांसाठी अग्रह केला होता. त्यात 6 नंबर, 14 नंबर 13 आणि 16 अशा ठिकाणी आमच्याकडे चांगले उमेदवार होते. मात्र, यांनी आम्हाला हो-हो करुन स्विकृत नगरसेवक म्हणून शब्द दिला. अर्थात हे फसवे आणि विश्वासघातकी आहेत. हे माहित होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर यांच्यात काही बदल झाला असेल. आता तरी हे कोणाला फसवणार नाही. या हेतूने आम्ही डोळे झाकुन पितापुत्रांवर विश्वास ठेवला. अगदी काल पर्यंत यांच्या तोंडात स्विकृत म्हणून चंद्रकांत सरोदे यांचे नाव होते. त्यासाठी सरोदे यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे पुर्ण केली होती. त्यासाठी नको ती धावपळ करुन पात्रता सिद्ध केली आणि अचानक ठेकेदारांची नावे पुढे आली. म्हणजे, या पिचडांकडे सामान्य माणुस आणि शब्दाला काही किंमत नाही. परंतु, निवडणुकांमध्ये जो कोणी पैसे पुरवितो, जो मलिदा देतो त्यालाच महत्व आहे. म्हणजे, इतका धुर्तपणा पराभव पत्कारुन देखील गेला नाही. त्यामुळे, आता आयुष्यात या मानसांवर पुन्हा विश्वास टाकायचा नाही. इतका तळतळाट आणि खोटेपणा असणारा राजकारणी व्यक्ती मी कधी पाहिला नाही. आम्ही सरळ आणि प्रमाणिकपणाचे राजकारण करतो, आमच्याच वाट्याला अशी मानसे का येतात? अशी खंत वाकचौरे यांनी व्यक्त केली.


मतांच्या विभाजनाची ताकद काय असते हे आपण नगरपंचायतीच्या निवडणुकीत पाहिली आहे. त्यामुळे, पिचडांनी हे समजून घ्यावे की, हा विजय तुमच्या ऐकट्याचा नाही. काही ठिकाणी अगदी कमी मतांनी भाजपचे सिट निवडून आले आहेत. तेथे काही नाही तर रिपाईची साथ यांना लाभली नाही का? चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, राजेंद्र गवांदे यांच्यासारखी रिपाईची नेते मंडळी भाजपचे स्टेज गाजवत होते. लोकांच्या उंबर्‍यावर जाऊन मते मागत होते. याची जरा देखील जाणीव या पिचडांना झाली नाही. केवळ रिपाईमुळे अकोले नगरपंचायतीवर कमळ फुलले आहे. हे त्यांनी मान्य केले आणि तरी देखील आम्हाला ऐनवेळी डावलले गेले. म्हणे अडिच वर्षानंतर तुम्हाला स्विकृत पद देऊ.! खरंतर ही केवळ अश्वासने आहेत. आत्तापर्यंत अशा अनेक अश्वासनांची खैरात आम्ही पाहिली आहे. त्यामुळे, आज भरल्या ताटावरुन उठवून दिले आहे. अन म्हणतात अडिच वर्षाने पंचपक्वान्न देऊन. वा रे तुमच्या कला.! त्यामुळे, पिचडांनी आम्हाला आजवर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरुन घेण्याचे काम केले आहे. तेच पाढे पुढे चालु ठेवले असून आता ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे, येणार्‍या निवडणुकांमध्ये आता पिचड कसे निवडून येतात ते पाहू.! आम्ही आता फक्त निवडणुकांची वाट पाहत आहोत. आम्ही त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे विजय वाकचौरे म्हणाले..!

तर, आज अकोले नगरपंचायतीत स्विकृत नगरसेवक पदासाठी निवड प्रक्रिया होती. त्यात भाजपकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात विजय बाबुराव पवार आणि सचिन शेटे यांनी आपले अर्ज दाखल केले असता सचिन शेटे यांनी जी संस्था दाखविली होती. ती संगमनेर तालुक्यातील असून त्यासाठी पात्र संस्था ही अकोले नगरपंचायतीच्या हाद्दीतील कायदेशीर संस्था हवी आहे. मात्र, हेच कागदपत्रे शेटे यांनी पुर्वी सादर केले होते. त्यामुळे, ते चालुन जातील असे त्यांना वाटले. मात्र, त्यावर प्राताधिकार्‍यांनी अक्षेप घेतला. त्यानंतर शेटे यांनी पुन्हा अपिल केले आहे. तर विजय पवार याचा अर्ज ग्राह्य धरला असून त्यावर रिपाईचा अक्षेप आहे. त्यामुळे, जितकी रंगत निवडणुकीत आली. तितकीच रंगत स्विकृत नगरसेवक प्रक्रियेत आली आहे. तर, राष्ट्रवादी कोठ्यातून एका व्यक्तीला स्विकृत नगरसेवक पद मिळणार होते. मात्र, त्यांच्यात पुन्हा भोंगळ कारभार पहायला मिळाला. एकात एक नाही अन बापात लेक नाही. त्यामुळे, वेळ निघुन गेल्यावर राष्ट्रवादीने गाडीला हात केला. परिणामी त्यांची संधी हुकली. आता जेव्हा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टातून हे चेंडू खाली येईल. तेव्हा राष्ट्रवादीला एक स्विकृत नगरसेवक पद मिळेल. त्यासाठी प्रकाश नाईकवाडी यांचे नाव प्राधान्याने पुढे आले आहे. तर अमित नाईकवाडी यांच्यासह अनेकजण तेथे इच्छुक आहेत. त्यामुळे, तेथे कोणाची वर्णी लागेल हे पाहणे महत्वाचे आहे. यावेळी प्रांताधिकारी यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता पारदर्शी पद्धतीने सर्व प्रक्रिया पार पाडली.  

उद्या सविस्तर विश्लेषण वाचा, रोखठोक सार्वभौमवर...