अकोल्यात तिसर्या आघाडीची बांधणी.! मात्तब्बर नेते एकत्र येणार.! अश्लिल शिविगाळ अन कानफाडनं.! साहेब हे वागणं बरं नव्हं.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
आजकाल अकोले तालुक्यातील राजकारणाला पॉलिटीकल इथिक्स राहिले नाही. ज्यांना ज्येष्ठ म्हणावे, ज्यांचा आदर करावा त्यांनीच शब्दांच्या पातळ्या सोडल्या आहेत. तर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या निवडणुका यात स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकांच्या माकडउड्या देखील सुरू झाल्या आहेत. कोणाला मिनी आमदार होऊ वाटते आहे तर कोणाला आमदार व्हायचे आहे. कोणाला संचालक तर कोणाला चेअरमन व्हायचे आहे. कोणाला सभापती तर कोणाला कोठे का होईना, पण चर्चेत रहायचे आहे. त्यामुळे, ज्यांनी उभी हयात राजकारणात घालविली ते वैचारिक भान विसरुन कंबरेखालच्या शब्दांना चोखंदळपणे वापरु लागले आहेत. तर, कोणी वड्याचे तेल वांग्यावर टाकत आहे. आता हेच पहा ना. समशेरपुर गटात शिवसेना ऐकमेकांना कशी भिडली आहे. काल, धुमाळांवर रोष व्यक्त करणारे तळपाडे आज त्यांच्याशी नैतिकतेच्या गप्पा मारताना दिसत आहे. तर, नेहमी वादग्रस्त असणार दराडे हे एका सामान्य जनसेवक शंकरभाऊ चोखंडे यांच्या कानाखाली मारतात, तर दराडेंचा एक समर्थक किती अश्लिल भाषेत चोखंडे यांना शिविगाळ करुन सोशल मीडियावर बिचार्याची आयमाय काढतो. हा कोणता ट्रेण्ड या तालुक्यात रुजु पाहत आहे हेच कळत नाही. या सगळ्या अस्थिर राजकारणात तिसर्या आघाडीचा जन्म होताना दिसतो आहे हे नाकारुन चालणार नाही. फक्त या राजकारण्यांनी स्वत:च्या पोळ्या भाजताना सामान्य तरुणांचा कोळसा करु नये, हेच सांगणे आहे.
खरंतर डॉ. किरण लहामटे हे आमदार झाल्यापासून तालुक्यात राजकीय गणिते नावाचा प्रकारच राहिला नाही. अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला गळाभेट देणारे व्यक्तीमत्व यशवंतराव भांगरे यांच्यानंतर लहामटे यांचे नाव पुढे येते. मात्र, जी आमदार पदाची पॅशन होती. ती, डॉक्टरांनी संपुष्टात आणली आणि लोकशाहीला अपेक्षित असा आम जनतेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी वावर सुरू केला. ते इतके जनतेत गेले की, त्यांना नेते नको झाले, मी जनतेचा आणि जनता माझी असे म्हणत त्यांनी अनेकांना अक्षरश: कोलुन दिले. त्यामुळे, एकास एक उमेदवार देणारे सर्वच नेते नाराज झाले. अगदी भांगरे साहेबांपासून तर मारुती मेंगाळ यांच्यापर्यंत कोणाचेच आमदारांशी पटत नाही. त्यांच्या, एकला चलो रे.! या भुमिकेने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आणि आता 2024 पर्यंत यांच्या नादाला लागण्यापेक्षा स्वत:चे अस्तित्व पुन्हा निर्माण केलेलेच बरे असे म्हणून ज्यानेत्याने स्वतंत्र चुल मांडायला सुरूवात केली. त्यातून आता तिसर्या आघाडीचा जन्म होऊ पाहत आहे.
खरंतर रिपाईने नगरपंचायतीत पिचडांना पाठींबा देऊन एक स्विकृत नगरसेवकाचा शब्द सोडून घेतला होता. मात्र, तेथे रिपाईला बाबुरावकी जड भरली आणि विजय वाकचौरे यांनी तडक पत्रकारपरिषद घेऊन भाजपशी फार्कत घेण्याचा निर्णय घेतला. अगदी काही तासांपुर्वी पिचडांना आदरणीय, वंदनीय, सन्माननिय, प्रिय म्हणणारे काही क्षणात भाजपचे अप्रिय झाले आणि त्यांनी युतीतून काढता पाय घेतला. त्यामुळे, तालुक्यातील आंबेडकरी विचारांचा एक गट वेगळा पडला. आता, शिवसेनेत भाराभर पुढारी झाल्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण हेच कळायला तयार नाही. त्यांच्यातील गटातटाची यादी मांडली तर तो वादाचा मुद्दा ठरेल. मात्र, तळपाडे, धुमाळ आणि दुसरीकडून दराडे व मेंगाळ अशा झुंडी उठल्या आणि नको-नको ते आरोप प्रत्यारोप आपल्या कानावर पडले. त्यामुळे, काही झालं तरी धुमाळ हे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहे. ते या दोघांना सामावून घेणार नाही ही आता काळ्या दगडावरील रेष आहे. तळपाडे यांच्याप्रमाणे स्थानिकांना न विचारता थेट मातोश्रीहून यंत्रणा हलविण्यासाठी दराडे प्रयत्न करणार नाहीत. त्यामुळे, ही दोघे सध्या तरी राजकारणात साईड हिरो म्हणून काम करणार्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतील. एव्हाना त्यांनी तो प्रयत्न सुरू देखील केला आहे.
या दोन बाजु झाल्यानंतर प्रश्न उरतो बी.जे.देशमुख साहेबांचा, अर्थात त्यांनी भांगरे आणि सावंत साहेबांना हताशी धरुन कारखान्याची मळी रगडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप काही त्यांना गोडवा हाती लागला नाही. कारखान्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आरोप प्रत्यारोप झाले की, निवडणुका पुढे ढकलतात. त्यामुळे, कडेलोटावर असणारा कारखाना पुन्हा पुर्वपदावर येतो. म्हणजे, तालुक्यातील राजकीय अस्थिरता ही फार वाढत चालली आहे. कोणाचा कोणावर वचक नाही, राष्ट्रवादीचा चिनपट कार्यकर्ता बंडखोरी करतो आणि पुन्हा आमदारांचे गुणगाण गातो. पक्षातून हकलुन देखील इकडच्या चुगल्या तिकडे आणि तिकडचे एकुण इकडे वाटोळे करू पाहतो. म्हणजे पक्ष आदेशाला कोणी किंमत देत नाही तर कोणी कठोर भुमिका घ्यायला तयार नाही. अशी बुळगी यंत्रणा काही पक्षांमध्ये होऊन बसली आहे. त्याचाच तोटा म्हणजे घड्याळाची काटे उलटे फिरु लागली आहे. त्यामुळे, जोवर कोडग्यांना अभय आहे. तोवर संघटन नाही आणि शिस्त नाही...!
अर्थात, शिवसेना, रिपाई आणि राष्ट्रवादी यांच्यात गटतट, मतभेद आणि भोंगळ कारभाराचे दर्शन होत राहिल. तोवर काँग्रेस पक्षाची भुमिका लक्षात येणार नाही. काँग्रेसची तत्वे म्हणजे आजकाल शरदचंद्र पवार साहेबांसारखी झाली आहेत. मनात एक आणि ओठावर एक.! ते काय करणार आहे. हे नेहमी गुलदस्त्यात असते. त्यामुळे, त्यांच्यावर अवलंबुन राहणे अगदी अवकाळी पावसासारखे आहे. काँग्रेसला पुन्हा आपली ताकद आजमावयाची असेल तर ते पुन्हा अलिप्त लढू शकतात. त्यामुळे, सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी होईल असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुक आहे. हे आमदारांच्या लक्षात आले असून त्यांनी स्वत:ची यंत्रणा गेल्या काही दिवसांपुर्वीच कामाला लावली आहे. त्यामुळे, ज्याला त्यांच्यासोबत सन्मानानं जायचे असेल त्यांनी पुर्वीच चर्चा करुन घेतली पाहिजे. अन्यथा नगरपंचायतीसारखे लढायचे टाईम आणि घोड्यांना सर्दी व्हायची. त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहिले आहे. त्यामुळे, एकमेकांच्या ताठर भुमिकेतून देखील तालुक्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता सावंत साहेब, भांगरे साहेब, विजय वाकचौरे, बी.जे.देशमुख, बाजीराव दराडे, मारुती मेंगाळ आणि अन्य काही नेते. यांच्यात नेहमी चर्चा होत असते. हे नेते सध्या स्वयंभू असून यांच्यात एकोपा घडून आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. तर, दराडे हे त्यासाठी प्रयत्नशिल राहतील. तसेही त्यांनी याच नेत्यांना आपल्या अजेंड्यावर घेतले आहे. त्यात काँग्रेस देखील त्यांच्यासोबत गेली तर नवल वाटण्याचे काही कारण नाही. तसेही ते भाजप सोबत खुलेआम जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीशी त्यांचे जमेल असे अनेकांना वाटत नाही. त्यामुळे, दराडे यांच्या कार्यक्रमांना आजकाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहु लागले आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाला बी.जे.देशमुख यांचे वावडे आहे, सावंत साहेबांचे कोणाशीच टिपन बसत नाही. त्यामुळे, एकंदर आज तरी तिसर्या आघाडीचा प्रयत्न काही व्यक्तींनी सुरू केला आहे. मात्र, तरी देखील निवडणुकांना अद्याप फार काळ आहे. त्यामुळे, पुलाखालुन खूप पाणी जाणार आहे. मात्र, तुर्तास अशा प्रकारची यंत्रणा उभी राहू पहात आहे. हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.