...अखेर भाजपमध्ये फुट पडली.! दोन वाकचौरे एकमेकांना भिडले, मतभेद पुन्हा चव्हाट्यावर.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोल्यात जसजशा निवडणुका येऊ लागल्या आहेत. तसतसे राजकीय संक्रमण आणि बंडखोरीचा कालावाधी सुरू झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे कालपर्यंत चर्चेत होतेच. आता मात्र, भाजप देखील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. कारण, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे आणि भाजपचेच परंतु पिचड समर्थक रावसाहेब वाकचौरे हे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून सोसायटीच्या निवडणुकीत केंद्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे, गटनेते यांनी सहकाराची निवडणुक म्हणून पक्षविरहीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करुन स्वत:चा पॅनल उभा केला आहे. तर, रावसाहेब वाकचौरे यांनी रिपाई व काँग्रेसला सोबत घेऊन आपले आस्तित्व पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकीकडे रावसाहेब वाकचौरे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी म्हणा किंवा जिल्हा परिषदेची व्युव्हरचना म्हणा.! यासाठी जालिंदर वाकचौरे यांनी आता कंबर कसली आहे. यात महत्वाचे इतकेच की, काल विरगाव ग्रामपंचायतीत एकाच म्यानात दोन तलवारी राहिल्या होत्या. आता मात्र, त्यांनी एकमेकांवर राजकीय वार सुरू केले आहे. त्यामुळे, पहिली गोष्ट म्हणजे, भाजपमध्ये फुट पडल्याचे पहायला मिळाले आहे. तर, राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे यांनी नगरपंचायतीत भाजपला मदत करुन विजय खेचुन दिला तर आता भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे महाविकास आघाडीच्या घटकांनी किती साधक ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अकोले तालुक्यातील काही गावांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. त्यापैकी विरगाव एक आहे. भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, शिक्षणसम्राट तथा दुधसंघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, रामनाथ बापु वाकचौरे आणि अन्य काही व्यक्तींमुळे हे गाव नेहमी चर्चेत राहते. दोन वाकचौरे हे नेहमी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असतात. मात्र, सन 2019 मध्ये जसे पिचड साहेब भाजपत गेले. तसे, अनेकांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली. पण करणार काय? तुझं माझं जमेना अन साहेबांपुढे कोणी बोलेना.! त्यामुळे, झाकली मुठ सव्वा लाखाची. आता हा राजकीय संयम फार काळ टिकत असतो का? त्यामुळे, जालिंदर वाकचौरे यांनी वेगळा पॅनल उभा करुन त्यात राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1, भाजप 4 आणि शिवसेना 4 असे उमेदवार घेऊन त्यांनी भाजप विरोधी काम केले आहे अशी ठिका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. तर, रावसाहेब वाकचौरे यांनी मित्रपक्ष रिपाई 1, काँग्रेस 1 आणि भाजप तथा आपले समर्थक म्हणून 11 उमेदवार घेतले आहे.
खरंतर, विरगावच्या सोसायटीचा इतिहास पाहिला तर 2012 मध्ये रावसाहेब वाकचौरे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले होते. तेव्हा, गावातील नेत्यांनी त्यांना स्थानिक पातळीवर स्विकारले नाही. आज जसे भाजपचे दोन नेते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. तेव्हा देखील रावसाहेब वाकचौरे यांनी राष्ट्रवादीचे रामनाथ बापु वाकचौरे यांच्या विरोधात पॅनल उभा करुन स्वत:ला आजमावू पाहिले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. रावसाहेब यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, कालांतराने दिवस बदलले आणि सन 2017 साली रामनाथ बापु यांच्यासह रावसाहेब वाकचौरे एकत्र आले व त्यांनी सोसायटीत स्वत:च्या मर्जीतला चेअरमन बसविला. त्यानंतर रावसाहेब यांनी गावात देखील स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले आणि ग्रामपंचायत देखील ताब्यत घेऊन पिचडांच्या विश्वासाचा ते कणा बनले. म्हणून तर त्यांना नंतर अगस्ति दुधसंघाचे व्हा.चेअरमन देखील करण्यात आले. आज गाव त्यांच्या बाजुने आहे. त्यामुळे, त्यांनी गाव, तालुका आणि आता जिल्ह्याच्या राजकारणाकडे धाव घेतली आहे.
दरम्यान, एकीकडे जालिंदर वाकचौरे यांनी गावात फारसे लक्ष न देता थेट जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थैर्य प्राप्त केले. सुदैवाने राज्यात भाजपचे सरकार आले त्यामुळे, त्यांची जिल्हापरिषदेत चलती झाली. ते भाजपचे गटनेते देखील झाले. त्यामुळे, जिल्ह्यात त्यांच्या शब्दांची दखल घेतली जाते आणि गावात जर त्यांना डावलले जात असेल तर त्यांनी बंड पुकारणे सहाजिक होते. त्यानुसार त्यांनी एक पॅनल उभा करुन त्यात भाजपच्या चौघांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेस एक, शिवसेना चार असे उमेदवार उभे करुन पिचड साहेबांचे समर्थक विरुद्ध जालिंदर वाकचौरे (भाजप) अशी लढत निर्माण केली आहे. अर्थात रावसाहेब वाकचौरे यांचा पॅनल पिचड साहेबांसारखा आहे. ते ज्या पक्षात जातील तो पॅनल त्या पक्षाचा असेल. तर, जालिंदर वाकचौरे यांचा पॅनल त्यांच्या मागे नव्हे.! चौघे त्यांच्या आदेशाने काम करतील. म्हणजे, जसे राज्यात भाजपला नमविण्यासाठी महाविकास आघाडी झाली. तसे रावसाहेबांना नमविण्यासाठी विरगावमध्ये महाविकास आघाडीसारखा पॅनल उभा राहिला आहे. येणार्या काळात आता सभासद नेमकी कोणाला कौल देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एक भाजपचा उमेदवार दाखवा.!
मला वगळुन पॅनल उभे करायचे नियोजन केले होते. रामनाथ बापु यांच्यासोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा यांना राष्ट्रवादी चालतेे का? उलट माझा पक्ष भाजपचा आहे. माझ्याकडे नोंदणीकृत भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यात एक तरी भाजपचा उमेदवार दाखवा. यांच्या वाढदिवसाच्या बॅनरावर मोदींचा फोटो नाही. तर, आज जे बॅनर तयार केले त्यावर मोदीजींच्या फोटोशेजारी ज्याचा फोटो लावला आहे. त्यांनी डॉ. किरण लहामटे यांचे बुथ गावात लावले होते. त्यामुळे भाजपचे नाव घेऊन फक्त वरवर प्रेम दाखवायचे. जेव्हा डॉ. लहामटे हे भाजपमधून गेले. त्यानंतर मी त्यांना रामराम देखील घालत नाही. परंंतु यांच्या शाळेवर आमदार जेवून जातात हे त्यांना चालते. त्यामुळे, तो भाजपचा पॅनला नाही. खरंतर, गाव पातळी किंवा सहकाराच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्ष नसतो. या संस्था टिकल्या पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, व्यक्तीद्वेष आणि मला टाळुन यांना निवडणुका करायच्या होत्या हा केवळ दांभिकपणा आहे. आता यांना पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळे, त्यांना ही नाटकं उभी केली आहे.