संगमनेरात हनीट्रॅप.! बड्या नेत्याची मध्यस्ती, पाच लाख दे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करतो.!


सार्वभौम (संगमनेर) :-

            बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 5 लाख रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे. एका प्रेम संबंधातून हा प्रकार झाला असावा असे वाटत असले तरी पैशासाठी हा एक हानीट्रॅपचा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे पैसे उकळण्यासाठी एका बड्या नेत्याला मध्यस्ती घातले असून तो अशाच प्रकारच्या दलाल्या करीत असल्याचे समोर येऊ लागले आहे. इतकेच काय.! गुन्हे दाखल होऊ नये म्हणून तो पोलिसांशी देखील अर्थपुर्ण तडजोडी करीत असल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. त्यामुळे, कायदा हा महिलांच्या बाजुने आहे. तुम्हाला यातून वाचायचे असेल तर पाच लाख रुपये देऊन संबंधित महिलेकडून लेखी घ्या आणि प्रकरण येथून रफा दफा करा असे हा मध्यस्ती म्हणतो आहे. हा मध्यस्ती कोणी छोटा-मोठा नसून तो राज्याच्या मंत्रीमंडळातील नगरच्या एक बड्या नेत्याला चांगला ओळखतो, तो केंद्रातील एका मंत्र्याच्या पक्षाचा तो पदाधिकारी आहे. त्यामुळे, जात आणि कायद्याच्या नावाखाली काही महिला पुरुषांना ब्लॅकमेल करुन लाखो रुपये उकळु पहात असल्याचे समोर येऊ लागले आहे. मात्र, बदनामी नको म्हणून लोक कसेबसे पैसे जमा करतात आणि यांना देतात. आता या प्रकरणाची पोलिस विभागाने चौकशी करुन जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुढे येऊ लागली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात नाशिक येथील एका पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नेण्यात आली होती. मात्र, त्यापुर्वीच यांना एक तक्रार निवारण समितीचे महाशय सापडले. यांनी हे प्रकरण स्वत:कडे घेतले आणि यांच्यात एक मध्यस्ती घडवून आणली. त्यात असलेल्या संभाषणानुसार असे होते की, एका विधवा महिलेवर संगमनेरच्या एका व्यक्तीने अत्याचार केला होता. त्याने संबंधित महिलेला रुम आणि अन्य काही ठिकाणी नेले होते. तर यांच्यात काही आर्थिक व्यावहार देखील झाले होते. मात्र, कालांतराने यांच्यात बिनसले आणि महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर एका पक्षाच्या या पदाधिकार्‍याने हे प्रकरण सामोपचाराने सोडविले असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून संबंधित महिलेला पाच लाख रुपये देणे ठरले आहे. मात्र, हा तोडगा निघाल्यानंतर ज्याने अत्याचार केला, तो अद्याप पैसे घेऊन आलेला नाही. म्हणून, या मध्यस्तीने त्याच्या घरी फोन केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

त्यात हा मध्यस्ती नेता म्हणतो आहे की, आपण कितीही काही सांगितले तर सरकार एखाद्या बाईचच ऐकतं, आपल्या पुरुषाचे कोणी काही ऐकत आहे. त्यामुळे, त्या महिलेचे म्हणणे आहे की, त्याने तिची इज्जत घेतली आहे. हे काही ठिकाणी हॉटेलला राहिले आहे तेथे याने तिच्यावर बळजबरी केली आहे. त्यामुळे, तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात तुमचे नातेवाईक यांना त्रास होणार, बदनामी होणार हे सर्व आपल्याला बरे वाटत नाही. त्यामुळे, अशा केसेस योग्य नाही. म्हणून यात जो काही तोडगा काढला आहे. तो तुम्ही समोर आल्यानंतर आम्ही सांगू शकतो. खरंतर, ज्याने हे उद्योग केले आहे त्याची पत्नी भयंकर रागावलेली आहे. सहाजिकच आपल्या नवर्‍याने असे काही केले तर कोणत्याही महिलेचा त्रागा होणे सहाजिक आहे. त्यामुळे, त्याची पत्नी देखील गुन्हा दाखल करा असे म्हणत आहे. त्यामुळे, तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे. तर ज्या महिलेवर अन्याय झाला आहेे त्या महिलेने आम्हाला सर्व काही सांगितले आहे. हे सर्व पोलिसांना सांगितले असे त्यांनी देखील सलोख्याची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी काहीतरी दिले पाहिजे. तुम्ही दोन्ही पार्ट्या हात वर करीत आहेत. 

तो Audio येथे आहे.

आता तुम्ही जर मला येऊन भेटले नाही. तर, पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल होऊ शकतो. तो मी करायला लावणार.! हाच शेवटचा पर्याय आहे. त्या महिलेचे म्हणणे आहे की, मला पाच लाख रुपये दिले तर मी गुन्हा दाखल करणार नाही. मात्र, समोर बसल्यानंतर आपण पाच लाख रूपये थोडीच देणार आहोत. बसल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकते. आम्ही देखील कुटूंबातील लोक आहोत. आम्हाला देखील कळतं ह्या केसेस खर्‍या किती आणि खोट्या किती आहेत. मात्र, तरी देखील या दोन्हींमध्ये समन्वय घडवून आणणे हेच आमचे काम आहे. ती तिच्या घरी व्यवस्थिर रहावी, हे यांच्या कुटूंबात व्यवस्थित राहवे. हेच आम्हाला अपेक्षित आहे. यात दोघांच्या चुका आहेत. मात्र, तरी माणुस स्त्रीवर अत्याचार करतो की स्त्री पुरुषावर अत्याचार करते? हे सगळ्यांना माहिती आहे. स्त्रीया ज्या पद्धतीने फिर्याद देतात त्या पद्धतीने पोलिसांना घ्यावी लागते. अन्यथा ती वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जात असते. त्यामुळे, त्यांना कोणी गुन्हा दाखल करण्यास नकार देत नाही. त्यामुळे, तुम्ही कधी भेटणार आहे हे सांगा. पैसे दिल्यानंतर तिच्याकडून सर्व काही लिहून घेऊ. तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये रहात होतो. आता आमच्यात काही संबंध राहिलेला नाही. ती तिच्या मार्गाने आणि हे यांच्या मार्गाने. काहीतरी तडजोड करुन होऊन जाईल याच्यात. अशा प्रकारचे संभाषण असणारी व्हायरल ऑडिओ क्लिप आहे. त्यात गुन्हे दाखल न करण्यासाठी खुलेआम पाच लाख रुपयांची मागणी होते. याची सखोल चौकशी होणे अपेक्षित असल्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे. 

दरम्यान, अकोले-संगमनेर नव्हे तर संपुर्ण नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपुर्वी हनीट्रॅपचे प्रकरण गाजत होते. हा प्रकार अद्याप थांबलेला नाही. तर, प्रेम आणि लग्न अशा पद्धतीने काही महिला पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात. हे गुन्हे दाखल होऊ नये म्हणून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतात तर काही महिला पुरुषांचे अश्लिल व्हिडिओ देखील काढतात. त्यामुळे, बदनामीपोटी अनेक पुरुष भिकारी झाल्याचे पहायला मिळत आहे. तर, जे कोणी सामाजहित म्हणून अशी प्रकरणे मिटविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना कायद्याने काय आधार आहे? पाच लाख रुपये म्हणजे ही एक प्रकारे खंडणीच म्हणावी लागेल. तर या क्लिपमध्ये पोलीसांचे देखील नाव आले आहे. त्यामुळे, खरोखर असे प्रकार होतात का? की हकनाक पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. की, पोलिसांच्या नावाखाली असे काळे धंदे केले जातात. याची चौकशी होणे अपेक्षित आहे. समाजसेवा आणि समुपदेशन असावे. मात्र, अशा पद्धतीने लुटमान नसावी. हेच यातून दिसून येत आहे.