सावंत साहेबांचे कान भरविणारा हा कानफुक्या कोण? या विचारांचा कडेलोट व्हावा.!



सार्वभौम (अकोले) :-

               एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य नेते डॉ. अजित नवले एका भाषणात म्हणाले होते. की, अकोले तालुक्यात आता एक नवी गँग दाखल झाली आहे. ती म्हणजे कानफुकी गँग, त्यावेळी त्या वाक्याला फार कोणी मनाला लावून घेतले नसेल. मात्र, आता त्या गँगची प्रचिती वारंवार येऊ लागली आहे. कारण, तालुक्यातील अभ्यासू आणि ज्यांना सर्वच आदर्श मानतात त्या दशरथ सावंत साहेबांचेच कोणीतरी कान फुकले आणि पहाडासारखी उंची व चाणक्यासारखी बुद्धीमत्ता असणार्‍या साहेबांना आज दिलगिरी व्यक्त करावी लागली. अर्थात तो त्यांचा मोठेपणा म्हणू.! पण, ही गँग अशीच फोफावत राहिली तर तालुक्यातील राजकीय संस्कृतीला अधिक वेगळे वळण लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, देर सही, लेकीन दुरुस्ती जरुरी है.! अशा लोकांमुळे राजकारणाला द्वेषाचे रुप येऊ लागले असून काल पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा तालुका आज बिहार सारखा पुढे येऊ लागला आहे. हे एकच उदा. नाही. तर, नामदार बाळासाहेब थोरात आणि डॉ. लहामटे यांच्यातील वैर असेल, अकोले नगरपंचायतीत मधुभाऊ नवले आणि आमदार असे वैर असेल तर परिवर्तनाच्या नावाखाली जो काही पॅनल उभा झाला त्यात अपशब्दांचा वापर करुन व्यक्तीद्वेषाने गायकरांवर केलेली टिप्पणी असेल. हे सर्व वाद आणि मतभेद केवळ कोण्या एका कानफुक्यामुळे उदयाला आले आणि गैरसमजातून मन आणि मतभेद निर्माण झाले. केवळ, अशा व्यक्तींपासून दुर राहिले पाहिजे. बस इतकेच.!


अकोले तालुक्यात सन 2019 मध्ये विधानसभेला परिवर्तन झाले आणि बघता-बघता तालुक्यात प्रस्तापित नेते आणि डॉक्टर लहामटे असे महत्वाचे दोन गट पडले. कालांतराने पिचड साहेबांना पराभूत करण्यासाठी जे लोक एकवटले होते. त्यांच्यात आणि आमदारांमध्ये द्वेष निर्माण करुन देणारी एक टोळी सक्रीय झाली आणि पहिला गट पडला तो म्हणजे भांगरे आणि लहामटे.! यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले की, कार्यकर्त्यांमध्ये देखील दोन गट पडले आणि यांच्यात थेट अजित दादांना मध्यस्ती करावी लागली. अर्थात डॉ. लहामटे यांच्या सभोवती असणारी काही टोळी त्यांनी इतकी चुकीची माहिती देते की, त्याचा परिणाम द्वेशात्मक पद्धतीने पुढे येतो आणि हि चर्चा पार बारामती ते मंत्रालयाच्या उंबर्‍यापर्यंत जाते. याला जबाबदार कोण असेल तर केवळ आणि केवळ कानफुकी गँग आहे. त्यामुळे, आमदारांनी आणि भांगरे साहेबांनी देखील किमान 2024 पर्यंत तरी एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ अशी भूमीका घेणे आवश्यक आहे. ते एकत्र नसतील तर नगरपंचायतीत काय झाले हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

   


तर, जेव्हा कोविडचा काळ सुरू होता. तेव्हा, ना. बाळासाहेब थोरात साहेब हे अकोल्यात आले होते. तेव्हा, रवि मालुंजकर यांनी त्यांच्याशी आवेशात्मक संवाद साधला होता. ती एक तळमळ होती असे मालुंजकर यांनी लोकरा-बाळांची शप्पत घेत भर सभेत डोळ्यातून आश्रृ ढाळत कबुल केले होते. मात्र, तेव्हा तालुक्यातील एका व्यक्तीने आमदार आणि नामदार यांच्यात मतभेद होऊन असे कान फुकले आणि नामदार अखेर नाराज झाले ते आजवर. अखेर त्यांनी अकोल्यात काँग्रेसला वेगळे लढण्याचे आदेश केले आणि झाले काय? दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.! आता हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, डॉ. अजित नवले यांनी कानफुक्या गँगचा उल्लेख केला होता. कारण, जेव्हा निळवंड्याचे आंदोलन सुरू होते. तेव्हा तालुक्यातील काही व्यक्तींनी ना. थोरात साहेब यांना डॉ. नवले आणि आ. लहामटे यांच्याबाबत चुकीची माहिती दिली असे त्यांचे मत होते. तेव्हा त्यांनी एका अज्ञात कानफुक्या गँगचा उल्लेख केला होता. त्यामुळे, संगमनेर हे थोरले बंधू असून अकोले हे धाकले बंधू आहे. यांच्यात नेमकी कोण वाद उभा करीत आहे. हे देखील आपण शोधले पाहिजे. अन्यथा हा वाद अधिक घातक होत जाईल....!

इतकेच काय.! जेव्हा अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झाल्या, तेव्हा डॉ. लहामटे आणि मधुभाऊ नवले यांच्यात वाकयुद्ध आपल्याला सर्वांना पहायला मिळाले. मात्र, वास्तवत: यांच्यात फार एकोपा होता. यांच्या यापुर्वी स्नेहभोजनासह बैठका झाल्या होत्या. मात्र, अचानक असे काय झाले? की यांनी वैयक्तीक टिका टिपण्णी सुरू केली. त्यामुळे, यात देखील द्वेश पसरविण्याचे काम कोणी केले? हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी येथे किंगच्या भुमिकेत असती. आज काँग्रेस सभागृहात हजर देखील राहु शकली नाही. त्यामुळे, या गैरसमजाचे तोटे हाच मुद्दा महत्वाचा आहे. तर या पलिकडे जे कोणी गैरसमज पसरवून राजकीय वातावरण दुषित करु पाहत आहे. त्यांनी देखील स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी हे उपद्रव थांबविले पाहिजे. कारण, यांच्यामुळे, अनेक नेत्यांमध्ये अस्थिरता प्राप्त होऊ लागली आहे. तर एव्हाना राजकारण राहिले बाजुला आणि व्यक्तीद्वेष वृद्धींगत होऊ लागला आहे.

आता फार काही पाल्हाळ करण्यात अर्थ नाही. कारण, तालुक्यात कानफुक्यांचे कारणामे काही कमी नाहीत. मात्र, तालुक्यातील ज्येष्ठ नेते दशरथ सावंत साहेब यांना देखील चुकीची माहिती देण्यात आली. खरंतर सावंत साहेेब हे सडेतोड व्यक्तीमत्व आहे. त्यांनी 60-70 वर्षे राजकारण व समाजकारण केले आहे. मात्र, त्यांचे आजवर या स्वभावामुळे कोणाशी टिपण बसले नाही. तर त्यांना अनेकदा निवडून दिले गेले तरी तो कार्यकाळ देखील त्यांनी पुर्ण केला नाही. अर्थात पटत नसेल तर बंड पुकारणे हा त्यांचा स्थायीभाव स्वभाव असावा. मात्र, घाटघर येथील कार्यक्रमात त्यांचे कोणीतरी कान फुकले आणि तडक स्वभावामुळे थेट आमदारांवर ते बरसले. भावनेच्या किंवा रोषाच्या भरात त्यांनी आमदारांची ऐसी की तैसी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांचा स्वाभाव ते कदाचित जाणुन नाहीत. खरंतर सावंत साहेबांच्या जागी दुसरा कोणी व्यक्ती असता तर ऐवढ्यात एखाद्या चॅनलवर जशास तसे उत्तर एव्हाना जास्त आवेशाने प्रतिउत्तर मिळाले असते. मात्र, खरोखर त्यांनी सावंत साहेबांच्या वयाचा आणि अनुभवाचा आदर राखला. म्हणून तर थेट संपर्क साधून दोघांमधील गैरसमज दुर केले. आता सावंत साहेब बोलुन गेले खरे. मात्र, त्यांच्यातील मोठेपणाचे पुन्हा दर्शन घडले. त्यांनी खुद्द आमदारांची माफी मागितली. खरोखर ही तालुक्याची संस्कृती आहे. मात्र, आमदारांनी जरी त्यांच्या वयाचा मुलाहिजा ठेवला तरी सोशल मीडियावर सावंत साहेबांवर अगदी नको तशी टिका झाली. आता झालं गेलं गंगेला मिळालं. पण, हा कानफुक्या व्यक्ती कोण? ज्याने सावंत साहेबांना चुकीची माहिती दिली आणि त्यांना माफी मागण्याची वेळ आणली. याचा शोध घेऊन तालुक्याने अशा व्यक्तींच्या विचारांचा घाटघरच्या दरीतुनच कडेलोट करणे गरजेचे आहे.