सावधान.! संगमनेरात अंडागँग दाखल.! अंड्यांचा मारा आणि चाकुचे वार.! सुरू झाली लुटमार...!
सार्वभौम (संगमनेर) :-
नगर शहरानंतर आता संगमनेर हे असे पहिले शहर आहे. जेथे अंडागँग सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे, सन 2012 मध्ये जे कोणी अंडागँगचे सदस्य तडीपार करण्यात आले होते. त्यांच्या चेल्या चपाट्यांनी पुन्हा डोके वर काढले की काय? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. विशेष म्हणजे, अगदी 2020 पर्यंत संगमनेरात फारशी गुन्हेगारी नव्हती. त्यानंतर मात्र, चेन स्नेचिंग, रस्तालुट, गुटखा, वाहन चोरी, दारु, गांजा, मटका, जुगार, कत्तलखाने, वाळुतस्करी यांचे प्याव फुटल्यासारखे वाटू लागले आहेत. एकीकडे या दोन नंबर गुन्ह्यांनी संगमनेर पुर्णत: बदनाम होत चालले असून काल नामदारांच्या नावे ओळखल्या जाणार्या संगमनेरची ओळख बिहार सारखी होऊ लागली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. आजही एक म्हण आहे की,पुणे तेथे काय उणे, आता संगमनेर तेथे हर प्रकारचे गुन्हे.! असे बोलले जाऊ लागले आहे. कारण, गुन्हेगारीत आता फक्त येथे अंडागँग येणे बाकी होती. ती देखील दाखल झाली आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासनाचे काम आहे गुन्ह्यांचे डिटेक्शन करणे, ते अगदी काही अंशी होत असून भलतेच उद्योग येथे पहावयास मिळत असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे, आता अंडागँगला रोखण्यासाठी पोलीस काय करतात. हे पाहणे महत्वाचे आहे. तोवर जनतेने तरी सावध राहिले पाहिजे.!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अनिकेत मच्छिंद्र कडलग (रा.जवळे कडलग, ता.संगमनेर) हे कृषी दुकानाची वसुली करुन 60 हजार रुपये घेऊन घराकडे निघाले होते. तेव्हा कोंची घाटाच्या उतारावर असताना त्यांच्या मागून एक अनोळखी दुचाकी आली. त्यांनी कडलग यांच्या आमिनी (एम.एच.12.के.जी.7975) कारला ओव्हरटेक केले. दुचाकीवर बसलेल्या मागच्या व्यक्तीने कारच्या पुढील काचवर दोन अंडे फेकुण मारले आणि ते थोडे पुढे गेले. कडलग यांना काही दिसेना म्हणून त्यांनी त्यांनी त्यांची कार तत्काळ रोडच्या कडेला घेतली. गाडी थांबल्याचे पाहून हे दोन चोरटे त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी काहीतरी टणक वस्तुने कडलग यांच्या डोक्यात वार केला. तर, त्यांनी दोघांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने कडलग यांच्या हातावर चाकुने वार केले. या दरम्यान, एकाने मागील सिटवर ठेवलेली बॅग उचलली आणि ते पळून गेले. आज कडलग यांच्यावर शहरातील कुटे रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंडगँग म्हणजे काय?
काही चोरटे हे दरोडे आणि रस्तालुट करण्यासाठी रात्री महामार्ग किंवा वर्दळीच्या ठिकाणी गाड्यांना आडवे होतात. गाडी चालकाच्या बाजुने काचेवर एक किंवा दोन अंडे फेकुण मारतात. त्यामुळे, वाहन चालकाला समोर काही दिसत नाही. परिणामी तो अंड्यातील पिवळा बलक आणि चिवट द्रव बाजुला करण्यासाठी वायफर चालु करतो. त्यामुळे, तो पिवळा बलक संपुर्ण काचेवर पसरतो आणि तो पाण्याने देखील निघुन जात नाही. त्यामुळे, काच पुर्ण पिवळी आणि अपारदर्शी होते. समोर काहीच दिसत नाही. म्हणून वाहन चालक गाडी थांबवितात आणि हे चोर, दरोडेखोर त्यांना लुटतात. हे चोरटे एकटे नव्हे तर दोघे-तिघे असतात. यांच्या टोळ्या देखील असतात. हे सर्व कृत्य करण्यासाठी ते अंड्याचा वापर करतात. म्हणून त्यांना अंडा गँग असे म्हणतात. यांच्यापासून वाचायचे असेल तर गाडीचा वायफार चालु करायचा नाही आणि गाडी देखील थांबवायची नाही...!
अंडागँगचा इतिहास...!
सन 2010 च्या दरम्यान नगर शहरातील मुकुंदनगर येथून अंडागँगचा उगम झाला. यांनी नगर तालुक्यातील कामरगाव, इमामपूर घाट, केडगाव, भिंगार, जामखेड रोड, विळद घाट आणि वायपास रोड येथे अनेक वाहन चालकांच्या काचेवर अंडे फेकूण रस्तालुट केली. त्यानंतर यांची मजल इतकी वाढली की, याच अंडागँगच्या एका मुख्य सुत्रधाराने लालटाकी परिसरात एक खुन देखील केला. ही गँग इतकी मोठी झाली. की, यात नगर शहर, भिंगार आणि मुकुंदनगर येथील बहुतांशी अल्पवयीन मुलांचा सामावेश झाला. या गँगची दहशत फार निर्माण झाली होती. त्यामुळे, यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली. तेव्हा तत्कालीन पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश, ज्योती प्रियसिंग, आर.डी.शिंदे, पोलीस उपाधिक्षक घुगे, खाडे आणि वाय.डी.पाटील साहेब, स्थानिक गुन्हे शाखाचे रजपूत साहेब, ढेकले साहेब, पाटोळे साहेब, दिलीप पवार साहेब यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. त्यानंतर यात बड्याबड्या नेत्यांवर देखील आरोप झाले. काही नेतेच यांना पाठबळ देतात अशी तक्रार पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी स्ट्रीग अॅपरेशन केले. तेव्हा अनेक तरुणांना यात ताब्यात घेण्यात आले होते. यात बहुतांशी मुले ही अल्पवयीन होती. त्यामुळे, जे सज्ञान होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन नंतर मोक्का आणि तडीपारीचे प्रस्ताव देखील मंजुर झाले होते. आता संगमनेरात ही गँग पकडली जाईल का? त्यात मोठी साशंकता आहे. त्यामुळे, नागरीकांनीच स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. असे मत समाजसेवकांनी व्यक्त केले आहे.