आ. डॉ. लहामटेंच्या शब्दापुढे जाल तर तुमची खैर नाही.! अन तुमचे उद्योग बंद करा, विज बोर्डाच्या अधिकाऱ्यांना उर्जामंत्री तनपुरेंचा 440 होल्टचा करंट.!

- sagar shinde

सार्वभौम (अकोले) :- 

                               आमदार खासदार म्हटलं की त्यांची ऐट काही औरच असते. त्यात मंत्री म्हटल्यावर बोलायलाच नको.! खादीची कापडं, कार्यकर्त्यांचा ताफा आणि बहादराचा मिजास वेगळाच, पण मोठ्या कुतूहलाने सांगावेसे वाटते. की, प्राजक्त तनपुरे हे मंत्री असून देखील ना कोणती गुर्मी ना कोणता मिजास, ना कोणती गर्दी ना कोणती खादी.! अगदी राजकारणातील पांढऱ्या बगळ्यांना लाजवेल इतके सरळ काम आणि साधे रहाणीमान.! डॉ. किरण लहामटेंसारखा आमदार तुम्हाला सगळ्या राज्यात कोठे सापडणार नाही. अन तुम्ही त्यांच्यापर्यंत तक्रारी येतील असे काम करता.? इथून मागे या तालुक्यात तुम्ही कसे अन काय काम केले ते सोडून द्या.! पण, आता तसले काम खपून घेतले जाणार नाही. यापुढे आ. डॉ. लहामटेंच्या शब्दापुढे जाल तर तुमची खैर नाही.! अन तुमचे बाकीचे उद्योग बंद करा, शेतकरी, सामान्य माणूस यांना सुविधा द्या. कोठे तारांना झोळ पडला असेल, कोठे पोलची गरज आहे, विज चोरी होत आहे अशा बाबींवर लक्ष द्या. अशा प्रकारे विज बोर्डाच्या अधिकाऱ्यांना उर्जामंत्री तनपुरेंचा 440 होल्टचा करंट दिला. तर, तालुक्यात काही ठिकाणी सबस्टेशन कसे बसविता येतील यासाठी उर्जामंत्री यांनी सर्वेक्षण अहवाल मागविला आहे. त्यांनी अकोले विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेथे त्यांनी अनेकांचा समाचार घेतला.

...याबाबत सविस्तर माहिती अशी की, महा. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तसेच उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे साहेबांनी आज अकोले तालुक्याला भेट दिली. तालुक्यातील काही आदिवासी समाजाचे प्रश्न आणि विज वितरण यांच्यासह त्यांनी तालुक्यातील राजकारणाचा आढावा घेतला. खरंतर, अनेकांना तनपुरे साहेबांच्या स्वभावाकडे पाहून असे वाटले नाही. की, ते एखाद्या अधिकाऱ्यास त्यांच्या शैलीत करंट देतील. पण, अमेरीकन शिक्षणातील ज्ञान आणि भारतीय व कौटुंबिक संस्काराचा संयम राेखून त्यांच्या टप्प्यात आलेल्या राजुरच्या मोवाडे या अधिकाऱ्याचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला. खरंतर राजुरमध्ये या अधिकाऱ्याबाबत इतक्या तक्रारी आहेत. की, आमदार महोदयांच्या निम्मा जनता दरबाराची फेज याच मोवाडेंमुळे उडून जाते. बरं हे महाशय आमदार साहेबांना देखील जुमानत नाही. असे काही तक्रारदार सांगतात. धड कोणाशी निट बोलायचे नाही, ना अर्थपुर्ण तडजोडी केल्याशिवाय कागद फायनल करायचा. राजुरमध्ये तर असे काही महाशय आहेत. जे, हॉटेलांमध्ये मिटर चेक करायला जातात आणि उलटसुलट बोलून भिती घालुन पोटभर जेवून येतात. साहेब, पैसे हो.! तर नको ती कारण आणि धमकी समोर येते. बरं हा प्रकार काही एकदाच नव्हे.! वारंवार होतो. त्यामुळे, काही व्यक्ती अशा लोकांना वैतागल्या आहेत. हे सर्व आदिवासी भागात घडतं आणि वितरणाचे आधिकारी व कर्मचारी त्यांच्यासोबत असे वागतात. ही फार मोठी शोकांतीका आहे. पण, करणार काय? आपलेच दात आणि आपलेच ओठ.! यांना वेसन घालण्याइतपत यांची मजल जात नाही.

            खरंतर, आज तनपुरे साहेबांनी एक खंत व्यक्त केली. की, तारांचे झोळ खाली येतात आणि त्यातून हजारो टन ऊस जळून खाक होतो. हे असले प्रश्न माझ्यासमोर यावेत.! किती दुर्दैवी बाब आहे. तुम्ही करतात तरी काय? तुमच्याकडे यंत्रणा आहे. अशी कामे करण्यासाठी काही खाजगी कंपण्यांच्या सोबत कॉन्ट्रक्ट केलेले आहे. ते काय करतात, त्यांच्याकडून काम करुन घेण्याची जबाबदारी कोणाची आहे. आदिवासी भागात लोकांकडे मिटर आहे. परंतु, मोठमोठी लाकडे उभी करुन त्याहून दुरवर लाईट कनेक्शन नेल्याच्या तक्रारी आहेत. हा काय प्रकार आहे.? मग मधले पोल गेले कोठे? चौकशी करा आणि कळवा. नेमकी असे का आहे? उगच जनतेच्या जिवाशी खेळू नका. राजूर विभागातून मोवाडे यांच्याबाबत त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तर, अधिकारी चुकत असेल, सांगून सुधरत नसेल तर बेधडक कारवाई करुन टाका. कोणामुळे सरकार बदनाम झालेले आम्हाला चालणार नाही. अशा शब्दात त्यांनी मनमौजी अधिकाऱ्यांचे कटावूट काढून घेतले.             


 वास्तवत: विज वितरण व्यवस्था प्रचंड  अडचणीत आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या देखील काही मर्यादा आहेत. मात्र, प्रत्येकाने किमान प्रेमाने तरी बोलायला शिका. माय-बाप शेतकऱ्यांचे प्रश्न तर समजून घ्या. आपली समस्या देखील त्यांना समजून सांगा. प्रेमाणे जग जिंकता येते. तुम्ही समोरच्याला रोषाने बोललात तर तुमच्या पदरी काय पडणार आहे? त्यामुळे, शेतकरी व विज ग्राहक यांच्याशी आदबिने वागावे असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तर, यावेळी अकोले विज वितरण कार्यालयातील बागुल साहेब यांचे तनपुरे यांनी कौतुक केले. कारण, राष्ट्रवादीचे नेते सिताराम पा. गायकर, कपील पवार साहेब, भानुदास तिकांडे, अशोक देशमुख, बबन वाळुंज, विकासराव शेटे यांच्यासह अनेकांनी विज संदर्भात प्रश्न उपस्थित केले. मात्र, तरी अनेक प्रश्नांना अगदी सकारात्मक दृष्ट्या तोंड देऊन त्यावर मार्ग काढण्याचे काम बागूल करत असतात. या सर्वांच्या प्रतिक्रिया समोर ऐकल्यानंतर उर्जामंत्र्यांनी बागुल यांचे तोंडभरुन कौतुक केले. चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे. अन ती पावती जनता देते. तसे बागुल यांचे काम आहे. तर, संगमनेर विभागीय अधिकारी थोरात साहेब यांचे देखील काम चांगले असल्याने तनपुरे साहेबांनी कौतुक केले. या व्यतिरिक्त आता, जेव्हा जेव्हा आ. डॉ. किरण लहामटे हे जनता दरबार घेणार आहेत. तेव्हा तेव्हा राजूर आणि अकोल्याच्या अधिकाऱ्यांना तेथे उपस्थित रहावे लागणार आहे. तसे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले आहेत. कारण, तुम्ही चांगले काम केले तर तुमच्या तक्रारीच आमदारांकडे येणार नाही. त्यामुळे, तुम्ही चुकतीय तर सामोरे जावे लागेल असे म्हणून या अधिकाऱ्यांना आता थेट जनतेला उत्तर द्यावे लागणार आहे.

           दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या कामाची शैली आणि अभ्यास पाहता त्यांच्याकडे जिल्ह्याची देखील जबाबदारी दिली पाहिजे अशा प्रकारचे मत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना कोल्हापुरवर लक्ष देता येत नाही. त्यामुळे, ते नगरच्या पालकमंत्री पदासाठी नेहमी नाखुश असतात. तर, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची प्रकृती आणि गृहमंत्री पदाचा व्याप लक्षात घेता त्यांच्याकडे पुन्हा अतिरिक्त पदभार देणे संयुक्तीक नाही. तर, कॉंग्रेस इच्छूक असली तरी पवार साहेब असली तडजोड कधी करु शकत नाही. त्यात शिवसेनेचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग, चेहरा समोर येतो. तो म्हणजे नवोदित तरुण मंत्री तनपुरे साहेबांचा. त्यामुळे, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची दारं अधिक मजबुत करायची असेल. तर, येथे अशाच व्यक्तीमत्वाची गरज आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची तरुण फळी उभी राहिली असून त्यांना बळ देण्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला पाहिजे. असे मत अकोले संगमनेरच्या कार्यकर्त्यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.