एकतर्फी प्रेमातून तिच्या झिंज्या धरुन प्रेम व्यक्त केले.! जाब विचारला तर थेट गळ्यावर चाकू फिरविला.! कॉलेज गेटवर राडा.!

   


सार्वभौम (संगमनेर) :- 

         संगमनेरात शहरात कॉलेजहून घरी जाणार्‍या एका 18 वर्षीय विद्यार्थीनीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास ओहरा कॉलेज गेटवर घडली. एका मित्राने टपली मारली तर दुसरा म्हणाला की, तु मला फार आवडतेस, चल गाडीवर बस. असे म्हणून झिंज्या ओढल्या. तर अन्य मित्रांनी पीडित तरुणीस शिट्या मारुन तिची छेडछाड केली. हा सर्व प्रकार जेव्हा तेथील काही तरुणांनी पाहिला तेव्हा त्यांनी आरोपी यांना विचारणा केली असता या एकतर्फी प्रेमविरांनी अनिकेत काळे आणि अनिकेत गायकवाड (रा. कसारा दुमाला, ता. संगमनेर) यांच्यावर चाकुने हल्ला केला. यांचे नशिब बलोत्तर चाकु गळ्याला लागला नाही. त्यानंतर याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी कसारा दुमाला येथील एक विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे कॉलेजला आली होती. कॉलेज भरल्यापासून ते सुटेपर्यंत काही मजुनू तिच्या मागेपुढे फिरण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा 11:30 वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटले तेव्हा अनिकेत दळे, अनिकेत मंडलिक, साई सुर्यवंशी असे अन्य काही तरुण पीडित तरुणीच्या मागावर होते. जेव्हा ही तरुणी कॉलेजच्या गेटवर आली तेव्हा हे तरुण एका दुचाकी वाहनावर आले. त्यातील दळे याने तिला विचारणा केली. की, तू कोठे चालली आहेस, चल माझ्या गाडीवर बस. तीने त्यास प्रतिक्रिया देखील दिली नाही. त्यामुळे दळे याने पीडित तरुणीच्या डोक्यात टपली मारली. तर अनिकेत मंडलिक तिला म्हणाला की, तु खूप सुंदर दिसते. त्यामुळे, मला फार आवडते असे म्हणून तिचे केस धरुन ओढले. तर तिची छेडछाड काढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा सर्व प्रकार सुरू असताना पीडित तरुणी पुढे चालत गेली असता सुर्यवंशीसह अन्य मुलांनी शिट्ट्या मारुन हवभाव केले.

दरम्यान, हा प्रकार तेथील काही मुलांनी पाहिली असता ते पुढे आले आणि त्यांनी हा टवाळखोरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यांनी उलट त्या मुलांवर भाईगिरी केली. तुम्ही त्या मुलींची छेडछाड का काढता? असे विचारले असता त्यांनी काळे आणि गायकावाड या तरुणांना शिविगाळ दमदाटी सुरु केली. तर, अनिकेत दळे याने आपल्या खिशातून चाकु काढला आणि काळे याच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. काळे याचे नशिब बलोत्तर तो थोडा मागे सरकला आणि चाकुचा वार हुकविला. अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता. त्यानंतर या सर्व तरुणांनी जे तरुण सोडविण्यासाठी आले होते. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अनेक अश्लिल शिविगाळ्या करुन आम्ही तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करु असा दम दिला. अशा प्रकारची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करीत आहेत.

दरम्यान, नुकतेच कालेज सुरू झाले आहे. त्यामुळे, शाळा महाविद्यालयांमध्ये असे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर घडताना दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी दामिनी पथकाची नेमणुक करणे गरजेचे आहे. तर, तरुणींनी देखील अशा टवाळखोर व्यक्तींना त्याच पद्धतीने धडा शिकविणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक कॉलेज प्रशासनाने देखील एक टिम तयार करुन किमान कॉलेज कॅम्पसमध्ये तरी रोड रोमीयो किंवा भाई-दादा यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तसेच येणार्‍या काळात पोलीस प्रशासनाने देखील शाळा-महाविद्यालयात सेल्फ डिफेन्स तसेच कायद्याबाबत जागरुकता करण्यासाठी कार्यशाळा किंवा संवाद परिषद आयोजित करणे अपेक्षित आहे. असे झाले तर किमान बरेचसे प्रश्न सॉल होतील. आज ही तरुणी पुढे आली आहे. अशा अनेक विद्यार्थीनी आहेत. ज्या पुढे येत नाहीत. भिती किंवा शिक्षण थांबेल या हेतूने त्या जे काही घडते त्याला निमुटपणे सामोरे जात असतात. त्यामुळे, अशी घुसमट थांबविण्यासाठी पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.