माझा तमाशा अन देवगडची यात्रा.! 15 वर्षापुर्वीच्या आठवणी दाटल्या..!



- सागर शिंदे

सार्वभौम :- 

         तो काळ कदाचित 2007 चा असावा. तेव्हा मी नेमकीच 10 वी पास झालो होतोे. तेव्हा फार काही जगण्याचे कौशल्य नव्हते. मात्र, कलाकार असल्याने ओढ नक्कीच कलाक्षेत्राची होती. इयत्ता चौथी-पाचवीत असताना कॉशिओ वाजविण्याची कला अवगत झाली होती. त्यामुळे, बॅण्डमध्ये लग्न-वराती मी सहज वाजवत होतो. घरी आठरा विश्व दारिद्र होते. ना शेती ना कोणत्या उत्पन्नाचा सोर्स होता. कधी भिक मागून खायचे तर कधी देवापुढचे नैवद्य गोळा करुन पोटाची भूक मागवायची. यापलिकडे आईने लोकाच्या बांधावर गाळलेला घाम आणि दोन रुपयांची वाजवणी याच्या व्यतिरिक्त एक नवा रुपया घरात येत नव्हता. मात्र, बाप आमचा अट्टल दारुड्या असल्याने सगळा संसार आईच्या खांद्यावर होता. माझा बाप नुसता कलाकार नव्हे.! तर महाकालाकर होता. त्यांनी कांताबाई सातारकर, काळु-बाळु, सुरेखा पुणेकर, बाबुराव बोरगावकर, संगिता महाडीक, इठाबाई यांच्यासह अनेक तमाशांमध्ये काम केले होते. तो काळ कदाचित 1985 चा होता. 7 ते 8 वर्षे बापानं तमासगिरी केली. तेव्हा सोडा.! अगदी मरेपर्यंत माझ्या बापाचा कोणी संबळ, ताशा, पेटा, पॅनो, बुलबुल, सनई यात कोणी हात धरला नाही. गण गवळण म्हटलं की, लोकांना ते भुलून टाकत होतो. इतका जिवंत कलाकार त्यांच्यात होता. तेच अनुवंश माझ्यात संक्रमीत झाले होते. त्यामुळे, मी आयुष्यात वेगळे काही करेल असे मला देखील वाटत नव्हते.

मला त्या घटना अगदी आजही स्पष्ट आठवतात. त्यावेळी, म्हणजे सन 2005 साली आई, मी आणि बाबा आम्ही संगमनेर तालुक्यातील देवगड यात्रेला येथे गेलो होतो. ती यात्रा म्हणजे नगर जिल्ह्यात एक नावाजलेली असायची. त्यात आमचा देव्हारी खंडोबा म्हणून जेजुरीला जाण्याची ऐपत नसल्याने पर्यायी लोक देवगडला दर्शनासाठी जायचे, त्यात आम्ही देखील त्याच माळेचे मणी होतो. त्याकाळी गाड्या बदलत-बदलत आम्ही हिवरगाव पावसा येथील ते मंदीर गाठले. यात्रा म्हणजे आमच्यासाठी केवळ एक आनंद होतो. वाटलं तरी आम्ही कधी काही खरेदी करु शकत नव्हतो. खोबर्‍याच्या कुटक्याचा प्रसाद आणि रेवड्या-गोडीशेव या पलिकडे फारफार तर जलेबीचे एखाद-दोन येटोळे मिळायचे. मात्र, कधी उंच उडणार्‍या राहाटात बसू वाटलं तरी बखाडाला धरुन ओडलं जायचं. कधी काही घेऊ वाटलं तर तो देखील हट्ट करण्याचा अधिकार नव्हता. कारण, तुला परत कधी आणणार नाही. हीच दहशत तोंड बंद करुन जायची. देवगडच्या यात्रेत इतकी गर्दी असायची की, मुंग्यांना शिरायला जणु जागा नसे. आम्ही तेव्हा गड चढून वर गेला तर इतके सुंदर दृश्य पाहून डोळे तृप्त झाले होते.

आम्ही गड उतरुन खाली आलो, आईने पेंडकं भरुन आणलेल्या भाकरी तिने सोडलेल्या आणि एका मोकळ्या मैदानी भोंग्यांचा आवाज घेत आम्ही त्या रिचविल्या. आता वेळ बराच झाला होता. तेव्हा तेथे आलेला तमाशा पहायचा आणि रात्र कशिबशी काढून चालतं व्हायचं असे ठरलं होतं. तसेही वग पहाटे चार पाच वाजेपर्यंत चालायचा. त्यात आईला त्याची फार आवड होती. त्यामुळे, आम्ही त्या राहुटीच्या दिशेने निघालो. असला भारी तंबु बांधलेला होता. त्या पाठीमागे एक आयताकृती राहुटी होती. रंगमंचकावर रंगीबेरंगी लायटा लावलेल्या होत्या. अर्थात हे दृश्य सहज कोणाच्याही मनाला भावले इतके ते मोहक होते, मला देखील त्याची भुरळ पडली. आम्ही शे दिडशे कोसावर लांब एक जागा शोधली आणि आईने एक बाडदान खाली आंथरले. आम्ही दोघे त्यावर बसलो. मात्र, बाबा नेमकी काय शोधत होते. देव जाणे. त्यांची नजर सरळ त्या राहुटीकडे जात होती. काही क्षणानंतर त्यांची पाऊले त्याच दिशेने चालते झाले. मी देखील त्यांच्याकडे तितक्याच उत्सुकतेने पाहत होतो. ते पुढे निघाले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन  मी देखील पाठोपाठ निघालो. कदाचित ही पाऊले माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारे ठरु शकणार होतो. मात्र, त्या रात्रीने भलतेच रौद्ररुप धारण करुन पहाट उजडविली...!

आम्ही, तमाशा पहायला आलेली गर्दी तुडवत पुढे गेलो. दादानं, राहुटीच्या द्वारपालाला रामराम ठोकला. त्याने आम्हाला आडविले, मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली ती मला आठवत नाही. काही क्षणात आम्ही दोघे राहुटीत शिरलो. आत इतके प्रसन्न वातावरण होते की, फक्त संथ चाळांचा आवाज, सेंन्ट मारलेल्या त्या नृत्यांगणा, अनेकजणी आपापल्या मेकअपमध्ये व्यस्त, दुसर्‍या खोली तीन दगडांवर मांडलेली चुल, त्यातून ढणढणा निघणारा जाळ आणि तव्यावर भाजणारी भाकरी असे ते त्या राहुटीतील तमासगिरीचे विश्व होते. एक वयस्कर महिला दादांना पाहुन पुढे झाली. तिच्या पायात इतकी घुंगरं होती की, घोट्याच्यावर व्यापलेली जागा आणि त्यात तो साडीचा दडपलेला भाग. त्यामुळे, त्याचा आवाज अगदी स्पष्ट येत होता. आरं काहो रं मास्तर.! आज हिकडं कसं? लै दिसानं फडात आलात.! तिच्या भाषेचा लय आपल्यापेक्षा फार वेगळा होता. मात्र, त्यात प्रेमळ लय होती. आपल्या मानसाची आपल्या कालाकाराच्या आदराची किनार त्या शब्दांना होती. काय नाही बुवा.! आलो होतो यात्रेला. तमाशाचा फड पाहिला अन म्हटलं यावं जरा आत जाऊन. बा नं त्यांना उत्तर दिलं. मग या की, बसा. त्या महिलेने एक लाकडी पेटीकडे बोट करुन दादांना खुनावलं. ते पुढे होऊन त्या पेटीवर बसले. त्या महिलेनं माझ्यावर नजर टाकली आणि माझ्या बा ला पाठमोर्‍हा होऊन विचारलं. मास्तर.! हे पाखरु कोणाचं म्हणायचं? तोच बा नं उत्तर दिलं. का? माझ्यासारखं दिसत नाही ना? ते दोघे तर हसलेच. मात्र, तेथे असणारी सगळीच मंडळी दिलखुलास हसली. मी मात्र, लाजुनच बसलो होतो. त्यावर ती म्हणाली, मास्तर, यालं काय यतं का? की गेलं वाया? नाय नाय, लय हुशार आहे तो, माझ्यासारखाच कलाकार आहे. लहानपणापासून कॉशिओ वाजवतो तो. लग्न वरातीत मास्टर झालाय दादानं उत्तर दिलं. आरं मग दे की आपल्या फडात पाठून, तुही परंपरा चालली पायजे, कला कह्याला  वाया घालतोय. त्याला मी लेकरासारखा संभाळीन. मी खरंतर आयुष्यात पहिल्यांदा त्या तमाशाच्या प्रेमात पडलो होते. दादा बसले होते तेव्हा नटल्या खटल्या तरण्याबांड मुलींनी त्यांचा आशिर्वाद घेतला होता. म्हणजे, रंगमंचावर   लोकांना भुरळ घालणार्‍या त्या तरुणी किती संस्कारक्षम असतात हेच चित्र मला पहायला मिळालं. तर, माझ्याकडे पाहून ये की फडात असे म्हणार्‍या तरुणी डोळ्यावर आलेला केसांचा आकडा हवेत भिरकावत मला देखील तमाशाच्या मोहात पाडून गेल्या.

त्या राहुटीत त्या दिवशी फार काही पहायला मिळालं. त्याक्षणी, मी माझ्यातील कलाकार जागा झाला. जीव गेला तरी चालेल. पण, आता याच फडात मी पेटी मास्तर म्हणून काम करणार असा प्रण मी केला. वाट पाहत होतो. ती फक्त बाप कधी जा म्हणतो याची. बाहेर बसलेल्या आईचा तर मला कधीच विसर पडला होता. आम्ही फडातून बाहेर पडलो तेव्हा काही दोन बापड्यांनी आम्हाला पुढे जागा करुन दिली. आपल्या बापाची किती वट आहे. या तमाशाला किती प्रतिष्ठा आहे. कलाकार म्हणजे किती राजा माणूस, हजारो मानसे केवळ यांच्या आदा पाहून दाद द्यायला बसलेले असतात या विचारांनी माझ्यातल्या कलाकाराची छाती त्या दिवशी रुंदावली होती. आम्ही पुढे बसलो, पहिल्यांदा रंगदेवतेच्या गणला सुरूवात झाली. रंगुदे खेळ नवा चांगला या गणाच्या शब्दांनी माझे अंत:करण भरुन आले. कारण, इतकी आवड, इतके प्रेम, इतकी आत्मियता मला आजवर कशात वाटली नव्हती. काही वेळ गेला आणि रंगबाजीला सुरूवात झाली. लोकांच्या शिट्ट्या आणि कालाकाराप्रती असणारे काही नको ते शब्द मला फार वेदना देऊ लागले. कारण, अगदी शेजारीच काही उपद्रवी बेवडे बसलेले होते. शिट्ट्यांची दाद नक्की असावी पण त्यात अपशब्द नसावे. म्हणून, माझे शेजारी बसलेल्या व्यक्तीशी वाद देखील झाले. तेव्हा मी भर तमाशात हुंदके देऊन रडत होतो. कारण, मला ज्या ठिकाणी जायचे होते. त्या रंगमंचाला मी राजा म्हणतो आणि काही नतद्रष्ट लोक भिकारी म्हणतात. माझ्यात इतका रोष भरला होता की, माझ्या धमन्या देखील दुथडी भरुन वाहत असाव्यात...!

त्या दिवशी रंगबाजी अगदी जोमात सुरु होती. मी आईला स्पष्ट सांगितले आज नंतर मी या तमाशात मास्तर म्हणून जाणार आहे. माझे शब्द संपते ना संपते तोच प्रचंड वेगाने आईने माझ्या गालात जोराची झापड मारली. बापने आयुष्यभर तमाशे करुन माझ्या आयुष्याचा तमाशा केला. अन तुला परत तमाशाचे डोहाळे फुटले. तिच्या शब्दांना फार धार होती, शब्दामागून शब्द बाहेर पडत होते. आता मला या तमाशाचे अधिक कौतुक लागण्यापेक्षा तिने माझे खवाट धरले आणि भर तमाशातून मला फरपटत बाहेर काढले. चार-दोन धमाट्यांचा मी मानकरी झालो असलो तरी आई इतकी का तापली? हे समजण्याइतपत प्रगल्भता माझ्यात नव्हती. त्या दिवशी मला पुढे घालुन तीने देवगड ते संगमनेर हा पायी प्रवास केला. रात्र काटत आम्ही देवगड सोडले. माझा बाप देखील मला हेच समजून सांगत होता. की, कलाकार हा फक्त रंगमंचावर राजा असतो, त्यानंतर तो खरोखर भिकारी असतो. लोकांची दाद ही केवळ दोन वेळचे अन्न देते, उभं आयुष्य तेथे कधी घडू शकत नाही. आज येथे सुपारी तर उद्या कोठे? तो प्रवास, मिळेल ते अन्न आणि आयुष्याची हेटाळणी यापलिकडे हाती काही मिळत नाही. काम नाही तर दाम नाही. प्रचंड हालाकीचे दिवस आम्ही काढले आहेत. त्यामुळे, तु तमाशाचा विचार सोडून दे.! बाबानं फार काही आठवणी सांगितल्या. आईने माझ्यात काय स्वप्न पाहिले आणि मी कोणते स्वप्न पाहतोय, ती काय जगले आणि हा काय जगू पाहतोय. हा सगळा परामर्श त्या दिवशी दोघांनी माझ्यासमोर मांडाला तेव्हा माझ्या डोक्यातून तमाशाचे खुळ काही अंशी निघुन गेले. काल मी देवगड्या यात्रेला गेलो होतो. तेव्हा तेथील ट्रस्टीने माझा सत्कार केला. माझे कुटुंब आणि त्यात आई देखील सामिल होती. त्या देवगडाची कृपा म्हणावी. आज सागर शशिकांत शिंदे हे एका चांगल्या प्रतिष्ठेने उभे आहेत. आयुष्यात चढ उतार येत राहतील. मात्र, आपली नैतिकता आणि प्रामाणिकता देव पाहतो आहे. तो प्रत्येक गोष्टीचे मुल्यमापन करतो. काल या सर्व गोष्टी अगदी प्रकर्षाने दाटून आल्या होत्या. म्हणुन हा प्रचंच मनात दाटून आला आणि तो मी आपल्यासमोर मांडला आहे. (संदर्भ :- माझ्या वाजंत्री या पुस्तकातील एक शॉर्ट किस्सा)