बिबट्याने घेतला चिमुरड्याच्या नरडीचा घोट, जबड्यात डोकं धरले, चार वर्षीय बालकाचा मृत्यू,
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) ;-
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथे चार वर्षीय चिमुरड्याचा बिबट्याने रक्ताचा घोट घेतला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याच्या गळ्यावर व डोक्याला बिबट्याचे दातलागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात सिद्धेश सुरज कडलग (रा.जवळेकडलग, ता. संगमनेर) असे मयताचे नाव आहे. ही घटना आज शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायं 6:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने जवळेकडलग परिसरावर शोककळा पसरली आहे. तर संगमनेरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्या संख्येवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उपाय योजना करावी अशी विनंती करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जवळेकडलग गावात रोडपासुन काही अंतरावर कडलग वस्ती आहे. मयत सिद्धेशचे आई वडील हे शेती व दुग्ध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. दररोजप्रमाणे आज देखील काम सुरू होते. दुपारी काम करून अराम देखील केला. त्यावेळी चिमुकला सिद्धेश घरच्यांसोबत अगदी आनंदाने खेळत होता. त्यानंतर तो देखील झोपला. सर्वजण आराम करून उठल्यानंतर आपले आपले काम सुरू केले. घरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने आजूबाजूला शेतीत देखील जनावरांसाठी चारा केला आहे. मात्र, तेथे बिबट्यांचा वावर जास्त असतो हे कदाचित कोणाच्या लक्षात येत नसावे. सर्वजण घरच्या कामात व्यस्त होते. चिमुकला सिद्धेश देखील सायंकाळच्या वेळी घराच्या परिसरात खेळत होता. घरातील काही जण जनावरांसाठी कुटी मशीन मध्ये चाऱ्याची कुटी करत होते. त्यावेळी घराशेजारी असणाऱ्या मोठ्या गिणीगवतातून बिबट्याची नजर या चिमुरड्या सिद्धेशवर पडली. त्याने या चिमुरड्याला एकटे असल्याचे पाहिले आणि डाव साधला.
दरम्यान, बिबट्याने गिणीगवतातून येऊन चारवर्षीय सिद्धेश्व हल्ला केला. त्याने चिमुरड्याला तोंडात घट्ट धरून गिणीगवतात नेले. हा सर्व प्रकार आज्जीने पाहिला. त्यावेळी या चिमुकल्याच्या आजीने आरडा ओरडा केला. तेथे एकच गर्दी जमली. जनतेने गिनींगवताकडे धाव घेतली असता बिबट्याने चिमुरड्याला सोडले. त्यानंतर तात्काळ चार वर्षीय सिद्धेशला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चार वर्षांच्या चिमुकल्याने आपला जीव गमावला होता. त्याला रुग्णलयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून पुढील प्रक्रिया करत आहे. खरंतर, जवळेकडलग परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढत असल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून आता शहरातील उपनगरात बिबट्यांचा वावर वाढत आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात बिबट्यांनी आता हैदोस घातला आहे. भर दिवसा गावात प्रवेश करणे, वाडी वस्तीत घुसून मानसे व जनावरे यांच्यावर हल्ले करणे. हा फार मोठा अतिरेख होऊ लागला आहे. यात वन विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असून आम्ही काय करु शकतो अशा प्रकारची उत्तरे देत आहेत. त्यामुळे, अजून आता भर दिवसा बिबट्या शहरात फिरावा अशी इच्छा वन विभागाची आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागल आहे. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. मात्र, सकाळीच लोक दुध घालण्यासाठी येतात, त्यांना रोज बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे, वेळीच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
