जय भिम चित्रपटाप्रमाणे संगमनेरात हेबियस कॉर्पसचा प्रकार.! लग्नासाठी मुलीचे अपहरण, पण मुलगी काही सापडेना.! तिला हजर करा, पोलिसांना हायकोर्टाचे आदेश.!

 


सार्वभौम (संगमनेर) :-

                  तामिळनाडू येथील 1993 मध्ये घडलेला एका सत्य घटनेवर आधारीत असलेला जय-भिम हा चित्रपट आज ऑस्करच्या उंबरठ्यावर आहे. त्यात असणारा हेबियस कॉर्पस हा गुन्ह्याचा प्रकार देशाला तेव्हा प्रचलित झाला. म्हणजे, एखाद्या व्यक्तीला कोंडून ठेवणे, ठराविक उद्देशाने त्याला समाजापुढे येण्यास मज्जाव करणे किंवा त्याच्या मुलभूत हक्कांवर गंडांतर आणणे हे प्रकार हेबियस कॉर्पसमध्ये मोडतात. अशाच प्रकारचा एक गुन्हा संगमनेरात समोर आला आहे. कारण, घुलेवाडी परिसरातील एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या मिसिंगची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याचा तपास होऊ शकला नाही. त्यामुळे, कलम 366 प्रमाणे यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ज्यांनी पळून नेली अशी शंका होती. ते म्हणतात आमचा काही एक संबंध नाही, एक एक्समॅनला अटक केली असता त्याच्याकडून देखील कोणतेही पुरावे हाती आले नाही. त्यानंतर यात अन्य दोन मुलींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. मात्र, तरी देखील अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागला नाही. यात तक्रारदारांकडून नरबळीची शंका देखील व्यक्त केली गेली तर पोलिसांवरही  आरोप करण्यात आले आहेत. अशा प्रकारची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे, न्यायालयाने तपास पोलीस उपाधिक्षक यांच्याकडे वर्ग केला असून काही करा, मुलीला शोधून हजर करा. अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पालकांनी दिली आहे. त्यामुळे, या हेबियस कॉर्पस सारख्या गुन्ह्याची चर्चा पुर्ण संगमनेरात सुरू आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहराच्या लगत असणार्‍या घुलेवाडी परिसरात 26 वर्षीय एका तरुणीने शहरात क्लासेस जॉईन केले होते.  तेथे तिची काही मित्रांशी ओळख झाली होती. त्यामुळे, त्यांच्या हाय हॅलो आणि मोबाईलवर चॅटींग वैगरे होत होती. त्यानंतर यांचे प्रेम अधिक वाढत गेले आणि आरोपी यांनी तिला लग्नाचा शब्द देऊन तिचे अपहरण केले. आता या मुलीने लग्न केले असले तरी तिच्या पालकांना काहीच अडचण नाही. परंतु फक्त त्यांना त्यांची मुलगी एकदा डोळ्यांनी पहायची होती म्हणून त्यांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली. मात्र, मुलगी आहे असेच उत्तर त्यांना मिळाले. मात्र, दिर्घकाळ लोटला तरी मुलीचा पत्ता लागला नाही. ज्याच्यावर शंका होती. तो देखील त्यावेळी दिल्लीला असल्याचे पुरावे पोलिसांनी सादर केले. त्यामुळे, त्याच्यावर शंका असुनही त्यास आरोपी करण्यात आले नाही. मग मुलगी गेली कोठे? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे, मुलीचे पालक अस्वस्थ झाले.

दरम्यान, मुलगी सापडेना म्हणून तिच्या पालकांना दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कलम 366 प्रमाणे गुन्हा दाखल केला. एक तपासाचा भाग म्हणून सीडीआर आणि अन्य टेक्निकल मुद्यांचे संकलन करण्यात आले. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, एका आर्मीत असणार्‍या व्यक्तीसोबत या मुलीचे हजारो कॉल्स झालेले आहेत. तेव्हा त्यास ताब्यात घेतले असता त्याने देखील मुलीबाबत शब्दभर माहिती दिली नाही. तो तब्बल एक महिना जेलमध्ये राहिला. मात्र, त्याला जामीन झाला आणि मुलीचा शोध कामय तपासावर राहिला. या दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीच्या पालकांनी या घटनेचा पाठपुरावे केल्यामुळे पोलिसांनी अन्य दोन संशयीत मुलींना आरोपाच्या पिंजर्‍यात उभे केले. तरी देखील मुलगी कोठे गायब झाली, हे समजले नाही. गुन्ह्याचा तपास, आरोपींची चौकशी, पोलिसांची उत्तरे आणि अदृश्य झालेली मुलगी याबाबत फिर्यादीच्या मनात कायम प्रश्नचिन्ह होते. त्यामुळे, त्यांनी हे प्रकरण थेट हायकोर्टात नेले.

दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिस अधिकार्‍यांसह यंत्रणेवर आरोप करीत आमची मुळ तक्रार यांनी दाखल करून घेतली नाही. तर धांदरफळ येथील मुळ व्यक्तीसह तपासात संदिग्धता असल्याचे आरोप करण्यात आले आहे. तर या लोकांना पैशाचा पाऊस पाडायचा होता. म्हणून माझ्या मुलीस यांनी नरबळी तर दिला नाही ना? अशी शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे, या गुन्ह्यात मुलीस नेमके कोठे डांबून ठेवले आहे का? ती नेमकी कोठे आहे? तिने लग्न केले आहे का? केले तर कोणासोबत केले? तिला दडून का ठेवले आहे? यांना कोण पाठीशी घालत आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे, जी मुलगी आहे. तिच्या मुलभूत हक्कांचा विचार करता हा एक हेबियस कॉर्पस प्रमाणे गुन्हा असल्याचे लक्षात येते. त्यामुळे, आता हायकोर्टाने या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यास करण्याचे आदेश दिले असून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेणे हे पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.