भाजपच्या विजयाचे शिल्पकार काँग्रेसच.! नाकारताय काय, आकडे तर पहा.! काँग्रेसची अधोगती, राष्ट्रवादी टॉपरच.!
सार्वभौम (अकोले) :-
राज्यात 106 नगरपंचायतीचा निकाल लागला. त्यात काँग्रेसचा सपाटा झाल्याचे पहायला मिळाले. तर, भाजपला देखील तोटा झाला असला तरी काँग्रेसच्या ताठर भुमिकेमुळे अनेक ठिकाणी कमळ फुलल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे, राज्यात महाविकास आघाडीचे शिल्पकार ठरलेले काँग्रेस आज भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरल्याचे बोलले जात आहे. राज्याप्रमाणे अकोल्यात देखील हिच परिस्थिती पहायला मिळाली आहे. कारण, जसे कर्जतमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. तसे जर अकोल्यात झाले असते. तर, आज अकोल्यातील नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली असती आणि भाजपचा कुच्चामोड झाला असता. मात्र, काँग्रेसच्या ताठर भुमिकेने तालुक्यात इतिहास घडला आहे. अर्थात याचा फायदा राज्याच्या भाजप बळकटीला होईल हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना का समजले नाही.! याचे आश्चर्य वाटते आहे. म्हणजे, एकीकडे ना.थोरातांनी जे काही उभे केले आहे. तेे मोडीत काढून भाजपला बळ देण्याचे काम पटोले यांनी केले आणि आता तोंडघाशी पडल्याचे दिसून आले आहे. कारण, राज्यात 2017 मध्ये 24 जागांवर असणारी काँग्रेस आज 2022 मध्ये 18 जागेंवर आली आहे. म्हणजे, पटोले यांच्या आडमुठ्या धोरणामुळे काँग्रेसला तोटा झाल्याचे बोलले जात आहे. हे असेच नियोजन असेल तर येणार्या काळात देशातून भाजप हालत नाही आणि त्यामुळे 18 जुलै 1978 (पुलोद) प्रमाणे पवार साहेब त्यांच्यासोबत गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे, काँग्रेसला ठेच लागण्यापुर्वीच शहाणपण आले म्हणजे बरे.!
आता राज्याच्या राजकारणाची गोळाबेरीज मांडण्यापेक्षा स्थानिक राजकारणाची परिस्थिती अभ्यासली तर लक्षात येते की, अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत केवळ महाविकास आघाडी झाली नाही. म्हणून भाजपच्या हाती बहुमत गेले. अर्थात ना. बाळासाहेब थोरात यांनी जरी थोडीफार सामंजस्याची भुमिका घेतली असती. तर, अकोल्यात भाजपचे कमळ येथे फुलले नसते. पण, त्यांनी येथे 2024 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या आणि नवले साहेबांना जिल्हा बँकेत संचालक करुन बळ देऊ पाहिले. मात्र, झाले काय? करायला गेले गणपती आणि झाला...गणेशा.! वास्तव पाहिले तर काँग्रेसची प्रभाग क्र. 15 ची प्रदिप नाईकवाडी यांची जागा निवडून आली. परंतु, प्रदिप यांचे काम आणि लोकप्रियता पाहिली तर ते अपक्ष लढले असते तरी त्यांचा विजय डोळेझाकपणे होता. त्यामुळे, काँग्रेसचा मिरीटवर कोणता उमेदवार निवडून आला? असा प्रश्न अकोल्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. उलट काँग्रेसमुळे भाजपला बळ मिळाल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे. तर, राजकीय मातब्बर म्हणतात की, नामदार साहेबांनीच भाजपच्या पिचड साहेबांना मदत केली आणि राष्ट्रवादीचा कुच्चामोड केला. त्यामुळे, जे काही पुरोगामी म्हणूण काँग्रेसकडे पाहिले जात होते. त्या चेहर्यांकडे आता अॅन्टी पिचड म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. कारण, कोणामुळे काय झाले आणि कोणाचा फायदा कोणाला झाला? कोण कोणावर चिखलफेक करीत होते आणि कोण कोणाला आतून मदत करीत होते हे न समजण्याइतपत जनता खुळी नाही. म्हणून तर कमळ फुलविणार्या हातांवर लोक प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे.
वास्तवत: तुम्हाला खोटे वाटेल. पण, जर खरोखर तालुक्यात महाविकास आघाडी झाली असती. तर, भाजपचे डोके वर निघाले नसते. मात्र, कोणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला. हे जनता आता बोलु लागली आहे. जर 17 प्रभागांचा विचार केला तर लक्षात येते की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे पाच जागा (प्रभाग 1, 6, 7, 10, 15) फिक्स आहेत. तर, प्रभाग दोनमध्ये काँग्रेसचे सिट अवघ्या तीन मतांनी पडले आहे. येथे सागर निवृत्ती चौधरी हा 169 मतांनी आला असून राष्ट्रवादी 84 आणि काँग्रेस 166 असे एकुण 250 मते घेऊन महाविकास आघाडीचा उमेदवार लिडने निवडून आला असता. प्रभाग 4 मध्ये भाजप 250 मतांनी निवडून आली तर काँग्रेसला 143 आणि शिवसेनेला 124 असे मिळून 267 मते होतात. हा देखील उमेदवार महाविकास आघाडीचा सहज निघाला असता. प्रभाग पाच मध्ये काँग्रेसने उमेदवार दिलाच नाही. तेथे केवळ 70 मतांनी भाजप विजयी झाले. म्हणजे प्रभाग 4 मध्ये काँग्रेस 124 मते घेऊ शकते. तर, येथे देखील 150 मते मुस्लिम आणि काँग्रेसला माननारे काही मते होती. त्यामुळे, महाविकास आघाडी झाली असती तर 70 मतांची गोळाबेरीच फार काही अवघड झाली नसती.
प्रभाग 11 मध्ये देखील फार मोठा तोटा झाल्याचे पहायला मिळाले. कारण, येथे भाजप 258 मतांनी विजयी झाले आणि राष्ट्रवादीला (251) सात मतांना हार मानावी लागली. म्हणजे काँग्रेसचे 140 मतदान धरले तर 391 मते ही महाविकास आघाडीला मिळाली असती. प्रभाग क्र. 12 मध्ये 423 मते भाजपने घेतली तर 187 मते शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने खाल्ली. जर ही जागा शिवसेनेने अग्रहाने घेतली असती तर आज त्यांचे तीन सिट असते. मात्र, नको तेथे त्यांचा तावदान फार होता. प्रभाग 16 मध्ये भाजपने 147 मतांमध्येच विजय घेतला. कारण, मतांच्या विभाजनाने राष्ट्रवादीला 92 आणि काँग्रेसला 142 असे एकुण 240 मते मिळाली असती. मात्र, यांच्यातील द्वेष यांना पराभवाकडे घेऊन गेला. तर प्रभाग 13 मध्ये भापला 268 मते होती. तर राष्ट्रवादी 216 आणि काँग्रेस 52 दोघांची बेरीज केली तर अगदी तंतोतंत म्हणजे 268 इतकी होते. त्यामुळे, एकत्र असणे किती महत्वाचे होते. हे नाना पटोले, ना. थोरात यांना स्थानिक नेत्यांनी सांगणे फार महत्वाचे होते. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांवर नाराजी व्यक्त करुन त्यांना पाया पडायला लावण्याच्या प्रयत्नात यांचीच पायधुळ उडाली.
एकंदर, काँग्रेसमुळे राष्ट्रवादीच्या 3, 11, 12, 13 अशा जागा गेल्या तर राष्ट्रवादी-शिवसेनेमुळे काँग्रेसच्या 4, 2, 14, 16 या जागा गेल्या. आता पराभव झाला हे नक्की.! मात्र, तरी देखील भाजपला रोखण्यासाठी शंभर टक्के भाजपनेच पाऊले ऊचलणे गरजेचे होते. कारण, राज्यात आणि देशात भाजप रोखणे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीला गरजेचे नाही. तितके काँग्रेसला आहे. कारण, पवार साहेब कधी कमळावर बसतील याचा काही नियम नाही आणि शिवसेना आत्ता कोठे सत्तेसाठी भाजपपासून बाजुला झाली आहे. ते कधीही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे, काँग्रेसला देशात स्थान मिळविण्यासाठी हा आटापिटा करणे अपेक्षित आहे. मात्र, नाना पटोले यांनी नेमकी कशाच्या जोरावर स्वत:ला आजमावू पाहिले आहे. हे त्यांना एकदा श्रेष्टींनी विचारले पाहिजे. कारण, काँग्रेसला या निवडणुकांमध्ये 6 ठिकाणी तोटा खावा लागला आहे. तर, राष्ट्रवादीची 2017 साली 13 जागेंवर सत्ता होती ती आता 2022 मध्ये 26 जागेंवर सत्ता आली आहे. भाजपची 2017 मध्ये 31 जागेंवर सत्ता होती ती 2022 मध्ये 24 जागेंवर आली आहे. म्हणजे, भाजपला सात जागेंचा तोटा आणि राष्ट्रवादीला 13 जागेंवर फायदा झाला आहे. तर शिवसेना 11 जागेंहून 14 जागेंवर सत्तेत बसली आहे. एकंदर काँग्रेसच्या यशाचा आलेख घटता दिसून येत आहे. त्यामुळे, येणार्या काळात तरी यांनी राजकीय शहाणपण दाखविले पाहिजे. इतकीच मापक अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.
तर, अकोल्यात पुरोगामी म्हणून समजल्या जाणार्या काँग्रेसकडून भाजपला फायदा व्हावा. हे फार शंकास्पद आहे. जर असे झाले तर 2014 मध्ये वंचित आघाडीची नकळत भाजपला मदत झाली आणि त्यानंतर 2019 मध्ये जनतेने त्यांना घडा शिकविला. तसेच जनता काँग्रेसला देखील धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. कारण, पुरोगामित्वाचे चेहरे देखील कालच्या निवडणुकीत अधोगामीत्वाला मांडीवर घेऊन त्यांना अंजारताना-गोंजारताना दिसून आले. त्यामुळे, काँग्रेस आणि रिपाईच्या नेत्यांवर तळागाळातील जनतेने चिखलफेक केल्याचे दिसून आले. तर, हा विजय भाजपचा नसून केवळ पिचड कुटूंबाचा आहे आणि हे नगरसेवक देखील 2019 प्रमाणे जसे राष्ट्रवादीतून भाजपचे दिसले. तसे येणार्या काही दिवसात अन्य पक्षाचे दिसतील अशी देखील शंका अनेकांनी उपस्थित केली. आता फक्त आगे आगे देखो.! होता हैं क्या.!
क्रमश: भाग 2