आज गायकरांचे धोतर वेशीवर टांगले, उद्या पिचडांचा लेंघा-कुर्ता वेशीवर दिसेल.! बहुजनांतील हे दुशासन कोण? नेते आक्रमक.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्याच्या राजकारणाला आता पुरोगामीत्वाची किनार राहीली नाही. कारण, येथे शब्दशस्त्रांचे युद्ध आणि अगदी वस्त्रहरण करण्याइतप राजकारणाची पातळी खालावली गेली आहे. परंतु, भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करणार्या दुशासनाचे काय हाल झाले. हे महाभारताने दाखवून दिले आहे. अन विशेष म्हणजे, स्वत: संस्कार आणि स्वच्छ राजकारण म्हणार्या पिचडांच्या समोर धोतर नाचविले गेले. मात्र त्यांनी ब्र शब्द काढला नाही. त्यामुळे, भर सभेत भीष्मपितामाह, द्रोणाचार्या आणि विदुर यांचे पुढे काय हाल झाले, हे देखील इतिहासाने अधोरेखित करुन ठेवले आहे. त्यामुळे, एक यशाने भारावून जाऊन ज्या पिचडांच्या समोर बहुजन नेत्याचे धोतर वेशिवर टांगले गेले. तो बहुजन समाज खरोखर जागा आहे का? त्या समाजाला या घटनेचे काहीच वाटले नाही का? भाजपला विकास करायला मते दिली की, तुमच्या नेत्यांना भर चौकात नागड करायला मते दिली? हा इतका उन्माद की सामाजाच्या ज्येष्ठ नेत्याच्या धोतरावर तुम्ही जल्लोष साजरा करता.! याचे आत्मचिंतन तालुक्यातील जनतेने केले पाहिजे. अर्थात हा राजकीय विजय भाजपचा नक्की असू शकतो. मात्र, तुमच्या समाजाची आणि संस्कृतीची लक्तरं तुम्हीच वेशिवर टांगू पाहत आहात, हे विसरू नका.! जे नेते काल पुरोगामी आणि सुसंस्कृत म्हणून मिरवत होते. त्यांच्या यशाच्या विजय हा बहुजन नेत्यांना नागवून साजरा केला जात असेल तर खरच येथील बहुजन समाज नेमकी कोणत्या आईचे दुध पिलाय.! असा प्रश्न बुजूर्ग विचारु लागले आहेत. निवडणुकांमध्ये जय-पराजय नक्की असतो. मात्र, तो अशा पद्धतीने साजरा केला जातो. हे आता पिचडांच्या नव्याने उदयास येणार्या राजकीय संस्कृतीकडून शिकला पाहिजे आणि येथील बहुजनांच्या मुलांनी देखील आपणच आपली मानसं कशी संपविली पाहिजे. हे देखील त्यांच्याकडून शिकले पाहिजे. कारण, आता हा तालुका आदिवाशी, पुरोगामी आणि बहुजनांचा म्हणून नव्हे.! अधोगामी म्हणून पुढे आणायचे काम सुरू आहे. अशा प्रकारचे परखड मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
खरंतर 1972 पासून पिचडांनी राजकारणात स्थिरता प्राप्त केली. ज्या यशवंतराव भांगरे यांनी त्यांना पाठबळ दिले. त्यांनाच मागे करुन यांनी 1977 साली त्यांच्या विरोधात विधानसभा लढविली. पात्र, पिचडांना पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हा आदरणीय यशवंतराव भांगरे यांनी पिचडांच्या कुर्त्याच्या मिरवणुका काढल्या नाहीत. कारण, तेव्हा भांगरे यांचे फार संयमी राजकारण होते. त्यानंतर सन 2019 साली डॉ. किरण लहामटे हे निवडून आले. तेव्हा त्यांची राजुरमधून मिरवणुक काढण्यात आली होती. त्यावेळी, कार्यकर्ते प्रचंड उत्साही होते. पिचड साहेबांच्या बंगल्यासमोर गाणे वाजविण्याचा हट्ट धरला गेला. मात्र, तेव्हा स्वत: आ. लहामटे म्हणाले होते की, डिजे बंद करा आणि पुढे जाऊन वाजवा. तेव्हा त्यांनी देखील विजयाचा अतिरेख केला नाही. मग जेव्हा 40 वर्षे जनता तुमच्या सोबत होती. (1995 वगळता) त्यात गायकर पाटील देखील सोबत होते. तेव्हा कधी धोतराची मिरवणुक विरोधकांनी काढली नाही. मग, आज कार्यकर्त्यांना भडकवून देणे, बहुजनांच्या नेत्याची धोतरं हवेत भिरकाविणे हा व्यक्तीदोष भाजपमध्ये गेल्यानंतर या कुटुंबाला कसा भिडला? याचे उत्तर आम्हला मिळत नाही. इतके काय.! दुर्दैवाने हे सगळं दुष्कृत्य आमचीच पोरं करीत असल्याने प्रचंड वेदना होत असल्याचे मत जुण्या जाणत्यांनी व्यक्त केले आहे.
हे राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे याचे आत्मचिंतन केले तर लक्षात येते की, गेली 40 वर्षे निवडणुकांमध्ये कारखान्याची दंगल वगळता सामाजिक संस्कृतीवर आणिबाणी आली नाही. मात्र, जसे येथे 2019 साली प्रस्तापितांनी भाजप उभी केली. तेव्हापासून कोणी एकमेकांचे बॅनर फाडतय तर कोणी एकमेकांवर कंबरेखाली वार करतय, कोणी कोणच्या वैयक्तीक आयुष्यात डोकावतय तर कधी नव्हे पानसरवाडीसारखे रक्तरंजित दंगे होऊ पाहत आहे. हे प्रकार येथेच थांबले नाही. तर, येथील नेत्यांचे वस्त्र विजयात नाचविले जाऊ लागले आहेत. त्यामुळे, या तालुक्याला आता पुरोगामी तालुका तरी कसे म्हणता येईल. कारण, एकेकाळी कम्युनिष्ट असणारे नेते भाजपचे कमळ घेऊन मिरवत आहे. तर, ज्या काँग्रेसला भाजप विरोधी म्हणून शिक्का आहे. ते भाजपची बी टिम असे आरोप होत आहे. त्यामुळे, तालुक्यात कोणत्या संस्कृतीचा उगम होऊ पाहत आहे. यावर तालुक्यातील नेत्यांनी विचार केला पाहिजे. हे असेच सुरू राहिले तर तालुक्यात फुले-शाहू आंबेडकरांच्या जयंत्या नव्हे.! तर भलत्याच जयंत्यांना गर्दी झाल्याचे पहायला मिळेल अन त्यात देखील धोतरं उधळली जातील.
एकंदर, भाजपला जनतेने कौल दिला यात तिळमात्र शंका नाही. मात्र, धोतराची मिरवणुक काढून जो काही विजय साजरा करण्यात आला. त्यावर बाकी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विजयाचा उन्माद जर असा साजरा करत असेल. तर त्याचे उत्तर येणार्या सर्वच निवडणुकीतून हा बहुजन समाज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या निवडणुकीत हाच बहुजन समाज राष्ट्रवादीला कौल देऊन राजुरच्या लेंघा आणि कुर्त्याची मिरवणुक काढल्याशिवाय राहणार नाही. असे मत बहुजन चेहर्यांनी सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले आहे. एकंतर, बहुजन तरुण आणि बुजूर्ग नेत्यांनी सिताराम पाटील गायकर यांची झालेली अवहेलना याचा निषेध केला असून आज आम्ही बोलत नाही. येणार्या निवडणुकाच याचे उत्तर देईल अशा संतप्त भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
क्रमश: भाग 3