तुम्ही आत्महत्या करु नका, आपण सावकाराचे पैसे हळुहळू फेडू.! पण, तरी 20 हजारापोटी तगाद्यातून त्याची आत्महत्या.! दोन सावकरांना ठोकल्या बेड्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
केवळ 20 हजार रुपयांचे व्याज, दिड लाख भरूनही वारंवार पैश्याला तगादा लावल्याने राजापूर येथील एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी बाथरूमच्या छताला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सोमवार दि.17 जानेवारी 2022 रोजी पहाटे 6:45 वाजण्याच्या सुमारास लक्षात आले आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय 43, रा. राजापूर, ता. संगमनेर, जि.नगर) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. ही आत्महत्या सावकारांच्या कर्जाला कंटाळून केल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे, मयताच्या पत्नीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी सुदाम देविदास दुधे (रा. नेहरूचौक, ता. संगमनेर) बालकीसन हनुमंत खंडेलवाल (रा. देवाचामळा, ता. संगमनेर) यांना शहर पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशा अण्णासाहेब नवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अण्णासाहेब निवृत्ती नवले व त्यांची पत्नी हे राजापूर गावचे आहे. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. अण्णासाहेब नवले हे शहरातील एका कापड दुकानात कामाला होते तर पत्नी विडी कामगार आहे. घरी शेती नसल्याने हे दोघे ही कष्ट करून आपला संसाराचा गाडा चालवत होते. परंतु, मुलांच्या शिक्षणासाठी व घरखर्चासाठी फार काटकसर करावी लागत होती. त्यामुळे, अण्णासाहेब नवले यांनी दोन-तीन वर्षांपूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी व घरखर्चासाठी शहरातील दोन सावकरांकडून 20 हजार रुपये व्याजाने घेतले. घरात काटकसर करून घेतलेल्या पैश्यांची परतफेड करीत होते. पण, 12 जानेवारी रोजी अण्णासाहेब नवले हे नियमित कामावर गेले नाही. त्यामुळे, त्यांच्या पत्नीने कामावर का गेले नाही असे विचारले असता. अण्णासाहेब नवले म्हणाले की, ज्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले आहे ते सावकार मला पैशासाठी धमकी देत आहे व माझ्या जीवाला धोका आहे. म्हणुन मी घरीच राहतो. परंतु, सावकार गावात येत असल्याने या भीतीपोटी अण्णासाहेब नवले हे घरचा परिसर सोडुन लपुन बसले होते. मात्र, सावकार हे मुद्दलपेक्षा आधील रक्कम मागत असल्याने अण्णासाहेब नवले हे खचुन गेले होते.
दरम्यान, त्यांच्या पत्नीने धीर देत हळूहळू पैसे फेडू असे सांगुन अण्णासाहेब नवले यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, अण्णासाहेब नवले हे दोन-तीन दिवस कामावर गेले. मात्र, शनिवार दि.15 जानेवारी पासुन कामावर न जाता ते घरीच थांबले होते. रविवार दि.16 जानेवारी रोजी रात्री जेवण करून अण्णासाहेब नवले झोपले. आज सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे पत्नी झोपेतून उठुन काम करत असताना पती अण्णासाहेब नवले हे कॉटवर पाहिले असता ते तेथे दिसले नाही. म्हणुन त्यांनी बाथरूमचा दरवाजा उघडुन पहिला असता त्यांच्या पतीने बाथरूमच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून पायाखाली खुर्ची व प्लास्टिक बादली घेऊन गळफास घेतल्याचे दिसुन आले.
दरम्यान, यावेळी मयत अण्णासाहेब नवले यांची बॉडी खाली उतरविली असता त्यांच्या खिशात एक छोटी डायरी मिळून आली, त्याच्या पहिल्याच पानावर "3" वर्ष व्याज, 10 टक्के, 20 हजार सावकाराच्या व्याजाने (मरण) 1,50,000 सुदाम दुधे (नेहरुचौक), बालकिसन खंडेलवाल (देवाचामळा) माझ्या मुलांना मिळाले पाहिजे 90 हजार’ असे लिहिलेले होते. त्याशिवाय घेतलेल्या पैशांच्या बदल्यात दिलेल्या पैशांचा हिशोब लिहिलेल्या काही चिठ्ठ्याही त्यांना सापडल्या. त्यानंतर त्यांच्या पत्नी आशा नवले यांनी शहर पोलिसांत येवून वरील दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुदाम दुधे (रा.नेहरु चौक) व बालकिसन (रा.देवाचा मळा) या दोघांना शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करत आहेत.