तीने गुन्हा मागे घ्यायचे दोन लाख मागितल परंतु जेलमधुन येताच त्याने आत्महत्या केली.! हनीट्रॅपचा खोटा गुन्हा नोंदविल्याची सुसाईड नोट.!


सार्वभौम (अकोले) :-

                   पती पत्नीने एकत्र येऊन एका तरुणावर गुन्हा दाखल केल्याने त्यास दोन महिने जेलमध्ये राहवे लागले. तर हा गुन्हा खोटा असून त्यामुळे, त्यास प्रचंड शरीरिक व मानसिक त्रास झाला. तर हा गुन्हा मिटविण्यासाठी फिर्यादी यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली.  ही रक्कम मयत तरुणाच्या घराच्यांसाठी शक्य नव्हती. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड बदनामी झाली आणि नोकरी देखील गेली. त्यामुळे, फिर्यादीकडील व्यक्तींच्या प्रचंड ताणवाखाली येऊन सुदर्शन चंद्रकांत राजगुरू (वय 22, रा. सुगाव बु, ता. अकोले. जि. अ.नगर) याने आज राहत्यात घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर मृत्युपुर्वी त्याने चिठ्ठी लिहुन त्यात खोटे गुन्हे दाखल करणार्‍या दोन व्यक्तींना कठोर शिक्षा करा. असे त्यात म्हटले आहे. हा प्रकार दि. 8 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सुगाव येथे घडला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. मयत मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर फिर्यादीनुसार पोलीस दोन व्यक्तींवर पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुदर्शन राजगुरू या तरुणाने मोठ्या कष्टाने शिकून अ‍ॅटोमाबाईलची पदविका संपादीत केली होती. त्यामुळे, उत्तम गुण आणि प्रामाणिक व प्रांजळ स्वभावामुळे त्याला नाशिक येथील एका चांगल्या कंपनीत काम लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपुर्वी नाशिक येथील आकाशवाणी परिसरात राहणार्‍या एका पाटील कुटुंबाने सुर्यभान याच्यावर एक गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे, त्यास अटक झाली आणि पोलीस कोठडीनंतर त्याला दोन महिने न्यायालयीन कोठडीत रहावे लागले. या गोष्टीचा त्यास प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास झाला होता. तो बाहेर आल्यापासून फार अस्वस्थ आयुष्य जगत होता. कारण, त्याची नोकरी गेली होती, त्याची बदनामी झाली होती. आयुष्याला काळा डाग लागला होता, आपण काहीच केले नाही. तरी देखील आपल्याला कोठडीत रहावे लागले. याचा त्याला प्रचंड मनस्ताप झाला होता. त्यामुळे, हे जगणे नकोच.! अशाच प्रकारचे विचार त्याच्या मानत घोळत होते. मात्र, ज्यांनी कोणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे. इतका त्रागा त्याच्या मनात साचला होता.

दरम्यान, बुधवार दि. 8 नोेव्हेंबर रोजी सकाळपासून तो फार अस्वस्थ होता. नाशिक येथून घरी आल्यामुळे, त्याच्या मनात नोकरी गेल्याचे आणि बदनामी झाल्याचे शल्य कायम होते. त्यामुळे, दुपारी त्याने ठाम भुमिका घेतली आणि स्वत:च्या आयुष्याला पुर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी त्याने एका डायरीच्या पानावर आपले अखेरचे मन हलके केले. त्या चिठ्ठीत तो लिहीतो की, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन मला दोन महिने जेलमध्ये बसावे लागले. या सर्व गोष्टींचा मला फार मानसिक व शारिरीक त्रास झाला. यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना केस मागे घेण्यासाठी विनंती केली. मात्र, त्यांनी गुन्हा मागे घेण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली. परंतु, आमची परिस्थिती हालाकीची असल्याने आम्ही ते देऊ शकलो नाही. तर त्यांची मुलीची बाजु असल्याचा फायदा घेऊन त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला.

चिठ्ठीत पुढे म्हटले आहे की, गुन्हा दाखल झाल्याने मी जेथे काम करीत होतो. त्यांनी मला तेथून काढून टाकले. या सर्व गोष्टींच्या माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनावर फार विपरित परिणाम झाला. इतकेच काय.! तर काहीच न करता समाजाच्या नजरेतून मला उतरून टाकले. समाज्यामध्ये माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलुन टाकला. जे माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत होते. तो दृष्टीकोण वाईट होऊन गेला आहे. फिर्यादीकडच्यांना मला वारंवार धमक्या दिल्या होत्या. तुला सोडणार नाही. तुला गायब करु, जेव्हा मी नाशिकमध्ये राहत होतो. तेव्हा पाटील यांना मला वारंवार मारहाण केली. माझा शारिरीक व मानसिक छळ केला, या सर्व त्रासाला मी प्रचंड वैतागलो होतो. माझी हरॅशमेंन्ट होत होती. आज त्यांच्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे.

तो पुढे म्हणतो की, या पाटील दाम्पत्यामुळेच मी आत्महत्या करीत आहेे. यात माझ्या कुटुंबाचा काहीच दोष नाही. माझी पोलीस खात्याला कळकळीची विनंती आहे. की, या पाटील दाम्पत्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी कारण, समाजात परत कोणी खोटी केस कोणावर टाकणार नाही. या द़ृष्टीने त्यांच्यावर कारवाई करावी हीच विनंती. आपला सुदर्शन राजगुरू...! त्यानंतर त्याने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्यापुर्वी त्याने एक फोन केेला होता. त्यावर तो अगदी धाय मोकलुन रडत होता. तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यांच्या शेजारी वैगरे पाहण्यास सांगितले असता तोवर फार उशिर झाला होता. एक शांत, संयमी तरुण गेल्यानंतर सुगावमधील अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. आता मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची मनस्थिती ठिक नसल्यामुळे तुर्तास कोणताही कारवाई झालेली नाही. मात्र, लवकरच पाटील दाम्पत्य अकोले पोलीस ठाण्यात आपल्याला पहायला मिळेल अशा प्रतिक्रिया सुगावकरांनी दिल्या आहेत.