नगरपंचायतीच्या चार प्रभागात उमेदवार फायनल.! कशी होईल तिरंगी व चौरंगी लढत.! प्रभागातील जातनिहाय मतदान.! कोण आहे किंग मेकर.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                   अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता अधिकच रंगत वाढली आहे. कारण, पुर्वी ज्या 13 प्रभागांची निवडणुक झाली. त्यात कोणालाही स्पष्ट बहुमत होत असल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे, अनेकांच्या नजरा आता प्रभाग क्र. 4, 14, 11 आणि 13 अशा चार प्रभागांकडे लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या या प्रभागांची निवडणुक आज जाहिर झाली असून प्रभाग क्र. 4 आणि 14 येथे खुला पुरूष प्रवर्ग तर 11 आणि 13 मध्ये खुला महिला प्रवर्ग असे प्रशासनाने जाहिर केले आहे. त्यामुळे, येथे पुरुष प्रवर्गासाठी मोठी रस्सीखेच असून अनेक ईच्छुकांनी गुढग्याला बाशिंग बांधले होते. त्यात कोणी थांबून घेतले तर कोणी निर्भिडपणे आपले नशिब आजमविले आहे. त्यामुळे, प्रभाग 4 आणि 14 मध्ये नेमकी अंतीम क्षणी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. आज तो प्रश्न मार्गी लागला असून चार मध्ये चौरगी तर, 14 मध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाग क्र. 11 आणि 13 येथे कोणत्या नेत्याच्या कुटुंबात ही उमेदवारी जाते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कारण, येणार्‍या काळात बहुमताचा आकडा पार करण्यासाठी 17 जागांची कसरत लागणार आहे. भलेही महिला निवडून आली तरी पुरूष प्रधान संस्कृती आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे, 11 व 13 मध्ये देखील तिरंगी लढत होणार आहे.  या चार जागा म्हणजे प्रत्येकाची प्रतिष्ठा आणि सत्ता ठरविणार असल्याचे बोलले जात आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, 21 डिसेंबर रोजी अकोले नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मतदान झाले आहे. त्यापैकी, काही ठिकाणी काही उमेदवार हे शाश्वत असले तरी प्रभाग क्र. 1, 2, 3, 5, 8, 10 आणि 17 येथे अगदी चुरशीची लढत आहे. त्यामुळे, कोणी कितीही काही म्हटले तरी जोवर निकाल हाती येत नाही. तोवर अंदाज बांधणे कठीण आहे. एकंदर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यापैकी कोणत्याही नेत्याला विचारा.! कोणाला बहुमत मिळणार हो.? तर ते आपल्यालाच मिळेल असे छातीठोकपणे सांगतात. त्यामुळे, घोडा आणि मैदान हे फार काही दुर नाही. हे असे असेल तरी शिवसेनाच्या तीनही जागेंवर (प्रभाग क्र. 1, 5, 10 येथे) प्रचंड संघर्षाची परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी दोस्तीत कुस्ती आहे. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत असणार्‍या ठिकाणी नेमकी गुलाल कोणाचा? हे सांगणे कठीण आहे. म्हणजे, कोणी कितीही म्हणत असेल की, आमच्याकडे बहुमत आहे.! मात्र, त्यांच्या अवाजवी आत्मविश्वासावर जाण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून तर येणार्‍या चार प्रभागांना प्रत्येकास ताकद लावावी लागणार आहे.

आता प्रभाग क्रमांक 14 चा विचार केला तर, तेथे एकुण 886 मतदान आहे. त्यात 120 मराठा असून त्यात 95 नाईकवाडी, 92 आदिवासी, 40 ते 45 अनुसुचित जाती, न्हावी 30 तर या प्रभागात 70 मतदान बाहेरुन स्थायिक झाले आहे. मुस्लिम आणि अन्य समाज असे 140 मतदान आहे. यात 300 मतदान हे सुशिक्षित म्हणजे नोकरदार असून 120 मतदार बाहेरगावी नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. तर, 886 पैकी 25 मतदार मयत झाल्याची आकडेवारी प्रथमदर्शनिय समोर आली आहे. म्हणजे, या प्रभागावर एकंदर नाईकवाडी यांचे प्रभुत्व आहे. तर नाना नाईकवाडी, विजय पवार, शरद नवले आणि प्रकाश नाईकवाडी यांची नावे भाजपकडून चर्चेत होती. त्यात शरद नवले यांच्या तिकिटावर शिक्कामुर्तब झाला आहे. तर, आज प्रकाश नाईकवाडी, विजय पवार यांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. राजु नाईकवाडी यांना काँग्रेसने पहिलेच उमेदवारी जाहिर केली होती. ती कायम राहिली आहे. तर, राष्ट्रवादीकडून पांडूरंग डमाळे, योगेश नाईकावाडी, सचिन शिंदे यांच्यासह अन्य काही उमेदवारांची नावे पुढे येत होती. मात्र, शिंदे आणि नाईकवाडी यांनी डमाळे यांच्या उमेदवारीचे सारथ्य करण्याचा निर्णय घेऊन श्रेष्टींना गुलालाचा शब्द दिला आहे. तर, या प्रभागात विशाल वैराट यांचे देखील 40 ते 50 एकगठ्ठा मतदान आहे. ते अपक्ष उमेदवारी करत होते. मात्र, डॉ. लहामटे आणि गायकर पाटील यांनी त्यांना विश्वासात घेतले आणि त्यांना थांबवून ख्रिचन समाजाचा पाठींब तेथे घेतला आहे. कारण, त्यांच्या उमेदवारीने मतांच्या विभाजन होण्यापेक्षा थेट फायदा होणे राष्ट्रवादीसाठी कधीही सोपस्कर होऊ शकते. 

तसेच प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकुण 817 मतदार असून त्यात 128 मुस्लिम, 94 ब्राम्हण, 68 न्हावी, 55 परिट, कुंभार 45, मारवाडी 40, तेली 35, सोनार 32, नावाडी 60 तर अन्य 150 पेक्षा जास्त मतदान आहे. यात महत्वाचे म्हणजे 817 पैकी 550 मतदान हे ओबीसी समाजाचे असल्याचे लक्षात येते. त्यामुळे, एकतर ओबीसी आरक्षण रद्द आणि त्यात ओबीसी बहुल असून देखील अन्य उमेदार हे म्हणजे त्या समाजावर अन्याय ठरेल. त्यामुळे, प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रत्येक पक्ष निर्विवाद ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न करेल असे विश्लेषकांना वाटते आहे. या प्रभागात सोशल मीडियावर चेतनशेठ नाईकवाडी यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, त्यांनी उमेदवारी नाकारली, त्यामुळे, हितेश कुंभार यांच्या तिकीटाचा मार्ग मोकळा होईल असे वाटले होते. मात्र, "गड आला पण सिंग गेला" अशी स्थिती त्यांच्याबाबत झाली आहे. कारण, प्रभाग 4 मध्ये हितेश कुंभार यांचे नाव भाजपकडून समोर आले आणि त्याच ठिकाणी योगेश जोशी यांनी बंडखोरी केली. त्यांना भाजपने डावलल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे, कुंभार यांची डोकेदुखी झाली असून त्याचा फार मोठा फटका बसू शकतो. किंवा मतांच्या विभाजनात जोशी जड भरु शकतात. तर, याच प्रभागातून राष्ट्रवादीकडून भोईर गुरूजी  इच्छूक होते. मात्र ही जागा शिवसेनेला सोडल्याने त्यांची नाराजी झाली होती. तरी देखील त्यांनी मोठ्या मनाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि तेथे श्रीकांत मैड (जग्गू) यांना पाठींबा दिला आहे. आज प्रभाग  4 मध्ये भाषण करताना गुरुजी यांचे मन गहिवरुन आले. त्यांनी डॉ. लहामटे व सिताराम पा. गायकर यांच्या तथा पक्षाच्या विनंतीला मान देऊन मैड यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काँगेसकडून फैजान तांबोळी यांची उमेदवारी निच्छित केली आहे. त्यामुळे, येथे चौरंगी लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकुण 635 मतदार असून येथे महिलांसाठी खुला प्रवर्ग राखीव निघाला आहे. हा प्रभाग पुर्णत: मागासवर्गीय मतदारांवर अवलंबून आहे. येथे 250 मातंग समाज, 65 बेलदार, 25 सुतार, 30 वडार, 40 बौद्ध, 25 न्हावी, 30 मराठा, 55 मुस्लिम आणि  अन्य 100 मतदार आहेत. येथे भाजपकडून मोहिते, गायकवाड, साळवे, खरात यांची नावे चर्चेत होती. मात्र, तेथे किर्ती गायकवाड, भिमाबाई खरात, सरला मोहिते यांनी माघार घेतली असून तेथे नवनाथ मोहिते यांच्या कुटुंबात जनाबाई मोहिते यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीकडून साळवे, गायकवाड आणि लोखंडे अशी नावे चर्चेत होते. मात्र, तेथे मा. नगरसेवक सुरेश लोखंडे यांची पत्नी आरती लोखंडे यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ देखील धुमधडाक्यात फुटला असून त्या शक्तीप्रदर्शनावर आमदार फार खूश असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. तर काँग्रेसकडून अंजली कर्णिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामुर्तब झाले आहे. या प्रभागात निवडून येणे म्हणजे फार जिकरीचे मानले जाते. कारण, येथे "अर्थपुर्ण" नियोजन केल्याशिवाय कोणाला विजयी होता येत नाही. त्यात मतदारांची शाश्वती देखील मानली जात नाही. त्यामुळे, येथे उमेदवारी देताना अनेकांची दमछाक होताना पहायला मिळाली आहे. तर, या प्रभाग 13 मध्ये प्रकाश साळवे यांनी कोठूनही उमेदवारी केली नाही. त्यामुळे, मातंग समाज बांधवांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

तर, प्रभाग क्र. 11 मध्ये एकुण 802 मतदार आहेत. त्यात 90 धुमाळ, 80 शेटे, 30 मुस्लिम, 20 बौद्ध, 150 छोटे-मोठे व्यापारी, 20 मैड, 20 आदिवासी, 5 चासकर, 20 घोलप, 8 कराळे, 10 ते 15 कदम, 10 आरोटे, 10 आवारी असे अवसरे, कांडेकर, केवारी, गायकवाड, घनकुटे, राजस्थानी, टपले, डुंबरे, डोरे, पवार, मंडलिक, तांबोळी यांची जेमतेम मते आहेत. त्यामुळे, येथे धुमाळ आणि शेटे यांचे वर्चस्व असून दोन्ही उमेदवार तोलामोलाचेच द्यावे लागणार आहेत. येथे भाजपकडून बबलु धुमाळ यांची पत्नी वैष्णवी धुमाळ यांची उमेदवारी आहे. तर धुमाळ यांना तेथे माननारा वर्ग फार मोठा आहे. त्यांनी मागिल निवडणुकीत अ‍ॅड. के.डि. धुमाळ यांना शह दिला होता. तेव्हा तर भाजप इतकी प्रबळ देखील नव्हती. तरी केवळी ६० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे, आता त्यांना विजय सोपा झाला आहे. मात्र, आज वकील साहेबांना गायकर साहेबांनी फार मोठी मदत केली होती. ते राष्ट्रवादीकडून असल्याने धुमाळांच्या कुटुंबात त्यांना मानाचे स्थान आहे. कोणी एक व्यक्ती त्यांना रोषाने संबोधित असेल तर अनेक धुमाळ त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. हे देखील नमुद व मान्य करावे लागेल. गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीकडून नंदाताई धुमाळ यांची उमेदवारी मानली जात होती. कारण, त्या १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला तेव्हा  त्या महिला तालुकाध्यक्ष होत्या. तर त्यानंतर अकोले ग्रामपंचायतीवर देखील सदस्य राहिल्या आहेत. मात्र, त्यानंतर अचानक वंदना भागवत शेटे यांचे नाव पुढे आले. भागवत शेटे यांचे सामाजिक काम चांगले असून ते शहराध्यक्ष आहेत. तर त्यांच्या कुटुंबाला फार मोठा सामाजिक व राजकीय वारसा आहे. कारण, याच घरातून रभाजी शेटे आणि त्यांचे सुपुत्र रावसाहेब शेटे यांनी अकोेले नगरपंचायतीचे सरपंचपद भुषविले आहे. त्यामुळे, वंदना शेटे यांच्या कुटूंबाला माननारा वर्ग फार मोठा आहे. तर, काँग्रेसकडून मधुभाऊ नवले यांनी वनिताताई शेटे यांची उमेदवारी दिली आहे. वनिताताई शेटे ह्या लक्ष्मणराव शिंदे यांच्या कन्या आहेत. शिंदे यांनी आणिबाणीच्या काळात कारावास पत्करला होता. त्यामुळे, त्यांच्या कुटुंबाला सामाजिक, राजकीय व देशभक्तीचा वारसा आहे. एकंदर, या प्रभागात एकदम तुल्यबळ उमेदवार असल्याचे पहायला मिळते आहे. त्यामुळे, येथील लढत ही अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशिची होणार असल्याचे पहायला मिळते आहे.