ठरलं तर मग.! अकोले नगरपंचायतीला महाविकास आघाडी एकत्र.! त्या चुका आठवल्या का-काँग्रेसची ताणाताणी.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
आता अकोले तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ-जवळ सुरूच झाल्या आहेत. त्यात नगरपंचायतीचे मतदान 21 तारखेला तर 22 ला निकाल आहे. त्यामुळे, आज राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाई यांनी मोर्चेबांधनी सुरू केली आहे. आज भाजपच्या ताब्यात नगरपंचायत असली तरी ते पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यामुळे, उद्या देखील नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची जबाबदारी डॉ. किरण लहामटे व गायकर साहेब यांच्यावर असणार आहे. मात्र, पिचड साहेबांची पुर्वी तालुक्यावर पकड होती. त्याचेच प्रतिबिंब शहरात पहायला मिळते. त्यामुळे, जसे त्यांना विधानसभेत नामोहरम केले, तसे नगरपंचायतीत देखील केले तर हा संदेश राज्यभर जाऊन डॉ. लहामटे हे राज्यात चर्चेचा विषय ठरतील. मात्र, त्यासाठी शहरावर पकड असणारे गायकर हे त्यांना वजिर म्हणून पुढे करावे लागणार आहे. तर यापलिकडे शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या घटकांना देखील सोबत घेऊन मित्रपक्षांचाही विचार करावा लागणार आहे. आता इतकी राजकीय प्रगल्भता तरी आमदारांमध्ये आली आहे. कारण, परिवर्तनाच्या नावाखाली व्यक्तीद्वेषाने पछाडलेले कोण.! आणि त्यांच्या सोबत राहुन त्यांची गरळ ओकणारे कोण.! इतके समजून घेत संयमाचे राजकारण त्यांच्या अंगी उतरले आहे. त्यामुळे, ज्यांनी पवार कुटुंबाला धोका दिला, त्यांना एकटे पाडण्याचे मनसुबे आमदार नक्कीच पार पाडतील. यात तिळमात्र शंका नाही.
अकोले शहराची ग्रामपंचायत बरखास्त होऊन त्याचे पुनर्गठण नगरपंचायतीत झाले. तेव्हा कोठेतरी वाटले होते. की, आता तरी शहराचा चेहरा बदलेल. रस्ते होतील, मुबलक पाणी मिळेल, शहर प्रकाशमय होईल, सांडपाण्याचे नियोजन होईल, पावसाचे पाणी लोकांच्या घरात जाणार नाही, गरिबांना निवारा मिळेल, वाहतुकीची समस्या मार्गी लागेल, बाजारपेठ सुधरेल, बस स्थानकाचा चेहरा बदलेल, अतिक्रमण निघेल, विजेचा प्रश्न मिटेल पण झालं काय? तोच गुल आणि तीच काडी. म्हणून तर डॉ. किरण लहामटे यांनी आता शहर विकासासाठी 12 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. म्हणजे, गेल्या काही आमदारकीत जितका निधी घाटघर ते कळस आणि टाकेद ते ब्राम्हणवाडा या संपुर्ण तालुक्याच्या 1,505.08 किमी क्षेत्रफळाला आला नाही. त्याच्या कित्तेक पटीने निधी फक्त शहरासाठी आणला आहे. म्हणजे, या आमदारांनी राज्यात श्रेष्ठींकडे स्वत:साठी काहीच मागितले नाही. त्यांनी गेल्या काही वर्षाच्या विकासाचा सर्व बॅकलॉक यांना काढायचा आहे.
आता, शहरात 17 प्रभाग असून दोन स्विकृत नगरसेवक असे 19 नगरसेवक आहेत. काल काय परिस्थिती होती याची गोळाबेरीज करण्यात काहीच अर्थ नाही. कारण, त्यांच्या राज्याकडे संपुर्ण सम्राज्य असताना देखील त्यांनी स्वत:ला दुसर्या राज्यात विलिन करुन घेतले. म्हणून तर त्यांचे सर्व सैन्य आजही सैरभैर आहे. त्यामुळे, जुन्या रेषा ओढून मैदान आखण्यात काहीच अर्थ नाही. आता, नवे गडी नवे राज्य.! आता तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळे, पहिला पुढाकार त्यांनाच असणार आहे. मात्र, तरी देखील त्यांना महाविकास आघाडीला सोबत घेण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. विशेषत: शिवसेना फार काही ओढाताण करणार नाही. पण, काँग्रेस स्वबळावर देखील दंड थोपटू शकते. इतकी, ताकद मधुभाऊ नवले, तथा काँग्रेसमध्ये आहे. कारण, भाऊंचे नातेगोते, संस्था, व्यक्तीगत त्यांना माननारी मंडळी आणि महात्वाचे म्हणजे पक्षाचे संघटन असे गणित मांडले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे, त्यांच्या मतांचे विभाजन हे राष्ट्रवादी व शिवसेनेला कधीच परवडणारे नाही. म्हणून काँग्रेस सोबत चर्चा करुन महाविकास आघाडीचा रथ पुर्ण केल्यास नगरपंचायत ओढणे फार काही अवघड जाणार नाही.
एकंदर तालुक्यात राष्ट्रवादीचा बोलबाला कायम ठेवणे आणि सन 2024 साली येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण पात्र कसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी डॉ. लहामटे यांची हिच कसाटी असणार आहे. जो पक्षातील खरा विरोधक होता. त्यास आमदारांनी अगदी खड्यासारखा बाजुला काढला आहे. त्यामुळे, त्यांचे वाच्चाळ तोंड आणि पक्षविरोधी भुमिका यामुळे ते बदनाम होत जातील, पवार कुटूंबाला त्याचे योग्य रिपोर्टींग होईल. परिणामी पुन्हा डॉ. लहामटे यांचा नारा तालुक्याच्या कानी पडेल. यासाठी डॉक्टरांनी फार शांत चिताने हे ऑपरेशन पार पाडावे लागणार आहे. विशेष म्हणजे, कोणाला जवळ करायचे आणि कोणत्या कानफुक्यांना दुर लोटायचे हे जरी ओळखून काम केले तरी पुरे.! आता ती वेळ आली असून शिवसेनेची मन धरणी करण्यास त्यांना काल यश आले आहे. तसेच काँग्रेसला देखील ते आपल्या सोबत घेण्यात यशस्वी होतील. यात तिळमात्र शंका नाही. फक्त आता 17 जागांची वाटाघाटी कशी.? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
ती एक चुक आठवते का?
ती तारीख 9 डिसेंबर 2019 होती. भाजप सोडून मधुभाऊ नवले हे राष्ट्रवादीत दाखल होणार होते. त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी विरोध सुरू केला. आम्हाला भाजपची विचारसारणी, तत्व आणि दिल्लीचे नेतृत्व देखील मान्य नाही. त्यामुळे, तेथे घुसमट होत असल्याचे त्यांनी अनेकदा बोलुन दाखविले. मात्र, राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा मुरका कायम ठेवला. त्यामुळे, आपल्यामुळे जर अनेकांना त्रास होत असेल, त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेला किंवा पदाला ठेच पोहचत असल्याचे त्यांना वाटत असेल तर आम्ही काँग्रेसमध्ये गेलेले कधीही चांगलेच राहिल. त्यानंतर त्यांनी 18 नोव्हेंबर 2020 रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दरम्यान, अनेकांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली. मात्र, नंतर ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. एकंदर, आज ते राष्ट्रवादीत असते तर नगरपंचायत आणि कारखान्यात तिसरे कोणी कितीही आदळ आपट केली असती तरी त्यांना यश आले नसते. त्या एका चुकीचा तोटा आज तोच असेल जितक्या जागा काँग्रेसला जातील. त्यामुळे, राजकारण करताना फार पायाजवळ पाहुन जमत नाही. याबाबत रोखठोक सार्वभौमने लेख लिहीला होता. त्याची प्रचिती आज आली आहे.
आमदार साहेब.! विचार करा.!
परिवर्तनाच्या नावाखाली तालुक्यात एक शिविगाळ करणारे व्यासपीठ निर्माण झाले आहे. त्यांच्या व्यासपीठावर बसून जनतेने तुम्हाला देखील नावे ठेवली असती. कारण, अशी संस्कृती राष्ट्रवादीची मुळीच नाही. परंतु, तालुक्याचे परिवर्तन करताना किमान जनता सोबत असावी लागते. जाहिराती देऊन आणि कोट्यावधींचा टर्नओव्हर असणे म्हणजे काही जनाधार नव्हे. ज्यांनी परिवर्तनाचा विषय काढला. त्यांच्या गावात त्यांना ग्रामपंचायत ताब्यात घेता आली का? आज शहरात नगरपंचायत ताब्यात घ्यायची आहे तर यांचे शहरात किती संघटन आहे? यांना माननारा वर्ग किती, यांच्या शिविगाळ्यांना दाद देणारा वर्ग किती? शहरासाठी यांचे योगदान काय? याची उत्तरे शोधून दाखवा आणि बक्षिस मिळवा अशी फुकट जाहिरात टाकली तरी कोणी उत्तर देणार नाही. त्यामुळे, तुम्ही गायकर पाटलांच्या पाठीशी खंबिर उभे राहिला. त्यामुळे, उद्या नगरपंचायत आणि कारखाना देखील तुमच्या ताब्यात देतील. हे आजच लिहुन घ्या.! अशा प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.