ना.थोरातांच्या सुखद धक्क्याने मधुभाऊ गहिवरले.! अमित भांगरेंना गायकरांनी टाळले.! व्यासपीठावर जुगलबंदी.!

 


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोले तालुक्यातील विचारांचे विद्यापीठ असणार्‍या मधुभाऊ नवले यांना ना. बाळासाहेब थोरात यांनी अचानक सुखद धक्का दिला. जिल्हा बँकेच्या दोन स्विकृत संचालकांपैकी एका जागेवर मधुभाऊ यांना संधी दिली. त्यामुळे, तालुक्यात एकाच जल्लोष झाला. आता, अकोल्यात काँग्रेसला बळ देण्याची ही व्युव्हरचना म्हणजे फार मोठी दुरदृष्टी आहे. कारण, आ. सुधिर तांबे यांनी तालुक्यात लक्ष घालणे, भाऊंना अचाकन उभारी देणे म्हणजे 2024 ची ही तयारी आहे. यावर राजकीय विश्लेषक ठाम आहेत. कारण, येणार्‍या काळात राज्यातून प्रत्येकजण स्वबळाचा नारा देणार आहेत. तर, शेतकरी आंदोलन व अन्य मुद्दांहुन केंद्रात परिवर्तन होण्याची देखील हिच वेळ आहे. तर राज्यात देखील स्वबळावर लढून सत्ता स्थापनेला संधी असणार आहे. त्यामुळे, काँग्रेस राज्यभर अशा पद्धतीने पाय रोवण्याचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, अकोल्यातील १९९९ पुर्वीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा कॉंग्रेसला घ्यायचा तर नाही ना.! असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर खऱोखर असे काही असेल तर येणाऱ्या काळात गायकर पाटील आणि मधुभाऊ यांच्यात राजकीय द्वंद्व पहायला मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. अर्थात उद्या काहीही होवोत, पण आज मात्र नामदार साहेबांचा सुखद धक्क्याने मधुभाऊ याचे मन गहिवरुन आल्याचे पहायला मिळाले. तर त्यांच्या एका चाहत्या व्यक्तीने त्यांना कडकडून मिठी मारली आणि ते धाय मोकलुन रडू लागले. हे चित्र पाहून अनेकांचे मन हेलावून गेले.

         मधुभाऊ नवले हे मुळत: शेतकरी व कष्टकरी पुत्र आहे. कांद्याच्या पाट्या डोक्यावर घेऊन त्यांनी बाजारात त्यांची विक्री केली आहे. जाणत्या वयात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा विचार अंगिकारला आणि प्रचारांच्या फेऱ्यांमध्ये माईक हाती घेऊन त्यांच्यातील कॉम्रेड स्वत:ला साद घालत होता. बोलबोल करता या चळवळीचा वेलु इतका विस्तारला की, सभांना त्यांच्याशिवाय शोभाच नव्हती. पुढे कम्युनिस्ट विचार अकोले तालुक्याच्या तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. तर, शेतकरी, कष्टकरी, विडी कमगार यांना न्याय देता देता त्यांनी राजकीय धडे गिरविले. त्यांच्यातील उमदा तरुण इतका प्रगल्भ झाला होता की, त्यांनी पुढे राजकारणात स्वत:चे अस्तित्व उभे केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध सोसायट्या, कारखाना, मार्केट कमिटी, ग्रामपंचायत या आणि अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांच्या यशाचा आलेख कधी कमी झाला नाही. तर, तो वाढतच गेला.  जेव्हा राजकारण व समाजकारणात त्यांचे मन जास्त रमले नाही. त्याच वेळी त्यांना तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीची खंत वाटली आणि त्यातून अभिनव शिक्षण संस्थेने जन्म घेतला. तर बुवासाहेब नवले पतसंस्था, मल्टीस्टेट अशा अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. कधी संगमनेर तर कधी अकोले अशा विविध ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधित्व केेले. या व्यतिरिक्त सहकारात त्यांच्यासारखा बाप माणूस नाही. असे म्हणण्याची चाल त्यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात लागू केली. अशी त्यांची थोडक्यात ओळख सांगता येईल.

            आता राजकीय दृष्टीकोणातून पाहिले तर, कम्युनिस्ट ते अपघाती भाजप प्रवेश आणि तेथे झालेली दमछाक व पुन्हा कॉंग्रेस या प्रवासात त्यांनी राजकीय तत्वांना कधी तसूभरही हालू दिले नाही. तालुक्यात राजकीय व सामाजिक चळवळीचा वारसा कसा जोपासला जावा याचे उत्तम उदा. म्हणजे भाऊ आहेत. त्यांनी अनेक सभा गाजविल्या, पराकोटीचा विरोध केला, प्रशासनावर पकड ठेवली, राज्याला नव्हे.! केंद्राला धारेवर धरले. पण, राजकीय व्यासपीठाची नैतिकता जोपासली. कधी टिका टिपण्णी करताना जीभेचा लगाम सोडला नाही. म्हणून तर आज जे काही गलिच्छ राजकारण सुरु आहे. शब्दांच्या लाखोल्या आणि सत्तेसाठी वाट्टेल ते ही जी भुमिका आहे. त्याबाबत भाऊंनी फार खंत व्यक्त केली. कारण, उभी हयात त्यांनी चळवळ, संघर्ष आणि राजकारण केले. पण, कधी कौटिल्यनिती तर कधी गणिमी कावे वापरले. पण, परिवर्तनाचे व्यासपीठ उभे करुन कोणाची निंदा-नालस्ती केली नाही ना कधी व्यक्तीगत आयुष्यात कोणाच्या डोकावून पाहिले. आजची परिस्थिती पाहून त्यांना प्रचंड वाईट वाटते आहे. म्हणून त्यांना तालुक्यात पुरोगामी, गांधिवादी व आंबेडकरवादी विचारसारखी पुन्हा उभी करायची आहे. त्यामुळे, येणाऱ्या निवडणुका पाहून ज्यांनी व्यासपीठ उभे केेले. त्यांचे मनसुबे धुळीस मिळवायचे आहे. त्यास सज्ज होण्यासाठी ना. थोरात साहेबांनी त्यांना बळ दिले आहे. कारण, संगमनेरचा छोटा भाऊ अकोले तालुका आहे. त्या तालुक्याच्या संस्कृतीला बाधा ठरेल अशा काही प्रवृत्ती उभ्या राहु लागल्या असून त्यांना सरळ करण्यासाठी नामदारांनी एक भाऊ येथे उभा केला आहे. एकंदर आशय आणि विषय लक्षात घेता. नामदार साहेबांनी जी काही जबाबदारी भाऊंना दिली आहे. त्यासाठी अर्थातच ते पात्र आहेत. येणार्या काळात अकोल्यात कॉंग्रेस आपले पाय घट्ट रोवेल आणि पठारभाग व भाऊंची ताकद व योग्य उमेदवार याच्या जोरावर उद्याची व्युव्हरचना नामदारांनी डोळ्यासमोर ठेवली आहे. असे म्हणतात की, पवार साहेबांनी दगडावर हात ठेवला की त्याला देवपण येतं. तसेच ना. थोरात साहेबांचे आहे. त्यांनी अनेकांना देवपण दिले आहे. येणाऱ्या काळात मधुभाऊंना असाच अचानक फोन येवो आणि विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लाभो. हिच तालुक्याच्या जनतेची अपेक्षा आहे. ती साहेब नक्कीच पुर्ण करतील.

गायकर साहेब अमितला टाळले.!

जेव्हा जिल्हा बँकेचे मा. चेअरमन सिताराम पाटील गायकर हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी एक उल्लेख केला की, मधुभाऊ नवले हे माझ्यासोबत जिल्हा बँकेत यावेत हे माझे एक मोठे स्वप्न होते. आता आम्ही दोघे मिळून अगस्ति सहकारी साखर कारखाना, सहकारी संस्था यांना मदत करण्याचे धोरण आम्ही दोघे घेऊ, निकोप संस्था उभ्या करण्याचे काम आम्ही दोघे करु असे वारंवार दोघे हा शब्दप्रयोग करुन त्यांनी अमित भांगरे यांना टाळल्याचे पहायला मिळाले. अर्थात एकीकडे अमित यांनी आम्ही तिघे एकत्र काम करुन म्हणाले. मात्र, गायकर साहेबांच्या विरोधात व्यासपीठ उभे करायचे, त्यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर टिका करायची, पिताश्रींनी तोंडसुख घ्यायचे, विरोधकांना पाठबळ द्यायचे. मग, गायकर पाटील तरी यांना का सोबत घेतील? उलट अमित यांना राष्ट्रवादीच्या कृपेने अल्पवयात चांगली संधी मिळाली होती. त्याचा फायदा घेत अनुभवी आणि मात्तबर राजकारणी, बहुजन नेते यांच्याकडून राजकीय डावपेच शिकून आमदार कसे होता येईल असा प्रश्न करायला हवा होता. मात्र, जिल्ह्यापर्यंत पोहचलेला नेता इतका हवेत गेला की, विधानसभेत गेला तर काय होईल.! बाप रे.! विचार न केलेलाच बरा. त्यामुळे, राजकीय प्रगल्भता नसणार्‍या व्यक्तीसोबत गायकर पाटील आता मिळते-जुळते घेतील का? आणि त्यांनी जरी घेतले तरी लोक आता त्यांनाच नावे ठेवतील की, इतके गलिच्छ राजकारण करुन देखील शेवटी ते त्यांनाच जाऊन मिळाले. त्यामुळे, आता फक्त, आगे आगे देखो.! होता हैं क्या.! 

अमित तु नवीन आहेस. 

आज तालुक्यात जिल्हा बँकेवर तीन संचालक आहेत. त्यामुळे, आपण तिघांनी मिळून (गायकर पाटील, मधुभाऊ, अमित) तालुक्याचा विकास करा, येथील प्रश्न मार्गी लावा. जिल्हा बँक आणि कारखान्यात कधीही घोटाळे झाले नाहीत. पण, उगच टिकेचा धनी केले जात आहे. वास्तवत: गायकर साहेबांच्या शब्दाला जिल्हा बँकेत वजन आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तेथे होतात. त्यामुळे, त्यांचा फायदा येथील संस्था टिकविण्यासाठी वापरला पाहिजे. अमीत तु नवीन आणि तरुण आहे. तरी देखील मधुभाऊ, गायकर पाटील आणि अमीत यांनी एका विचाराने राहिले पाहिजे. तर ना. बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याला योग्य न्याय दिला असून पक्षाला अकोल्यात ताकद दिली आहे. 

- मिनानाथ पांडे (ज्येष्ठ नेते काँग्रेस)

माझ्या विनंतीला मान देऊन संधी दिली.!

आज अकोले तालुक्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. कारण, येथे पहिल्यांदा तीन संचालक मिळाले आहे. मधुभाऊ हे माझे गुरू आहेत. कारण, मी त्यांच्या संस्थेमध्ये घडलो आहे. 1991 पासून भाऊंनी या तालुक्यात सहकार उभा करण्याचे काम केले आहे. मला आज खरोखर वाटतय की, एकदा कळसमध्ये मी ना. थोरात साहेबांना विनंती केली होती. की, आपण अकोले तालुक्याला छोटा भाऊ म्हणतो. आज आमच्या तालुक्यातील सहकाराची परिस्थिती फार बिकटआहे. त्यामुळे, तुम्ही तालुक्यात लक्ष घाला. साहेबांनी त्या विनंतीला मान देऊन आज तुम्हाला जिल्हा बँकेमध्ये तज्ञ संचालक म्हणून संधी दिली आहे. जेव्हा मी युथ फाऊंडेशनचे काम सुरू केले तेव्हा मी भाऊंना भेटलो होतो. तेव्हा ते म्हणाले की, सहकाराबाबत कोणतेही काम असेल तर मी मदत करेल. तर काम करताना ग्रास रुटपासून काम केले पाहिजे. आज मी तुम्हाला शब्द देतो की, पांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सहकार विकसित करण्यासाठी सर्व एकत्र येऊन काम करु.! (क्लिप ऐकावी)

- अमित भांगरे (जिल्हा बँक संचालक)

"मग त्यांनी असेच म्हणायचे का"?

खरंतर अमित भांगरे यांच्या अल्पयीन राजकारणाची प्रचिती पुन्हा आली. ते म्हणले की, मी एकदा कळस येथे विनंती केली होती की, आमच्या तालुक्यातील सहकाराची परिस्थिती फार बिकटआहे. त्यामुळे, तुम्ही लक्ष घाला. त्यामुळे, साहेबांनी त्या विनंतीला मान देऊन आज तुम्हाला जिल्हा बँकेमध्ये तज्ञ संचालक म्हणून संधी दिली आहे. याचा अर्थ आता जाणकारांनी लावला असता त्याबाबत अनेकांनी मतमतांतरे व्यक्त केली. ज्यांना अर्थ समजला ते अवाक झाले आणि ज्यांना नाही समजला त्यांनी टाळ्या वाजविल्या. मात्र, तालुक्यात परिवर्तनाच्या नावाखाली व्यक्तीद्वेष म्हणून शिविगाळीची भाषणे ऐकल्यानंतर टाळ्या कुटणारे देखील असेल तरी त्याला विरोध करणारे देखील आहेत. हे देखील आज बारकाईने भाषण एकून त्याचा मतीतार्थ लावणारे सुज्ञ लोक देखील पहायला मिळाले. म्हणजे, नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मधुभाऊ नवले यांनी रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून 16 पानांचा विशेष अंक काढला होता. तेव्हा साहेबांनी तो जनत करुन ठेवत स्वत: घेऊन गेले. तेव्हा, सार्वभौमसह मधुभाऊ यांनी किती कष्ट घेतले. हे देखील बोलुन दाखविले होते. तर जिल्हा बँकेच्या निवड प्रक्रियेत अकोल्यात मधुभाऊंना स्थान द्यावे. असे लेख सार्वभौमने लिहिले होते. विशेष म्हणजे तेव्हा साहेबांनी ते वाचले देखील होते. म्हणजे, पत्रकारांनी असे म्हणायचे का? की आमच्यामुळे ते संचालक झाले.! तर मुळीच नाही. पत्रकार लहान असले तरी अभ्यासक आणि तारतम्य बाळगणारे आहे. त्यामुळे, असला बाळबोधपणा कधी केला जात नाही आणि तो इतरांनीही करु नये.! अशा प्रकारची चर्चा सुरु होती.