कार्यकर्त्यांनी हाथोडा उचलण्यापुर्वी कत्तलखान्यांवर जेसीबी फिरला.! मुस्लिम संघ कत्तलाखान्यांच्या विरोधात.! शेतकर्यांना सहआरोपी करा.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेरात कत्तलखान्यांतील जनावरांच्या रक्तपातानंतर हिदुत्ववादी संघटना पेटून उठल्या आणि दहा तास प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर तिव्र आंदोलन करीत पोलीस प्रशासन व नगरपालिकेला शरण येण्यास भाग पाडले. म्हणतात ना.! बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. या म्हणीप्रमाणे, नगरपालिकेच्या अधिकार्यांनी पहिल्या रात्री पाचही कत्तलखाने सिल करुन टाकले होते. तर आज दुसर्या दिवशी ही कत्तलखान्याचे वाडे जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे, आंदोलकांनी फार मोठे समाधान व्यक्त केले आहे. तर, आता अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे हे त्यांनी दिलेल्या शब्दाला जागतात का? पोलीस उपाधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर कारवाई करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, विशेष म्हणजे, या आंदोलनाला चक्क मुस्लिम बांधवांनी देखील समर्थन दिले असून अशा कत्तलखान्यांमुळे संगमनेरचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे, ते बंद झाले पाहिजे. तसेच कसायांसह व्यापारी आणि त्यांना जनावरे विकणार्या शेतकर्यांवर देखील गुन्हा दाखल झाले पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यात संगमनेरातून मांस कसे वितरीत होते. हे आपल्याला खर्या अर्थाने लॉकडाऊनच्या काळात समोर आले. कारण, कधी शेतमालाच्या गाडीत संगमनेरचे मांस मुंबईत पकडले, तर कधी नाशिक जिल्ह्यात. त्यामुळे, जेथे माणसांना बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, तेथे हजारो किलो मांस येथून बाहेर पडत होते. आता ते कोणाच्या आशिर्वादाने हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, कोरोनाच्या आकडेवारीत राज्यात संगमनेरचे नाव अग्रभागी असले तरी मांस निर्यातीत देखील ते कमी चर्चेत आले नाही. त्यामुळे, एकीकडे महसुलमंत्री म्हणून राज्यात संगमनेरची ओळख असताना ती आता पुसून कोरोना आणि मांस यांची आयडेन्टीटी पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे, अगदी काल परवा पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके (श्रीरामपूर) यांनी जी काही कारवाई केली. त्याने या ओळखील अधिकच भर घातली आहे.
आता 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांची इतकी मोठी कारवाई आणि त्यात रक्तरंजित अवस्थेत पडलेली 30 ते 40 जणावरे असा फोटो राज्यभर पसरला आणि हे फोटो कोठे युपी-बिहारचे नसून ते नगर जिल्ह्यातील संगमनेरचे आहे.! असे खोचक विधात त्यावर लिहीले होते. त्यामुळे, ज्याने ते फोटो पाहिले तो एक-एक करुन थेट प्रांताधिकारी कार्यालयासमोर आला आणि बोल-बोल करता मोठा जनसमुह कत्तलखान्यांच्या विरोधात उभा राहिला. अधिकारी पाकीट घेतात, प्रशासनाच्या नावाने घो.! मुर्दाबाद, या प्रशासनाचे करायचे काय.! खाली डोके वर पाय.! या पलिकडे अगदी भयानक पद्धतीने जनसमुहाने आपला रोष व्यक्त केला होता. त्यामुळे, कारवाई करण्यासाठी आजवर टाळाटाळ करणार्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी 10 तास बंड पुकारला होता.
दरम्यान, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी अनेक पळवाटा काढून हे आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीराम गणपुले, अमोल खताळ यांच्यासह अनेक व्यक्तींनी कायद्यावर बोट ठेऊन प्रत्येकवेळी प्रशासनाच्या तडजोड पद्धतीवर पाणी फेरले. अखेर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सर्व पर्याय संपल्यानंतर प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावर मार्ग काढला. त्याच दिवशी हे कत्तलखाने सील करण्यात आले. तर आज मुदतीप्रमाणे त्यावर जेसीबी फिरविण्यात आला आहे. त्यामुळे, नगरपालिकेने त्यांचे काम पुर्ण केले आहे. मात्र, जसे पोलीस अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. तशी संबंधित प्रभागाचे अधिकारी यांना तेथे काय चालते हे माहित नव्हते का? मग त्यांना अभय का देण्यात आला? असा प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे.
आता बजरंगदलाने दिलेल्या निवेदनात मुद्दा क्रमांक चार मध्ये पोलीस उपाधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर देखील निलंबन व बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. केवळ या मागणिसाठी रात्री 10 वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. तेव्हा अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे ह्या संगमनेरात येऊन देखील आंदोलनस्थळी आल्या नाही. मात्र, त्यांनी लेखी दिले की, मुद्दे क्रमांक 1 ते 4 हे पोलीस विभागाशी निगडीत आहेत. त्यावर सात दिवसांच्या आत उचित कारवाई केली जाईल. त्यामुळे, आपण आंदोलन मागे घेण्यात यावे. खरंतर, बीट आंमलदार आणि अन्य व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे, आता सात दिवसात पोलीस उपाधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर काय करावाई होते. की, यात एकावर कारवाई आणि एकाला अभय असे होते की काय? हेच पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आता पोलिसांच्या या कारवाईत काही व्यक्ती मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर पोलीस एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहे. त्यामुळे, अजून पाच दिवसांनी कोण तुपाशी आणि कोण उपाशी.! हेच हेच संगमनेरकरांना पहायचे आहे.
तर, संगमनेर शहरात जी काही जनावरे मारून त्यांचे मांस काढण्यात आले आहेत. त्यातील 80 टक्के जणावरे ही अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील असल्याची खंत अकोल्यातील गोरक्षक यांनी केली आहे. तर, गोमातांची चारा व खुराक आभावी होणारी हेळसांड याबाबत देखील त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच, संगमनेर शहरातील काही मुस्लिम संघटनांनी एक चांगले पाऊल उचलले आहे. त्यांनी प्रातांधिकारी यांची भेट घेऊन कसाई यांच्यासह व्यापारी व त्यांना जणावरे देणार्या शेतकर्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण, जोवर शेतकरी जनावरे द्यायचे थांबत नाही. तोवर कत्तलखान्यांमध्ये कत्तली होणे थांबणार नाही. हेच वास्तव आहे. त्यामुळे, असे प्रकार टाळण्यासाठी प्रांताधिकार्यांकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. खरोखर या मागण्यांचे आत्मचिंतन प्रशासनाने करुन त्याची अंमलबजावणी करावी. अशी मागणी संघनांनी केली आहे.