साखर कारखाना बंदची टिमकी वाजुनही अगस्तिची ठिणगी पेटली.! 28 वर्षे यशाचे.! असा कारखाना राज्यात नाही.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले):-

         अगस्ति सहकारी साखर कारखाना बंद पडणार अशा प्रकारची टिमकी गेल्या वर्षभरापासून वाजत होती. त्यामुळे, अकोलेकर आणि उत्पादक यांच्यात प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, असे असताना देखील आज रविवार दि. 10 रोजी कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. त्यामुळे, तालुक्यातील तमाम जनतेने त्याचा आनंद व्यक्त केला आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून एकीकडे उसतोडणी कामगारांच्या टोळ्या शोधणे, कर्ज उपलब्ध करणे, त्याचे वितरण करणे, वाहतूक आणि अशा अनेक प्रश्नांसाठी संचालक मंडळ जीवाचे रान करीत होते. तर, दुसरीकडे कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सिताराम पाटील गायकर यांच्या न आल्याचे पहायला मिळत होते. तरी देखील डॉ. किरण लहामटे यांच्या शिष्टाचारानंतर व दादांच्या मध्यस्तीने यावर हल काढून विरोधकांच्या प्रश्नांना पुर्णविराम दिला गेला. मात्र, असे असताना देखील कारखाना आज पुन्हा त्याच नव्या दमाने सुरू झाल्याने अनेकांनी संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षभरापासून उत्तम प्रशासक बी.जे.देशमुख व ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी कारखान्याच्या कारभारावर शंका उपस्थित केली होती. कारखाना बंद पडतो की काय.! असा संदेश शेतकर्‍यांपर्यंत गेल्यामुळे, त्यांच्यात मोठा संभ्रम होता. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होते. उसतोड कामगार अगस्ति कारखान्यावर येताना वारंवार अन्यत्र चौकशी करीत होते. खरोखर कारखाना बंद होणार तर नाही ना? आमच्या कष्टाचे पैसे बुडणार तर नाही ना? त्यामुळे, जनजागर करता-करता राज्यात आणि जिल्ह्यात चुकीचे संदेश पोहचले आणि त्याचा तोटा एव्हाना त्रास संचालक मंडळाला झाला. अर्थात पिचड साहेब व मंडळ यांची त्यात किती भूमिका असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, गायकर पाटलांना मात्र, यात फारच त्रास सहन करावा लागल्याचे पहायला मिळाले.


आता एक गोष्ट मात्र नक्की.! की, एकदा का विरोधात गेले. की, साधं ग्रामपंचायतीला निधी मिळत नाही. हा तर कारखाना आहे. येथे लाख आणि कोटी सोडून रकमा ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळे, पिचड साहेबांच्या भाजपत जाण्याने कारखान्यात कर्ज मिळाले असते असे जर कोणाला वाटत असेल. तर तो निव्वळ मुर्खपणा आहे. त्यामुळे, गायकर साहेबांनी घरवापसीचा जो काही निर्णय घेतला त्याला मात्र दाद द्यावी लागेल. त्यामुळे, झाले असे की, अजित दादांनी त्यांनाच नव्हे तर संपुर्ण तालुक्यातील शेतकर्‍यांना पदरात घेतले आणि पुन्हा कर्ज देऊन कारखाना उभा केला आहे. अर्थात या सगळ्यात डॉ. किरण लहामटे यांचे योगदान देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण, त्यानी जर गायकर पाटील यांना समजून घेत दादांकडे मध्यस्ती केली नसती तर चालु गाडीची कानखीळ निघायला वेळ लागला नसता. त्यामुळे, बहुजनांचा नेता म्हणून गायकरांनी जी काही घरवापसीचा निर्णय घेतला. तो अकोल्यातील शेतकर्‍यांना तारुन गेल्याचे दिसते आहे. तर, बी.जे.देशमुख व सावंत यांच्या भूमिकेमुळे काही का होईना येथील कार्यपद्धतीवर जरब बसला. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मात्र, या आरोप प्रत्यारोपाला कंटाळून गायकर पाटलांनी काढता पाय घेतला असता तर बाकी, कारखान्याचा आज जो बॉयरल पेटला आहे. तो पेटला नसता. हे देखील तितकेच खरे आहे.

 माजी मंत्री म्हणाले

येणार्‍या काळात जेव्हा निळवंड्याचे कॅनॉल सुरू होतील. तेव्हा, उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. बाकी कारखान्यांना उस कोठून आणावा याची चिंता असते. मात्र, ती आपल्याला नसणार आहे. 28 वर्षे कारखाना सर्वाच्या सहकार्याने चालला आहे. येणार्‍या काळात तो असाच सुरू राहिल. या वर्षी आपल्याला 6 लाख मॅट्रीक टन उसाची गाळप करायची आहे. तर इथेनॉल प्रकल्प देखील अधिक जोमाने सुरू होणार आहे. आदरणीय शरदचंद्र पवार व नितीन गडकरी यांना सांगितले की, साखरेच्या बरोबरीने इथेनॉल निर्मितीला महत्व द्यायचे आहे. त्याचा आपण देखील अंगिकार करणार आहोत. त्या माध्यमातून अगस्ति स्वयंपुर्ण करायचा आहे. राज्यातील सर्वच कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे, कर्ज घेतल्याशिवाय कोणताही कारखाना चालत नाही. असा राज्यातील एकमेव कारखाना असेल. की, ज्याचे संचालक स्वत:ची संपत्ती गहाण ठेऊन कारखाना चालावा यासाठी कर्ज उचलुन कारखान्याला देते आहे. त्यामुळे, हा कारखाना हा त्यागातून उभा राहिला आहे. अकोल्यात छोटे-छोटे शेतकरी देखील शंभर ते दिडशे टन उत्पादन घेत आहे. त्यांचे खरोखर कौतुक केले पाहिजे.

गायकर पाटील म्हणाले.!

अगस्ति उभा करण्यासाठी येथील शेतकरी, कामगार, सर्व पक्षीय नेते यांनी आजवर सहकार्य केले आहे. जेव्हा हा कारखाना उभा नव्हता तेव्हा तेथील शेतकर्‍यांची काय आवस्था होती. हे शेतकर्‍यांना विचारा. गेली कित्तेक वर्षे अनेक तोटे आपण सहन केले आहे. तरी कारखाना उभा आहे. गेली 25 वर्षे मी जिल्हा सहकारी बँकेत काम करण्याची संधि मिळाली आहे. त्यामुळे, वेळोवेळी कारखाना चालु राहिला पाहिजे. यासाठी अल्पमुदत कर्ज उपलब्ध केले. आजवर एफआरपी पेक्षा जास्त रक्कम म्हणजे 70 ते 80 कोटी रुपये शेतकर्‍यांना दिले आहेत. गेल्या पाच वर्षात 28 कोटी रूपयांची एफआरपी उस उत्पादकांना दिली. कामगारांचे पगार, एफआरपी, व्यावस्थापन हे गणित कोणत्याच कारखान्यात जमत नाही. आज राज्यातील सर्वच कारखानदारी अडचणीत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून कर्ज वाढले आहे. आजही 27 ते 28 कोटी रुपये व्याज भरावे लागत आहे. मात्र, काही मंडळींना ही वस्तूस्थिती माहित नसते. ती मांडण्याचा प्रयत्न केले आहे. एमडींनी सर्व आर्थिक परिस्थिती समजून सांगितली आहे. आज कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 4 ते साडेचार लाख टन उभा आहे. त्यामुळे, गेल्या 28 वर्षातील इतिहासातील उच्चांकी कार्यक्षेत्रातला उस आहे. तो मार्च ऐन्डमध्ये संपवायचा आहे. बाहेरचा 8 शे ते 9 शे टण गेटकेन आणून 6 लाख मॅट्रीक टनचा गाळप करायचे आहे. आज साखरेचे बाजार वाढते आहे. ते असेच राहिले तर आपल्यासाठी साधक असणार आहे. आता या गळीत हंगामाची पुर्ण तयारी झाली आहे. तो यशस्विरित्या पार पडणार आहे.