बैलपोळ्याच्या दिवशी नवी गाडी घरी आणताना चोरांनी त्याचा खून केला.! दोन तासात आरोपी गजाआड.! एसपी साहेब भावूक झाले.!
- Sagar Shinde
सार्वभौम (अहमदनगर):-
आजवर आपण सर्वांनीच खाक्या वर्दीला नावे ठेवण्यात धन्यता मानली आहे. मात्र, या वर्दीत देखील एक संवेदनशिल व्यक्ती दडलेला असतो. हे देखील शोधण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे धुळ्याचे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित साहेब आहेत. जेव्हा बैलपोळ्याच्या शुभमुहूर्तावर एक गरिब घरातील होतकरु मुलगा शोरुममधून नवी गाडी घेऊन घराकडे निघतो आणि त्या गाडीसाठी चोरटे त्याचा रस्त्यात खून करतात. ही मनाला चटका लावून जाणारी घटना घडते. त्यानंतर जेव्हा लोक रस्त्यावर येतात आणि बंड पुकारतात. तेव्हा हे संवेदनशिल अधिकारी भाऊक होऊन सगळ्या जनतेसमोर शपथ घेतात की, हे आरोपी अगदी नरकात जरी असले तरी मी त्यांना शोधून आणेल. अन्यथा माझ्या नोकरीचा राजिनामा देईल. त्यानंतर अवघ्या दोन तासात तीन आरोपींना बेड्या ठोकल्या जातात. म्हणजे, "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" असेच हे अधिकारी आहेत. अन्यथा, अनेक जिल्ह्यांत व राज्यात एकाच वेळी ऑनर किलिंग होतात आणि ते कायम तपासावर राहतात. तरी देखील काही गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी साधी खंत देखील व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे, धुळेकरांना पंडित साहेबांसारखा देव अधिकारी लाभला. हे भाग्यच समजले पाहिजे.
आम्हाला अजुही तो दिवस आठवतो आहे. 3 फेब्रुवारी 2015 रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी परिसरात पोलीस कर्मचारी दीपक कोलते याची हत्या झाली होती. तेव्हा, नगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक लखमी गौतम साहेब होते. आपल्या कार्यकाळात आपल्याच सहकार्याची हत्या होते, हे दु:ख त्यांच्या मानाला प्रचंड बोचत होते. दुर्दैवाने त्याच काळात त्यांची बदली झाली आणि ते निरोप समारंभात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. की, मी जातो आहे. मात्र, माझ्या सहकार्याची हत्या करणार्यांना मी पकडू शकलो नाही. याची खंत आयुष्यभर कायम राहिल. जेव्हा कधी हे आरोपी पकडले जातील, तेव्हा मी कोठेही सेवेत असो, मला कळवा. आयुष्यात सर्वाधिक आनंद मला त्या दिवशी होईल. अर्थात नंतर ते आरोपी बीडमध्ये पकडले आणि ते कालांतराने निर्दोष देखील सुटले. हा भाग वेगळा आहे. परंतु, एक पोलीस अधिक्षक असून देखील गौतम साहेबांनी खंत म्हणून जे काही वक्तव्य केले. त्याने नगरकरांचे मन जिंकले होते. आजही एक निर्भिड, निष्पक्ष व संवेदनशिल अधिकारी म्हणून त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. आज धुळ्याच्या चिन्मय पंडित साहेबांकडे पाहुन डिआयजी लखमी गौतम साहेबांची आठवण झाली. कारण, संविधानाला अपेक्षित असे ही लोकाभिमूख अधिकारी आम्ही अगदी जवळून अनुभविले आहे.
हा उहापोह मांडण्याचे कारण असे की, धुळे जिल्ह्यातील शिरापूर तालुक्यातील एक होतकरु तरुण मोठ्या जिद्दीने व कष्टाने उभा राहिला होता. छोटेमोठे काम करुन तो एकटा आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. पै-पै जमा करुन त्याने बैलपोळ्याच्या शुभमुहुर्ताचे औचित्य साधून एक दुचाकी घेण्याचे नियोजन केले होते. ठरल्याप्रमाणे तो एका शोरुमध्ये गेला आणि त्याने बिलाचे प्लस-मायनस करुन प्लॅटीना गाडी खरेदी केली. मोठ्या आनंदाने तो गाडी घेऊन आपल्या घराकडे निघाला होता. मात्र, काही वेळातच त्याच्या आयुष्याला पुर्णविराम मिळणार, हे त्याला देखील माहित नव्हते. त्याने चिमठाण रस्ता ओलंडला आणि काही क्षणात तिघांनी त्याची गाडी आडविली. नव्याकोर्या गाडीकडे पाहुन या तिघांची नियत फिरली आणि त्यांनी प्रेमसिंग राजेंद्र गिरासे या तरुणाचा चाकुने भोकसून खून केला.
दरम्यान, धरणे गावात ऐकीकडे बैलपोळा सुरू असताना दुसरीकडे अशा पद्धतीने एकुलत्या एक मुलाची हत्या झाल्याचा निरोप येतो. त्यामुळे, सहाजिकच जनप्रक्षोभ होणे अपेक्षित आहे. आरोपीला अटक करा या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे, येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निमाण झाला होता. याच वेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक हे धुळे दौर्यावर असल्यामुळे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित साहेब हे त्या बैठकीत होते. मात्र, त्यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी अन्य कामे सोडून थेट धरणे गाठले. ते जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा नागरिकांच्या रस्तारोकोमुळे तब्बल दोन किलोमिटर रांगाच रांगा लागुन वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे, मोठा उद्रेख निर्माण झाला होता.
दरम्यान, जेव्हा चिन्मय पंडित यांनी आंदोलकांशी चर्चा केली तेव्हा प्रेमसिंग यांच्या हत्येबद्दल ते स्वत: प्रचंड भावून होताना दिसले. आरोपी अटक होतीलच हा विश्वास देताना पंडित साहेबांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते उपस्थित जनतेला उद्देशून म्हणाले की, तुम्हाला जेव्हढं दु:ख आहे, तितकेच मला देखील आहे. हेच प्रकरण जर माझ्या कुटुंबात कोणाबाबत झाले असते तर मला किती वेदना झाल्या असत्या.! त्यामुळे, मी तुम्हाला शब्द देतो की, आरोपी हे नरकात जरी दडून बसले असेल तरी त्यांनी मी अटक केल्याशिवाय राहणार नाही. असे झाले नाही. तर, मी पोलीस खात्याची नोकरी सोडून देईल.! पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या या शब्दांनी दु:खात बुडालेल्या नागरिकांनी देखील त्यांच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला. त्यांनी जे काही अश्वासन दिले, ते एक अधिकारी म्हणून नव्हे.! तर, त्यांच्या शब्दात जी काही आत्मियता होती ती प्रत्येकाच्या काळजाला स्पर्श करणारी होती. त्यामुळे, पंडित साहेबांच्या त्या चार-दोन वाक्यानंतर आंदोलनाचे पाणी-पाणी झाले.
तुम्हाला सांगायला आनंद होता की, "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या म्हणीप्रमाणे, पंडित साहेबांनी तत्काळ पाऊले उचलली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन पथके आणि स्थानिक पोलीस ठाण्याची तीन पथके अशा सहा पथकांनी अवघे दोन तास अक्षरश: पिंजून काढले. प्रेमसिंग ज्या मार्गाने आला त्या मार्गावर सर्वत्र नाकाबंदी आणि साध्या वेशातील पोलीस तैनात केले. त्या रस्त्याने जेथे सीसीटीव्ही उपलब्ध होईल त्याचा यांनी शोध घेतला. तर आरोपीच्या हातावर एक स्टॅटु काढलेला होता. तीच एक महत्वाची ओळख पोलिसांच्या हाती लागली होती. पंडित साहेबांच्या या पथकाने अवघ्या दोन तासात शिरपूर येथून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आणि दिलेला शब्द खरा करुन दाखविला. त्यामुळे, साहेबांचे धुळेकरांनी मन:पुर्वक आभार मानले आहेत. काही झाले तरी, पोलीस खात्यात इतक्या संवेदनशील मनाचा अधिकारी असणे म्हणजे लोकशाहीला लाभलेले हे खरं देणं आहे. कारण, आपण असे काही अधिकारी आणि कर्मचारी पाहिले आहेत. जे मदत सोडा.! धड निट बोलत देखील नाहीत. त्यामुळे, साहेबांना खरोखर सॅल्युट केला पाहिजे.
मी कर्तुव्याचा बांधिल.!
मी धुळे जिल्ह्याचा पदभार घेतला आहे. तेव्हापासून मी गुन्ह्यांच्या निर्गतीला आणि गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सनाच्या दिवशी घडलेले हे कृत्य माझ्या देखील मनाला चटका लावून गेले. जनतेच्या भावनांचा मी आदर केला. मी जे काही बोललो ते मनातून शब्दांद्वारे निघून गेले. कारण, त्यांना जे काही दु:ख झाले होते. ते मला देखील झाले होते. त्यामुळे, काही झालं तरी मी या आरोपींना बेड्या ठोकणार असा निच्छय केला होता. कदाचित हे शक्य झाले नसते तर माझ्या शब्दाप्रमाणे मी वागलो असतो. आता या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल. यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. पोलीस प्रशासनाला गावकर्यांनी जे काही सहकार्य केले. त्यांचे मी आभार मानतो.!
- चिन्मय पंडित (पोलीस अधिक्षक, धुळे)