अखेर राजुरचा ग्रामसेवक बडतर्फ, आरोग्य अधिकारी निलंबित, निगळे ताईमच्या राजिनाम्याला मुहूर्त कधी.! की आणखी जीव घ्यायचे आहेत?

सार्वभौम (राजूर) :- 

राजूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि गलथान कारभारामुळे १७० व्यक्तींना कावीळला सामोरे जावे लागले आहे तर एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या ग्रामपंचायतीचा पाट्या टाकू व भ्रष्ट ग्रामसेवक राजेंद्र किसन वर्पे याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांनी निलंबन नव्हे तर थेट खात्यातून बडतर्फ केले आहे. यासाठी कारण जरी समशेरपूर आणि देवठाण ग्रामपंचायतींमधील गैरकारभार असला. तरी, त्याच्या कारवाईला मुहूर्त हा राजूर ग्रामपंचायत आणि कावीळची साथ हाच ठरला आहे. आता वर्पे नंतर ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम सरपंच पुष्पाताई निगळे या नैतिकतेच्या आधारे राजिनामा देणार आहेत की नाही? की आणखी काही बळी जाण्याची वाट त्या पाहणार आहे? त्यांनी राजिमाना द्यावा आणि खुशाला नातेवाईकांचे लग्न कार्य करीत फिरावे अशा प्रकारची टिका राजुरकर करीत आहेत. त्यांना नैतिकता वाटत नसेल तर स्वत: डॉक्टर असणार्‍या आमदारांनी तरी नैतिकता दाखवून निगळे यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राजुरचे ग्रामस्त करीत आहेत. तर   आरोग्य अधिकारी डॉ. विनोद भिसे यांने देखील निलंबन केल्याची माहिती समोर आली आहे. दै. रोखठोक सार्वभौमच्या बातमीनंतर वर्पे याच्या चौकशीला वेग आला आणि तडकाफडकी ग्रामसेवक थेट निलंबित करण्यात आला आहे. यापुर्वी देखील सार्वभौमच्या बातमीने गटशिक्षणअधिकारी निलंबीत केला होता.

राजेंद्र वर्पे यांचे निलंबन का?

जसे ग्रामपंचायतीमध्ये पुष्पाताई निगळे हुकूमशाही कारभार करतात तसेच राजेंद्र वर्पे करीत होते. वाट्टेल तेव्हा कामावर येणे, वाट्टले तेव्हा घरी जाणे, ग्रामविकास अधिकारी म्हणून जी जबाबदारी असते त्यात कसूर करणे, चुकीच्या पद्धतीने ग्रामनिधी वापरणे, सेवा शर्ती वागणुकीचे कलम ३ चे वारंवार उल्लंघन करणे, १४ व्या वित्त आयोगाचे नियमबाह्य खर्च करणे, समशेरपूर तसेच देवठाण येथे सन २०१७ ते २०२०-२१ या काळात निधीतून गैरव्यवहार करणे असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. यासाठी वर्पे याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्याने दिलेले उत्तर शासनाला समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे, काल राजुरच्या कावीळ साथीचा ठपका ठेवून येरेकर यांनी वर्पे याला थेट खात्यातून बडतर्फ केले आहे.

सरपंचांची आमदारांकडून कानऊघडणी.!

डॉ. किरण लहामटे यांचा स्वभाव व कार्यपद्धती पहाता त्यांनी सरपंच पुष्पाताई निगळे यांची कानऊघडणी केली असणार नव्हे.! केलीच.., पण तरी देखील हा दुर्लक्षपणाचा कळस आणि अकार्यक्षमतेचा ठपका सरळसरळ दिसून येतो. मात्र, केवळ कानऊघडणी करुन चालणार नाही. तर, त्यांच्याकडून राजिनामा घेतला पाहिजे, आज २०० पेक्षा जास्त नागरिक कावीळ बाधीत झाले आहेत. मात्र, रेकॉर्डवर आले नाही. एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, आमदारांनी तरी त्यांच्या स्वभावाप्रमाणे नैतिकता बाळगून निगळे यांचा राजिनामा घेतला पाहिजे. अर्थात ज्यांनी आमदारांच्या भरोशावर निगळे यांना मते दिली, तेच मतदार आता अशा प्रकारची मागणी करीत आहते. त्यामुळे आमदारांनी मतदारांच्या मतांचा तरी आदर केला पाहिजे.

आरोग्य अधिकारी देखील निलंबीत.!

खरंतर ग्रामपंचायतींचे पाणी तपासण्याचे काम आरोग्य विभागातील एमपीएब्लु अधिकार्‍यांनी तपासणे अनिवार्य असते. ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या टाकीतून पाण्याचे नमुणे घेऊन ते संगमनेर येथील लॅबला तपासायला न्यायचे असतात. तेथे पाणी शुद्ध की अशुद्ध याचा अहवाल मिळवायचा असतो. मग चार महिने टाकी धुतलेली नव्हती तर हे आरोग्य अधिकारी काय झोपले होते का? या प्रकरणात डॉ. विनोद भिसे यांचे निलंबन केले आहे. ते सीओ आले तेव्हा उपस्थित नव्हते, दोषी असणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी राजूर ग्रामस्थ करीत आहेत.

ताई जरा जबाबरीने वागा.!

पुष्पाताई निगळे यांना डॉ. किरण लहामटे यांनी सरपंच केले. डॉ. लहामटे हे पायला भिंगरी लावून फिरताना दिसत आहे. बाहेर मोठमोठ्या कार्यक्रमांना ५६ इंच छाती करुन सांगत आहेत. की, मी येथील आरोग्य, रस्ते, शाळा, सुधरविल्या. पण, दुर्दैवाने त्यांच्या गावात अशुद्ध पाण्याने लोक अखेरचा श्‍वास घेऊ लागले आहेत. उपचार मिळत नाही म्हणून लोक नाशिक , संगमनेर सारख्या ठिकाणी जाऊ लागले आहेत. अर्थात याला जबाबदार कोण? तर शंभर टक्के सरपंच पुष्पाताई निगळे. किमान आपल्यामुळे आमदारांना तालुक्यात आणि जिल्ह्यात खाली मान घालायला लगणार नाही याची तरी जाणिव त्यांनी ठेवली पाहिजे. आपल्याच्याने पेलवत नसेल तर खुर्चीला चिकटून बसण्यापेक्षा एखाद्या कार्यक्षम व्यक्तीला सरपंच पद दिले पाहिजे. नाहीतर किमान जबाबदारीने तरी वागले पाहिजे असे त्यांच्याच गटाचे सदस्य आपल्या भावना व्यक्त करु लागले आहेत.