ब्रेकींग.! राजुरमध्ये कावीळचा आणखी एक बळी.! नैतीकतेच्या आधारे उपसरपंचांचा राजिनामा, सरपंचांना घम ना पस्तावा...!!
सार्वभौम (राजूर) :-
राजूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे कावीळ आजाराने आता दुसरा बळी घेतला आहे. यापुर्वी प्रियंका हरिभाऊ शेंडे (वय २०) तरुणीचा जीव गेला होता. आता पुन्हा मिसबाह एलीया शेख (वय १३) या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तिच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला असून याला पुर्णत: राजूर ग्रामपंचायत जबाबदार आहे. या घटनेत दोषी म्हणून ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पेे याला खात्यातून बडतर्फ केली असून आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. विनोद भिसे यांना निलंबित केले आहे. तर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून राजूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष बनसोडे यांनी राजिनामा दिला आहे. आता दोन जीव जाऊन देखील सरपंच पुष्पा निगळे यांना काहीच सुख दु:ख नाही की काय? असा प्रश्न पडला आहे. ज्यांनी त्यांना निवडून दिले तेच लोक त्यांच्या अकार्यक्षकतेबाबत राजिनामा मागत आहेत. मात्र, ताई इतक्या निष्ठूर झाला आहेत. की, त्यांना लोक मेले तरी हरकत नाही पण पद जाता कामा नये.! अशी भुमिका दिसून येत असल्याची टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे.
जनाची सोडा पण मनाची म्हणून जेव्हा-जेव्हा काही अघटीत घडले आहे. तेव्हा-तेव्हा भल्याभल्या पदाधिकार्यांनी संबंधित घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन राजिनामे दिले आहेत. त्यामुळे, राजूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष बनसोडे यांचे कौतुक केले पाहिजे. मात्र, सरपंच म्हणून जेव्हा लोकांना आधाराची आणि उपचाराची गरज होती. तेव्हा सरपंच पुण्याला आणि पती कारभाराला.! त्यामुळे, किमान जनतेची मागणी म्हणून तरी सरपंच पुष्पाताई निगळे यांनी राजिनामा दिला पाहिजे असे राजुरच्या सामान्य मानसांना वाटते आहे. मात्र, आपण नागरिकांना शुद्ध पाणी देऊ शकलो नाही, राजुरकरांना योग्य उपचार देऊ शकलो नाही, अजारी पडलेल्यांना वेळीच औषधे पुरवू शकलो नाही, आपल्या अकार्यक्षमतेमुळे २०० पेक्षा जास्त नागरिकांना कावीळ झाली आणि दोन व्यक्तींना मृत्युला सामोरे जावे लागले याची जरा देखील खंत सरपंच ताई यांना नाही की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
हीच आहे ती राजा हरिश्चंद्राची नगरी...
खरंतर प्रियंका हरिभाऊ शेंडे या तरुणीचा जीव गेला तेव्हा ग्रामपंचायत म्हणे तिला कावीळ नव्हती आणि तिला अन्य अजार होते. त्यामुळे, तिचा मृत्यू झाला अशी चर्चा त्यांनी केली. आता पुन्हा मिसबाह एलीया शेख या १० वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तीला देखील यांनी काही अन्य अजार जाहिर केला नाही म्हणजे देव पावला.! या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत ग्रामपंचायतीने जाहिर केली पाहिजे. खरंतर शासनाने फिर्यादी होऊन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी होत आहे. मात्र, मोठा राजकीय वरदहस्त असल्यामुळे अशा प्रकारची कारवाई होणार नाही. सरकारी व्यक्तींना तोफेच्या तोंडी दिले जाईल आणि पदाधिकारी नामानिराळे ठेवले जातील. हीच आहे ती राजा हरिश्चंद्राची नगरी. जेथे नैतिकता नाही ना कारवाई...!!
आमदार साहेब.! ही बिलं भरा....
राजुर हे डॉक्टर आमदारांचे गाव असले तरी त्या ठिकाणी आरोग्य सेवा नाही हे फार दुर्दैव आहे. शुद्ध पाणी मिळाले नाही म्हणून लोक मरु लागले आहेत. जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कोणी नाशिक ते कोणी पुणे, कोणी संगमनेर ते कोणी मुंबईला जात आहे. पिचड साहेब नाशिकला उपचाराला गेले तर आमदार म्हणाले त्यांनी आरोग्य सेवा इथे उपलब्ध केली नाही, जितेंद्र पिचड यांना उपचार मिळाले नाही म्हणून आमदारांनी टिका टिपण्णी केली. आता दोन वेळा आमदार होऊन सुद्धा साधा कावीळ झालेला रुग्न आपल्या गावात बरा होत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय? आज पुण्यातील पेशन्टला ५ ते ७ लाखांच्या पुढे उपचाराचा खर्च आला आहे. अन्य रुग्णांना खाजगीत उपचार घेतल्याने लाखो रुपये खर्च आला आहे. आपण आमदार आहात, नैतिक जबाबदारी समजून तुम्ही राजिनामा देणार नाहीच. पण, भलेभले कार्यक्रम आणि इव्हेन्ट घेऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा जे लोक बाहेर उपचार घेत आहेत. त्यांची बिले तुम्ही भरणार आहात का? असा प्रश्न राजुरकर विचारत आहेत.
उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.!
गेली 15 दिवसा पासून राजूर मध्ये कावीळ ह्या रोगाचे थैमान झाले आहे. यात सर्वात जास्त पाण्यामुळे प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. गेली 3 महिन्यापूर्वीच राजूर ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा टॅंक साफ सफाई करण्यासाठी, तत्कालीन बडतर्फ ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांना मिटिंग मध्ये ठराव करून पाण्याचे टाकीचे साफ सफाई करण्यास सांगितलं होते. परंतु त्या नंतर त्या विषयावर कोणतीच कारवाई संबंधित ग्रामविकास अधिकार्याकडून झाली नाही. त्याच प्रमाणे आरोग्य विभाग phc यांनी ही कधी पाण्याच्या टेस्ट केल्या नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे मी सुद्धा माझी नैतिक जबाबदारी समजून माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा देत आहे.
- संतोष बनसोडे (मा. उपसरपंच राजूर)