कोविडशी तो झुंजला, जगला तरी तो हरला.! वास्तवातले विदारक चित्र.! कोणी कोणचं नसतं.! एक प्रासंगिक लेख.!
- सागर शिंदे
सार्वभौम विशेष :-
गेल्या 10 दिवसांपुर्वी अगदी रात्री दिड वाजता अचानक माझा फोन वारंवार वाजत होता. इतक्या मध्यरात्री कोण बुवा? अर्थातच समाजसेवेच्या रिकाम्या उठाठेवी सोडून माझ्याकडे दुसरे असणार तरी काय.! पाहिलं तर माझ्याच गावातील संदेशचे काही मिसकॉल पडले होते. मी उठून त्याला फोन केला. तेव्हा तो मोठ्या हताश शब्दांनी बोलला. भाऊ, दत्ताला लोणीच्या हॉस्पिटलला आणले आहे. त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत आहे. त्याच्या कासाविस शब्दांनी माझी पुर्णत: झोप उठली होती. आरे.! पण, त्याला अॅडमिट तर केलय ना? मग डॉक्टर उपचार करतील ना.! मी त्याला धिर देत काळजी करु नको असे म्हणतो ना म्हणतो, तेच त्याचे उत्तर आले. भाऊ, येथील डॉक्टर म्हणतात, पेशन्टला आमच्याकडे जागा नाही. तुर्तास गेटवरच त्यांनी अॅक्सिजन लावला आहे. आता ते म्हणतात तुम्ही काही करा, पण याला येथून घेऊन कोठेही जा. त्यानंतर मी अक्षरश: रात्री दिड दोन वाजता काही विखे समर्थकांना फोन लावले. मात्र, नेहमीप्रमाणे अपयश आले. डॉक्टरांशी बोलणे झाले तर ते म्हणाले येथे जागा नाही. तुम्ही बोलुन काही उपयोग होणार नाही. एकीकडे रुग्णाला प्रचंड त्रास होत चालला होता. इतक्या रात्री फोन करावा तरी कोणाला? जिल्हा रूग्णालयात इतक्या रात्री त्याचे काय होईल हे मला नव्याने सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे, डोकं अगदी भांबावून गेले होते. अखेर मी रात्री 2 वाजता संदेशला म्हटलं.! आपण तालुक्यात जे करु ते दुसरीकडे नाही. त्यामुळे, तू अकोल्याला घेऊन ये. बीना अॅक्सिजन पेशन्टच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता.
दत्ताला अकोल्यात आणेपर्यंत पहाटेचे तीन वाजत आले होते. तोवर मी अकोले व राजूर रुग्णालयात फोन लावला तर तो बंद होता. काही डॉक्टांचे फोन देखील बंद होते. एकीकडे अन्नासाठी वणवण करणारे हे कुटुंब त्यांना खाजगी खर्च परवडणारा नव्हता. तर लोणी येथील डॉक्टरांनी सांगितले होते. की, या पेशन्टची आम्ही रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केली आहे. ती निगेटीव्ह आहे. मग याला श्वास घ्यायला त्रास का होतो आहे? याचे उत्तर मला इतक्या रात्री कोण सांगणार होते? तर याला आता अॅडमिट करावे तरी कसे आणि कोठे? काहीच कळत नव्हते. तेव्हा माझे मित्र महेश तिकांडे यांना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास मी फोन केला. माझे पेशन्ट सकाळपर्यंत डॉ. नवले यांच्या हॉस्पिटलला घ्यावे. मी दिवस उजाडताच पुढे काय करायचे ते पाहिल. तिकांडे यांनी स्वत: सर्व जबाबदारी घेऊन पहाटे 3 वाजता दत्ताला अॅडमिट करुन घेतले. तोवर सकाळपर्यंत त्याची प्रकृती स्थिर राहिली होती. डॉक्टरांनी त्यास तपासणी करण्यास सांगितले तर चक्क 12 स्कोर आलेला होता. मात्र, जेव्हा मी तेथे जाऊन डॉक्टरांना सविस्तर माहिती दिली. हा मुलगा फार गरिब आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे, येथून मी सुगाव कोविड सेंटरला घेऊन जातो. त्यानंतर विशेष म्हणजे डॉ. नवले यांनी माझ्याकडून एक रुपया देखील घेतला नाही. अगदी फ्री मध्ये डिस्चार्ज फाईल करुन दिली.
दरम्यान, जेव्हा मी बाहेर आलो. तेव्हा राष्ट्रवादीचा सिम्बॅल असणार्या एका अॅम्ब्युलन्सला चालकास मी विनंती केली. सर्व प्रकार सांगितल्यानंतर देखील त्याने पाचशे रुपये लागतील असे म्हणत व्यवहार सुरू केला. तर याच दरम्यान, मला एका व्यक्तीने फोन केला होता. की, येथील एका रुग्णवाहीकेने पेशन्ट नगरला नेण्यासाठी 14 हजार रुपये घेतले होते. तेव्हा एक गोष्ट वाईट वाटली की. जुन्या गाड्या नटवायच्या आणि समाजसेवेच्या नावाखाली अॅम्ब्युलन्स म्हणून बक्कळ पैसा लुटायचा. त्यामुळे, मी स्वत: माझ्याकडील गाडी काढली आणि पेशन्ट माझ्या गाडीत बसवून थेट सुगाव कोविड सेंटर गाठले. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले. मात्र, एक गोष्ट अशी खटकली की, सरकारी यंत्रणा असताना देखील येथे रुग्ण अॅडमिट केल्यानंतर दोन ते तीन हजार रुपयांचा एक कोर्स असणार्या गोळ्या बाहेरुन आणण्यासाठी दिल्या जातात. तर काही अन्य तपासण्या करण्यासाठी 19 शे रुपये द्यावे लागतील असे रुग्णास सांगण्यात आले. तोवर मी सर्व प्रक्रिया करुन मार्गस्त झालो होतो. हाच प्रश्न माझे धांदरफळ येथील नितीन कोकणे यांनी त्याच दिवशी मला फोनहून विचारला होता. भाऊ, सरकारी रुग्णालयात गोळ्या नाही, तपासण्या नाही मग फक्त अॅक्सिजन मिळतो का? त्यावर मी तालुक्याची बाजू सावरुन नेली होती. मात्र, आज दत्ता देखील हतबल झाला होता. तेव्हा मी डॉक्टरांना सांगितले. साहेब.! जे काही आपल्याकडे आहे. ते वापरा आणि रुग्णाला बरे करा. त्यानंतर त्यांनी होकार दर्शविला आणि त्यानंतर माझे मन समाधान झाले.
दुर्दैव असे की, मी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि निवांत झालो होता. त्यानंतर तिसरा दिवस उजडला आणि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तेथून एका डॉक्टांचा फोन आला. रुग्णाची तब्बेत प्रचंड खराब होत चालली आहे. त्यामुळे, एकतर खाजगीत न्या, किंवा जिल्हा रुग्णालयात हलवा. तेव्हा दत्ताचा अॅक्सिजन (सॅच्युरेशन) 70 पर्यंत आले होते. तर, अंगाचा पुर्णत: गळाठा झाला होता. 70 आकडा ऐकल्यानंतर मी देखील पुर्ण गळून गेलो. सुगावला नेमकी किती आणि काय उपचार झाले. हे मला कळले नाही. अखेर ती रात्र माझी देखील प्रचंड अस्वस्थेत गेली. दत्ता हा ना माझ्या रक्ताचा नातेवाईक, ना जाती धर्माचा, ना त्याच्याशी कधी दोन शब्द प्रेमाचे बोलणे होते. मात्र, तरी देखील मी माणूस म्हणून माझी अस्वस्थता वाढत चालली होती. याचे कारण म्हणजे, मी माझी आजी, बाबा आणि एक बहिन गमविली होती. नात्यातले 16 रुग्ण पॉझिटीव्ह असताना त्यांच्या पाठीमागे मी निर्धास्त होऊन लढत होतो. अक्षरश: डोळ्यादेखत माझी मानसे मेली आणि त्यांना मी स्वत: आग्नी दिला होता. त्यामुळे, माणसाची किंमत मला समजणार नाही तर मी माणूस कसला? कोरोनाच्या काळात 25 ते 30 रुग्ण मी हताळले होते. त्यामुळे, दत्ता जर डोळ्यादेखील खचत असेल तर ते माझ्यासारख्याला कधीच पचणी पडणार नव्हते.!
त्या दिवशी ठरविले होते. दत्ताकडे एक रुपया नसूदे. पण, तो जगला पाहिजे. माझ्या डोळ्यादेखत तरुण तगडी बहिन साधना आणि मित्र ज्ञानेश्वर गेला होता. त्यामुळे, ठेच लागून देखील मी दुर्लक्ष करणार होतो.! म्हणून मी डॉ. भांडकोळी सरांना फोन केला. 70 ऑक्सिजन आणि 12 स्कोअर तरी देखील डॉक्टरांनी प्रयत्न करु असे म्हणत माझ्या शब्दावर दत्ताला अॅडमिट करुन घेतले. पैशाचे काय? हा प्रश्न तेव्हा माझ्या मनात डोकावला होता. मात्र, तरी देखील पहिले जीवदान मग बाकी असे म्हणत त्याच्यावर उपचार सुरू झाले. पहिल्या दिवसापासून एकीकडे तो मृत्युशी झुंजत होता तर दुसरीकडे त्याचे कुटूंब पै-पै जमा करण्याचा प्रयत्न करीत होते. आज सहा दिवस उजडले आणि डॉक्टरांचा फोन आला. पेशन्ट पुर्णत: स्टेबल झाले आहे. तेव्हा मला बिलाची आठवण झाली. खरंतर मला तेव्हा पहिले गाव सुचले. एक मेसेज टाकला तर अनेक तरुण पुढे येतील, पुढारी मदत करतील. बोलबोल करता पैसा जमा होईल. त्यामुळे, मी एक मेसेज टाईप करुन गृपवर सोडला. दुर्दैव असे की, दोन दिवसात राष्ट्रवादीचे प्रकाश भाऊ सोडले तर कोणी रुपया देखील दिला नाही.
त्यानंतर काही व्यक्तींनी फुल ना फुलाची पाकळी दिली. मात्र, भल्याभल्या पुढार्यांनी साधी विचारणा देखील केली नाही. म्हणजे, जेव्हा निवडणुका लागतात. तेव्हा गोरगरिबांच्या घराभोवती राहुट्या टाकणारे पुढारी इतके स्वार्थी कसे असू शकतात? एरव्ही घराबाहेर अग्नीकुंड उभारुन ठाण मांडणारे नेते इतके निर्लज्ज कसे असू शकतात, निवडणुकीच्या काळात भाऊ दादा म्हणून महिना दोन महिने गरिब जनतेला चोंभाळणारे नेते अशा वेळी कोठे जातात? निवडणुका आल्या की पैशाची लालसा दाखविणारे नेते कोठे असतात? असे अनेक प्रश्न माझ्या मनाला भेडसावले. पण काय करणार.! निवडणुकीच्या काळात हेच गोरगरिब लोक लाचारीचे जगणे स्विकारतात, नेत्यांची चापलुसी करतात, चंद पैशासाठी विकले जातात. त्यामुळे, जेव्हा वेळ येेते तेव्हा कोणी उभे राहत नाहीत. त्यामुळे, आपला स्वाभिमान गहाण राहता कामा नये. अशा पद्धतीने अवघ्या एक दिवसासाठी पाच वर्षे स्वत:ला कोणी विकू नये. हीच प्रत्येक व्यक्तीला माझे तळमळीचे सांगणे आहे. तर प्रत्येकाने स्वत: सक्षम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कोणाकडे हात पसरावे लागणार नाही.
खरंतर, जेव्हा जीवण मरणाचा प्रश्न असेल तेव्हा ना कोणी जात पाहिली पाहिजे ना कोणी धर्म. ना कोणी राजकारण केले पाहिजे ना कोणी श्रेय्यवाद.! मात्र, असे होताना दिसत नाही. त्याची फार मोठी खंत वाटते. पण, काही झाले तरी समाजात स्वार्थी लोक असले तरी काही नि:स्वार्थी लोक देखील आहेत. उंचखडक गावातील अमर देशमुख (सीए, पुणे) यांनी पाच हजार दिल्याने डोंगराऐवढा आनंद झाला. तर संगमनेरचे तलाठी तात्या, प्रा.सचिन देशमुख सर, प्रा. सुरेशभाऊ मंडलिक, डॉ. कुलकर्णी मॅडम, हेरंब कुलकर्णी सर, विलासभाऊ लाड यांच्यासह अनेकांनी मोठी मदत केली. त्यामुळे, दत्ताचे बील भरणे सोपे झाले आहे. यात त्याच्या मुलाचे खरोखर कौतुक केले पाहिजे. त्याने हरिओम भेळ सेंटर येथे काम सुरु करून दोन महिन्याचा पगार बिल भरण्यासाठी घेतला. तर त्याची गाडी देखील विकून पैसे जमा केले आहेत. तर एक मंदीर उभे करण्यासाठी तीन ते चार लाख जमा करणारा व्यक्ती स्वत:साठी एक रुपये देखील जमा करु शकला नाही. याची देखील आज खंत वाटली. गाव करील ते राव काय करणार.! अशी जुनी म्हण आहे. मात्र, गावाने देखील अंग काढून घेतल्याचे दिसून आले. या सगळ्यात स्वाभाव, व्यक्तीचा इतिहास आणि अन्य काही महत्वाच्या गोष्टींना महत्व असले तरी. जेव्हा जीवण मरणाची लढाई सुरू होते. तेव्हा सर्व काही विसरून सगळ्यांनी सोबत आले पाहिजे. असे माझे प्रांजळ मत आहे. पण असो. ज्याने चोच दिली, त्याने चारा देखील दिला आहे. त्यामुळे, दत्ताच्या नावात देव आहे. त्याचे दैव बलोत्तर म्हणायचे. आज तो घरी येईल. त्याला हे आयुष्य बोनस म्हणून मिळाले आहे. त्यात तो नक्की जीवाभावाची मानसे जमा करीत अशी अपेक्षा आहे. एकंदर या सगळ्या प्रक्रियेत डॉ. भांडकोळी, त्यांच्या मिसेस आणि माऊली आरोटे सर (मेडिकल) यांच्या योगदानाला जागच्या कोणत्याही मापकात मोजले तर त्यांचे मुल्यांकन होणार नाही. हे तितकेच खरे आहे.! अत: दिप भव:
प्रकाश उल्हास देशमुख, अमर प्रकाश देशमुख (C.A), मोतीलाल भोर, राजेंद्र लोंढे, सुजित आंबरे, विद्याधर आंग्रे, संतोष धुमाळ, महेंद्र शिंदे, दीपक पवार, गणेश शिंदे, अनिल देशमुख, प्रतीक कोटकर, अंकुश आहेर सर, हेरंब कुलकर्णी सर, डॉ.कुलकर्णी मॅडम, संदिप घोलप साहेब, प्रा.सचिन भरत देशमुख, अभिजित मंडलिक, प्रसाद काळे, दत्तू पिंगळे, ईश्वरभाऊ वाकचौरे, संदीपभाऊ देशमुख, प्रा. सुरेश मंडलिक सर, परवेझ भाऊ शेख, दत्ता भांगरे, ढगे सर कळस, गिरिश बोऱ्हाडे सर, राहुल भाऊ, गणेश पुंडे, अदित्य ब्रॅण्ड, तलाठी तात्या संगमनेर, भागवत नाईकवाडी, विलास भाऊ लाड, महेश जेजुरकर यांनी यथाशक्ती मदत केली आहे. सर्व दानशुर व्यक्तींचे मन:पुर्वक आभार. (जर कोणाचे नाव चुकूण राहिले असेल तर वैयक्तीक मला नाव सेंड करा. आमच्या माहितीस्तव.)
*प्रिय मित्रांना.!*
सर्वांना माहित आहे. कोरोनाने भल्याभल्यांचा जीव घेतला आहे. तर, अर्थिक गोष्टीला अनेकांना सामोरे जावे लागले आहे. आज, अशाच एका *हातावरील कुटुंबासाठी* मी आपल्याला हात जोडूून *विनंती* करणार आहे. अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथील *दत्तात्रय खरात* या तरुणास कोरोना झाला होता. राजूर, लोणी, सुगाव कोविड सेंटर अशा अनेक ठिकाणी उपचार करुनही त्याचा *स्कोअर १२ वर गेला आणि अॅक्सिजन लेवर ७० वर* आली होती. परिणामी अंतीम पर्याय म्हणून त्यास *डॉ. भांडकोळी* हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातून तो आता निट झाला आहे. डॉक्टरांनी त्यांचे बील माफ केले. परंतू मेडिकल आणि अन्य तपासण्या यात *७० ते ८० हजार* रुपये बाकी आहे. हा मुलगा होतकरु असून रोज लोकांच्या बांधावर जेव्हा *कष्ट करेल तेव्हा रोजीरोटीचा प्रश्न मिटतो.* त्याने कोविडशी मात करुन जगण्याचे धैर्य सोडले नाही. त्यामुळे, आपण त्याला उभे राहण्यास मदत करणे आवश्यक आहे. फार काही मांडत नाही. परंतु, ज्यांना शक्य आहे. त्यांनी १० रुपये पासून तर *तुम्हाला हवी ती १००, २००, ५००० हजार अशी मदत करुन सहकार्य करावे.*
कंपल्शन नाही, सहखुशी.!
- 8888782010 फोन पे