गायकर पाटलांचा आ.लहामटेंना कानमंत्र.! आता तरी आमदारांनी सुधरुन घ्यावं.! भलं बुरं समजून घ्यावं.!

 

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                               अकोले तालुक्यात गेल्या ४० वर्षानंतर आमदारकीची गणिते बदलली. यात डॉ. किरण लहामटे हे किंग ठरले, तर अशोक भांगरे हे किंग मेकरच्या भुमिकेत पुढे आले. राष्ट्रवादीचे हे यश ऐतिहासिक असले तरी, ते टिकविण्याची जबाबदारी आता डॉ. लहामटे यांची आहे. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या डॉक्टरांच्या हाती थेट तालुक्याच्या रथाचे सारथी होण्याचे भाग्य लाभले आहे. सुदैवाने त्यांच्या दिमतीला राज्याची सत्ता आणि जनतेचा सर्वात मोठा कौल देखील आहे. मात्र, दुर्दैव असे की, डॉक्टरांच्या स्वभावाने काहीसे वातावरण नकारात्मक निर्माण होऊ पाहत आहे. तर, त्यांच्याच जवळ अगदी मांडीला मांडी लावून बसणारे काही कार्यकर्ते डॉक्टर प्रत्येक ठिकाणी चूक कसे आहेत, किंवा त्यांचे नियोजन व पारख यात ताळमेळ कसा नाही हे सांगण्याची जणू काहींनी सुपारीच घेतली आहे. त्यामुळे, जनतेने कमी परंतू त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना बदमान करण्यास सुरुवात केली आहे. एकंदर, डॉ. आमदार झाल्यानंतर त्यांना योग्य असा दिशादर्शक मिळाला नाही. विनय सावंत यांच्यासारखे त्याच्यासोबत वावरत असताना अनेकांची पोटदुखी झाली आणि घर का ना घाट का.! या म्हणीप्रमाणे आमदारांच्या जवळ कोणाला जाऊ द्यायचे नाही आणि त्यांनाही कोणावर विश्वास ठेऊ द्यायचा नाही. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. म्हणजे, डॉ. अजित नवले यांच्या भाषेत  सांगायचे झाले तर, कानफुकी गँग राष्ट्रवादीत फार मोठ्या प्रमाणात आसल्याचे लक्षात येते. आता या राजकीय गोतावळ्यात डॉक्टरांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? तर, तालुक्यात बहुजन नेता म्हणून सिताराम पाटील गायकर हे परिचित असले तर, त्यांच्या ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नसा आहेत. मराठा समाज व लोकनियुक्त नेते त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. तर, त्यांनी जी भाजपची पायवाट धरली होती. त्याच्या पाऊलखुना त्यांनी स्वत: बुजविल्या आहेत. त्यामुळे, जर डॉ. लहामटे यांना राजकारणात लंबी रेस खेळायची असेल तर, कोण्या कानफुक्यांचे न एकता गायकरांशी मिळते जुळते घेणे हीच काळाची गरज आहे. अन्यथा येणारा काळ 2019 प्रमाणे लोकप्रक्षोभाचा नसून सद्सद् विवेक बुद्धी वापरुन जनता निर्णय घेणार आहे. हे त्यांनी विसरु नये. त्यामुळे, दर सही, लेकीन दुरुस्त होणी चाहिऐं.! हाच सुचक संदेश.

               

जर आपण एखाद्या व्यक्तीला आपला कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानत असेल. तर, त्या व्यक्तीच्या राजकारणाचा मुळापासून नायनाट केला पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्वाची असते, ती रणनिती आणि गणिमी कावे. जसे की, अपराजित भाजपला नामोहरम करण्यासाठी शुत्रुच्या पक्षात जावून शरदचंद्र पवारसाहेबांनी तीन पक्ष एकत्र केले आणि 104 आमदार विरोधात बसविले. तसेच केंद्रात देखील नरेंद्र मोदी यांच्या विरोधात समविचारी पक्ष एकत्र येऊन बैठका घेत केंद्राला घाम फोडला आहे. त्यामुळे, पवारांकडून दबावतंत्र आणि राजणितीचे धडे त्यांच्या प्रत्येक चेल्यांनी नक्कीच घेतले पाहिजे. राज्यात कोणी घेऊ ना घेऊ, डॉ. किरण लहामटे यांनी तरी ते प्रकर्षाने अंगिकारले पाहिजे. कारण, येथे पवारांच्या निष्ठेशी गद्दारी करणारे व्यक्ती कमी नाहीत. त्यामुळे, जे कोणी आज पुर्वीचे राष्ट्रवादी व विद्यमान भाजपमध्ये साहेबांच्या बरोबर आहेत. त्या प्रत्येक पवार प्रेमींना डॉ. लहामटे यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात आणण्याचे काम केले पाहिजे. पवार साहेबांनी आ.बाबनराव पाचपुते यांना जसे एकटे पाडण्याचे काम केले. तसे येथील साहेबांना डॉक्टरांनी एकटे पाडण्याचे काम केले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने येथे डॉक्टरच एकटे पडताना दिसत आहे. का ? तर, केवळ समायोजनेचा आभाव म्हणावा लागेल.

          आता एक बाकी नक्की की, एक लक फॅक्टर म्हणून डॉक्टर नावाचे रोपटे येथे उदयाला आले.  मात्र, त्याचे वटवृक्ष करताना कार्यकर्तेच त्यांच्या फांद्या छाटताना दिसत आहे. तर, डॉक्टर देखील कार्यकर्त्यांना बळ देताना दिसत नाहीत. अर्थात त्यांच्याकडे एक विशिष्ठ टिम वगळता त्यांचे विखे पाटील, ना. थोरात साहेब, आ. जगताप, आ. पवार यांच्याप्रमाणे टिम वर्क आजवर कधी दिसले नाही. मी जनतेत आहे असे म्हणत भल्याभल्यांना साहेब अक्षरश: कोलुन देतात. मात्र, जनतेच्या प्रश्नांसाठी १६ वर्षे आंदोलन करणार्या इरोम चानु शर्मिला (आयर्न लेडी) या जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. तेव्हा, १६ वर्षेचे फलित म्हणून लोकसभेत केवळ ९० मते मिळाली होती. त्यामुळे, जनता फार काही कामांचे आणि तुमच्या दौऱ्यांचे कौतुक करेल आणि त्याचे रुपांतर मतात उतरेल, असे जर डॉक्टरांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. एकदा परिवर्तन होऊ शकते, मात्र तेच पाढे पंच्चावन्न होणे अशक्य आहे. त्यामुळे, जर, डॉक्टरांना पुन्हा आमदार व्हायचे असेल. तर, विचारांचा का नसेना, समर्थक का नसेना, गटातला आणि गोटातला का नसेना.! पण, त्यांचे संघटन करणे गरजेचे आहे. त्यासाठी, आता कोण्या ज्योतिषाची गरज नाही.!  तर, डॉक्टरांनी स्वत: हे अँपरेशन हाती घेणे आवश्यक आहे. ते ही वेळेच्या आता. अन्यथा निवडणुकीपुर्वी आमदारांची हवा होती, नंतर सहा महिने आमदार हवेत होते आणि वर्षभरात त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षात कसाही राजकीय वातावरणाचा सर्वे करुन पाहिला तर, मा. आ. वैभव पिचड यांच्या समर्थनार्थ सकारात्मक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे, येणाऱ्या तीन वर्षात डॉक्टरांना संयमाची कसोटी पणाला लावून पुन्हा डॉक्टरमय किंवा राष्ट्रवादीमय वातावरण तयार करायचे आहे.

              कोणी काही म्हटले तरी डॉ. लहामटे हे सामान्य मानसांना भावलेले व्यक्तीमत्व आहे. तर, सुज्ञ लोकांमध्ये काहीशी नकारात्मक भावना निर्माण होऊ पाहत आहे. वास्तवत: राष्ट्रवादीतून भांगरे कुटुंब आता आमदारकीचे स्वप्न पाहत आहे, हे जर कोणी नाकारत असेल तर त्याने त्यांच्या राजकीय विचारांची प्रगल्भता स्वत:जवळ ठेवलेली बरी. त्यामुळे, डॉक्टर जितके हेकेखोरपणे वागेल, तितके त्यांच्यासाठी बरे आहे. कार्यकर्ते जितके त्यांच्या विरोधात वागतील तितकी त्यांच्यासाठी जमेची बाजू होईल. कारण, डॉक्टर कितीही प्रांजळ आणि प्रामाणिक असले तरी, त्यांच्यामागे भलती माऊथ पब्लिसिटी करणारी यंत्रणा असेल तर बदनामी तर होणारच ना.! इतकेच काय.! राज्य आणि बारामतीच्या वाड्यापर्यंत डॉक्टरांच्या विरोधात शंख वाजविणारे नेते देखील तालुक्यात आहेत. हे देखील डॉक्टरांनी समजून घेतले पाहिजे. या सर्व प्रक्रियेत अत्यंत महत्वाची आणि अधोरेखित गोष्ट म्हणजे, एक आमदार म्हणून डॉ. लहामटे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काही राजकीय लोक आपल्या विरोधकांना वारंवार गोळ्या मारताना दिसून आले आहे. ही बाब विशेषत: अगस्ति कारखाण्याच्या वादळादरम्यान प्रकर्षाने दिसून आली. त्यामुळे, मानसांना पत्रावळी सारखी वापरुन घेणारी मानसे डॉक्टरांनी पहिली समजून आणि ओळखून घेतली पाहिजे. कारण, आमदारांच्या तोंडावर साखरशब्द बोलयचे आणि पुढेमागे मिर्चीच्या धुऱ्या फेकायच्या. ही प्रवृत्ती तालुक्यात वाढत आहे. 

अर्थात हे डॉक्टरांच्या स्वभावाचेच तोटे आहेत. हे त्यांनाही कळतय पण वळतय कोठे.! त्यामुळे, येणारा काळ त्यांनी संयमाने आणि राजकीय प्रगल्भतेच्या गणिम नितीने हताळला पाहिजे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि ना कोणी मैत्री तोडत असते. गोपिनाख मुंढे, महाजन आणि विलासराव देशमुख हे भलेही वेगवेगळ्या पक्षाचे होते. मात्र, कायम त्यांनी एका तटात जेवण केल्याचे इतिहास सांगतो. इतकेच काय, तर तिघेही एकापाठोपाठ मार्गस्त झाले. मात्र, त्यांच्या शोलेच्या दोस्तीने ते आजही अजरमर आहेत. या पलिकडे,  खुद्द अजित दादांनी अकोल्यात सिताराम पाटील गायकर यांच्यावर टिकेची झोड उठविली होती. आज त्यांना पुन्हा पक्षात घेत जिल्हा बँक आणि कारखान्याची सुत्र हाती दिली आहे. त्यामुळे, हे मांडण्याचे कारण काय.? तर, डॉक्टरांसारखा चांगला आणि जनतेत मिसळणारा आमदार आदरणीय यशवंतराव भांगरे यांच्यानंतर कोणी लाभला नाही असे सामान्य लोक आजही म्हणतात. त्यामुळे, त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा  आलेख घटता नसावा तर उंचावत जाणारा असावा. म्हणून, त्यांनी त्यांच्या राजनितीत बदल करुन वैयक्तीक संघटनापेक्षा पक्षीय संघटन वाढविले पाहिजे. जे राष्ट्रवादीत आले आहेत, त्यांच्याशी सलोखा प्रस्तापित केला पाहिजे. व्यक्तीने असे वागावे की, विरोधकाला देखील हेवा वाटला पाहिजे. जसे आज आ. निलेश लंके हे नाव गाजते आहे. उद्या. विजय औटी जरी राष्ट्रवादीत आले. तरी, लंके यांचे तिकीट कापण्याची मजल पक्षाची देखील होणार नाही. इतकं, काम, लोकप्रियता आणि संघटन आपल्यामागे उभे असले पाहिजे. उद्या, भांगरे कुटुंबाने जरी विधानसभेच्या तिकीटाचा दावा केला. तरी, पक्षाने पहिला विचार आपला केला पाहिजे. होय.! डॉक्टरच, असे म्हणणारे लोक देखील त्यांनी ऊभे केले पाहिजे हेच प्रकर्षाने मांडावेसे वाटते.

           खरंतर, त्या दिवशी एका कार्यक्रमात डॉ. लहामटे साहेब व गायकर साहेब यांचा एक फोटो पाहिला आणि काही गोष्टी मनात डोकावून गेल्या. गायकर हे डॉक्टरांच्या कानात काहीतरी हितगुज करत होते. तितक्याच तल्लिनतेने आमदार ते ऐकत होते. विषय काय होता हे तुर्तास महत्वाचे नाही. परंतु, आज मितीला जर खरोखर या दोघांनी तालुक्यात काम करताना हातात हात घेतला. तर, येणाऱ्या काळात आ. लहामटेंना 2024 ते वातावरण शंभर टक्के सोपस्कर जाईल. अकोल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पिचड साहेब वगळता तालुक्यात कोणाला इतके पाठबळ नाही. खुद्द आमदार महोदयांना देखील नाही. कारण, त्यांच्याकडे ना कधी कारखान्याचे संचालक पद, ना त्यांचे कोणी नगरसेवक. त्यामुळे जिल्हा परिषद ते सातेवाडीहून थेट मंत्रालय असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे, त्यांचे नशिब आहे. की, ते तालुक्याचा राजा असताना त्यांना आयता वजिर मिळाला आहे. मात्र, त्या वजिराला वापरायचे कसे.! हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आमदारांचे तालुक्यावर वर्चस्व प्रस्तापित होईल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊ घातल्या आहेत. त्यात गायकर पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन स्वत:चे बळ वाढून घ्यायचे. की, अन्य कोणाला बळ देऊन विधानसभेला विरोधक प्रबळ करायचे हे त्यांनीच ठरवायचे आहे. कितीही नाही म्हटले तरी, गायकर पाटील यांच्याकडे आज कारखाना आहे. नगर पंचायतीसाठी त्यांच्याकडे स्वत:चे पाठबळ आहे. तालुक्यात त्यांच्याच जोरावर आजवर पिचड साहेबांनी ३५ वर्षे तालुक्यात वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे, अशा व्यक्तीला विश्वासात घेऊन त्यांचे कानमंत्र ऐकले. तर, डॉक्टरांना नक्कीच ते मोलाचे आणि फायद्याचे ठरतील. अन्यथा त्यांच्या आमदारकीचा वापर करुन फुकट बाबुरावकी करणारे त्यांच्या आवती भोवती काही कमी कानफुके नाहीत. त्यामुळे, डॉक्टरांनी या गोष्टीचे चिंतन केले पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे भले का एखाद्या गुहेत का होईना.! पण, स्वत: ध्यानस्त होऊन दुरदृष्टी ठेवत भविष्याच्या राजकीय रुपरेषा आखली पाहिजे. कारण, डॉक्टरांसारखा सामान्य आमदार या तालुक्याला पुन्हा लाभणान नाही, हेच त्रिवार सत्य आहे.