बाबो.! तीन ग्रामसेवक व तीन माजी सरपंचांनी केला 10 लाखांचा घोटाळा.! तीन ग्रामपंचायतींच्या आठ जणांवर गुन्हे दाखल.! अकोल्यातील प्रकार.!
सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये घोटाळे घडत आहेत. मात्र, त्यावर कोणी आवाज उठवत नाही. तर काही पुढारी आणि ठेकेदार हे सरपंच व ग्रामसेवक यांच्या बोकांडी बसून धिटाईने कामे घेऊन ते मंजुर्या येण्यापुर्वीच करुन त्यांची बिले काढण्याची कामे करताना दिसत आहे. त्यामुळे, अशाच तीन ग्रामपंचायत मधील घोटाळे पुन्हा उघड झाले आहेत. त्यामुळे, शेणीत, केळी रुम्हणवाडी व तिरडे अशा तीन ठिकाणच्या माजी सरपंच आणि ग्रामसेवक अशा आठ जणांवर अकोले व राजूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार सन 2018 ते 19 या कालावधीत घडला असून एकूण 9 लाख 78 हजार 6 रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ग्रामसेवक व सरपंच यांच्यासह काही सदस्यांना देखील आरोपी करण्यात आले असून यात ठेकेदारांची देखील चौकशी करुन त्यांना यात सहआरोपी करण्यात यावे. अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दीपेश गोरक्ष पिटेकर हा दि. 31 डिसेंबर 2015 ते दि. 19 जून 2018 या कालावधीत कोळी रुम्हणवाडी येथे कार्यरत होता. त्यावेळी तेथे शकुंतला जनार्धन परते (रा. केळी रुम्हणवाडी, ता. अकोले) ही महिला सरपंच म्हणून कार्यरत होती. या दोघांनी मिळून केळी रुम्हणवाडी येथे ग्रामपंचायतीचे 14 वित्त आयोग व पाच टक्के पैसा अबंध निधिमधून नियमबाह्य खर्च केला आहे. त्यानंतर झालेल्या कामाचे मुल्यांकन व पुर्णत्वाचा दाखला न घेता नियमबाह्य खर्च करुन 2 लाख 50 हजार 632 रुपयांचा अपहार केला आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी केली असता यात ग्रामसेवक आणि माजी सरपंच यांनी हा कारभार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, विस्तार अधिकारी गणपत गोपाळ धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, अकोले तालुक्यातील तिरडे ग्रामपंचायतीत देखील मोठा घोटाळा समोर आला आहे. दि. 1 एप्रिल 2015 ते 27 डिसेंबर 2019 या दरम्यान तत्कालिन सरपंच सुनिल निंबा बोरवे, संगिता रमेश बोरवे (रा. तिरडे, ता. अकोले), द्वारकादास राघवदास बैरागी (रा. केळी रुम्हणवाडी, ता. अकोले), इंदुबाई शांताराम गोडे (रा. तिरडे, ता. अकोले) अशा चौघांनी मिळून तिरडे ग्रामपंचायत येथे आलेला पाणी पुरवठा ग्रामनिधी हा 5 टक्के पैसे अबंध निधिमधून नियमबाह्य खर्च केला. त्यातील 5 लाख 47 हजार 116 रुपये इतक्या रुपयांचा अपहार केला. कारण, झालेल्या कामाचे मुल्यांकन न करता तसेच पुर्णत्वाचा दाखला न घेता नियमबाह्या खर्च केला आहे. त्यामुळे, विस्तार अधिकारी गणपत धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शेणीत ग्रामपंचायतमध्ये देखील मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तेथे ग्रामसेवक अरूणा पुनाजी गंभीरे (रा. राजूर, ता. अकोले) व सत्यभामा चहादू जाधव (माजी सरपंच शेणीत) या दोघांनी मिळून पाणी पुरवठा निधी 14 वित्त आयोग निधीमधून नियमबाह्या खर्च केला. या दोघांनी 1 लाख 80 हजार 258 रुपयांचे काम केले. मात्र, त्यांनी झालेल्या कामाचे मुल्यांकन व पुर्णत्वाचा दाखल न घेता नियमबाह्य खर्च केला आहे. त्यामुळे. या दोघांनी संगनमताने शासनाची फसवणुक केली आहे. त्यामुळे, विस्तार अधिकारी गणपत गोपाळ धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक व माजी सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक खैरनार करीत आहेत.
ऐकंदर हा सर्व प्रकार पाहिला तर, यात ग्रामसेवक नक्कीच दोषी आहेत. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी कोण्या ठेकेदाराच्या दबावाखाली किंवा कशा अर्थपुर्ण तडजोडीने हा मनमानी कारभार केला आहे. याची खर्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. अकोले तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बड्या नेत्यांच्या छत्रछायेखाली भलेभले ठेकेदार गेंडे पोसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, ज्या माय माऊलीला संविधानाने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली म्हणून ती सरपंच झाली. मात्र, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्या भोंगळ कारभाराची चौकशी झाली तर खर्या अर्थाने यात काय गौडबंगाल आहे. हे समोर येईल. अर्थात पोलीस देखील यात फार काही खोलात जात नाहीत. त्यामुळे, अशा प्रकाराचा चांगला पाठपुरावा केला. तरच अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागते. तसे पाथर्डी तालुक्यातील रोहयो घोळाटा उघड झाला होता. तसे येथे सर्व झाकली मुठ सव्वा लाखाची अशा म्हणीप्रमाणे काम चालते. त्यामुळे, याचे पुढे काय होणार.! हे देखील सर्वज्ञात आहे.
खरंतर, अकोले तालुक्यात बीडीओ, ग्रामसेवक, सरपंच आणि छोटे ठेकेदार यांना ब्लॅकमेलिंग करणार्या काही यंत्रणा तालुक्यात कार्यरत आहेत. हम करे सो कायदा अशा पद्धतीने धिटाईने अधिकार्यांच्या उरावर बसून कामे करुन घेण्याची पद्धत येथे रुजली आहे. त्यामुळे, येथे शक्यतो कोणी अधिकारी यायला धजत नाही. एक देव माणसासारखे बीडीओ रेंगडे साहेब याच यंत्रणेचे बळी ठरले. तर त्यांच्या पाठोपाठ चौधरी साहेब आले. त्यांना देखील जेरीस आणले. आता सोनकुसळे हे तोफेच्या तोंडी आहेत. दुर्दैवाने या अधिकार्यांना काम करताना स्वातंत्र्य नाही. यांच्या समोर अनेक ब्लॅकमेलर आणि धिटाई करणारे अजगर आहेत. त्यामुळे, हकनाक भितीपोटी काही अधिकारी जीव मुठीत धरुन काम करताना दिसत आहे. त्यामुळे, एक गोष्ट नक्की आहे की, डॉ. किरण लहामटे हे एक कार्यक्षम आमदार शंभर टक्के आहेत. मात्र, त्यांच्याकडे नियोजन नसल्याने प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचा यत्किंचितही अंकुश नाही. तर हे जे घोटाळे उघडे पडले आहेत. ते सर्व माजी आमदार वैभव पिचड आमदार असताना झाले आहेत. नशीब.! ते डॉ. लहेमटे आमदार असताना उघड झाल्याने आजी-माजी हा फरक पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.