संचालक कवडे यांनी रॉयल्टी बुडवुन तलावाची बेकायदेशीर जागा विकली.! त्यांच्या व्यवहाराची चौकशी करा.!अन्यथा आमरण उपोषण.!संगमनेरात उपसभापती व संचालक एकमेकांना भिडले.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरालगत असलेल्या गुंजाळवाडी गावातील वेल्हाळे रोड ते गुंजाळमळा येथुन जाणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्यावर राजहंस दुध संघाचे संचालक विलास साहेबराव कवडे यांनी अतिक्रमण करून 3 गुंठ्याच्या जागेत 4 गुंठे जागा वापरात आणुन स्थानिक ग्रामस्थांची अडवणुक करून दमदाटी केली व स्थानिक लोकांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. येवढेच काय! याच गुंजाळवाडी गावातील नैसर्गिक पाण्याच्या तलावाची जागा घेऊन त्यात बेकायदेशीर रित्या मुरूम व मातीची भर टाकुन तेथे प्लॉटिंग करून शासनाची रॉयल्टी बुडवली व प्लॉट घेणाऱ्या लोकांची फसवणुक केली आहे. त्यामुळे, विलास कवडे यांच्यावर कारवाई व्हावी. अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन योगेश गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, सचिन गुंजाळ, अरुण गुंजाळ, शांताराम गुंजाळ यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना दिले आहे. तर योगेश अप्पाजी गुंजाळ यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात राजहंस दुध संघाचे संचालक विलास कवडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तर विलास कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचायत समितीचे उपसभापती यांच्यावर देखील अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, संगमनेरात छोटे-मोठे राजकीय पुढारी सरसकट आता जमिनीच्या खरेदी विक्री, एन. ए. प्लॉट, वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 करणे व सामन्य जनतेची दिशाभूल करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुढाऱ्यांनी पैसे कमवण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे अनेक गैरप्रकार संगमनेरात होताना दिसत आहे. त्यातच गुंजाळवाडी भागातील गुंठेवारी म्हणल्यावर लाखो रुपयांचा विषय असणार. त्यामुळे, विलास कवडे यांच्या सारखे प्रतिष्टीत व्यक्ती स्थानिक लोकांना दमदाटी करून गुंठे बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तर वरिष्ठांनी शहानिशा करून या विषयात लक्ष घालायला हवे. अशी मागणी जनतेकडून होत आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हणले आहे की, तक्रारदार हे पिढ्यान-पिढ्या गुंजाळवाडी येथील रहिवासी असुन गेल्या अनेक दिवसांपासून वेल्हाळे रोड ते गुंजाळमळा येथे त्यांचा वहिवाटीचा रस्ता होता. पण, काही दिवसांपूर्वी संचालक विलास कवडे यांनी रस्त्यालगत 3 गुंठे जागा खरेदी केली. मात्र, प्रत्यक्षात विलास कवडे यांचा 4 गुंठे वापर असुन रस्त्याच्या जागेवर देखील त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. ह्या रस्त्याचे काम गुंजाळवाडी ग्रामपंचायत करणार असल्याने विलास कवडे यांनी हे काम बंद पाडले आहे. तक्रादारांनी वेळोवेळी रस्ता खुला करण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रादारांनाच दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे, तक्रादारांनी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्याकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. नवनाथ अरगडे यांनी विलास कवडे व तक्रारदारांना बोलावुन चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बैठक घेतली या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ देखील उपस्थित होते. नवनाथ अरगडे यांनी सर्वांसमोर विलास कवडे यांना तुमची जागा सात बारा प्रमाणे मोजुन घ्यावी. व उर्वरित अतिक्रमण असलेल्या जागेतुन रस्ता करून देण्याची विनंती केली. परंतु विलास कवडे यांनी स्पष्ट नकार दिला व माझा लिटीकेशनच्या जागा घेण्याचा धंदा करतो. त्यामुळे, मी रस्ता होऊ देणार नाही अशी भुमिका घेतली.
दरम्यान, विलास कवडे यांनी यापुर्वीही बेकायदेशीर जागेची खरेदी करून शिविगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हणले आहे. राहणे मळा येथे विनापरवाना मोबाईल टॉवर उभारून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. पण, गुंजाळवाडी ग्रामस्थांनी वेळीच विरोध केल्याने तेथुन कवडे यांनी काढता पाय घेतला. गुंजाळवाडी हद्दीतील गोफने मळा येथे गावातील नैसर्गिक पाण्याच्या तलावाची जागा घेऊन त्यात बेकायदेशीररित्या मुरूम व मातीची भर टाकुन तेथे प्लॉटिंग करून शासनाची रॉयल्टी बुडवली व प्लॉट घेणाऱ्या लोकांची फसवणुक केली. त्यामुळे, कवडे यांच्या व्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी गुंजाळवाडीतील काही लोकांनी केली आहे. अन्यथा कुटुंबासह उपोषणाला बसु अशा तक्रारीचे निवेदन पोलीस उपविभागीय कार्यलयात दिले आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे व राजहंस दुध संघाचे संचालक विलास कवडे यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली. हा वाद आता गुंठेवरीचा राहिला नसुन प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यामुळे, या वादाची किनार कुठपर्यंत जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरंतर, गुंजाळवाडीला गुंठेवारीचे आगार म्हणले जाते. त्यामुळे, येथे राजकीय पुढाऱ्यांसह अनेकांचे जमिनीवर बारकाईने लक्ष असते. याच गुंजाळवाडीत सरकारी फॉरेस्ट जमिनीची (वर्ग-2ची) जमीनला बनावट कागदे तयार करून खोटे वारसदार दाखवुन तोतया राजकीय पदाधिकाऱ्याने तलाठी, मंडलअधिकारी, लिपीक, तहसीलदार यांच्या संगनमताने तस्करी केल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर काढली होती. ही जमीन जरी वर्ग-2 ची असली तरी ती शहरालगत असल्याने तिची किंमत करोडो रुपये होती. त्यामुळे, गुंजाळवाडी भागात गुंठेच काय! एक इंचावरून ही वाद झाले तर काही वावग वाटणार नाही.