डॉ. पुनम निघुते प्रकरणात अनेक ट्वीस्ट.! डॉ. योगेश निघुतेंकडे 7 दिवस.! नुसतीच साशंकता.!



सार्वभौम (संगमनेर) :- 

                        संगमनेर तालुक्यातील डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम निघुते यांनी राहत्या घरात आपले जीवण संपविले आणि त्यानंतर अनेक प्रश्नांनी जन्म घेतला. यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत असतानाच आरोपी निघुते यांना अटी व शर्तींच्या अधिन राहून तात्पुरता जामीन होतो. म्हणजे, यात नक्कीच पोलीस यंत्रणा कोठेतरी कमी पडली आहे. तर सरकारी वकील महोदय देखील यापेक्षा वेगळे नाहीत. त्यामुळे, सर्व प्रकार आता शंका निर्माण करणारा आहे अशा प्रकारची खंत नातेवाईक व्यक्त करु लागले आहेत. मुलीचा छळ, त्यानंतर आत्महत्या, त्यानंतर पीएमसाठी स्थानिक डॉक्टरांवर शंका, त्यानंतर पोलिसांवर शंका आणि अखेर सरकारी वकीलावर शंका. त्यामुळे, डॉ. निघुते प्रकरणात सर्व संदिग्धता निर्माण झाली असून खरोखर डॉ. पुनम निघुते यांना न्याय मिळेल का? अशा प्रकारचा प्रश्न नातेवाईक उपस्थित करु लागले आहेत.

खरंतर, डॉ. पुनम यांनी आत्महत्या केल्यानंतर डॉ. योगेश निघुते हे आरोपाच्या पिंजर्‍यात उभे राहिले. जेव्हा, पुनम यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा थेट पोलिसांनी डॉक्टरांच्या घराला छावणीचे स्वरुप दिले होते. या प्रकरणात महिलेचे नातेवाईक प्रचंड संतापलेले होते. त्यामुळे, यात गुन्हा दाखल होणार याची खात्री पोलिसांना झाली होती. त्यामुळे, गुन्हा दाखल होताच डॉ. योगेश निघुते यांना पोलिस ताब्यात घेतली. अशा प्रकारची परिस्थिती होती. मात्र, झालं काय? जेव्हा गुन्हा दाखल झाला. तेव्हा मात्र, डॉ. निघुते हे परागंदा झालेले होते. तेथेच यंत्रणेवर नातेवाईकांनी अविश्वास व्यक्त केला होता. खरंतर, नगर शहरात जेव्हा डॉ. शेळके यांच्या पत्नीने त्यांच्या राहत्या घराहून उडी मारुन आत्महत्या केली. तेव्हा तिचे धुळ्याचे पालक यांनी अशाच प्रकारे कलम 306 दाखल केला होता. तेव्हा मात्र, पोलिसांनी त्यास पकडण्यास जंग-जंग पछाडले होते. माग डॉ. निघुते यांच्यावर वर्दी इतकी मेहरबान का? हे अद्याप समजले नाही. म्हणजे, कलम 498 सारख्या गुन्ह्यत जे निर्देश आहेत. तेच कलम 306 ला पोलिसांनी लागू केले. तर, एक जीव जाऊन देखील अशा गुन्ह्यात वेटेज राहील का काही?

एकीकडे संगमनेर जिल्हा रुग्णालयाची देखील यात फजिती झाल्याचे दिसते आहे. कारण, जेव्हा डॉ. पुनम यांनी आत्महत्या केल्यानंतर जेव्हा त्यांचे शवविच्छेदन करायचे होते. तेव्हा, मयताच्या नातेवाईकांनी थेट रुग्णालयावर अविश्वास व्यक्त केला. म्हणजे, येथे काय गौडबंगाल चालते. याची कदाचित त्यांना माहिती असावी. त्यामुळे, त्यांनी संगमनेर येथे शवविच्छेदन करण्यास साफ नकार दिला. हे खर्‍या अर्थाने संगमनेर प्रशासकीय यंत्रणेचे दुसरे अपयश होते. आरोग्य खाते ही देखील एक प्रशासकीय यंत्रणा असून तेथे आपल्याला न्याय मिळू शकत नाही. ही माहिती जालन्याचे लोक व्यक्त करतात आणि मृतदेह औरंगाबाद देखील घाटी रुग्णालयात नेतात. हे दुर्दैवच आहे. मात्र, तरी देखील बरं झालं.! तो घातपात असल्याचे घाटी रुग्णालयातून समजले. अन्यथा संशयाचे खापर येथील डॉक्टरांच्या माथी फुटले असते.

आता हा शंकेचा धागा येथीच थांबला नाही. तर, जेव्हा डॉ. योगेश निघुते यांनी अ‍ॅड. अतुल आंधळे यांच्या मार्फत जामीन टाकला. तेव्हा, सरकारी वकीलावर शंकेची कुर्‍हाड उगारली गेली. अर्थात काही भूमिका शंकास्पद असल्याने वादाचे मुद्दे उपस्थित होतात. त्यामुळे, राज्यात असे अनेकदा झाले आहे की, जेव्हा एखाद्या वकीलावर अक्षेप घेतला तर त्याला बदलण्याची वेळ देखील येते. इतकेच काय.! फिर्यादी हे न्यायालय देखील बदलण्याची मागणी करु शकतात. कारण, अशोक लांडे खून खटल्यात फिर्यादी शंकर राऊत यांनी नगर न्यायालय बदलवून नाशिक न्यायालय घेतले होते. त्यात कोतकर कुटुंबातील चौघांना जन्मठेप झाली होती. त्यामुळे, हा तर केवळ वकीलांवर अक्षेप आहे. फक्त ती मागणी न्यायालयाकडे न करता त्यांनी जिल्हा सरकारी वकील यांच्याकडे करणे अपेक्षित होते. त्यामुळे, उच्च न्यायालयातील वकीलास देखील टिकेचा धनी व्हावे लागले आहे. 

एकंदर, पोलिसांची भूमीका यात महत्वाची आहे. त्यांनी जर कागदावर बोट ठेवले तर पुढे काय होणार आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, एका डॉक्टरचा जीव गेला आहे. यात 498 (अ), 304 (ब), 306 अशी गंभीर कलमे आहेत. एकीकडे पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे कागदपत्रे रंगविण्यात फार माहिर आहेत. त्यामुळे ते येणार्‍या 18 सप्टेंबर पर्यंत काय करतात हे पाहणे महत्वाचे आहे. यात काही झाले तरी जर राजकीय आणि वरिष्ठांचा दबाव आला तर हे प्रकरण काय वळण घेईल. हे सांगता येत नाही. कारण, तसेही ही घटना घडल्यानंतर या प्रकरणात खूप काही घडमोडी घडून गेल्या आहेत. ज्याच्या संगमनेरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे, अंतीम क्षणी, सरकारी पक्षाचा युक्तीवाद आणि पोलिसांनी (आयओ) मांडलेली बाजू. यावर खूप काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे, हे प्रकरण अजून किती वळण घेतय. याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे.