संगमनेरात राष्ट्रवादीच्या पवार साहेबांना दंड.! मास्क न वापरल्याने महिला पोलीस अधिकार्‍याशी हुज्जत, दंड करुन डायरीला नोंद.!



सार्वभौम (संगमनेर) :-

                   कायदे हे पोलिसांसाठी नव्हे.! तर नागरिकांसाठी बनविलेले असतात. त्यात सामान्य माणुसच नव्हे.! तर पुढारी आणि नेते मंडळी देखील येतात हे बडे-बडे पदाधिकारी विसरुन गेले आहेत. कारण, काल संगमनेर बस स्थानक परिसरात राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार यांची नियमांचे उल्लंघन केले आणि तेथून मोठा वाद उभा राहिला. बोलबोल करता यांच्यात चांगलीच शब्दीक वाकयुद्ध रंगल. मात्र, रिशेला पेटलेल्या सपोनी कोकाटे यांनी थेट दोनशे रुपयांची पावती फाडून त्यांना कायद्याची भाषा शिकविली. आता पद म्हटल्यानंतर ना साहेब गप्प राहणार आणि वर्दी म्हटल्यानंतर ना मॅडम गप्प राहणार. त्यामुळे, यांच्या बाचाबाचीत अनेकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धा तास चाललेला हा वाद अखेर पोलीस निरीक्षक देशमुख यांची गाडी आल्यानंतर शमला. मात्र, या सर्व घटनेची कोकाटे यांनी स्टेशन डायरीला नोंद ओढली आहे.

त्याचे झाले असे की, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमरास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार हे संगमनेर बस स्थानकाच्या समोरून नाशिक रोडकडे चालले होते. त्यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे यांचे पथक हे अधिकार्‍यांनी नेमून दिलेल्या पावत्यांची पुर्तता करीत होते. विनामास्क दिसेल त्याची पावती करणे, जो पळुन जाण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या गाडीची चावी काढणे अशा प्रकारे त्यांचा शासकीय कार्यक्रम सुरू होता. या दरम्यान एका व्यक्तीच्या गाडीची चावी त्यांनी काढल्यामुळे, नुकताच वाद सुरू होता. यावेळी एक पत्रकार हे चित्रीकरण करीत असता त्याने काही प्रश्न देखील विचारले. मात्र, मॅडम त्यांचे कायदेशीर काम करत राहिल्या.

याच दरम्यान, तेथे कपील पवार हे त्यांच्या काहीतरी महत्वाच्या कामानिमित्त चालले होते. मात्र, मॅडमने त्यांना अडविले आणि मास्क कोठे आहे? अशी विचारणा केली. वास्तवत: हे प्रकरण जाग्यावर मिटले असते. मात्र, दुर्दैवाने तेथे सोशल मीडियाचे काही माध्यमे उपस्थित असल्यामुळे, आता हा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता.  मॅडमचा स्वभाव असा आणि साहेबांची स्वभाव तसा, त्यात समोर कॅमेरा सुरू होता. त्यामुळे, आता मॅडमने त्यांना सोडले तर पुढारी आणि नेते आहेत म्हणून सोडले. मग ही कारवाई फक्त सामान्य मानसांवरच का? असा प्रश्न उद्या माध्यमांनीच उपस्थित केला असता. त्यामुळे, धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय, परिणामी, कोकाटे यांनी त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली.

खरंतर, मॅटर फार शुल्लक होता. मात्र, आ, देखे जरा, किसमे कितना हैं दम.! असा प्रकार येथे पहायला मिळाला. जर, कपील पवार यांनी तत्काळ स्वत:ची ओळख सांगितली असती तर कदाचित हा प्रकार इतक्या टोकाला गेला नसता. तर दुसरीकडे मॅडम यांनी देखील थोडा अजून समजुतदारपणा घेतला असता तर ही वेळ आली नसती. खरंतर पवार यांनी स्वत:ची गाडी बाजुला लावून दिली होती. पोलीस जी काही पावती करणार होते. ती देखील त्यांना मान्य होती. तोंडाला मास्क नव्हते, घाईत ते विसरून गेले. हे देखील त्यांनी मान्य केले होते. मात्र, दोघांच्या पदामुळे आणि शुल्लक बाचाबाचीतून हा प्रकार अधिक वाढत गेला. तो इतका की, अखेर वेळ हमरी तुमरीवर येऊन ठेपली.

एका बड्या पदाधिकार्‍याची व पोलिसांची ही झुंबड पाहण्यासाठी जवळ-जवळ शेकडो लोक जमा झाले होते. त्यामुळे, वाहतुकीचे नियमन करणार्‍या व्यक्तींमुळेच वाहतुकीची कोंडी झालेेली पाहायला मिळाली. काही वेळानंतर पवार यांनी त्यांची रितसर पावती घेतली आणि चर्चा सुरू होती तेच पोलीस निरीक्षक यांनी गाडी तेथे उशिरा हजर झाली. तोवर पवार  हे काही अंतरावर मित्रांच्या दुकानावर जाऊन उभे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दोन्ही गटांच्या बाजु ऐकूण घेतल्या आणि ते तेथून निघून गेले. मात्र, बराच वेळ तेथे अल्प तणावाचे वातावरण कायम होते. या दरम्यानच्या काळात अनेक व्यक्ती तेथून विनामास्क निघून गेले. म्हणजे, एका व्यक्तीला पकडले खरे.! मात्र, त्यानंतर अनेकांना मोकळीक मिळून गेली. त्यानंतर कोकाटे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार कागदावर घेतल्याची मिंहती सुत्रांनी दिली.

दरम्यान, पोलिसांचा दुटप्पीपणा संगमनेरात पहायला मिळत आहे. दिल्लीनाका येथे पोलिसांना मार खावा लागला होता. त्यामुळे, अद्याप पोलिसांनी तेथे कधी पावती फाडण्याचे धाडस केले नाही. मात्र, हेच पोलीस शहरात कारवाई करण्यासाठी किती सरसावतात हे चुक की बरोबर हा प्रश्न स्थानिक व्यक्तींनी उपस्थित केला आहे. एकीकडे संगमनेर पोलीस ठाण्यात बहुतांशी कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत. अधिकार्‍यांचा जाच आणि वारंवार कायद्यावर बोट ठेवणे. हे अनेकांना जड-जड वाटू लागले आहे. त्यामुळे, अनेक जणांनी पोलीस ठाण्यातून बदली करुन जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकंदर, आज ज्या पद्धतीने कोकाटे यांनी निर्भिडपणे कारवाई केली. त्यास दाद द्यावी लागेल. मात्र, कपील पवार हे फार स्पोटक व्यक्तीमत्व नसून शांत व संयमी आहेत. त्यांचा स्वभाव देखील भांडखोर नसून विनम्र आहे. त्यामुळे, अशा प्रकारचे वाद पोलिसांनी देखील टाळले पाहिजे. तर, हीच घटना नव्हे.! राज्यभरात देखील पुढार्‍यांनी नियमांचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया संगमनेरात उमटत होत्या.