आई बाळासाठी बिबट्याशी झुंजली.! तिचे रौद्ररुप पाहुन बिबट्या पळाला.! काळीज गलबलविणारा एक थरार.!
सार्वभौम (संगमनेर/अकोले) :-
अकोले आणि संगमनेर तालुक्यात बिबट्यांनी आता हैदोस घातला आहे. भर दिवसा गावात प्रवेश करणे, सरकारी कार्यालये आणि वाडी वस्तीत घुसून मानसे व जनावरे यांच्यावर हल्ले करणे. हा फार मोठा अतिरेख होऊ लागला आहे. यात वन विभाग मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असून आम्ही काय करु शकतो अशा प्रकारची उत्तरे देत आहेत. अकोले तालुक्यातील आंबड येथे एका व्यक्तीचा जीव घेतल्यानंतर आता धंदरफळ खुर्द मधील माणकेश्वर मळ्यात अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. त्याची आई कविता ही बिबट्यावर काठी घेऊन धावली म्हणून जिवाचा आकांताने तो पुन्हा मकेच्या शेतात पळाला. त्यामुळे, या बालकाचा जीव वाचला. तरी देखील वाघाच्या जबड्यात सापडलेल्या बाळाला दात आणि नख्या लागल्या असून त्यास संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी पाटोळे यांनी तत्काळ पिंजरा लावला आहे.
राजे छत्रपती शिवरायांच्या काळात सन 1674 साली हिरकणी नावाची महिला 4 हजार 400 फुट उंच असलेला रायगडाचा कडा उतरुण खाली आली होती. म्हणजे जेथे वारा सोडता चिटपाखरु देखील फिरकणार नाही. अशा कड्याहून हिरकणी उतरली होती. का? तर आपल्या पोटचा गोळा घरी तिची वाट पाहत होता. राज्यांच्या आदेशाने रायगडाची दारं बंद झाली आणि त्यानंतर या महिलेच्या मातृत्वाने जन्म घेतला. त्यामुळे, आईचे महात्म्य आणि लेकरासाठी तिळतिळ तुटणारा जीव या प्रेमाची तुलना अगदी कशातच होऊ शकत नाही. अशाच एका मातृत्वाचे दर्शन धांदरफळ येथे पहायला मिळाले आहे.
त्याचे झाले असे की, धांदरफळ येथे कविता ताई या आपल्या घराजवळच अवघ्या काही अंतरावर जनावरांसाठी घास कापत होत्या. तर दुसरीकडे अजोबा बबनराव हे शेळ्यांच्या कळपात स्वच्छतेचे काम करीत होते. तोच सागर खताळ यांचा मुलगा शिवराज हा अजोबांकडून आपल्या आईकडे शेतात चालला होता. या दोघांमधील अंतर हे अवघ्या काही फुटांचे होते. त्यामुळे, या परिसरात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास असे काही अघटीत घडेल अशी कोणाच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. आई सविता ह्या शेतात घास कापत होत्या त्यांच्या जवळच मका लावलेली होती. त्यात हा बिबट्या दबा धरुन बसला होता. मात्र, त्याची चाहुल कोणाला लागली नाही.
दरम्यान, सविताबाई ह्या त्यांच्या कामात व्यस्त असताना त्यांचा मुलगा शिवराज हा त्यांच्याकडे येत होता. त्या क्षणी डोळ्याचे पाते लावते ना लावते तोच बिबट्या मकेतून आला आणि त्याने शिवराजवर झडप मारली. काही क्षणात त्याचा आवाज आईच्या कानावर पडला आणि त्यानी वळून पाहिले तर बिबट्या बाळावर तुटून पडला होता. त्या आईने एकच किंकाळी फोडली आणि स्वत:च्या जिवाचा विचार न करता ती बिबट्यावर चाल करुन गेली. मला मरण आले तरी बेहत्तर पण, माझ्या लेकराला काही होता कामा नये. अशी प्रत्येक आईची धारण असते. तर नाकात पाणी गेल्यानंतर माकडीन देखील डोक्यावरच्या पिलाला पायाखाली घेते अशी देखील जुनी म्हण आहे. मात्र, सविता ताई ह्या त्या हिरकणी प्रमाणे बिबट्यावर धावून गेल्या. स्वत:चे काय होईल याची पर्वा त्यांनी केली नाही. एका काठीच्या सहाय्याने त्यांनी बिबट्यावर हल्ला केला. त्या मातृत्वाच्या धैर्यापुढे बिबट्या देखील नामोहरम ठरला.
अखेर, सायंकाळी गडात पडण्याच्या वेळी घडलेला हा प्रसंग परिसरात भितीचे वातावरण निर्माण करुन गेला. आईच्या त्या किंकाळीने संपुर्ण धांदरफळ परिसत काही क्षणात भयवाह परिस्थिती उभी राहिली होती. बिबट्या आणि एका आईचा थरार अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. बोलबोल करता अनेक पुरुष मंडळी तेथे जमा झाली. त्यांनी शिवराज यास तत्काळ संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यास योग्यवेळी उपचार मिळाल्याने तुर्तास त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्या परिसरात भितीचे वातावरण कायम होते. त्यामुळे, वन विभागाचे अधिकारी पाटोळे यांनी तत्काळ माणकेश्वर मळ्यात पिंजरा लावला होता. मात्र, दुर्दैवाने याच परिसरात शेळ्या, कालवडी, कुत्रे हे बिबट्याची शिकार बनले आहेत. तेथील कॅनॉल परिसरात वन विभागाने तीन वेळा पिंजरा लावला होता. मात्र, त्यात कुत्रं देखील अडकले नाही. लोकांचा जीव घेतल्यानंतर बिबट्या पकडण्यात प्रशासनाला यश येणार आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यात देखील बिबट्यांची धुमाकुळ सुरू आहे. गेल्या महिन्यात आंबड येथे एका तरुणाचा अक्षरश: बिबट्याने बळी घेतला. त्या पाठोपाठ काही किरकोळ हल्ले देखील झाले. बिबट्याने गावं आणि वाड्या वस्त्याच नव्हे.! तर चक्क अकोले शहरातील पंचायत समितीत देखील प्रवेश केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, अजून आता भर दिवसा बिबट्या शहरात फिरावा अशी इच्छा वन विभागाची आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागल आहे. तसेच अकोले तालुक्यातील गणोरे व डोंगरगाव येथे देखील बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. अगदी दोन दिवसांपुर्वी बिबट्या भास्कर सहाणे यांच्या पडवित येऊन त्याने भक्षाचा शोध घेतला. मात्र, सुदैवाने तेव्हा कोणी बाहेर नव्हते. त्यामुळे, काही अनर्थ घडला नाही. मात्र, सकाळीच लोक दुध घालण्यासाठी येतात, त्यांना रोज बिबट्याचे दर्शन होत आहे. तर अकोले तालुक्यातील माळेझाप, औरंगपूर आणि उंचखडक या परिसरात देखील बिबट्याचे राजरोस दर्शन घडत आहे. त्यामुळे, वेळीच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.