तुला तलाठी करतो असे म्हणत 18 लाख 50 हजारांना गंडा घातला.! संगमनेरच्या आरोपींची अकोल्यात टोळी.!

सार्वभौम (अकोले) :-

                   तलाठी म्हणून कामाला लावतो, शेतकर्‍यांना दुग्ध प्रकल्प टाकून देतो, सबसिडी मिळवून देतो असे म्हणत सामान्य व्यक्तींना फसविणार्‍या एका टोळीस अकोले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका व्यक्तीला तलाठी करण्याची आमिष दाखवून या टोळीने तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी शेखर नंदु वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात विजयकुमार श्रीपत पाटील व नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पुढील चौकशीसाठी 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हापासून अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. भाजपने रोजगाराचे जे आश्वासन दिले होते. ते मातीत मिळाल्याने तरुण नोकरीसाठी वाट्टेल ते करण्यास तयार आहेत. असाच एक फंडा अकोल्यातील तरुणाने केला होता. तो असा की, शेखर वाघमारे या तरुणाला सरकारी कर्मचारी त्यात तलाठी होण्याची इच्छा होती. या दरम्यान, कोणीतरी एकाने सांगितले की, सरकारी नोकरी हवी असेल तर एका व्यक्तीला काही रक्कम दिल्यास तो तलाठ्याची नोकरी देतो.

दरम्यान, पडत्या काळात कामधंदा हवा म्हणून वाघमारे याने विजयकुमार पाटील आणि नितीन जोंधळे अशा दोघांना काही रक्कम अदा केली. त्यानंतर आपली ऑर्डर निघेल या अपेक्षेने तो वाट पाहत राहिला. मात्र, या दलाल लुटारुंनी त्याच्याशी पुन्हा संपर्क केला आणि अगाऊ रकमेची मागणी केली. आता गुतली गाय आणि फटके खाय.! या पलिकडे कोणताही पर्याय वाघमारे याच्याकडे राहिला नव्हता. त्याने इतकडे तिकडे पैशाची जुळवाजुळव करुन या दोघांना पुन्हा पैसे दिले. आता मात्र, परिस्थिती नसताना देखील जी रक्कम गेली. त्याला पर्याय राहिला नव्हता.

बराच कालावधी निघुन गेला तरी या दोघांकडून कोणत्याही प्रकारची ऑर्डर हातात मिळत नव्हती. मात्र, या दोघांनी त्याला एक खोटे नियुक्तपत्र दाखवून त्याचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे, हे सांगतील तेव्हा वाघमारे त्यांना बँकेद्वारे व्यवहार करीत राहिला. दोन वेळा पैसे देऊन देखील काम झाले नाही. तेव्हा पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे, चक्क वाघमारे आता जाळ्यात अडकले होते. पैसा गेला, ऑर्डर नाही, नोकरी नाही, विश्वास नाही. त्यामुळे, फिर्यादी याने आरोपी दोघांकडे त्याने दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, आज उद्या कामाला लावतो असे म्हणून दोघांनी वाघमारे यास उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. वेळोवेळी आरोपींनी त्याच्याकडून 18 लाख 47 हजार 700 रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, जेव्हा आपली फसवणुक झाली आहे. हे लक्षात आले. तेव्हा त्याने आरोपी पाटील व जोंधळे या दोघांकडे पैशाची मागणी केली. तेव्हा आरोपी यांनी त्यास शिवीगाळ, दमदाटी केली. आपण फार मोठ्या जाळ्यात अडकलो आहोत हे वाघमारेच्या लक्षात येताच त्याने थेट अकोले पोलीस ठाणे गाठले. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना भेटून सर्व हकीगत त्यांना कथन केली. घुगे यांनी थेट गुन्हा दाखल केला आणि त्यांचे एक पथक थेट पुण्याला रावाणा केली. त्यांनी पाटील व जोंधळे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर, सातारा, नगर, अकोले अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून एक गोष्ट लक्षात आली आहे की, नोकरी लावतो, आढीव भाव देतो, कामाला लावतो, असे नाना प्रलोभने दाखवून काही लोक सामान्य नागरिकांची फसवणुक करीत आहेत. अशा प्रकारच्या टोळ्या त्यांच्या आर्थिक हितासाठी सामजात कार्यरत आहेत. त्यामुळे, त्यांच्या अश्वासनाला बळी पडू नका. कोणाला पैशांची देवाणघेवाण करु नका. जर गेल्या काही दिवसात आपल्याबाबत असे काही झाले असेल तर पोलिसांशी संपर्क करा. मात्र, नोकरी, गुंतवणुक, मान्यता, प्रकरणे यांसाठी कोणी कोणाला पैसे देऊन स्वत:ची फसवणुक करुन घेऊ नका.

- मिथुन घुगे (सपोनी अकोले)