पोलिसांना गुटखा देऊन चोर पोलीस ठाण्यातून पळुन गेला.! सकाळपासून तो सोबत फिरला आणि....!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात अन्न व औषध विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. यात 1 लाख 13 हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला होता. चांगली मोठी कारवाई झाली असे कौतुक होत असताना या गुन्ह्यातील आरोपी हा पोलीस ठाण्यात आणला असता तो भर दिवसा पोलीस ठाण्यातून पळुन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता एकीकडे पोलिसांना हे धंदे दिसून येत नाही, तर दुसरीकडे अन्न व औषध विभागाने कधीनवद अशी कारवाई केली, त्यात पोलीस ठाण्यातून आरोपी पळून जातो. म्हणजे याला नेमकी म्हणावं तरी काय? त्यामुळे, हा आरोपी गेला तरी कसा? की याला कोणी पळवून लावले? अशा प्रकारची उलटसुलट चर्चा संगमनेर तालुक्यात अगदी वार्यासारखी पसरली होती. आता आरोपी नरेश रामदास पगडाल (रा. पद्मनगर, मालदाड रोड, संगमनेर) याला कोणी पकडेल का? त्याबाबत कागद रंगविले जातील का? की अटक नव्हता म्हणून सगळेच हात वर करतील? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संगमनेर पोलिस ठाण्याला संकटांचे ग्रहण लागले आहे. कधी पोलीस कोरोना पॉझिटीव्ह होत आहे तर कधी आरोपी, कधी पोलिसांना मारहाण होत आहे तर कधी धमक्या दिल्या जात आहे. कोणावर अॅन्टी करप्शनची धाड पडत आहे तर कोणावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता तर भर दिवसा पोलीस ठाण्यातून आरोपीच पळून गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, एकीकडे पोलिस ठाण्यात कर्मचार्यांना शिस्तीचे धडे देणारे अधिकारी देशमुख यांच्या पोलीस ठाण्यातून आरोपी अगदी सहज निघून जातो.! हे अनेकांना न पटण्याजोगे आहे. त्यामुळे, आता या घटनेत नेमकी कोणाचा बळी जातो की, तो आमच्याकडे नव्हताच असे म्हणत वर हात केले जातात हे पाहणे महत्वाचे आहे.
संगमनेर म्हटलं की आजकाल येथे असे काही घडू शकत नाही. असे म्हणण्याची हिंमत देखील कोणी करु शकत नाही. कारण, युपी, बिहार मध्ये घडू शकते ते येथे ऐकायला मिळत आहे. आहो.! येथे लॉकडाऊन उठतो कोठे नाहीतर देहविक्री व्यावसाय सुरू झाला. त्यात अकोल्यातील काही तरुण अगदी उध्वस्त झाले आहेत. याच कारणामुळे, अगदी तीन दिवसांपुर्वी एका तरुणाला त्याच्या पालकांनी बेदम मारहाण केली. म्हणजे, तालुका सोडून रात्री अपरात्री संगमनेरात हव्या त्या सुविधा अवैध मार्गाने मिळू लागल्या आहेत. म्हणून तर येथे येणारे अधिकारी रग्गड मलिदा खातात आणि बदली झाली तरी जाण्याचे नाव देखील घेत नाहीत. त्यामुळे, राज्यात गाजलेले संगमनेरी कत्तलखाने, कसरवाडीचा नावाजलेला गांजा, निमगावचा प्रसिद्ध गुटखा असे काय-काय प्रसिद्ध नाही. त्यात भर पडली मार खाणारे पोलीस आणि कोविड पॉझिटीव्हची आभाळाला भिडलेली आकडेवारी.! त्यामुळे, पुर्वी म्हणायचे पुणे तेथे काय उणे.! आता म्हणतात राज्यात भारी, संगमनेरची दस नंबरी.!
संगमनेरात अवैध धंदे जोरात सुरू असताना महसुल आणि पोलीस इतकी बघ्याची भूमीका का घेतात आता हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. वाळुचा अवैध होणारा उपसा दोन्ही विभागांच्या आशिर्वादाने चालतो, असे पर्यावरण प्रेमी सांगतात. म्हणून तर नदीत उतरुन त्यांनी प्रवरामाईला कवटाळून त्यांनी आंदोलन केले. हे वाळुतस्कार कोणाचे वळु आहेत? तर अर्थातच राजकीय आश्रयाखाली आणि प्रशासनाच्या सावलीखाली यांचे धंदे भर दिवसा बोकाळले आहेत. म्हणून तर नाममात्र कारवाया करायच्या आणि आम्ही कार्यक्षम असल्याचे दाखवायचे, मात्र हा घाव घालायचा कोणावर? तर जे मलिदा पोहच करीत नाहीत. म्हणून तर भर दिवसा पोलीस ठाणे आणि महसुलच्या आवारातून गुन्ह्यातील ट्रॅक्टर चोरी जातात तर कधी चांगले ट्रॅक्टर नेऊन खटारा ट्रॅक्टर तेथे आणून लावले जातात. यासाठी प्रशासनातलेच लोक त्यांना मदत करीत असल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, होणार काय? हे सगळे एकाच माळेचे मनी.!
आत तुम्हीच पहा ना, पहाटपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. तेव्हापासून तो आरोपी त्यांच्यासोबत होता. सगळी चौकशी झाली, गुन्हा दाखल करायला त्यास आणले गेले. मात्र, पोलीस ठाण्यातून हा बहाद्दर कोणी गायब केला की काढून दिला. हेच काळायला तयार नाही. हा आरोपी गेला कसा? याबाबत अनेकांना साशंकता आहे. नेमकी गुटखा प्रकरणातलाच का? यापुर्वी याच गुटख्याहुन श्रीरामपूर येथे गुटखापुरान घडले. यात संगमनेरचे पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, पुढे काय झाले हे सर्वश्रूत आहे. आता हा आरोपी पळाला खरा. मात्र, याची चौकशी करता-करता त्याला जामीन मिळाला नाही तर बरे.! कारण, मदने यांची स्टाईलच कायम चौकशीवर अशी आहे. कारण, राजूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीची व्हायरल रेकॉर्डींग चौकशी सुरू आहे. आता तो पोलीस 30 तारखेला रिटायर होईल. माग यांची चौकशी पुर्ण होईल का? असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि काही संघटनांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करावी अशी मागणी त्यांच्याकडेच एका संघटनेने केली आहे. मात्र, अद्याप प्रकरण चौकशीवर आहे. आता गुन्ह्यातील नरेश पगडाल पळाला खरा. मात्र, तो पोलिसांच्या ताब्यातच नव्हता, त्याची स्टेशन डायरीला ऐन्टीट्रीच नव्हती, तो पोलीस ठाण्यात आलाच नव्हता, आम्हाला त्याबाबत काही माहितीच नाही. अशा प्रकारची उत्तरे समोर येतील. तसेही संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी रात्री 9:30 वाजता सांगितले की, मला त्याबाबत काही माहिती नाही. घ्या आता.! अशा गुन्ह्यात जामीन मिळून जातो. हे पोलिसांना देखील माहिती आहे. त्यामुळे, तपास सुरू आहे, या पलिकडे शब्द नाही....!