अकोल्यात राजकीय नंगानाच.! राष्ट्रवादीचे पायतान पायात राहिले नाही.! यांनी ऐकमेकांना भिडावं हेच भाजपला वाटत.! मग यावर फक्त हीच पर्याय.!

 

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                              अकोले तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस गडूळ होत चालले आहे. सन २०१९ साली पिचडांचा एक पक्षप्रवेश होतो काय आणि तालुक्याच्या परिवर्तनाची पहाट उजडतेय काय.! यात गेल्या ४० वर्षात तालुक्याचे वाटोळे झाले की चांगले, यावर बोलण्यात आता कोणाला स्वारस्य राहिले नाही. मात्र, भुतकाळाच्या पडद्यावर वार करताना भविष्यकाळ देखील रक्तभंबाळ होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण, आमदारकीनंतर येथील राजकारण हे तालुक्यात मोठ्या संघर्षाने उभा राहिलेल्या साखर कारखान्यावर येऊन ठेपले आहे. एकीकडे दशरथ सावंत व बी. जे. देशमुख, दुसरीकडे माजी मंत्री मधुकर पिचड, तिसरीकडे सिताराम पाटील गायकर, चौथीकडे आमदारांचे कार्यकर्ते आणि पाचविकडे मधुकर नवले, अशोक भांगरे यांच्यासह डॉ. अजित नवले, विजय वाकचौरे आणि विखे गटाचे विकास वाकचौरेंसह अन्य नेते. या सगळ्यांनीच खेचाखेची सुरु केली आहे. या सगळ्यात शेतकरी, कर्मचारी आणि तालुक्याच्या अस्मितेला तडा जायला नको. हेच महत्वाचे साकडे सामान्य माणूस या राजकारण्यांना घालत आहे. या सगळ्या आखाड्यात राष्ट्रवादी पक्षाचे "पायतान मात्र पायात" दिसत नाहीत. त्यांनी एक अजेंडा निच्छित करुन "एक नेता" निर्धारीत केला पाहिजे. ही जबाबदारी स्थानिक नेत्यांवर न सोडता स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लक्ष घालून तिढा सोडविला पाहिजे. तरच शाश्वती आहे. अन्यथा या सगळ्यांच्या वादात कारखाना बंद पडला तर भाजपवाल्यांना त्याचे राजकीय भांडवल होईल आणि नहाक पवार साहेबांच्या भरोशावर येथे राष्ट्रवादीचा आमदार दिला असा पश्चाताप व्हायला नको, म्हणजे झालं.! त्यामुळे, पवार साहेब.! देर सही, लेकीन दुरुस्त आऐं.! हे तुम्हीच समजून घ्या.

              भाऊ.! सत्तेपुढे शहानपण चालत नाही. त्यामुळे, सत्ता नाही तर सगळे नेते पिचडांच्या विरोधात उतरले. त्यात राज्यात भाजप पायऊतार झाले त्यामुळे पिचडांसाठी आणखीच "दुष्काळात तेरावा महिना", अशा विपक्ष परिस्थितीत राष्ट्रवादीने येथे जो जम बसवायला पाहिजे होता. तो काही त्यांना बसविता आला नाही. येथील तालुकाध्यक्ष बारामतीहून, युवक अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पाहुणा म्हणजे जे वाटप केलं, त्याला मिरीट काय? तर शुन्य.! परिणामी ना येथे संघटन उभे राहिले, ना कोणती संस्था ताब्यात घेता आली. एकटे आमदार मात्र पायपिट करीत सगळ्या कोविडच्या काळात भिरभिरा फिरत होते. दुर्दैवाने येथे बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते साडले तर संघटन तितकेच झाले, जितकी पदं वाटली. त्यानंतर राष्ट्रवादीला आमदारकीच्या काळात स्थापन केलेल्या समन्वय समितीत देखील समन्वय ठेवता आला नाही. म्हणजे, पवार साहेबांनी एकास एक करण्यासाठी जो एक विचार उभा केला. त्या एक विचाराने पुढे एकही विचार घेतला गेला नाही. म्हणून तर राष्ट्रवादीतच गटा-तटाचे राजकारण सुरु झाले. होय.! हे तितकेच खरे आहे की, डॉ. किरण लहामटे यांना पक्षाच्या संघटनाचे नियोजन करता आले नाही. "ऐकला चलो रे"! या वाक्याचे त्यांनी तंतोतंत पालन केले. तर, जवळ इतके चुगलीखोर लोकांचे वर्तुळ तयार केले की, याची त्याची जिरवा-जिरवी साहेबांकडून काढून घेण्यात ही चांडाळ चौकट रममान झाली. खरंतर साहेबांना हे कोणीतरी सांगितले पाहिजे की, "शंभर कौरवांना मार्गदर्शन करणारा एकच "शकुनिमामा" चुकीचा होता. परिणामी सगळे "हस्तिनापुरचे साम्राज्य" त्यांना गमवावे लागले होते. तर, अवघ्या "पाच पांडवांना" मार्गदर्शन करणारा एकच "श्रीकृष्ण" होता. परिणामी गेलेलं सगळं हस्तिनापूर साम्राज्य पुन्हा मिळाले होते." त्यामुळे, कोण 'शकुनी' मामा आणि कोण 'श्रीकृष्ण' हे डॉ. किरण लहामटे यांनी समजून घेतले पाहिजे. कारण, या सगळ्यात संतोष नाईकवाडी यांच्यासारखे कर्णासम अनेक कार्यकर्ते निष्ठूर कौरवांत राहुन मरायला नको. हेच महत्वाचे. ज्या दिवशी साहेबांना हा राजकीय सारिपाठ लक्षात येईल तेव्हाच त्यांना पुन्हा आमदार होता येईल. अन्यथा प्रत्येक वेळी नशिब साथ देते असे नाही. या "दिवास्वप्नातून" बाहेर येणे नित्तांत गरजेचे आहे.

                  आता राजकारणाच्या मुळ मुद्द्यावर येऊयात. अकोले तालुक्यात पिचड यांना "नामोहरम" करण्यासाठी अजित दादांनी सिताराम पाटील गायकर यांच्या डोक्यावर पुन्हा हात ठेवला. कारण, राजकारण हे फार संयमी असते हे उताविळ लोकांच्या समजण्यापलिकडचे आहे. त्यामुळे, येथील सहकार ताब्यात घेऊन शरद पवार साहेबांना एकटं पाडणाऱ्या पिचड साहेबांना एकटं पाडण्यासाठी दादांनी गायकर पाटील तालुक्यात सक्रिय केले. त्यांच्या पाठोपाठ ८० टक्के संचालक आणि बहुजन समाज पुन्हा राष्ट्रवादीत चालता झाला. परंतु, दुर्दैव असे की, त्यांच्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांनी नव्हे पण बी.जे. देशमुख यांनी टिकेची झोड उठावली. ते कोणाचे नाव घेऊन.? तर पवार साहेब आणि अजित दादांचे. आता पहा ही गंमत, देशमुखांचा विरोध कोणाला? तर ज्या दादांनी तालुक्याचा सहकार ताब्यात घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली त्या गायकर साहेबांना. म्हणजे, दोघांचा मार्गदर्शक एकच. मग ही लढाई कोणासाठी आणि कशासाठी? जरी गायकर पाटील हे कारखाण्यात पिचड यांच्यासोबत सोबत असले तरी त्यांनी पिचडांना लगेच विरोध करायचा का? तर याला काही उच्च पातळीचे राजकारण म्हणता येत नाही. कारण, जिल्हा परिषदेत कैलास वाकचौरे हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. तालुक्यात ते राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सोडा, कार्यकर्त्यांच्या तोंडाकडे देखील पहात नाहीत. राजरोस ते पिचड साहेबांच्या मांडिला मांडी आणि खाद्याला खांदा लावून काम करतात. मग, त्यांची पवार साहेबांनी गटनेते पदाहून हकालपट्टी केली का? तर बिल्कूल नाही. हे संयमाचे राजकारण आहे. वेळ आल्यानंतर पवारांनी गायकर पाटील यांना त्यांची चुक दाखवून दिली आणि पाटील पुन्हा राष्ट्रवादीत आले. हे संयमी राजकारण असते. फाईल उघडू का ? किंवा इडीची नोटीस पाठवू का ? असे म्हणणार्या भाजपचे काय झाले हे आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे, जोवर कारखान्याची निवडणूक लागत नाही. तोवर कारखान्यात कोणत्याही प्रकारचा खोडा न घालता तो चालला पाहिजे ही भूमिका गायकर पाटलांची आहे. मात्र, ते पिचडांसोबत कारखान्यात हितगुज करतात हे लोकांना खटकते. त्यावरच पुढे तर्क वितर्काचे राजकारण उभे केले जाते.

                आता, तालुक्यात झालेय असे की, भाजप राहिली बाजूला आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेतेच एकमेकांना गेंड्यासारखे भिडले आहेत. गेल्या ४० वर्षात जे पहात आलोय त्याचीच ही पुनरावृत्ती आज होत आहे. मात्र, दुर्दैवाने आजवर जे लोक "राजकीय शहानपण" शिकवत आले आहेत, तेच वेड्यासारखे वागताना दिसत आहे. त्यामुळे, यांच्याकडून येणाऱ्या पिढीने काय घ्यावे आणि लोकांनी का पुन्हा राष्ट्रवादीला मतदान करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, गायकर पाटील राष्ट्रवादीेचे, आमदार राष्ट्रवादीेचे, बी.जे. देशमुख राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादीच्या आमदाराला सपोर्ट करणारे ज्येष्ठ नेते हे सावंत साहेब. मग ही लढाई नेमकी कोणाची आणि कोणाच्या विरोधात सुरु आहे. म्हणजे,  राष्ट्रवादीचेच पायतान राष्ट्रवादीच्या पायात नाही. यापेक्षा दुसरी म्हण काय लागू पडू शकते. म्हणून या गोष्टी आता जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. तालुक्याची रिपोर्टींग करण्याची जबाबदारी तुमची आहे. कारखाना बंद पडल्यानंतर जेव्हा कामगारांच्या बायका लोकांचे धुनीभांडी करण्याची कामं शोधतील, तेव्हा हे पदाधिकारी लक्ष घालणार आहेत का? असा प्रश्न पक्षातील ज्येष्ठ नेते विचारु लागले आहेत. कारखाना सोडा.! किमान पक्षांतर्गत असणारे वाद तरी तुम्ही मिटविले पाहिजे. अन्यथा तुमचेच नेते तुमच्याच नेत्यांना बेईज्जत करतील आणि विरोधकांचे फावले जाईल. फक्त "ताप निघून गेल्यावर ढोस" देऊ नका म्हणजे झालं, अन्यथा पक्षाला साईड इफेक्टल सामोरे जावे लागेल हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.

             

एकंदर आता यावर पर्याय काय? तर, खरोखर पवार कुटुंबाला पिचड यांना एकटे पाडायचे की नाही? हे ठरवून घेतले पाहिजे, तालुक्यात जुनी राष्ट्रवादी आणि नवी राष्ट्रवादी यांच्यात एकोपा घडवून आणला पाहिजे. राष्ट्रवादीत नेतृत्व कोणी करावं? हे खुद्द पवार साहेबांनी सांगितले पाहिजे, येथील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार यांच्या जबाबदार्या नेमून दिल्या पाहिजे, पक्षात जे वशील्याचे तट्टू तथा जे कार्यक्षम नाहीत ती पदे रिक्त करुन नव्याने भरले पाहिजे, जिल्ह्यातील नेत्यांनी या तालुक्याकडे काना डोळा न करता येथील यंत्रणेवर लक्ष दिले पाहिजे, संघटन आणि नियोजन शुन्य असलेल्या नेत्यांचे थोडेफार कान फुकून त्यांना धडे दिले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमदार साहेबांनी तालुक्याच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थापनात लक्ष घालून स्वत: कमी पळून नियोजनपुर्वक काम केले पाहिजे. तर,  सध्या कारखाण्यात बी.जे देशमुख आणि गायकर पाटील हे पक्षांतर्गत युद्ध सुरु आहे. जे विरोधकांना पौष्टीक आहे. ते थांबविले पाहिजे. तरच या तालुक्याची जनता राष्ट्रवादीला माफ करेल. अन्यथा यांची भेट फार काळ दुर नाही.

            आता अखेरची गोष्ट अशी की, देशमुख आणि गायकर यांच्यातील पक्षांतर्गत वादामुळे, आज जे राष्ट्रवादीत आहेेत हे नेते डबल नव्हे टिबल गेम खेळताना दिसत आहेत. जसे की, गायकर साहेबांना सांगायचे आम्ही तुमच्या बाजुने आहोत, पुन्हा देशमुख यांना म्हणायचे तुम्ही बोलतात ते खरेच आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तर रात्री आणि पहाटे जाऊन पिचड साहेबांच्या दारात जाऊन मुजरा ठोकून यायचा. साहेब.! फक्त तुम्ही म्हणाल तसे. असा काही राजकीय बाजार भरला आहे. खरंतर बी.जे.देशमुख सर सांगतात ते खोटे नसेलही. परंतु, तेच तेच मांडून त्यांनी त्याचे भांडवल न करता त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कारखाना वाचवायला केला पाहिजे. साहेब, कर्ज नक्की आहे. पण, ते फेडण्यासाठी तुमच्यासारखे अभ्यासू लोक असतील तर कारखाना वाचावा ही तुमची अपेक्षा आहेच ना.! मग झालं गेलं त्याची चौकशी सुरु आहेच. पण, आता तो वाचेल कसा? यावर चर्चा केली पाहिजे. त्यातून तोडगा काढला पाहिजे. तुम्ही अभ्यासक तथा उत्तम प्रशासक आहात यात तिळमात्र शंका नाही. मात्र, आता तालुक्याच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा तुम्ही स्वत: मलम व्हावे अशी प्रत्येकाची ईच्छा आहे. त्यामुळे, आरोप प्रत्यारोप न करता तालुक्यात जसे आमदार होण्यासाठी काही सुज्ञ व्यक्तींनी मध्यस्ती केली. तशी मध्यस्ती तालुक्याची धनलक्ष्मी वाचविण्यासाठी केली पाहिजे. यात स्वत: डॉ. लहामटे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, मधुकर नवले, विजय वाकचौरे, अशोक भांगरे, डॉ. अजित नवले, विनयजी सावंत, कॉ. शांताराम वाळुंज अशा काही व्यक्तींनी एक होऊन प्रयत्न केले पाहिजे. तरी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी तालुक्याच्या विनंतीला मान देऊन अगस्ति कारखाना नको त्या रुपाने चर्चेला येण्यापेक्षा या वादाचा सोक्षमोक्ष लावावा असे आम जनतेचे मत आहे.